शनिवार, २३ मे, २०२६

2856. लक्षणं जिवंतपणाची

 कोणी पोरं क्रिकेट खेळताना दिसली की एक तरी ओव्हर खेळावीशी वाटते.
घरी जाताना टीव्हीच्या दुकानासमोर गर्दी दिसली तर रस्त्यावर थांबून चार बॉल मॅच बघावीशी वाटते.
ग्राउंडवर मॅच दिसली की बॅटला बॉल लागल्यावरचा आवाज ऐकावासा वाटतो.
रिक्षाचा पोंगा दिसला की वाजवावासा वाटतो.
वडाच्या पारंब्या दिसल्या की झोका घ्यावासा वाटतो.
चिंचेचं झाड दिसलं की एक तरी बुटुक हाताला येतं का बघावंस वाटतं.
लगडलेल्या कैऱ्या दिसल्या की दगड मारावासा वाटतो.
पाण्याचं तळं दिसलं की चपट्या दगडाने भाकऱ्या पाडाव्याश्या वाटतात.
मित्र भेटले की कोणाचा इन केलेला शर्ट मागून बाहेर काढावासा वाटतो.
कोणी खुर्चीवर बसायच्या आधी ती खुर्ची ओढावीशी वाटते.
मैत्रीणीला झुरळाची नायतर पालीची भीती दाखवायला आवडतं.
फ्रुटी पिऊन झाली तरी त्यातून शेवटचा थेंब येईपर्यंत फूर्-फूर् आवाज काढवासा वाटतो.
रिकामी प्लास्टिक ची पिशवी फुगवून अचानक कोणाच्यातरी मागे फोडावीशी वाटते.
वाढदिवस साजरा झाल्यावर फुगे उंच उडवावेसे वाटतात.
तेच फुगे नंतर फोडावेसे वाटतात.
जिन्याचा लाकडी कठडा दिसला की त्यावरून घसरावसं वाटतं.
शेजारची बेल मारून पळून जावसं वाटतं.
एखाद्या गाडीच्या टायरमधली हवा काढायचं नाटक, तोंडानी सूऽऽ आवाज काढवासा वाटतो.
मॉल मधल्या ट्रॉलीची गाडी गाडी करावीशी वाटते.
रिकामा फळा दिसला की त्यावर डोंगर, नदी, नारळाचं झाड, घर, पक्षी काढावेसे वाटतात.
गेलेले दिवे आल्यावर, मेणबत्ती सगळ्यात आधी विझवावीशी वाटते.
पेट्रोलचा, स्पिरिटचा वास छान वाटतो.
सोसायटीत कोणी सायकल चालवताना दिसलं की वाढलेल्या वजनासह एक तरी राउंड मारावीशी वाटते.
पहिल्या पावसानंतर गाडीवरचा वडापाव खावासा वाटतो. 
रात्री काहीही कारण नसताना, भूक लागते आणि फडताळातले डबे ढुंडाळून क्रीम बिस्कीट खावंसं वाटतं, नायतर फ्रिजमधली चॉकलेट खावीशी वाटतात. वेफर्सचा, फरसाणाचा डबा फस्त होतो
मलई बर्फी, गुलाबजाम, जिलबी आणि असे गोड काही दिसले की ज्याचं एकावर समाधान होत नाही. पैज लावून खावंसं वाटतं.
मोगरा, जुईचा गजरा दिसला की घ्यावासा वाटतो. घमघमाट मनात थेट पोहोचतो.
विजेची कोर आकाशात दिसली तर रस्त्यात थांबून झूम करून फोटो काढवासा वाटतो.
पूर्वीच्या सुंदर नट्यांचे फोटो दिसले की क्षणभर बघावेसे वाटतात.
आपकी आखोमे, कुछ मेहेके हुएसे राज है, अशी गाणी सलग चार वेळा ऐकावीशी वाटतात. 
बालगंधर्व रंगमंदिरात संशयकल्लोळ नाटक पुन्हा एकदा बघावंस वाटतं.
ट्रीपला जाताना जुनी मराठी गाणी ऐकावीशी वाटतात.
कोकणात एक छोटं घर हवं असं वाटतं.
आणि
श्यामची आई सिनेमा बघताना आजही डोळ्यात पाणी येतं.
वाढणारं वय हा केवळ एक आकडा आहे.
नुसता श्वास चालतोय म्हणून माणूस जिवंत नसतो.
हे ज्यांना वाटतं, असंच करावंसं वाटतं, त्यांची जिवंतपणाची लक्षणं यापेक्षा वेगळी नसतात.
अशीच लक्षणं तुमची देखील असतीलच.... 😊
आणि अशीच लक्षणं जोपर्यंत तुमच्यात आहेत, तोपर्यंत तुम्ही मनापासून जिवंत आहात हेही निर्विवाद सत्य आहे.
🥰

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...