शनिवार, २३ मे, २०२६

2834. मुलांच्या मनाचा तळ ढवळताना

    आई का आवडते, का आवडत नाही?’ आणि ‘वडील का आवडतात, का आवडत नाहीत?’ शाळेतल्या विद्यार्थ्यांशी असं बोलणं सुरू होतं. मुलांनी सांगितलेल्या गोष्टी जरा गमतीशीर वाटल्या. आई आवडते कारण; आई जेवायला घालते, शाळेचा डबा देते, मळलेले कपडे धुते, दिवाळीत मामाच्या गावाला नेते, आजारी पडल्यावर काळजी घेते. वडील आवडतात कारण; नवे कपडे घेतात, खर्चायला पैसे देतात, खाऊ आणतात, वह्या पुस्तकं असं शाळेचं साहित्य घेतात, आजारी पडल्यावर दवाखान्यात नेतात.
     आई-वडील आवडतात कारण की, या संवादातून एका गोष्टीचा आपसूकच उलगडा होत गेला ती म्हणजे आई-वडील आवडतात कारण ते वस्तू पुरवतात म्हणून. वस्तूंचे पुरवठादार म्हणून आई-वडील आवडतात हे ठीक पण मग मानसिक पातळीवरील संबंधांचे काय? आई-वडील मुलं एकत्र छान खेळ खेळताहेत, गाणी म्हणताहेत, गप्पागोष्टी करताहेत, घर कसे बांधायचे, घरातल्या सामानाची मांडामांड कशी करायची, हे ठरवत आहेत. जेवू घालणं, अभ्यासाला बसवणं, आरोग्याकडं लक्ष देणं, शाळेत नाव दाखल करणं, अधूनमधून फिरायला घेऊन जाणं, सिनेमाला घेऊन जाणं किंवा पाठवणं. यापलिकडे खरे पालकत्व असतं. आमचं ‘पालकपण’ तिथ पर्यंत पोहोचायला हवं.
     मुलांच्या मनातल्या कल्पना, भावना, प्रश्न, विचार, अभिप्राय, अनुभव एकूणच मुलांना जे जे म्हणून सांगायचं आहे ते आपण अत्यंत उत्सुकतेनं, मनापासून ऐकत आहोत, असं जर मुलांना वाटलं तर आणि तरच मुलं आपल्या मनाची कवाडं खुली करतात, असा शिक्षक (आणि पालक म्हणूनही) अनुभव आहे. पालकांचे सततचे उपदेश, पालकांच्या मते मुलांनी ज्या गोष्टी करणं चांगलं असतं त्या गोष्टी करत राहणं, घरी येणाऱ्या पाहुण्यांना कविता, गाणी म्हणून दाखवणं, अभ्यास कर असं सतत सतत सांगत राहणं, एकच गोष्ट शंभर वेळा सांगणं, वारंवार आठवण देत राहणं या गोष्टी मुलांच्या एकूण कल्पनाविश्वाला मोठी ठेच पोहोचवतात.
     मला एखादी वस्तू घेताना कोणीही विचारत नाहीत, मला महत्त्व देत नाहीत, माझ्या आवडीनिवडींना या घरात काहीच किंमत नाहीये, अशा गोष्टी मुलांच्या मनाची पकड घेतात तेव्हा मुलं मनानं हळूहळू दूर जात असतात. लहान बाळाच्या कल्पनाविश्वात आईचं केवढं मोठं स्थान असतं. लहान असताना तर प्रत्येक गोष्टीत मुलांना आपल्या आईला सहभागी करून घ्यायचंच असतं. पुढं मुलं वाढीला लागतात. मोठी होऊ लागतात. स्वावलंबी होऊ लागतात, तसतसे हे भावनिक, मानसिक नातं तितकं घट्ट राहत नाही, असं अनेकदा दिसतं. कारण प्रेममय आई पुढे जाऊन मुलांना वस्तूंची ‘पुरवठादार’ वाटू लागते. वस्तू पुरवणं हे आपलं काम आहे, असं कळत नकळत आईलाही वाटत राहतं. हे झालं कुटुंबातलं.
     शाळेत काय दिसतं? तिथं शिक्षक काही विशिष्ट वाक्ये वापरून संवाद साधताना दिसतात. इकडं लक्ष द्या, नीट ऐका, लिहून घ्या, बडबड करू नका, मी सांगतो/सांगते ते करा, बाकी डोकं लावू नका, घरचा अभ्यास का आणला नाहीस?, काल कुठे गेली होतीस, अशी काही पठडीबद्ध वाक्यं उच्चारत आणि ठराविक प्रश्न विचारत शाळांच्या बंदिस्त खोल्यांतून विद्यार्थ्यांशी शिक्षकांचे साचेबद्ध बोलणं सुरू असतं. तिथं खरं तर मोकळाढाकळा संवाद नसतोच. मुलं चलाख असतात. आपल्या विषयी आपलेपणा नसलेला तिथला कृत्रिम सूर मुलांना लगेच लक्षात येतो.
      मुलांचं मन खरं तर सतत कल्पनेच्या पंखांनी भराऱ्या घेत असतं. जे जे म्हणून पाहिलंय, ऐकलंय, अनुभवलंय, त्याविषयी विचारावं, बोलावं, लिहावं असं भरपूर काही मुलांना वाटत असतं. कधी एखादी वेदना ठसठसत असते. कधी आनंदाने मन उचंबळून आलेलं असतं. कधी एखादी भन्नाट कल्पना डोक्यात आलेली असते. पण आपुलकीचा शब्द-संवाद आणि जिव्हाळा नसेल तर मुलं आपल्या अंतरंगात जे काही सुरू असते, ते मोकळेपणानं खुलं करत नाहीत. यातून शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक, आणि घरी पालक आणि मुलं यांच्या मनामनांत अदृश्य भिंती उभ्या राहतात. त्या एकूण मुलांच्या भावविश्वावर भयंकर आघात करत राहतात.
     वर्गात शिकवलेल्या एखाद्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहून आणण्याला 'घरचा अभ्यास' मानायची पद्धत आपल्याकडे रुढ झाली आहे. वास्तविक पाहता आम्ही शिक्षक जे काही वर्गात शिकवतो. तेव्हाच त्यावर आधारित अनेक प्रकारचे तोंडी प्रश्न तिथेच विचारतो. पुन्हा घरून येताना मुलांना ‘लिहून आणा रे’ असेही बजावतो. कसलेही नावीन्य न उरलेल्या, रंजकता किंवा आव्हान नसलेल्या त्याच त्या पाठ्यघटकावर आधारित प्रश्नांची उत्तरं बिचाऱ्या मुलांना लिहून आणायची असतात. केवळ शिक्षकांच्या ‘समाधाना’साठी ती लेखी उत्तरं लिहायची असतात. कारण शाळेत गेल्यावर ‘घरचा अभ्यास आणला काय?’ असा जाब शिक्षक मुलांना विचारतात. शारीरिक शिक्षा करता येत नसली तरी मनाला लागेल, वाईट वाटेल असे टोचून/टाकून बोलतात. यातून होतंय असं की, मुलं शाळा-शिक्षक आणि पर्यायानं शिक्षणापासून मनानं दूरावतात. मनातल्या मनात चरफडत राहतात. कुढत राहतात. त्यांना सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, अशी स्थिती आहे.
     पुस्तकांत डोकं खुपसून, खाली वाकून शांतपणे काहीतरी लिहीत बसलेली मुलं पाहून पालकांनाही केवढं मोठं समाधान वाटत असतं. पण विषय, आशय न समजलेल्या अनेक गोष्टींवर लिहिणे, बोलणे ही गोष्ट मुलांच्या मनावरचा ताण खूपच वाढवत नेते. त्यामुळं पुस्तकात दिलेले उपक्रम, कृती, प्रयोग हे करण्यावर एकूण व्यवस्थेने भर दिल्यास 'अभ्यास म्हणजे सजा' आणि 'खेळ म्हणजे मजा' असे मुलांना वाटणार नाही. Joy of learning म्हणजे शिकण्यातला खराखुरा आनंद मुलांना मिळेल. पाठीवरच्या ओझ्या विषयी अनेकदा बोलले जाते, ते योग्यही आहे. पण मुलांच्या मनावरच्या ओझ्याचा विचार किती करतो? हे एकदा स्वतःला प्रौढांनी विचारायला हवं.
     मुलं कोणत्या वातावरणात वाढतात. त्यांच्या मनाला कोणत्या अडचणी अडथळ्यांचा, प्रश्न समस्यांचा भुंगा कुरतडत असतोय, हे जाणून घेण्यात आपली शिक्षण व्यवस्था कमी पडतेय, असं वारंवार दिसतंय. शिक्षण हक्क कायद्यामुळे प्राथमिक शिक्षणात बालस्नेही शिक्षणाचा कितीही बोलबाला सुरू असला तरी लहान मुलांना आपण नीट समजून घेऊ शकलेलो नाही आहोत, हे वास्तव अधोरेखित होत राहतं. आपली एकूण शिक्षण व्यवस्था मुलांचं मन जाणून घेण्यात अपयशी ठरलीय, किंबहुना ती नापास झालीये, असं वाटतं. हे पचायला जरा जड वाटत असलं तरी ते कटुसत्य आहे.
      अनेकदा असं होतं की, शाळेतल्या वर्गांच्या भिंती बाहेरचं वास्तव आणि शाळेतलं औपचारिक शिक्षण हे एकमेकांशी काहीही नातं सांगत नाहीत. पुस्तकं केवळ आदर्शांच्या गोष्टी सांगणार. बालपण म्हणजे संस्कारक्षम वय आहे म्हणून आम्ही शिक्षणातून नीतीमूल्यांचे, संस्काराचे धडे देणार. त्याच वेळी समाजात जे बघायला मिळतं ते भलतंसलतं असतं. हे सारं ‘समजून घेताना’ मुलांचा केवढा मोठा गोंधळ उडतो. अनेक घटना घडामोडी मनाच्या डोहात विचारांचे खडे टाकतात. त्याचे तरंग उमटत राहतात. मुलांना याविषयी भरपूर बोलायचं असतं, पण आम्ही मुलांचं कान उपटून मोठे करून ठेवलेत. आमचं त्यांनी ऐकावे यासाठी. घरी-दारी मोठे म्हणजे प्रौढ लोकं मुलांच्या तोंडाला कुलपं लावायला निघालेत.
     हेच बघा ना आईला दुपारी वामकुक्षी घ्यायची असेल तर घरातल्या मुलांनी सुटीचा दिवस असला तरी चिडीचूप बसायचं असतं. एवढीशी वटवट देखील आईला त्रास देते. सुटीच्या दिवशी घराबाहेर पडायचं नाही. घरात, गल्लीत आवाज करत खेळायचं नाही. मुलं छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधत असतात. तो आपण पालक म्हणून कळत नकळत हिरावून घेतो. तिकडं शाळेतही काही वेगळं नसतं. समजा ‘ऑफ पिरियड’ असेल आणि बदली आलेले शिक्षक काहीही शिकवणार नसतील तर सर्व विद्यार्थ्यांनी शब्दशः ध्यानस्थ ऋषी सारखं ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ बसून राहायचं असतं. मुलांना काय वाटतं? त्यांना मुक्तपणे व्यक्त होऊ दिलं तर? याला काही अर्थच नसतो.
     मुलांना स्वातंत्र्य दिलं तर ते हमखास बिघडतील अशी आमची धारणा असते जणू. म्हणून आम्ही त्यांना सतत सतत नियंत्रित करत राहतो. एकुणच आम्ही मुलांना किती गृहीत धरतो. हे गृहीत धरणं मुलांच्या कल्पनाविश्वावर मोठाच आघात करत राहतं. आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही पण नुकसान व्हायचं ते होऊन जातं. मुलांना मुक्तपणे व्यक्त होता यावं, असं भयमुक्त वातावरण घरानं आणि शाळेनं उपलब्ध करून द्यायला हवं. जिथं मुलं नापसंती, नाराजी, हरकती, आक्षेप, असहमती, व्यथा, वेदना, वंचना सांगू शकतील. आपल्या डोक्यातल्या अफलातून आयडीया आणि हो आनंदही तितक्याच मस्त जोशात सांगतील, साजरा करतील.
     कुटुंब आणि शाळा मोठी माणसं चालवतात. या दोन्हीही ठिकाणचे वातावरण प्रचंड अविश्वासाने भरलेलं आहे. मोठ्यांनी घालून दिलेले नियम पाळायचे, त्यांची ती शिस्त आणि सूचनाबरहुकूम लहानांनी वागायचे असते. मोठ्यांच्या आज्ञा पाळणारी मुलं शहाणी आणि प्रश्न विचारणारी वात्रट किंवा आचरट ठरतात. घरातलं आज्ञाधारक मूल किंवा शाळेतला आज्ञाधारक विद्यार्थी सर्वांच्या कौतुकाचा विषय असतात. घरातल्या किंवा शाळेतल्या इतर मुलांना योग्य ‘संदेश’ देण्यासाठी आज्ञाधारक मुलांचं तोंड फाटे पर्यंत कौतुक सुरू असतं. यातून होते असे की, वेगळा चिकित्सक विचार करणारी मुलं आपण दाबून, दडपून टाकतो. आपल्या मनातल्या कल्पनांच्या भ्रूणाची ती आपणहून हत्या करून टाकतात. कल्पनेचे पंख आपोआप अशक्त, कमजोर होत जातात.
     मुलं मोठी झाली की मग त्यांनी भराऱ्या घ्याव्यात असं पालक आणि शिक्षकांनाही वाटतं. खरं सांगायचं तर आम्हीच त्यांचे पंख ‘छाटलेले’ असतात. कारण मुलांवर आम्ही विश्वास टाकतच नाही आहोत. विश्वास हा तर लोकशाही व्यवस्थेचा मूलाधार आहे. तिथं कल्पनेला धुमारे फुटण्याची शक्यता भरपूर असते.
     अत्यंत नमुनेदार प्रसंग आठवतो. यात्रेतून लहान मुलाला खेळण्यातली गाडी आणलेली असते. आई-वडील बाहेर गेलेले असतात. हे चार-पाच वर्षे वयाचे मूल सारखा विचार करत असते की चावी दिली की गाडी पुढे कशी जात असेल बरं? त्याच्या मेंदूला चावी बसलेली असते. घरात कोणी नाही, हे पाहून तो ती गाडी खोलतो. खोलतो म्हणजे फोडतो असेच म्हणा. आई येते मुलाने खोलीभर पसारा मांडलेला असतो. आईचा पारा दोन कारणांनी चढतो. पहिले म्हणजे ती महागडी गाडी तुटलेली, फोडलेली, उस्तारलेली असते म्हणून. कारण त्यामुळं आर्थिक नुकसान झालेलं असतं. मुलांच्या आनंदासाठी, नवीन काही शिकण्यासाठी असा त्याग करायची घरातल्या  मोठ्यांची तयारी नसते. आईच्या रागावण्याचं दुसरं कारण घरभर घातलेला पसारा. मूल बिचारं हिरमुसून गेलं नसतं तरच नवल. आता गंमत पुढे आहे. लहानपणी असं वागलेले हे आई-वडील बारावी नंतर याच मुलाला इंजिनीअरिंगला जाताना मॅकेनिकल फॅकल्टी घ्यायचा आग्रह धरतात. अरे पण, पाच वर्षांचा असताना तो खेळण्यातल्या मोटारीच्या रचना समजून घ्यायचा प्रयत्न करत आपली काहीतरी कल्पना लढवत होता. त्या गाडीच्या आत मध्ये कुठेतरी ड्रायव्हर असला पाहिजे, त्याशिवाय चावी दिल्यावर गाडी चालूच शकत नाही, असं त्या मुलाचं म्हणणं होतं. त्या मुलाच्या दृष्टीने ती कल्पना डोक्यात येणं म्हणजे मॅकेनिकल इंजिनीअर बनण्याची सुरुवात असू शकेल ना? पण मुलांना अशा तऱ्हेने समजून घ्यायला आम्ही कमी पडतो.
     घराच्या रंगवलेल्या सुंदर भिंतीवर लहान मुलांनी रंग कांड्यानी जर का चित्रं रेखाटली तर ती किती टक्के पालकांना आवडतील? हे असं सगळीकडं होतं असा दावा अजिबात करायचा नाहीये. पण साधारणपणे असंच होताना दिसतं. हे वास्तव नजर अंदाज करता येत नाही. मुलांच्या मनातील अभिनव कल्पनांचे, विचारांचे रसरशीत कोंब आम्ही खुडून तरी टाकतो किंवा त्याकडं दुर्लक्ष तरी करतो. मग समाजात इनोव्हेशन घडत नसल्याची तक्रारी करण्यात धन्यता मानतो. पण इनोव्हेशनसाठी मोडणे, तोडणे, जोडणे, त्यातून नवे घडवणे असं काही काही करायची संधी, मुभा आम्ही मुलांना किती देतो? आपण बहुतेक लोक एका विशिष्ट 'साच्यात' शिकलो, वाढलो म्हणून मुलांनाही आपण साच्यात का ढकलायचं? हा मुलांवर मोठाच अन्याय आहे. मुलं दुबळी आणि मोठे लोकं सामर्थ्यवान असतात. म्हणून मुलं हे सारं निमुटपणे सहन करत राहतात. आतल्या आत चरफडतात, गुदमरून जातात. त्यांना ‘व्हाईस’च नाही, नसतो.
     मुलांना उनाड वाऱ्यासारखं मस्त हुंदडायला आवडतं. खेळ खेळायला आवडतात. मुलांच्या वाढीच्या, आरोग्याच्या आणि एकूण विकासाच्या दृष्टीनं मैदानी आणि देशी खेळांचं असलेलं महत्त्व वादातीत आहे. अशा कितीशा संधी आम्ही मुलांना उपलब्ध करुन देतोय? याउलट मुलांना स्क्रीन आवडतात, असं 'मानून' आम्ही खेळा ऐवजी गेम्स खेळायला देतो आहोत? क्वालिटी टाईम देण्या ऐवजी मोबाईल, टॅब, लॅपटॉप हातात देत आहोत. डिजिटायझेशनचे प्रचारक असलेले एक शिक्षक सगळीकडे सांगत असतात की, मुलांना स्क्रीन आवडतात. म्हणून आम्ही त्यांच्या हातात टॅब दिलेत. त्यातून मुलं छान शिकतात. डिजिटल साधनं मुलं किती मस्त हँडल करतात हे काय कौतुकानं सांगण्याची गोष्ट आहे? त्याचा मुलांच्या मन, मेंदूवर, डोळ्यांवर आणि एकूण शरीरावर पुढं जाऊन कोणते अनिष्ट परिणाम होतील, ती किती प्रमाणात हाताळायला द्यावीत, याचा गंभीरपणे विचार नको करायला? मुलांची शाळा, माध्यम निवडण्यापासून, त्यांना निरनिराळ्या वस्तू खरेदी करणं, त्यांनी कोणता छंद जोपासावा, कोणत्या कलेची ‘साधना’ वगैरे करावी, कोणते खेळ खेळावेत, कोणते मित्र जोडावेत, कोणते पदार्थ खावेत, असे सारे निर्णय अनेक पालक स्वतःच घेताना दिसतात. इतरांच्या आयुष्यात केवढा हा हस्तक्षेप? आपल्या मोठ्यांच्या आयुष्यात कोणी असा इतका हस्तक्षेप केल्यास आपण ते सहन करु काय?
     मुलांचं सारं काही भलंबुरं आम्हालाच कळतं असं पालकांना वाटतं. मुलं अज्ञानी आहेत. आम्हीच जणू मुलांचे उद्धारकर्ते आहोत. असं अनेक पालक मानत असतात. इथंच गडबड झालीये. आपल्या देशात तर बहूसंख्य पालक जणू मुलांचे ‘कस्टोडीयन’ बनलेले असतात. जे पालक मुलांना अशा 'संवर्धन पद्धतीनं' वाढवताहेत, त्यातून अनेक मुलांची वाढच खुरटून गेलेली दिसतेय. सृजन ज्या कशाला म्हणतात, ते जन्मण्याआधी मरुन जातेय त्यांच्या जीवनातून. शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि लेखक अरुण ठाकूर एकदा एका शिक्षकांच्या कार्यशाळेत बोलताना म्हणाले होते की, "शिक्षणाशी संबंधित दोन घटक असे आहेत की ज्यांना शिक्षणातलं फारसं काही कळत नाही. मात्र मुलं आम्ही त्यांच्या ताब्यात सोपवलेली आहेत. यातला पहिला घटक म्हणजे पालक आणि दुसरा म्हणजे सरकार." पालक आणि सरकार करत असलेल्या प्रयोगांचे परिणाम गिनीपिग बनलेल्या कोवळ्या वयातल्या मुलांना भोगावे लागत आहेत, ही त्यातली अत्यंत वाईट गोष्ट.
     खरं तर मुलांचं सहज बोलणं पालक असो की शिक्षक दोहोंनाही नवी समज, नवे शहाणपण देणारं असतं. शिक्षक म्हणून मला तर मुलांचं बोलणं सतत ‘फीडबॅक’ म्हणून महत्त्वाचं वाटत आलेलं आहे. मुलांशी साधलेल्या संवादाने मला शिक्षक म्हणून भरपूर समृद्ध केलेय. आम्ही शाळेत मुलांच्या कल्पनाशक्तीला फुलवायला गप्पांचा तास ठेवलाय. मुलं प्रश्न, शंका विचारतात. समस्या सांगतात. त्यावर विचार करतात. शक्कल लढवतात. उत्तरं शोधायचा प्रयत्न करतात. तो अवकाश आम्ही मुलांना उपलब्ध करून दिलाय. मुख्य म्हणजे चुका करायचं स्वातंत्र्य मुलांना हवं असतं. चुकणार ते मूल शिकणार. म्हणूनच मुबलक चुका करायचं ‘स्वातंत्र्य’ आम्ही मुलांना दिलंय. कोणत्याही मुलानं सांगितलेलं कोणतंही उत्तर पूर्णपणे चूक मानायचं नाही, असा आम्ही शाळेत नियम केलाय. मुलं मुक्तपणे व्यक्त होताहेत. मुलांच्या कल्पनेच्या पंखांना बळ देतो आहोत. काटेकोर वेळापत्रक मुलांवर लादत नाहीत. त्यांच्या आशा, अपेक्षांचे प्रतिबिंब शालेय कामकाजात उमटले पाहिजे, याची काळजी घेतो. मुलांच्या मनातल्या प्रश्नांचे अंकुर खुडून टाकणे हे भ्रूणहत्ये इतकेच वाईट असते. पण आम्ही तसं मानत नाही.
     मुलांच्या विश्वात अफाट गोष्टी असतात. त्यांना ते व्यक्त करायला नीट पर्यावरण मिळालं की ते आपोआप बोलते होतात. To teach म्हणजे शिकवणं आणि To learn म्हणजे शिकणं. शिक्षकांनी मुलांना 'शिकवण्याच्या' मोड मधून  शिकणं म्हणजे एक आनंद देणारी प्रक्रिया असते, तिकडं न्यायला हवं. शिकणं म्हणजे शेअरिंग व्हावं. शिक्षणात देणारा आणि घेणारा असा भाव नको. त्यासाठी शिक्षकांनी स्वतःचं मन, मानस आणि रोल देखील बदलायला हवा. मुलांना भरपूर काही येत असतं, ती कोरी पाटी किंवा रिकामा घडा नसतात, यावर शिक्षक पालकांनी विश्वास टाकायला हवा. कठोर वातावरणातल्या परीक्षा मुलांचा खऱ्या शिकण्याचा आनंद हिरावून घेतात. तिथल्या स्पर्धा मुलांना दुःखी करतात.
     मुलांच्या अफाट कल्पनाशक्तीचे अनेक नमुनेदार उदाहरणं आणि अनुभव सुद्धा सांगता येतील. एकदा काय झालं आमच्या शाळेतल्या तिसरीतल्या मुलीने डिजिटल क्लासच्या सॉफ्टवेअरचा डोंगल टेबलच्या ड्रावर मधून नेला. पेन ड्राइव्हच्या आकाराचा डोंगल दगडानं फोडला. इतर मुलांनी ही गोष्ट आम्हा शिक्षकांना सांगितली. डोंगल फोडणाऱ्या मुलीला तसे का केले? असे विचारले. तेव्हा तिने जे काही सांगितले ते चक्रावून टाकणारे होते. ती म्हणाली “मला वाटले की कंप्युटरला हे मशीन लावलं का त्याच्या आत मध्ये जे लोकं बोलत्यात, नाचत्यात. ते याच्या मधी असतील, म्हणून हे फोडून बघितलं. त्यात काहीच नाय निघालं.” तिच्या कल्पनेतून, कुतूहलातून आलेल्या उत्सुकतेला आम्ही सलाम केला. तिच्या जिज्ञासेतून आलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. “तू वेगळा विचार करतेस. तू हुशार आहेस.” असं सांगत पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्या मुलीचा हुरूप वाढवला. तू चांगलं काहीतरी करू शकशील, असा विश्वासही दिला.
     एके दिवशी शाळा भरायच्या आधी कुणाल माझ्या जवळ आला म्हणाला, "सर, अण्णा हजारे दिल्लीत लोकपालाच्या आंदोलनास बसलेत, सगळे राजकीय पक्ष भ्रष्ट आहेत, असं ते म्हणत्यात. सारे पक्ष भ्रष्ट असतील तर मग निवडणुकीत अण्णा त्यांचं मत कोणाला देत असतील?" किती नेमका प्रश्न कुणालला पडला होता.
“आंब्याचं पिकलेलं फळ खालीच का बरं पडतं रे?” असं विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता “आम्हाला खायला” असं उत्तर सांगणारी मुलं साफ चुकीची ठरवता कामा नयेत. नव्या कल्पनांचा, विचारांचा शाळा आणि घराने एकूण समाजाने आदर करायला हवा. संवादाचं अवकाश मिळालं की मुलांच्या कल्पनाशक्तीला बळ मिळते. हे शहाणपण मुलांसोबतच्या संवादानेच दिलेय. शाळा आणि घरानं हेच उबदार वातावरण पुरवायचं असतं. आणि मुख्य म्हणजे मूल म्हणजे स्वतंत्र व्यक्ती असते, हे मोकळेपणानं मान्य करावं ना कधीतरी. आता उशीर झाला असलं तरी पुढच्या पिढ्यांच्या भल्यासाठी तरी किमान. जेवढे पालक, शाळा मुलांच्या भावविश्वावर भलाबुरा परिणाम करतात त्यापेक्षा समाजाचा वाटा जास्त असतो. म्हणून समाजाचे दायित्व मोठे असते.
     ज्येष्ठ शिक्षणतज्ञ लीलाताई पाटील यांनी ऐंशीच्या दशकात लिहून ठेवले आहे की, “मुलं-पालक आणि विद्यार्थी शिक्षक यांच्यात कठोर भिंती उभ्या आहेत. ज्या भिंतीमुळे आपण एकमेकांना दिसू शकत नाहीत. ओळखू शकत नाहीत. समजू शकत नाहीत. त्या भिंतींना संवादामुळे खिंडारं पडली नाहीत तरी खिडक्या निर्माण होतील, म्हणून संवाद हवा आहे.”
       गेली वीस वर्षे काम करताना हा संवाद मला शिक्षक म्हणून भरपूर समृद्ध करत आलाय. पाठ्यपुस्तकाच्या पलिकडे जाऊन मुलांच्या भावविश्वाशी नातं सांगणारा हृद्य संवाद. त्यांचे आख्खे भावविश्व उलगडत नेणारा संवाद. मुलांना जगणं आणि शिकणं याकडे समग्रपणे बघण्याचं आत्मभान देणारा संवाद. मुलांच्या अचाट कल्पनाशक्तीला खतपाणी घालणारा, ती फुलवणारा, त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवणारा संवाद. या अशा संवादातून मुलांचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होईल. त्यासाठी त्यांना संधी द्यायला पाहिजेच, शिवाय त्यांच्यावर विश्वासही टाकायला हवा. म्हणजे पुढच्या काळात ते कल्पनांच्या भराऱ्या घेतील. नवं काहीतरी करून दाखवतील. बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत, बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखरं, लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात मायेचा पाझर.
      मुलांना काय नि बियांना काय रुजायला, अंकुरायला, वाढायला, फुलायला, फळायला, बहरायला आश्वासक वातावरण लागतेच. शाळा, शिक्षक, पालक आणि मुख्य म्हणजे समाज आज ना उद्या कधीतरी अंतर्मुख होऊन मुलांच्या स्वातंत्र्याचा विचार करतील त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर विश्वास टाकतील. या अपेक्षेसह. सर्वप्रथम ज्यांनी आपल्यावर मनःपासून जीवापार खूप प्रेम, माया व चांगले संस्कार केलेत त्यांना कधीही विसरू नका, तसेच आपल्यावर कठीणप्रसंगी ज्यांनी अनेक प्रकारची मदत व उपकार केलेले आहेत, त्यांची जाणीव ठेवा व त्यांनी तुमच्यावर जेवढा विश्वास ठेवला आहे, त्यां विश्वासास कधीही तडा जाऊ देऊ नका, व त्यांचा कधीही विस्वासघात  करू नका, जर तुम्ही करीत असाल तर तुमच्या सारखा पापीचांडाळ ह्या जगात कुणीही नसेल,  तसेच सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. आपल्या भारतीय आदर्श संविधानाचे रक्षण करा.
   एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा जमेल तेव्हढीच मदत करा, आणी नसेलच जमत  तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, अफवावर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, समाजातील प्रामाणिक माणसे, समाजसेवक, यांच्यावर प्रेम करा, पण विश्वासघातकी, दगाबाज, खोट्या, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, चुगलीखोर अश्या लोकांपासुन नेहमीच खूप सावध व खूप दूर रहा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध,  सुरक्षित व सतर्क रहा.

✍️ भाऊसाहेब चासकर
(लेखक प्रयोगशील शिक्षक असून, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत. 'तुम्ही आम्ही पालक' मासिकाच्या मे महिन्याच्या अंकासाठी लिहिलेला लेख)
🌻☘️🌺🙏🌻🙏🌺☘️🌻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...