शनिवार, २३ मे, २०२६

2808. आजकल पांव जमीं पर

“एक धर्मराजाचा रथ होता, जो जमिनीपासून एक वित वर चालायचा आणि दुसरा माझा लेक आहे. ज्याची पावलं कायम जमिनीपासून दोन विती वर असतात.”
मला आरशासमोर पाहिलं की आईनं हा शेरा ठोकलाच पाहिजे. आता हे खरंय की मी आरशासमोर जरा अंमळ रमतो; तेव्हढ्यापुरती माझी उंची चार इंचानं वाढते अन् रूंदी आपोआप चार इंचानं कमी होते. रंग उजळतो, डोळ्यात एक चमक जाणवायला लागते.
असं नेहमी होत नाही, कधी कधी. काही खास कारण असलं की.
आणि अशी खास कारणं मला कायमच मिळत असतात. आता अजय देवगणच्या नव्या चित्रपटाच्या म्युझिक लाँचपार्टीचं मला आवर्जून आमंत्रण होतं. मग हे माझ्यासाठी खास कारण नाही का?
अजय माझ्याबरोबरच कॉलेज मधे होता. माझा क्लासमेट. ‘याच्यामुळं आमचा अजय पास झाला.’ असं त्याच्या घरचे दहा वेळा मान्य करतात.
आता अजय एव्हढा बिझी असतो की, त्याची खबरबात घ्यायची तर त्याच्या सेक्रेटरी बलबीरशीच बोलावं लागतं. त्यालाही हे चांगलं माहीत झालंय की, मी अजयचा जुना मित्र आहे. त्याला फोन केला की तो सांगतो… अजयकडे कधी पूजा आहे, कधी पार्टी आहे, कधी गेट टू गेदर आहे… 
“आप आईये ना...” असं बलबीर म्हणाला की मी तेच निमंत्रण समजतो. अर्थात मला बघून अजय किंवा काजोलच्या कपाळावर कधी आठी उमटत नाही. मुळात कुठं कसं वागायचं किती पुढं पुढं करायचं, हे मला चांगलं कळतं…
गेल्या गेल्या अजयला हात मिळवला आणि ‘अरे तू आ गया!’ असं तो हसून म्हणला की मला पुरेसं असतं. मग अधिकृतरित्या मी मोठ्या मोठ्या सितार्‍यांच्या मेळाव्यात हलक्या पिसासारखा तरंगायला मोकळा असतो. तरंगण्यासाठी मला कुठलही पेय तोंडाला लावायची गरज नसते… तो माहोलच असा असतो की, तुम्ही तरंगायलाच लागता. निदान मी तरी!
तुम्ही म्हणून समजून घ्याल...बाकी कुणाला सांगायला गेलं तर, ‘काय पकवतोय...’ असे भाव ते चेहर्‍यावर आणतात. एकजात सगळे जळतात माझ्यावर.
आता खरं सांगायचं तर, कुणाला पकवायचा माझा स्वभाव नाही. पण मला सगळ्याच विषयात रस आहे, गती आहे त्याला मी काय करू? क्रिकेट, पॉलिटिक्स, पामेस्ट्री हे असले विषय म्हणजे माझ्यासाठी समोरच्याला बोलतं करण्याचे विषय आहेत. पण ‘हिंदू हा धर्म आहे की संस्कृती?’ ‘खलील झिब्राल च्या कवितेची जातकुळी कुठली?’ हे असले विषय मला नेहमीच बोलतं करतात.
तसा मी धार्मिक सुद्धा आहे, श्रद्धाळू सुद्धा आहे. सद्गुरू दाते महाराजांचा मी अनुग्रह घेतलाय. तसं उठसूट कुणाला हात, पत्रिका दाखवायला मला आवडत नाही… पण वर्षाअखेरीस मी खास कल्याणला जाऊन आमच्या घरच्या ज्योतिषाला पत्रिका दाखवल्या शिवाय राहत नाही.
आता हे वर्ष मला जरा खडतर होतं म्हणून त्यावर उपाय म्हणून मला दर शनिवारी मारुतीला खडे मीठ, खडी साखर, सात उडीद, तेल, रुईच्या अकरा पानांचा हार, नारळ... हे सगळं मारुतीला वाहून अकरा प्रदक्षिणा घालायला सांगितल्या आहेत.
शनिवारी मीठ, तेल विकत घ्यायचं नसतं, हेही मला ठाऊक आहे म्हणून शुक्रवारीच ऑफिसमधून येताना मी त्याचे पैसे देऊन येतो. शनिवारी हाफ डे... दुपारी गर्दी कमी म्हणून ऑफिसमधून येतानाच मी मारुतीला गाठतो.
आता आज शनिवार, त्यात ऑफिस, देऊळ करून पार्टीला जायचंय. मी नाही गेलो, तर अजय रागवेल असं नाही पण तरी जायला तर हवंच.
कसाबसा ऑफिसमधून सटकून मी आज मारुतीला आलो. सगळं वेळेत पार पडलं, तर मला तीन पन्नासची बस सहज मिळू शकेल. पण आज बसनं जायचं म्हणजे अगदीच ‘बिलो द मार्केट’ वाटेल.. एरव्ही रात्री पार्टी असते तेव्हा खपून जातं, पण आज मात्र भर दुपारी हॉटेलच्या गेटपाशी कमसे कम रिक्षा तर हवीच.
मारुतीला गेलो...नियमाप्रमाणं सगळं नेहमीप्रमाणं अर्पण केलं. तिथला पोरगा मला टिळा लावायला सरसावला, पण मी त्याला अडवलं. म्हणालो, “अजय देवगणकडे पार्टीला जातोय !”
त्यानं फक्त भुवया उंचावल्या. त्यानं नारळाची वाटी पुढं केली, तीही मी नाकारली. सोचनेवाली बात है... माझी श्रद्धा माझ्याजवळ. त्याचं प्रदर्शन कशाला उगीच? धावतपळत प्रदक्षिणा पूर्ण केल्या.
कोपर्‍यावर आलो. समोर बस होती. पण रिक्षाच्या भरवशावर सोडली आणि रिक्षाच यायला तयार नाही!
तेव्हढ्यात एक पांगळा कुबड्या टेकत टेकत देवळाकडे येताना दिसला. तरूण होता, हौशी होता. त्याला पण घाई असावी. ‘आता हा देवाकडे काय मागेल?’ या प्रश्नानं मी बेचैन होऊ शकलो असतो, पण नाही झालो. तेव्हा मला रिक्षा मिळणं गरजेचं होतं.
एक दोघं आले. पण माजुरडे नाही म्हणाले. मी सांगितलं, मला कुठं जायचंय ते. पण मग्रुरीत ‘जाओ’ म्हणाले.
तेव्हढ्यात तो पांगळा सुद्धा आला. आता भुतदया म्हणून रिक्षावाला त्याच्याकडेच आधी जाणार. म्हणजे बोंबलाऽऽ. आम्ही दोन पायावर उभे आहोत म्हणजे पापच केलंय जणू!
आपण वैतागलो ना, तर असे काहीबाही विचार करायला लागतो. आत्ता पण तसंच झालं. पण तेव्हढ्यात रिक्षा आली. साहजिकपणे रिक्षावाला त्याच्यापाशी थांबला.
पाहिलं तर, कुबड्या सांभाळत त्यानं एका हातात नारळाची प्रसादाची वाटी धरली होती, कपाळावर शेंदराचा टिळा लावला होता. हा काय घरीच जाणार असेल. मी त्याला घाईत म्हटलं, “तुम्हाला ड्रॉप करून मी रिक्षा पुढं नेऊ का?”
“तुम्हाला कुठं जायचंय?” त्यानं विचारलं.
मी ऐटीत सांगितलं, “अजय देवगणच्या...”
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तो म्हणाला, “अरे ! मी पण तिथंच चाललोय. मी गौरांग वेलणकर. हॅलो, ग्लॅड टू मीट यू…!”
त्यानं उत्साहानं हात मिळवला. आम्ही दोघं रिक्षात बसलो. रिक्षानं वेग घेतला. तो बसल्यावर एकदम नॉर्मल दिसत होता. नसलेल्या पायांचं ओझं त्याच्या खांद्यावर दिसत नव्हतं आणि माझं लक्ष राहून राहून त्या लटकणार्‍या काड्यांकडे जात होतं.
“तुम्ही कसे ओळखता अजयला?” मी सहज विचारलं. 
त्यानं सांगायला सुरुवात केली. “मी त्यांच्या नव्या घराचं डिझाईन करतोय. प्लस, त्यांच्या नव्या चित्रपटाची गाणी पण मीच लिहिली आहेत. शिवाय कायदेविषयक काही सल्ला हवा असेल, तर अजय नेहमी माझ्याशीच कन्सल्ट करतो.”
तो बोलत राहिला. मी ऐकत राहिलो. चार वर्षांपूर्वी अपघातात त्यानं त्याचे पाय गमावले होते. मी केवळ अपघातानं अजयचा क्लासमेट होतो. मी धरून ठेवली, म्हणून आमची ओळख टिकली; जिला मी ‘मैत्री’ असं म्हणतो. आणि हा स्वकर्तृत्वावर त्याच्या गळ्यातला ताईत झाला होता ! शेंदाराचा टिळा आणि नारळाच्या वाटीची त्याला अडचण होत नव्हती. वाटेत त्याला अजयचा दोनदा फोन आला, ‘कुठपर्यंत आलायस’ म्हणून. तो रिक्षानं येतोय कळल्यावर अजय त्याला रागावला होता. ‘सांगितलं असतंस, तर गाडी पाठवली असती.’ असं काही तरी अजय त्याला म्हणत असावा. संभाषणावरून तरी असंच वाटत होतं. 
गौरांगनं आवर्जून सांगितलं, “तुझ्या मित्रासोबतच येतोय.” थँक गॉड ! अजयनं मित्राचं नाव विचारलं नाही. पण आता जर यानं मला विचारलं, ‘तुम्ही काय करता? तुम्ही अजयला कसं ओळखता?’
या विचारानं माझ्या पायातली ताकदच गेली. रिक्षातून उतरताना तो सहज उतरला. त्यानं त्याच्या कुबड्याही अगदी सहज जमिनीवर टेकवल्या.
...आणि मी? एरव्ही आई म्हणतच असते, ‘माझ्या लेकाची पावलं जमिनीला लागत नाहीत’ आणि आज रिक्षातून उतरताना खरंच माझे लटपटते पाय...!

- चंद्रशेखर गोखले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...