शनिवार, २३ मे, २०२६

2824. दोरी

     मी आज सकाळी माझी जुनी डायरी चाळत होतो आणि लक्षात आलं की, गेल्या ३ वर्षात मी अशा १० लोकांशी मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्याशी माझं कधीच पटत नव्हतं. आपण किती वेडे असतो ना? फक्त एकटं पडू नये म्हणून आपण अशा ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करतो, जिथं आपली जागाच नसते. ही माझ्या चुकीची कबुली मलाच देताना एका जुनी बोधकथा आठवली, जी आजच्या धावपळीच्या जगात अगदी चपखल बसते.
     कल्पना करा, एक छोटासा उंदीर आहे. त्याला वाटतं की एका बेडकाशी मैत्री करावी. मैत्री तर झाली. पण उंदराला भीती होती की बेडूक त्याला सोडून जाईल. मग त्यानं काय केलं? एक दोरी घेतली आणि आपला पाय बेडकाच्या पायाला घट्ट बांधून टाकला. त्याला वाटलं, 'आता आपण कायम सोबत राहू, एकत्र मजा करू.' आणि मग काय झालं? बेडूक तर पाण्यातला राजा. त्याने सवयीप्रमाणे तलावात उडी मारली आणि तो आरामात पोहू लागला. पण बिचारा उंदीर? त्याला पोहता येत नव्हतं. तो पाण्यात गुदमरला आणि काही वेळातच मेला. त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागला.
     इतक्यात आकाशात एक ससाणा शिकार शोधत उडत होता, त्याला पाण्यात तरंगणारा उंदीर दिसला. त्याने खाली झडप घातली आणि उंदराला आपल्या नख्यांत पकडून वर उडाला. पण उंदराचा पाय तर बेडकाला बांधलेला होता. उंदरासोबत तो जिवंत बेडूकही आकाशात ओढला गेला. शेवटी एका उंच कड्यावर आदळून त्याचाही अंत झाला.
आपल्याला वाटतं की, उंदीर बेडकामुळं मेला आणि बेडूक ससाण्यामुळे मेला.
नाही तसं नाही, त्या दोघांना ‘दोरी’नं मारलं, ज्या दोरीनं त्यांना जबरदस्तीनं, एका नात्यानं गुंतवून ठेवलं होतं.
     आपल्या आयुष्यातही असंच होतं. मंडळी, जिथं आपण ‘फिट’ होत नाही, तिथं आपण उगाचच सामावून जाण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावर सध्या ‘रिलेशनशिप डिटॉक्स’चा जो ट्रेंड सुरू आहे, तो उगाच नाही. आपण जितका जास्त ओढून-ताणून नातं टिकवायचा प्रयत्न करतो, तितकंच आपण आतून तुटत जातो. जबरदस्तीची नाती कधीच दिलासा देत नाहीत, ती फक्त गुदमरवून टाकतात. विचार करा. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी ‘दोरी’ तर नाही ना, जी तुम्हाला नको असलेल्या दिशेला ओढून नेतेय?
नातेसंबंध हे श्वासासारखे मोकळे असावेत
फासासारखे आवळलेले नकोत, नाही का?



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...