शनिवार, २३ मे, २०२६

2822. जबाबदारी एक गरज

 प्रभात रोडवर राहणारं एक सुखवस्तू कुटुंब. मोठा बंगला, कुटुंब प्रमुख काही वर्षांपूर्वी निवर्तले. घरामध्ये चार माणसं.  त्या, त्यांचा धाकटा मुलगा, सून आणि त्यांचा पाच वर्षाचा छोटा मुलगा. मोठा मुलगा, त्याची बायको, एक मुलगा असे सिंगापूरमध्ये राहतात. मुलगी न्यूयॉर्क मध्ये राहते वर्षातून एकदा तरी ती येते. तिच्या सासु सासऱ्यांना भेटायला, मग चार दिवस इकडे. मुलाचं बरेच वर्षात इकडे येणं झालं नाहीये. घर खूप मोठं आहे, स्वयंपाक करायला एक वेगळी बाई, साफसफाई करायला भांड्याला मावशी. एकूण काय सुखवस्तू कुटुंब.
      एका रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं, तातडीने मुलाने जवळच असलेल्या सह्याद्रीमध्ये ॲडमिट केलं. सीनियर डॉक्टरशी बोलणं केलं, डॉक्टर असलेल्या मित्रांना कन्सल्ट केलं. ताबडतोब अँजिओग्राफी केली आणि लक्षात आलं की ७० टक्के ब्लॉकेज आहे. त्यामुळे अँन्जिओप्लास्टीला पर्याय नाही. रात्रीमध्येच अँजिओप्लास्टी केली. धाकटा मुलगा ऑपरेशन थिएटर च्या बाहेर येरझाऱ्या घालत होता, रात्री त्याने बायकोला फोन करून सांगितलं, सगळं ठीक आहे काळजीचं कारण नाही, तुम्ही दोघे झोपा म्हणजे सकाळी तू इथे येऊ शकशील. हा फोन संपल्यानंतर त्याने मोठ्या भावाला आणि बहिणीला व्हाट्सअप व्हिडिओ कॉल केला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्या दोघांनी आईची काळजी घे, काही लागलं तर सांग आणि पैशाची काळजी करू नकोस असा दिलासा दिला. त्याने आईसाठी केलेल्या धावपळीचे आणि प्रयत्नांच कौतुक केलं. हा डोळे मिटून भिंतीला टेकून बसला होता. झोप लागणं शक्य नव्हतं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टर आले. सगळं ठीक आहे सांगितलं. पण काळजी घेणं आवश्यक आहे. 
     सिव्हीयर अटॅक येऊन गेला आहे. आता त्यांना आय.सी.यू. मध्ये किमान २४ तास ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात येईल. थोड्या वेळाने त्यांना ऑपरेशन थिएटर मधून आय.सी.यू. मध्ये शिफ्ट केलं. त्याने घरी फोन करून जरी सांगितलं असलं तरी हिला झोप अजिबात लागली नव्हती. सकाळी उठून तिने उपमा केला डब्यात भरला, मुलाला शाळेत सोडलं आणि हॉस्पिटल गाठलं हा बाकावर बसलेला बघून तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हा जागा झाला याने सगळं सांगितलं तिला. पुरुष शक्यतो डोळ्यातून पाणी येऊ देत नाहीत. रात्रभर जागरणामुळे पित्त झालं होतं, डोकं दुखत होतं, तिने त्याला उपमा खायला दिला. आय.सी.यू.मध्ये जाऊन सासूबाईना बघितलं. त्या ग्लानीत होत्या. त्यांचा हात हातात घेतला. डोक्यावरून हात फिरवला. इतक्यात नर्स आली आणि तिने सांगितलं की अजून एक तासाने त्यांना थोडं पाणी दिलं तरी चालेल.  ही बाहेर आली, नवऱ्याला सांगितलं की तू आता घरी जा, फ्रेश हो, झोप थोडावेळ म्हणजे बरं वाटेल. मी आहे इथे, तू अजिबात काळजी करू नको. लेक शाळेतून येईल. त्याने डोळ्याने हो म्हणलं आणि निघाला.
     ही आय.सी.यू.च्या बाहेर बसली होती. मनात विचार आला, किती अचानक गोष्टी घडतात, सगळं बदलून जातं. काल पर्यंत ठीक असलेलं सगळं विस्कटून जातं. हा घरी गेला फ्रेश झाला, मेडिक्लेमचे पेपर्स काढले, बेडवर आडवा झाला बायको तिकडे आहे, काळजीचं कारण नाही या विचारात क्षणात गाढ झोप लागली. ही आय.सी.यू.मध्ये गेली, सासूबाईना जाग आली होती, त्यांनी हिच्याकडे बघून डोळ्याने ठीक आहे सांगितलं, हात पुढे केला, हिने तो दोन्ही हातात धरला, आश्वस्त केलं. म्हणली काळजी करू नका, सगळं ठीक आहे, हा रात्रभर इथेच होता, आत्ताच घरी गेलाय, आज आय.सी.यू.त राहायचं आहे. मानेने त्यांनी हो म्हणलं. एक दिवस ऑब्झरव्हेशन मध्ये आणि नंतर दोन दिवस प्रायव्हेट रूममध्ये असा मुक्काम झाला. या दरम्यान दोघांनी आपल्या वेळा ठरवून सगळं नीट मॅनेज केलं. डिस्चार्ज मिळून त्या घरी आल्या. नातवाने आज्जी हाक मारून मिठी मारली.
मुलगा आणि सून जवळ असताना, त्यांनी विचारलं त्या दोघांना कळवलं कां ? तो येणार आहे कां ?..
हो कळवलं गं .....
काय म्हणाला ? 
तो उत्तर टाळत म्हणाला. आई मी आहे ना इथे, तू कशाला काळजी करत्येस? इतक्या लांबून ताईला येणं शक्य नाहीये, दादा'चा नवीन जॉब आहे, कामाचं खूप लोड आहे ग.
आईला जे समजायचं ते समजलं. सिंगापूरहून मला बघायला येणं शक्य नाहीये यावर विश्वास नव्हता. या दोघांच्या प्रयत्नांनी मरणाच्या दारातून परत आल्या होत्या, दोघांबद्दल खूप दाटून आलं होतं. आठ दिवसात त्यांना चांगलंच बरं वाटलं. नेहमीचं जेवण घ्यायला सुरुवात झाली. मुलाला बोलवून सांगितलं की कपाटातून माझं मृत्युपत्र काढ. त्याला कळेना, आई हे का मागत्ये. आई अग तू पूर्ण बरी हो, डॉक्टरने कोणताही विचार नको करू असं सांगितलं आहे, फक्त आराम करायला सांगितलं आहे.तू दे मला. याने नाईलाजाने ते काढून दिलं. त्यांनी ते एकदा बघितलं आणि चक्क फाडून टाकलं. याला प्रचंड आश्चर्य वाटलं, 
आई अग हे काय केलं ? आमच्या तिघांच्या समोर केलं असतं तर समजू शकतो. मी एकटा असताना असं केल्यावर त्या दोघांना काय वाटेल ?
जे वाटायचं ते वाटू देत. मला ते मृत्युपत्र बदलायचं आहे.
आई अग कां पण ? आम्हा तिघांना समान दिलं आहेस की, अजून काय ग?.
जर हक्क समान असेल तर जबाबदारी पण सारखी हवी. तो पैसे कमवायला गेलाय याबद्दल काही माझं म्हणणं नाहीये, पण ज्या क्षणी कळलं, तेव्हा किमान एकदा तरी म्हणाला कां, मी चार दिवसांनी येतो. नाही नां ?
मी उगाच रागराग करत नाहीये. मला हेही मान्य आहे की कळल्यावर लगेच विमान पकडून यायला जमणार नाहीये,
पण तुला मदत करायला आश्वस्त करणं गरजेचं होतं. लगेच नाही तरी आठ दिवसानी येईन म्हणायला हवं होतं. आपलं माणूस जवळ असणं आणि त्याने वेळेवर मदत करणं गरजेचं. मदर्स डे किंवा फादर्स डे ला विश नाही केलं तरी चालेल पण खरी मदत लागेल त्यावेळी कारणं न सांगता जबाबदारी घेणं म्हणजे खरं विश करणं.

पराग दामले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...