आमच्या दाणीकाकांकडे श्रीरामाची एक शिसवी लाकडाची दोन अडीच फुटी पुरातन रेखीव, सुंदर मुर्ती होती. तो धनुर्धारी राम होता. प्रसन्न हास्य चेहर्यावर विलसत होतं आणि एक हात त्यानं कटीवर मोठ्या रुबाबात ठेवलेला होता.
अलंकार तर असे धारण केले होते की, त्रैलोक्याचं वैभवच जणू तो मिरवत होता. गळ्यातला तुळशीचा पायघोळ हार अगदी त्याच्या कोमल श्रीचरणकमलांपर्यंत आलेला दाखवला होता. इतकं सगळं असून तो एकटा होता. त्याच्या शेजारी त्याला साजेशी सीतामाई नव्हती.
रामाला एकटं ठेऊ नये, असं काकांच्या आईला फार वाटायचं… म्हणून ती आयुष्यभर तितकीच सुंदर, त्या मुर्तीला अनुरुप अशी सीतामाईची मुर्ती शोधत होती. श्रीराम एकटा असू शकतो… पण सीतामाई एकटी कशी असणार?
दाणीकाकांची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी होती, तरी सीतामाईचा शोध त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. तरीही आईसाठी ते म्हैसूर, बेंगलोरपर्यंत गेले, गुजरातेत फिरले… पण योग जुळून येईना. त्यांच्याकडचा श्रीरामाचा फोटो पाहून ती मुर्ती विकत घ्यायला अनेक जण पुढं आले; पण सीतामाई कुणाकडेही नव्हती.
काकानी प्रयत्न खूप केले… प्रवास खूप केले, अनेकाना भेटले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांची आई श्रीरामाला एकटाच ठेऊन गेली. इतरांना मुलाबाळांच्या लग्नाची आस असते, ही म्हातारी श्रीरामाच्या जोडीदाराची चिंता वाहत गेली.
दाणीकाकांच्या मनाला फार लागलं. कारण आई जातानाही त्या विषयीच बोलत होती. अशी काही फार आजारी नव्हती पण तरी थकली. खाण्यावरची तिची वासनाच उडाली.
काकांची मुलगी मुकी होती. दिसायला मोहक पण मुखातून एक शब्द उमटायचा नाही. काकांची आई मात्र फक्त तिचंच ऐकायची…
तिनं कॉफी आणली की बळेबळे का होईना, घोट घोट कॉफी प्यायची. जे काही हितगुज चालायचं, ते तिच्याशीच चालायचं. आजी काय बोलतेय, ते तिला कळायचं आणि तिचे मुके हुंकार आजीला कळायचे.
शेवटी शेवटी काकाना वाटायला लागलं, श्रीरामासाठी सीतामाईचा शोध हा प्रतिकात्मक आहे… मनातून आजीला नातीच्या लग्नाची आस लागून राहिलीय!
पण कांता लहान असतानाच आजीनं बजावलं होतं, “नक्षत्रासारखी मुलगी आहे… आता ती मुकी निपजली, ते आपले आणि तिचे भोग. पण म्हणून तिच्यासमोर कुणी डोकं धरून बसायची गरज नाही. झालं लग्न, आनंद आहे. नाही झालं, तर माझी श्रीरामावरची भक्ती वाया जायची नाही… तो घेईल तिची काळजी.”
https://whatsapp.com/channel/0029VaDinBXFcowDhOwBNW0y
आणि खरंच तो नियम या घरानं आजपावेतो पाळला. आजीमुळं घरचे सगळेच तिच्याशी बोलक्या मुलीशी संवाद साधावा तसे बोलायचे. त्याचा परिणाम असा झाला की कांताला ओठांच्या हालचालीवरून समोरच्याच्या बोलण्याचा अंदाज यायला लागला.
पण तरी, आजीसोबतचा तिचा संवाद वेगळाच असायचा. आणि तिच्याशीच बोलताना आजीचे शेवटचे शब्द होते, “श्रीरामा, तुला एकट्यालाच ठेऊन जावं लागणार बहुतेक… असो! शेवटी तुझी इच्छा! आम्ही हेका धरून काय होणार?” आणि ती गेली.
आता कांता खरच मुकी झाली. दाणीकाकाना ते जाणवयचं. त्यावर उपाय म्हणून त्यानी तिला जवळच्या आर्ट स्कूलमधे हॉबी क्लासला घातलं. रोज संध्याकाळी ती पेंटींग्जचे धडे घ्यायला जायला लागली. ओघवती रेष हातात होतीच पण आता त्याला पोषक वातावरण मिळालं.
एकदा सरानी सांगितलं, “नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी स्केच करून आणा.”
कांताकडे श्रीरामाची मूर्ती होती. तिनं त्याचीच ओघवत्या रेषेत वेगवेगळी स्केचेस केली. ती चित्र पाहून अख्खं आर्ट स्कूल खुळावलं. चित्र छानच होती पण मुर्तीचं अलौकीक सौंदर्य आणि डौल मोहवून टाकणारा होता.
मग शानबाग सर, पेडणेकर सर खास मूर्ती पहायला घरी आले. त्यांनी त्या मुर्तीची सिलॅबसप्रमाणं माहिती दिली. त्यात दाणीकाकांना काही स्वरस्य नव्हतं.
आणि मग या ना त्या कारणानं आर्ट स्कूलमधलं कुणी ना कुणी कांतासोबत घरात डोकावायला लागलं. त्यातच ललीत परिमू सारखा देखणा काश्मीरी शिल्पकार घरी आला. मूर्ती पाहून त्याचीही अवस्था वेगळी नव्हती. तसा काही तो आस्तिक नव्हता, पण तरी ती मुर्ती बघून गुंगून गेला.
मग काकानी सीतामाईच्या शोधाची टेप त्याच्यासमोरही वाजवली. तो आत्मविश्वासानं म्हणाला, “मी आणतो तुमच्या श्रीरामासाठी साजेशी सीतामाई!”
काकांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. आनंदून ते म्हणाले, “कशी… कधी… कुठे…???”
तो शांतपणे म्हणाला, “आत्ता ती अंतराळात आहे. तिला मी अवतीर्ण करेन…”
आणि तो कामाला लागला… प्रिया मचोरीयावर त्यानं वेशभुषेचं काम सोपवलं. तो श्रीमंत उद्योजकाचा मुलगा होता. पैशांची त्याला कमतरता नव्हती आणि श्रीमंतीचा माज नव्हता.
एक-दोन मॉडेल्स बघितल्यावर त्याची नजर कांतावर स्थिरावली… तिचे टपोरे काळेभोर डोळे, सरळ नाक आणि गालात दडून बसणारं हास्य, काहीसे कुरळे लांबसडक केस…
मग आणखी काय हवं! प्रिया मचोरीयानं सीतेला टिपिकल बनारसी पेहेराव दिला, जो कांताला विलक्षण सूट झाला आणि कांता सीतामाईच् रूप घेऊन ललीतसमोर उभी राहू लागली. ललीतला हवे असलेले हावभाव कांताला मुद्रेवर मुद्दाम आणावे लागत नव्हते, ती अंतर्बाह्य तेच अनुभवत होती!
आणि सीटींग्ज मागं सीटींग्ज पार पडायला लागल्या. हातात वरमाला घेतलेली काहीशी सल्लज तरी मिलनासाठी आतूर सीतामाई भूतलावर अवतीर्ण व्हायला लागली, तशीच ती कांतेच्या हृदयातही साकार व्हायला लागली. त्याचे परिणाम आता घरात जाणवायला लागले.
आणि खरंच एक दिवस ललीतनं त्या मर्यादा पुरुषोत्तमाशेजारी त्याला साजेशी विलक्षण सौंदर्य लाभलेली, हातात वरमाला घेतलेली, अबोल सलज्ज सुकुमारी सीतामाई उभी केली.
प्रतिमा पाहिल्यावर दाणी कुटुंबाला आपल्या लेकीत दडलेल्या अलौकीक सौंदर्याची जाणीव झाली. कुठलाच कलाकार बिदागीशिवाय काम करत नाही. ललीतनंही ‘इस हाथसे दो, और उस हाथसे लो’, म्हणतात तसं सीतामाईची प्रतिमा त्यांना देऊन त्यांची जानकी आपल्याकडे घेतली.
दाणीकाकांनीही जनक राजाची भूमिका मोठ्या आनंदानं पार पाडत आपल्या लेकीची पाठवणी त्या जादूचे हात असलेल्या शिल्पकारासोबत केली.
आज या पाठवणीला कित्येक वर्षं उलटून गेली आहेत आणि ती श्रीराम-जानकीची मूर्ती ‘अभिजात कलेचा आदर्श नमुना’ म्हणून गणली जातेय.
— चंद्रशेखर गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा