शनिवार, २३ मे, २०२६

2835. मीरा

 "अगं बाळा तू मुलगी आहेस, मुलींना दाढी मिशी येत नाही मग सांग बरं ते न्हावी काका कशी करतील तुझी दाढी? दादा तुझ्याच एवढा आहे पंधरा वर्षाचा पण तो मुलगा आहे म्हणून त्याला दाढी मिशी आली आहे. न्हावी काका त्याची दाढी करून द्यायला आले आहेत आपल्या घरी..! "
" न्हाई न्हाई, मला पण करून द्या हो न्हावी काका दाढी दादासारखी , त्याची झाली की ..! "
" नाही बेटा मुलींना करावी लागत नाही दाढी."
" करा करा करा, करा म्हणते ना मी.मग करा नाहीतर मारीन मी "
...म्हणत वेदिका ने काही कळायच्या आत हाताशी होता तो तांब्या नाव्ह्या च्या तोंडावर फेकून मारला...! चटकन उठून तो बाजूला झाला. बरोबर डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर लागल्याने तो कळवळला. खोप पडली होती , रक्त डोळ्यावरून गालावर ओघळू लागलं होतं..! त्याने त्यावर रुमाल दाबून ठेवल्याने थोड्यावेळात ते थांबलं..! मीरा ने लगेच फ्रिज मधून थंडगार पाणी आणून त्याला दिलं , अचानक हे झाल्यामुळे तो ही घाबरला होता..! रागावून काही उपयोग नव्हता म्हणून मीरा वेदिका ला आत घेऊन गेली , वेद ची दाढी फक्त एकाबाजूचीच झाली होती पण तो ही त्यांच्या मागे आत निघून गेला ..! नाव्ही एकटाच बाहेर हॉल मधे बसला होता , जखमेतल्या वेदनेमुळे त्याला बसवत ही नव्हतं आणि काम अर्धवटच झालं होतं म्हणून न सांगता जाता पण येत नव्हतं..!
*******
 समोरच्या भिंतीवर हार घातलेल्या फोटोकडे त्याचे लक्ष गेले. अजयचा फोटो होता तो. मीराचा नवरा. दाढी कटिंग साठी त्याच्याकडेच यायचा.  पंधरा वर्षापूर्वी बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असतांना मीराला हॉस्पिटल मधे घेऊन जावं लागलं. अगदी वेळेवर पोहोचले होते ते, इनमीन अर्ध्या तासात मीराला जुळे झाले. एक मुलगा एक मुलगी. दोघेही डिलिव्हरी नंतर जवळपास वीस मिनिट रडले नाहीत. त्यात मीराला ब्लीडींग फार होत होतं. ताबडतोब तिला ब्लड द्यावं लागणार होतं. मुलांना बघावं की मीराला, डॉक्टर्स नर्सेस सगळ्यांची धावपळ सुरू होती.  नेमकं तिच्या ग्रुपच ब्लड हॉस्पिटलमधे अँव्हेलेबल नव्हतं म्हणून अजय ते आणायला भरधाव वेगात एवढ्या पावसात कारने निघाला होता. स्वच्छ दिसत नव्हतं. एका डिव्हायडरला धडकून तो ऑन द स्पॉट गेला होता. इकडे हॉस्पिटल मधे रक्ताची सोय झाली होती त्यामुळे मीरा वाचली  होती पण अजय गेल्याचे कळल्यावर ती धक्क्याने पुन्हा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आली तेव्हा दोन्ही बाळं भुकेने रडत होते. मीराने दोघांना आलटून पालटून जवळ घेत शांत केलं , इथे नर्सेस होत्या मदतीला, घरी गेल्यावर कसं होईल ह्याची पहिल्यांदाच तिला काळजी वाटली. आठ दिवसानंतर डिस्चार्ज झाल्यावर मीरा दोन्ही बाळांना घेऊन एकटीच घरी आली होती..! दोन बाळांना सांभाळणं एकटीला मोठं काम होतं. दिवस कसा निघून जायचा कळायचं नाही ..!  ती स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर होती, रात्री दोन वाजेपर्यंत एका अमेरिकन कंपनीत ' वर्क फ्रॉम होम ' चालायचं तिचं , सकाळी उठून पुन्हा मुलांच्या मागे..!
******
चार वर्षानंतर चेकअप ला आलेल्या डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की मुलांच्या मेंदूची वाढ म्हणावी तशी होत नाहीये ,  ह्यांची बुद्धी इतरांपेक्षा बरीच मंद राहील तेव्हा मीरा हबकली. आधीच मुलं जन्मल्या पासून त्यांना वाढवायची जबाबदारी तिच्या एकटीवर येऊन पडली असतांना होता तो त्रास कमी की काय ते नॉर्मल नाहीत ह्याचा अतिरिक्त शारीरिक आणि मानसिक त्रास तिला सहन करावा लागणार होता. पण तरी खचून न जाता त्याही परिस्थितीत तिनी मुलांना हुशार बनवून आपल्या पायांवर उभं करायची जिद्द मनोमनी बाळगली ..! पण तरी तिचं तिलाच कळत नव्हतं की दोन मतिमंद मुलांना ती एकटी कशी सांभाळणार? आपलं पूर्ण आयुष्य ह्यातच जाईल पण इतकं करून मुलं आपल्या पायावर उभे राहू शकतील ह्याची खात्री नसल्याने कधी कधी तिचं अवसान गळून पडायचं. अनेकदा रात्री ऑफिस काम आटोपल्यावरही तिला झोप यायची नाही पण तिने खंबीरपणे घेतलेला. काहीही झालं तरी मी दोघांनाही मोठं करीन, जमेल तेवढं हुशार बनवण्याचा प्रयत्न करत राहीन ' हा निश्चय पक्का होता ..!
 निश्चय पक्का होता खरा पण हे काम किती कठीण आहे ह्याचा अनुभव पंधरा वर्षात तिला भरपूर आला होता..!
******
वेद पण अर्ध्यातून उठून गेल्याने दोन्ही मुलं आत खोलीत होते.  नाव्ही मीरा बाहेर येण्याची वाट बघत बसला होता , वेदिका पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून मीराने खोलीचे दार बाहेरून बंद केले होते. वेदची दाढी जरी अर्धीच झाली होती तरी तिने न्हाव्याला पूर्ण पैसे दिले शिवाय कपाळावर झालेल्या जखमेच्या औषधोपचारासाठी वेगळे दोनशे दिले..!
तेवढ्यात मीराने खोलीचे दार उघडावे म्हणून वेदिका आतून जोरजोरात दाराची कडी वाजवत आवाज देत होती म्हणून मीराने पळत जाऊन कडी उघडली पण दार उघडेना, वेदिका कडी वाजवत असतांना बहुतेक चुकून आतून कडी लागून गेली होती. मीरा ला खूप टेन्शन आलं , दोघांनाही आतून कडी उघडा सांगून उपयोग नव्हता , ते त्यांना कळालं नसतं..!
***
पंधरा वर्षाचे वेद आणि वेदिका दोघेही तारुण्याच्या उंबरठ्या वर होते. ती एक वेगळीच काळजी वजा भीती मीराच्या मनात होती. एकदा असंच ती रुम मधे गेली असतांना वेद सगळे कपडे काढून बेडवर झोपलेला दिसला. सुदैवाने वेदिका डोक्यावर पांघरून घेऊन दुसरीकडे तोंड करून झोपली होती म्हणून बरं...!  रुममधे मीरा ने तिघांना पुरेसा होईल असा बेड करून घेतला होता. दोघांच्या मधे ती झोपायची पण त्यानंतर तिने वेद चा बेड वेगळा करून घेतला होता. मोठ्या बेड वर ती आणि वेदिका दोघीच झोपायच्या ..!
आत्ता दाराची कडी आतून उघडणं भाग होतं. रात्र होण्यात होती. फक्त दोघांनी एका खोलीत राहणं मीराला सेफ वाटत नव्हतं. तिनी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून दाराला जोरात धक्का दिला. दार उघडलं. मीराच्या जीवात जीव आला ..!
वयाच्या पाचव्या वर्षापासून मीरा त्यांना साध्या साध्या गोष्टीं बरोबर मराठी इंग्रजी भाषा ही शिकवत होतीच पण आता तिने त्यांना स्व संरक्षणाच्या गोष्टीही शिकवल्या होत्या..! पुढील दहा वर्षात दोघेही कॉम्प्युटर शिकले. मोबाईल हाताळणं शिकले. मराठी इंग्रजीत संवाद करणं शिकले. सगळं तिनेच शिकवलं, इतर नॉर्मल मुलांच्या बरेच मागे होते तरी पण त्यांच्या सारख्या इतर मतिमंद मुलांमधे ते सगळ्यात पुढे होते ..! ईश्वर कृपेने दोघांनाही चाळीसाव्या वर्षी त्यांच्यात झालेल्या प्रगती मुळे मेडिकल सबस्क्रिप्शन सर्व्हिसेस मधे पुरेशा पगाराचा जॉब मिळाला , विशेष म्हणजे त्यातही 'वर्क फ्रॉम होम ' ची सवलत मिळाली होती ..! मीराचे स्वप्न पूर्ण झाले होते , दोघांनाही तिने कठीण परिस्थितीत आपल्या पायावर उभं केलं होतं..!
     मीरा आता वयाच्या सत्तरी च्या आसपास आली होती. जाड चष्मा लागला होता. केस पूर्णतः पांढरे झाले होते , चेहऱ्यावर कर्तव्य पूर्तीच्या समाधाना आड थोडा थकवाही  दिसू लागला होता पण जॉब मात्र तिचा अजूनही सुरू होता. डिलिव्हरी नंतर  तिला अनेक दुःखे झेलावी लागलीत. थोडीही उसंत तिला मिळाली नव्हती.  तिच्या स्वतः साठी द्यायला तिच्याकडे वेळ नव्हता. मौज मज्जा हे शब्द तिच्यासाठी राहिलेच नव्हते पण तिला त्याचं महत्वही नव्हतं , तिच्यासाठी कधी न डगमगणं हे महत्त्वाचं होतं.!
घरातल्या हॉलचं आता दिवस रात्र उघडं असलेलं पॉश ऑफिस बनलं होतं. तीन भिंतींना टेकून मीरा, वेद आणि वेदिकाचे ऑफिस टेबल्स व त्यावर त्यांचे लॅपटॉप्स होते. उरलेली चौथी भिंतं अजयच्या फोटोची होती ज्यातून तो तिघांकडेही कौतुकाने बघतांना दिसायचा..!
     परिस्थिती आपल्यावर कशीही ओढवली असो , त्यातून मार्ग काढून सगळं नीट करण्याची जिद्द मनात असली की सगळं कसं बरोबर नीट होतं हे मीरा ने घेतलेल्या अपार कष्टाने दाखवून दिलं होतं..!

डॉ. संजय जहागीरदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...