“श्वेता, अगं त्या विवेक गद्रेचं स्थळ छान वाटतंय. वाचून बघ ना त्याचा बायोडाटा !” श्वेता घरी येताच आई तिचा अंदाज घेत म्हणाली.
“विवेक नाव मुलाचं? ओके. बघते काम झालं की…!” श्वेता लॅपटॉपवर उरलेलं काम संपवत होती. पण कामातलं लक्ष उडालं होतं.
‘विवेक नाव मुलाचं?’ तिचे डोळे भरून आले. कॉलेजमध्ये तिच्याभोवती रुंजी घालणारा उंचापुरा, तरतरीत विवेक तिला आठवत होता. आपण लग्न करू म्हणणारा !
एक दिवस तो पुढच्या शिक्षणासाठी परदेशी निघून गेल्याचं कळलं, तिकडेच त्याचं लग्न झाल्याचं कळलं आणि श्वेता निराशेच्या गर्तेत बुडाली.
तिनं अमोलशी बोलायचं ठरवलं. विवेक आपल्या मनातून जात नाही, हे तिनं अमोलला सांगितलं. तिच्या ऑफिसमधेच काम करणारा अमोल हा तिचा लहानपणापासूनचा मित्र होता. काही वेळ गेला की हळूहळू बरं वाटेल हे अमोलनं तिला पटवून दिलं.
अमोल तसा चार चौघांसारखा वाटायचा… पण मनाचे श्लोक व दासबोध हे त्याच्या आयुष्याचे वाटाडे होते. तो कधीच गडबडून जात नाही, हे तिला नेहमी जाणवत असे. ‘पण हा सारखा म्हाताऱ्या माणसांसारखं बोलतो… जरा बोअरींग आहे,’ असंही तिला वाटायचं.
सहा महिने गेले आणि विवेकच्या आठवणी थोड्या थोड्या कमी होऊ लागल्या. तेवढ्यात एक दिवस अचानक विवेकचा टेक्स्ट आला.
‘मी भारतात आलोय. तुला भेटायचंय.’
ज्या चक्रव्यूहातून बाहेर पडावंसं वाटत होतं, त्यात तिला विवेक परत ओढत होता. आपल्या भावनांशी खेळून तो निघून गेला, म्हणून त्याला चांगलं सुनवावं ही इच्छा तिच्या मनात प्रबळ होत गेली. अमोलला सोबत घेऊन ती विवेकला भेटायला गेली.
विवेकनं आपण न सांगता का परदेशी निघून गेलो याची हजार कारणं दिली. आई-बाबांनी ठरवलेलं लग्न दोन वर्षात फिसकटलं. या चुकांना श्वेतानं माफ करावं, अशी विनंती त्यानं केली. चार-चार वेळा सॉरी म्हणाला. मी आजही तुझ्यावर प्रेम करतो हे परत परत सांगू लागला.
“माझ्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुला कुणी दिला? माझे नैराश्यात गेलेले दिवस मला परत देशील? यापुढं मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नको.”
श्वेतानं त्याची चांगलीच कानउघाडणी केली. ते बोलून टाकताच आज तिला बरं वाटत होतं. अमोल तिचं कौतुक करेल असं वाटत होतं पण अमोल म्हणाला,
“झालं गेलं त्यावर पडदा टाक. रिवेंजची कधीच जरूर नसते.”
तिनं आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं.
दोन आठवड्यांनी ती विवेक गद्रेला भेटली. बोलका, मोकळा डॉक्टर विवेक तिला चांगला वाटला. पण त्याच्याशी लग्न करावं का नाही हे तिला अजिबात कळत नव्हतं. तिने अमोलशी चर्चा केली.
“त्याच्याशी लग्न करावं की नाही, हा निर्णय तुला का घेता येत नाही याचं कारण शोध. कदाचित तुला माझ्याशी लग्न करावंसं वाटतंय का, याचा विचार कर.” तो जोरात हसला.
“तू खूप जवळचा मित्र आहेस रे. पण तुझ्यात मला माझा ‘नवरा’ दिसत नाही !” श्वेतानं अडखळत सांगितलं व अमोल जे समजायचं ते समजला.
महिनाभरानं अमोलनं तिला त्याचं लग्न ठरल्याचं सांगितलं.
“श्वेता, तुझं नी माझं लग्न एकाच वेळी होणार अशी लक्षणं दिसतात. विवेकला होकार दिलास ना?”
श्वेतानं ‘हो’ म्हणून मान हलवली. मी मुलींना भेटतोय हे सांगायला काय हरकत होती, असं वाटलेलं तिनं दाखवलं नाही.
“फोटो दाखव ना तिचा. नाव काय?” ती कुतूहलानं अमोलकडे पाहू लागली.
“तू दाखव विवेकचा फोटो. त्यानंतर मी तिचा फोटो दाखवेन.”
तिच्या पर्समध्ये, फोनवर विवेकचा फोटो नव्हता, याचं अमोलला आश्चर्य वाटले.
“बरं… हा बघ तिचा फोटो.” त्याच्या हातात असलेला तिचाच फोटो त्यानं तिला दाखवला. स्वतःचाच फोटो बघून ती गडबडली.
“अरे माझाच फोटो काय दाखवतोयस?” श्वेता पूर्ण गोंधळून गेली होती.
“बाईसाहेब, मी वाट बघून थकलोय. कुठही जायला ‘मी’ सोबत हवा असतो. प्रेमभंगाचं दु:ख ‘मला’ सांगून हलकं होतं. आनंदाच्या प्रसंगी ‘मला’ शोधण्यासाठी नजर भिरभिरत असते. प्रमोशनचा पहिला फोन मला, दुःख होताच पहिला फोन मला. उद्या विवेकशी भांडलीस की पहिला फोन मलाच करणार आहेस. स्वतःला विचार ना
– ‘क्या यही प्यार है?’
“…आणि बाईसाहेब, माझ्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला तरी कुणी दिला?”
तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं. चुकलचं खरं आपलं ! अमोल बोअरिंग वाटायचा. पण तरी तो आपल्याला आवडतो, हे कधी कळलंच नाही.
“सॉरी अमोल. या दोन विवेक नावाच्या व्यक्तींनी माझाच ‘विवेक’ घालवलाय !”
“खराखुरा ‘विवेक’ काय हे समजून घ्यायचं असेल, तर हे वाच.” त्यानं तिला मनाच्या श्लोकांचं छोटंसं पुस्तक भेट दिलं.
“जेव्हा बुध्दी सारासार विचार करून योग्य निर्णय घेते, तेव्हा त्याला ‘विवेक’ म्हणतात. तो शिकण्यासाठी मनाच्या श्लोकांसारखं पुस्तक नाही ! एक एक श्लोक मन या विषयावर डॉक्टरेट मिळवायला पुरेसा आहे. याला बोअरिंग कुणाला म्हणावसं वाटलं तर जरूर म्हणू देत.” त्यानं रोखून तिच्याकडे पाहिलं. ती चपापली.
“बरं, ऐक. मी रविवारी सज्जनगडावर समर्थांवर व्याख्यान ठेवलंय, ते ऐकायला चाललोय. यायचंय तुला?” अमोलनं विचारताच ती क्षणार्धात तयार झाली.
गडावर बुवांनी खड्या आवाजात ‘जय जय रघुवीर समर्थ’चा गजर केला व निरूपणास सुरवात केली.
‘विवेके क्रिया आपुली पालटावी।
अती आदरे शुध्द क्रीया धरावी॥
जनी बोलण्यासारिखे चाल बापा।
मना कल्पना सोडिं संसारतापा॥
श्वेताला आजवर न जाणवलेली एक वेगळीच शांतता जाणवत होती. खूप आधार वाटत होता. आजवर असं कधी वाटलंच नव्हतं. तिथली स्पंदनं फार वेगळी होती. शब्दांनी न सांगता येणारी. तिचा शांत चेहरा अमोल कौतुकाने पाहत होता. आता सुरंवंटाचं फुलपाखरू होण्यास वेळ लागणार नाही, हा विचार मनात येऊन तो प्रसन्न हसला.
- ज्योती रानडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा