शनिवार, २३ मे, २०२६

2850. शुभारंभ

     त्याच्या पंधरा वर्षांच्या लेकाने गेले काही दिवस त्याच्या मागे तगादा लावला होता. सीजन बॅट हवी म्हणून. त्याने लेकाला कसंबसं थोपवून धरलेलं हे सांगून की. "शनिवारी सुट्टी असते मला, तर तेव्हा जाऊ". लेकाचं रोज count down चालू होतं, नी त्याला remind करून देणंही. अगदी गुरुवारपर्यंत.
     पण अख्खा शुक्रवार गेला, लेकाने एक शब्दही काढला नाही बॅटबद्दल. शनिवारी सकाळीही काहीच नाही, मग अखेरीस त्यानेच विचारलं लेकाला की. "काय रे... जाऊया ना बॅट आणायला? SG ची मस्त बॅट बघून ठेवलीये मी तुझ्यासाठी". लेकाने त्याच्याकडे बघितलं नी विचारलं. "कितीची आहे बॅट?" त्याने सांगितलं... 
"अरे तुला तीनेक हजारापर्यंतची चालेल सध्या. बाकी मग पुढचं पुढे बघू".
लेक म्हणाला. "म्हणजे आजीने तुला परवा जेव्हा विचारलं की आजोबांच्या पुढच्या महिन्यात येणाऱ्या वर्षश्राद्धाला, तिला एका old age home च्या लायब्ररीसाठी नवी पुस्तकं घेऊन द्यायची इच्छा आहे. तेव्हा तू म्हणालास की आधी आपल्या घरी ह्या कार्याचा इतका खर्च होणारेय तो निस्तरू, बाकी मग पुढचं पुढे बघू... तसं का?".
हे लेकाचं ऐकलं आणि अचानकच त्याला जाणावलं की, आईचा एकही फोन नाही आलेला गेल्या दोन दिवसांपासून. "माझ्या बॅटसाठी जेवढे लागणार आहेत पैसे, तेवढे तरी दे आजीला. बाकी मग पुढचं पुढे बघू". एवढं बोलून, लेक तिथून शांतपणे निघून गेला.
.
.
.
आज सकाळी त्याच्या बाबांचं कार्य, यथासांग पार पडलं. आता संध्याकाळी तो नी बायको. आईला आणि लेकाला घेऊन, बाहेर जाणार आहेत. नेमकं कुठे ते त्या दोघांनाही न सांगता. लेकासाठी नवी सीजन बॅट घेणार आहेत ते. आणि तिथून डायरेक्ट जाणार आहेत, एका वृद्धाश्रमात. त्याने डोनेशन म्हणून दिलेल्या तीस हजारातून. नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या लायब्ररीचा, शुभारंभ सोहळा आहे संध्याकाळी. त्याच्या आईच्याच हस्ते.
त्यांच्या आपसातील नात्यांचा शुभारंभ तर त्यांच्या लेकाच्या हस्ते, गेल्या महिन्यातच पार पडलाय.

- सचिन श. देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...