शनिवार, २३ मे, २०२६

2826. कणा

     अचानक कसलासा आवाज आला आणि रोहिणीबाई दचकून उठल्या. हाताशीच असलेला नाईटलँप लावून त्यांनी चहूबाजूला पाहिलं. भिंतीवरच्या घड्याळात रात्रीचे सव्वातीन झालेले. त्यांची खोली तर थंडीची दुलई पांघरुन शांत निजलेली त्यांना दिसली. पण काहीतरी जमिनीवर पडल्याच्या आवाजापाठोपाठ, त्यांच्या मुलाच्या- अनिषच्या रुममध्ये कसलीशी कुजबूज रोहिणीबाईंना जाणवली. पाचेक महिन्यांपुर्वीच अनिषचं मेघनाशी लग्न झालेलं आणि सगळं तसं आलबेल चाललेलंही.
‘मग ही कुजबूजवजा धुसफूस, ह्या साखरझोपेच्या वेळी का बरं चाल्लीये?’ असा विचार करत रोहिणीबाई पलंगावरून उठल्या. शेजारील स्टुलावर ठेवलेल्या बाटलीतून त्यांनी पाणी प्यायलं आणि तिथूनच पुन्हा कानोसा घेतला… अजूनही आतून बोलाचालीचा आवाज येत होता आणि तो खचितच प्रेमालापाचा नव्हता, हे रोहिणीबाईंनी ताडलं होतं. 
आपल्या बेडरूममधून बाहेर येत, रोहिणीबाई अनिषच्या बेडरूमच्या बंद दाराकडे बघत, किचनमध्ये गेल्या आणि देव्हार्‍यातील देवाला हात जोडत, पुन्हा बंद दाराकडे नजर टाकत स्वतःच्या खोलीत परतल्या. दाराच्या खालच्या फटीतून ट्यूबचा प्रकाश, दोनेक लाद्यांपर्यंत पसरला होता. रोहिणीबाईंनी पलंगावर बसत उशीखाली ठेवलेली माळ काढली नी एकशे आठ वेळा स्वामींचा जप केला.
‘म्हणजे उजेड करून वादावादी चाल्लीये तर…’ असा विचार करतच रोहिणीबाईंनी त्यांच्या मिस्टरांच्या फोटोकडे पाहिलं आणि जरासं प्रकटपणेच म्हणाल्या, “तुम्ही नका काळजी करू… मी आहे.” आणि मंदसं हसत नाईटलँप बंद करून त्यांनी अंथरुणाला पाठ टेकली.  रात्रीच्या ह्या पाऊणेक तासांच्या झोपमोडीमुळं रोहिणीबाईंचा डोळा सकाळी अंमळ उशिरानंच उघडला. त्या उठल्या तेव्हा, दिवा न लावता घड्याळात किती वाजलेत, हे दिसण्याएवढं उजाडलं होतं. रोहिणीबाई घाईतच उठल्या... अंथरुण-पांघरुण आवरुन, प्रातर्विधी आटोपून, त्यांनी चहाचं आधण चढवलं. किचनच्या मुद्दामहून पंधरा मिनिटं पुढं ठेवलेल्या घड्याळात तोपर्यंत आठ वाजले होते.
‘म्हणजे पावणे आठ… आज रविवारच आहे, तेव्हा पोरं काही दहा शिवाय उठायची नाहीत. पोह्यांसाठी चिराचीरी करुन ठेऊ. मुलं उठली की घेऊ करायला… आणि काल रात्री नेमकं काय घडलं दोघांत, तेही विचारू. साधारण अंदाज घेऊन दोघांच्या मूडचा…’ असा विचार करत रोहिणीबाई चहाचा कप घेऊन, हाॅलमधील सोफ्यावर येऊन बसल्या.
पहिला घोट घेतलाच होता त्यांनी की, त्यांना आपल्या रुमचा दरवाजा उघडून मेघना आंघोळ करून, तयार वगैरे होऊन, खांद्यावर एक मोठाली बॅग अडकवून येतांना दिसली.  रोहिणीबाई जराशा चक्रावल्याच. सोफ्यावरून लगबगीनं उठत त्यानी मेघनाला विचारलं,
“काय ग… रविवारचं एवढ्या लवकर तयार होऊन कुणीकडे दौरा…? आणि अनिष कुठाय?”
मेघनानं खांद्यावरची बॅग खाली ठेवली आणि ती मान खाली घालून उभी राहिली. तिच्या गालांवरुन ओघळलेले थेंब रोहिणीबाईंनी पाहिले आणि वेळ न दवडता मेघनाच्या हाताला धरत, त्यांनी तिला सोफ्यावर बसवलं. तिच्या शेजारी बसत, तिचा हात आपल्या हातात धरत त्यांनी तिला तिच्या अस्वस्थतेचं कारण  विचारलं.
मेघना काहीही न बोलता, नुसतीच मुसमुसत होती. तेवढ्यात अनिषही बाहेर आला आणि एकदा मेघनाकडे, एकदा आईकडे पाहत डायनिंग टेबलजवळची खुर्ची ओढून त्यावर बसला. मेघना काही बोलत नाही पाहून, रोहिणीबाईंनी आपला मोर्चा अनिषकडे वळवला आणि त्याला विचारलं,
“नेमकं झालंय काय?”
अनिषनं सांगायला सुरुवात केली. “आई, आमच्या ऑफिसमध्ये एक नताशा म्हणून मुलगी आहे. आय मिन, बाई आहे चाळीशीची. तिचा मला काल रात्री मेसेज आला आणि तो मेघनानं पाहिला, म्हणून ती अपसेट झालीये.” 
मेघनानं आता चेंडू आपल्या कोर्टात आलाय पाहून, तो तटावला. “रात्री अडीच वाजता कुठला मेसेज पाठवला तिनं, ते ही सांग ना... तुमची कुठली UAT सक्सेसफुली रन झाली किंवा तिचं कोणी अचानक गेलं वगैरे सांगणारा मेसेज नव्हता तो… इट वाॅज अ पाॅर्न क्लीप शी सेंट टू यू! …आणि खाली डोळा मारणारे, नी डोळ्यांत बदाम असणारे स्माईलीज… रात्री अडीच वाजता…? रादर ऍट एनी पाॅईंट ऑफ टाईम, ऑफिसमधल्या लेडी कलिगनं अशी क्लीप पाठवावी…? डोन्ट यू फाईंड एनीथींग राँग इन इट?”
अनिष सारवासारव करत सांगू लागला, “मेघना, मी तुला तेच तर सांगत होतो ना ! अगं नताशा मॅड आहे. ती सगळ्यांशीच अशी वागते ऑफिसमध्ये. एकटी राहते, अनमॅरीड आहे. स्वत्ःच्या टर्म्स नी कन्डिशन्सवर आयुष्य जगते. अर्धा खोका CTC घेते आणि तो जेन्ट्सबरोबर पार्ट्या, क्लब्जमध्ये उडवते. पण अर्ध्या रात्री कुणीही तिला फोन करावा, ताबडतोब मदतीला धावून जाते ती. ते ही पैसे घेऊन, परतफेडीची अपेक्षा न ठेवता ! ॲटलीस्ट नाॅट इन टर्म्स ऑफ मनी.
“शी इज व्हेरी हायली क्वालिफाईड, अँड वाॅज रनिंग आवर सिंगापोर ऑफिस अप टू द लास्ट इअर. तिची आई एक्स्पायर्ड झाली आणि ती इथं आली. खूप मोठ्या पोझिशनवर आहे ती. आमच्या CEO ला डायरेक्ट रिपोर्टींग करते. तिच्या हाताखाली सात मॅनेजर्स आहेत, ज्यांपैकी एकाच्या अंडर मी आहे. आय कॅन नाॅट से एनिथींग टू हर डॅमईट! ही अशी लोकं वाकड्यात गेलेल्यांचं, करिअरही बर्बाद करू शकतात. तिचा इगो नाही दुखावू शकत मी, प्लिज अंडरस्टँड धीस फाॅर गाॅड्स सेक !”
अनिष एवढं बोलून, टेबलवर जोरात हात आपटून, खाली जमिनीवर बघत बसून राहिला. मेघनानं संतापून  अनिषला विचारलं, “म्हणजे उद्या ती तुला तिच्याबरोबर नाईट स्पेन्ड करायला सांगेल, तर तू ते ही करणार का? थिंकींग शी वुईल रुईन युवर करीअर, इफ यू से नो टू हर!”
अनिषनं काहीही न बोलता मूठ वळवत, पुन्हा टेबलवर आपटली. मेघना दोन्ही हात तोंडाशी नेऊन, आता हमसून हमसून रडू लागली. इतका वेळ हे सगळं ऐकत, नी बघत असलेल्या रोहिणीबाई बोलू लागल्या.…
“कुणीही कितीही पाॅवरफुल असो. पण आपला कणा गहाण टाकू नये रे कोणापाशी. काय होईल? नोकरी जाईल ना! अरे, दुसरी मिळेल, अर्ध्या पगाराची मिळेल किंवा मिळणारच नाही ना. अरे, स्वतःची कन्सल्टींग सुरू कर. CS आहेस तू. वेळ लागेल जम बसायला. पण पैशाच्या हव्यासापायी, स्वतःला इतकं मिंधं करु नकोस रे कुणासमोर.
“आणि गेलं वर्षभर जर ती बाई त्रास देतेय तुला, तर तू हे आधी का बोलला नाहीस? म्हणजे तुला ते मिळणारे महिना अडीच लाख जास्त महत्त्वाचे वाटले. स्वतःच्या स्वाभिमानापुढे ! ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही, तेही कदाचित अशी पिळवणूक सहन करणार नाहीत. मग तुझ्यासारख्या उच्चशिक्षितांनी का झुकावं अशा हुकूमशहांपुढं?”
आईचं बोलणं ऐकून अनिष म्हणाला, “आई, अगं फक्त इतकंच कारण नाहीये ग. नताशाला धरून राहिलो, तर पुढं-मागं मला साऊथईस्ट एशियाचा हेड करुन, सिंगापोर ऑफीसलाही पाठवू शकते कंपनी आमची. मला खूप चांगले प्राॅस्पेक्ट्स आहेत आई, जर मी नताशाला न दुखावता राहिलो…”
रोहिणीबाईंनी अनिषला विचारलं, “म्हणजे उद्या त्या नताशानं तुला... म्हणजे मेघना मघा म्हणाली तसं काही… म्हणजे मग तू तेही… म्हणजे…”
अनिषनं आईला हातानं थांबवत सांगितलं, “हो आई, मी ते ही करेन. रादर करावंच लागेल. काॅर्पोरेट वर्ल्डमध्ये हे करावंच लागतं, इफ यू रिअली वाॅन्ट टू अचिव्ह समथींग बिग आणि इथं आपल्याला स्वतःच्या बोटांवर नाचवणार्‍यांचं जेंडर नसतं. जितक्या मुली एक्स्प्लाॅईट होतात इथं, तितकीच मुलंही होतात. मुलांचं नशिबच म्हणायचं, जर हे एक्स्प्लाॅईटेशन करणारी, निदान कुणी बाई असेल तर. नाहीतर ‘बायसेक्श्युअल’ बॉसेसही सर्रास असतात इथं !”
रोहिणीबाईंनी कानावर हात ठेवला नी मान वळवली. त्यांनी मेघनाकडे पाहिलं आणि सुस्कारा सोडत म्हणाल्या, “इतका डोक्यात विचार पक्का आहे त्याच्या. इतकं ध्येय ठरवून बसलाय तो आयुष्यात आणि त्याची शिक्षा तू स्वतःला देतीयेस? तू घर सोडून चाललीयेस? बॅग उचल नी आत नेऊन ठेव.
“आणि अनिष, तू. घरातून जर कुणी बाहेर जाईल, तर तो तू जाशील. कारण आम्हाला फक्त एकमेकींचीच गरज आहे. हिची नॅशनलाईज्ड बँकेतली नोकरी आणि ह्यांचं मिळणारं अर्ध पेन्शन, आम्हाला पुरेसं आहे, व्यवस्थित जगण्यासाठी. ह्या तुमच्या कॉर्पोरेट कल्चरनं मुळासकट गिळंकृत केलेल्या तुला, आता गरज राहिलेली नाहीये आमची.
“तेव्हा, तुझा रस्ता तुला मोकळा आहे. तुझ्या पद्धतीनं आयुष्य जगण्यासाठी. तू बॅग भर तुझी, नी आत्ताच्या आत्ता निघ इथून. फक्त जातांना तो खुंटीला अडकवलेला, तुझा कणाही घेऊन जा. जेव्हा कधी वापरायची वेळ येईल, तेव्हा तो जरूर वापर नी त्यावेळीच पुन्हा घरी ये.
“पण मी ठरवेन, तुझ्यासाठी दार उघडावं की नाही ते! आणि मेघना तू. तू अगदी आल्यापासून मला ‘ए आई’ म्हणतेयस ना? बघ ही आई तिच्या मुलीच्या पाठीशी उभी राहीलीये आज. बॅग आत ठेऊन ये तुझी. मी आपल्या दोघींसाठीच पोहे करतीये.”
मेघना आणि रोहिणीबाई एकमेकींना धरून आत जातांना, काही बोलण्यासाठी अनिष उभा राहिला. आणि तेवढ्यात त्याला मेसेज रिसिव्ह झाल्याचं नोटिफिकेशन आलं. 
नताशाचा मेसेज वाचून तो ॲकनाॅलेज करेपर्यंत, मेघना आणि रोहिणीबाई दोघीही अनिषला ओलांडून, ‘स्व’ची ठाम जपणूक करणाऱ्या, स्वतःच्या चौकटीच्या आतल्या ठोस जगात निघून गेल्या होत्या.

- सचिन श. देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...