शनिवार, २३ मे, २०२६

2869. धग

 तिच्या मैत्रीणी सोबत बसली होती ती काॅफी पित, कुठल्याशा हाॅटेलमध्ये. एकमेकींत काहीतरी संवाद घडून, आता दोघीही शांतच बसून होत्या. मैत्रीणीने हातातला काॅफीचा मग टेबलवर ठेवत, तिच्या हाताला आपला हात लावला. मग तिचा दंड आपल्या हाताने धरला. पुढे तिच्या गालावरही हात ठेऊन पाहिला तिने.
"Its absolutely normal"
"हो... आत्ता... ह्या क्षणी... कारण... कारण तू मला हात लावतीयेस"
"काय बोलतीयेस तू?"
"Believe me... हे... हे माझं अंग... हे असं नसतं... I mean... दिसत असेल असंच may b... पण... पण हात लावल्यावर चटका बसावा समोरच्याला, इतकं तापलेलं असतं ते"
"It is so ridiculous"
"Yess... It is... पण... पण हे खरंय"
"------"
"तुला सांगते... मला जेव्हा कधी कोणी पुरुष... I mean परपुरुष हात लावतो ना, तो सहनच करु शकत नाही, माझ्या अंगाचा चटका"
"हे कसं शक्य आहे?"
"I don't know... but its actually happening with me"
"म्हणजे तुला म्हणायचंय की... ह्या तुझ्या वयाच्या पस्तीशीतच, तुझ्या सगळ्या शारीरीक भावना मेल्यायत?... u are not interested in it anymore?... आणि म्हणून हे असं..."
"नाही... खोटं का बोलू?... अजिबातच नाही मेल्यायत भावना... तीन वर्षांपुर्वी तो गेला... पण त्याच्या नंतर मी अगदी कसोशीने प्रयत्न केला, स्वतःला सांभाळायचा... आणि सांभाळलंही... मन तर सांभाळलंच, आणि शरीरही... पण... पण माझीही नैसर्गिक गरज होतीच की, ती तर येणारच ना उचंबळून... आणि तेच तर सांगतीये तुला... गेल्या वर्षभरात, तीनदा असे मोहाचे क्षण आले माझ्यासमोर... जेव्हा मी माझं सर्व काही उतरवून, माझं सर्वस्व बहाल करायला तयार झाले होते... पण... पण ते तिघेही माझ्या अंगाशी आले, नी अक्षरशः काहीतरी पोळल्यासारखे लांब झाले माझ्यापासून... पेटतं अग्नीकुंडच झालं होतं, जसं काही शरीर माझं"
"अगं पण कसं काय? I mean... how the hell its possible?"
"मी ही तोच विचार करत होते सतत... आणि... आणि मला बहूतेक त्याचं उत्तर मिळालंय"
"काय? तुला उत्तर मिळालंय?"
"I think so... परवा माझ्यापासून झटकन लांब होतांना तो बोलला... ठिणग्या ओकून नुकत्याच शमलेल्या, फुलबाजी सारखी भासतीयेस तू... लालबुंद, तप्त... कुठलीशी भयानक 'धग' बाहेर पडतीये तुझ्या अंगातून... 'धग'... yess... thts the word"
'प्लिज जरा कळेल असं काहीतरी बोलशील?"
"वयाच्या बत्तीसाव्या वर्षी मला वैधव्य आलं... म्हणजे ज्या वयात स्त्री ही पुर्णतः फुलून, तिच्या वसंताच्या ऐन बहरात असते... त्याच वेळी मी माझ्या, हक्काच्या शरीरसुखापासून वंचित झाले... माझ्या नवर्‍याची जेव्हा चिता पेटत होती, मी थ्रुआऊट तिथे बाजूलाच उभी होते... अगदी ती चिता शांत होईपर्यंत"
"So what?... म्हणजे समाजमान्य नियम झुगारुन देत, तू स्मशानात गेलीस... आणि नवर्‍याच्या चितेजवळ शेवटपर्यंत थांबलीस, त्याबद्दल मला कौतुकच आहे तुझं... कारण ज्या एखाद्याच्या जाण्याने ज्या एका व्यक्तीला सर्वात जास्त फरक पडतो, तिने त्याला घरीच निरोप द्यायचा?... स्मशानापर्यंतची शेवटची सोबतही करायची नाही?... आणि कारण काय तर ती एक बाई आहे?... its all rubbish... so whtever u did, is absolutely right for me"
"पण... पण आता असं वाटतंय मला, की मी नसते गेले तर?... rather तिथे... त्याच्या चितेजवळ थांबले नसते, तर बरं झालं असतं"
"What? काय बरळतीयेस?"
"हो... ते पुर्ण दोनेक तास, मी त्या चहूबाजूनी उडणाऱ्या ठिणग्यांमध्ये होते... त्या भस्सकरून पेटलेल्या, आगीच्या लोळांच्या धगीत होते... आणि... आणि तिच 'धग' कदाचित तेव्हा तिथे जळणारा माझा नवरा, माझ्याभोवती एखाद्या सुरक्षा कवचा सारखी लपेटून ठेवत होता... जेणेकरुन त्याच्या व्यतिरिक्त, आणिक कुठलाही पुरुष माझ्या कधीही जवळ येऊ शकू नये"
"R u nuts?... असं कसं असू शकेल?"
"तुला सांगू... त्या रात्री माझा नवरा, जवळ आला होता माझ्या... पण भयंकर दमले होते मी... खूप प्रयत्न केला त्याने... समजावून... अंगचटीला येऊन... थोडसं धुसफुसून... पण मी त्याला अगदीच रिस्पाॅन्स दिला नाही त्या रात्री... मग चिडचीड करतच तो, माझ्याकडे पाठ करुन झोपला... नंतर काहीवेळ त्याची चुळबूळही जाणवत होती मला... आणि त्यातच मला गाढ झोप लागली... थेट सकाळी जेव्हा डोळा उघडला, नवर्‍याची चुळबूळ कायमची थांबली होती... he was dead may b in middle of the night, due to a massive heart attack... मी... मी त्या रात्री त्याला संमती दिली नाही माझ्या अंगाशी यायची... आणि आता... आता तो ती संमती देत नाहीये दुसर्‍या कुठल्याच पुरुषाला, माझ्या अंगाशी येण्याची... त्याच्यातील ती पुरुषी अतृप्तता, त्याच्या चितेची 'धग' होऊन माझ्या अंगाभोवती विळखा मारुन बसलीये... परपुरुषापासून मला दूर ठेवतीये ती 'धग'... त्यामुळेच आता या पुढे शरीरानेच नाही, तर मनानेही होरपळतच दिवस काढायचेत मी"
तिची मैत्रीण सुन्न झाली होती, हे सारं काही ऐकून. मेल्यानंतरही एखाद्याचं, एखाद्या शरीरावरचा हक्क न सोडणं अनुभवून. त्या अस्वस्थतेतच काॅफीचं बिल पेड करुन, उठल्या दोघी जागच्या. जाता जाता तिने पर्समधून दहा रुपये काढून, तिथल्या वेटरला दिले. जे घेतांना त्याच्या बोटांचा, तिच्या बोटांंना हलकासा स्पर्श झाला. आणि तीव्र चटका लागल्यासारखा, हात झपकन मागे घेतला त्याने. तिने तिच्या मैत्रीणीकडे पाहिलं. मैत्रीणीने पुन्हा तिच्या हाताला हात लावला. 
तिचं अंग... व्यवस्थित नाॅर्मलच जाणवलं होतं मैत्रीणीला.

- सचिन श. देशपांडे
😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...