बनारसच्या मणिकर्णिका घाटावर एक ‘डोमराजा’ होता, ज्याचं नाव होतं कालू. तो मृतदेहांना अग्नी द्यायचं काम करायचा, पण तो खूप हसायचा.
लोक म्हणायचे की स्मशानात हसणारा माणूस एकतर वेडा असतो किंवा एखादा सिद्ध पुरुष!
कालू डोम समाजाच्या तिसऱ्या पिढीचा होता. त्याचे आजोबा म्हणायचे, “बेटा, आपण अग्नी देतो… पण आपण रडायचं नाही. कारण आपण दरवाजा उघडतो, बंद करत नाही.”
कालू प्रत्येक चितेवर लाकडं रचताना एखादं भजन गुणगुणायचा. कधी चहा पिताना मृताच्या नातेवाईकांना विचारायचा, “बाबूजी, पान खाणार का?” लोक आधी संतापायचे, पण हळूहळू त्यांना सवय झाली.
एके दिवशी एक तरुण संन्यासी काशीमध्ये ज्ञानाच्या शोधात आला. त्याचे नाव होतं नचिकेता. त्यानं कालूला हसताना पाहिलं तेव्हा तो भडकला. म्हणाला,
“इथे लोक आपले वडील गमावताहेत आणि तू हसतोयस? तुला लाज नाही वाटत?”
कालू म्हणाला, “महाराज, तुम्ही नवीन दिसताय. बसा, चहा घ्या.”
नचिकेता चिडून म्हणाला, “मी स्मशानात चहा पीत नाही.”
कालू हसून म्हणाला, “म्हणूनच तर तुम्हाला फक्त दुःख दिसतेय.”
पहिली रात्र…
नचिकेता तिथंच थांबला. त्यानं निश्चय केला की तो या डोम राजाला वैराग्य शिकवेल. रात्री एक तिरडी आली. एका १६ वर्षांच्या मुलीचा मृतदेह होता, जिनं लग्नाच्या कपड्यांमध्येच विषप्राशन केलं होतं.
तिची आई जोरात टाहो फोडून रडत होती आणि वडील दगडासारखे सुन्न झाले होते.
नचिकेताचं हृदय विरघळलं, त्याचे डोळे पाणावले. कालू शांतपणे चिता रचत होता. त्यानं मुलीच्या हातातील बांगड्या उतरवल्या आणि आईला देत म्हणाला,
“माय, हे घेऊन जा. आगीत काच वितळते, पण तुझी आठवण वितळणार नाही.”
आई अधिकच रडू लागली. कालूनं चिता पेटवली. जेव्हा आग धगधगू लागली, तेव्हा कालू नचिकेताला म्हणाला,
“पाहा...”
नचिकेतानं पाहिलं. आगीच्या ज्वाळांमध्ये त्या मुलीचा चेहरा आता शांत दिसत होता.
कालू म्हणाला, “रडण्यामुऴ ती हलकी झाली नाही, तर आगीमुळं झाली. आपण रडतो कारण आपण ‘पकडून’ ठेवतो. आग ‘सोडवून’ देते.”
नचिकेता निरुत्तर झाला.
दुसरी रात्र…
दुसऱ्या रात्री एक ९० वर्षांच्या वृद्धाचा मृतदेह आला. त्यांना चार मुलगे होते, सर्व मोठे अधिकारी. पण कुणीच आलं नव्हतं. शेजाऱ्यांनी मृतदेह आणला होता. कालूनंच चिता रचली आणि स्वतःच मुखाग्नि दिला.
नचिकेताने विचारलं, “त्याची मुलं कुठं आहेत?”
कालू म्हणाला, "्_“ते उद्या येतील… अस्थि घ्यायला. आज त्यांची महत्त्वाची मीटिंग आहे.”
नचिकेता संतापानं म्हणाला, “हे कसलं कलियुग!”
कालू हसून म्हणाला, “महाराज, कलियुग इथं नाही, त्यांच्या घरात आहे. स्मशानात तर ‘सतयुग’ असतं. इथं कुणी खोटं बोलत नाही, कुणी मोठेपणा दाखवत नाही. राजा असो वा रंक, लाकडं सारखीच लागतात.”
नंतर त्यानं त्या वृद्धाच्या चितेची एक मूठभर राख हवेत उडवली आणि म्हणाला,
“पहा, हा चालला... ना मुलगा रोखू शकला, ना पैसा.”
नचिकेताच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक केविलवाणं हसू आलं.
तिसरी रात्र…
तिसऱ्या रात्री कोणताही मृतदेह आला नाही. घाट रिकामा होता. कालू आणि नचिकेता बसले होते आणि गंगा संथ वाहत होती.
नचिकेताने विचारलं, “तुला कधी भीती वाटत नाही का?”
कालू म्हणाला, “वाटायची... जेव्हा मला पहिला मुलगा झाला, तेव्हा मी घाबरलो की, जर मी मेलो तर याला कोण जाळणार? मग समजलं की जाळणारा ‘मी' नाही, तर ‘अग्नी’ आहे. मी तर फक्त लाकडं रचतो.
“जसं आयुष्यात आपल्याला वाटतं की, आपणच सर्व चालवत आहोत. परंतु चालवणारा तर कुणी वेगळाच आहे. आपण फक्त लाकडं रचतो. अहंकार, मोह आणि क्रोधाची. आग तर तोच (ईश्वर) लावतो.”
नचिकेता म्हणाला, “तू तर ज्ञानी निघालास !”
कालू म्हणाला, “ज्ञानी नाही महाराज... हा घाट पाहून पाहून थकलोय. इथं रोज लोक येतात आणि म्हणतात की ‘गेला’. मला वाटतं की तो गेला नाही, तर परतलाय. घरापासून शाळेत जाणारं मूल सुद्धा आईपासून दूर जातं, पण शेवटी घरीच परततं ना !”
सहा महिन्यांनंतर नचिकेता काशी सोडणार होता. जाण्यापूर्वी तो घाटावर आला, तर तिथं कालू नव्हता. चौकशी केल्यावर समजलं की, कालूला टीबी झाला होता आणि काल रात्री तो त्याच चितेवर विसावला, जिथं तो इतरांना जाळायचा. त्याच्या मुलानंच त्याला मुखाग्नि दिला. नचिकेता धावत गेला. चिता जळत होती आणि मुलगा रडत होता. नचिकेता मुलाला म्हणाला,
“तुझे वडील तर हसायचे, तू का रडतोयस?”
मुलगा म्हणाला, “ते हसायचे कारण त्यांना ठाऊक होतं, की मी रडणार आहे.”
नचिकेता चितेपाशी बसला आणि तेच भजन गुणगुणू लागला जे कालू गायचा. त्या रात्री घाटावर नचिकेता पहिल्यांदा हसला. लोक चकित झाले.
तो म्हणाला, “मी हसत नाहीये… मला आता उमजलंय!”
मणिकर्णिका घाटावर आता कालूचा मुलगा मृतदेह जाळतो. तो सुद्धा हसतो. प्रवासी विचारतात, “वेडा आहेस का?”
तो म्हणतो, “नाही ! वडिलांनी सांगितलं होतं की, स्मशानात रडणारे खूप आहेत, हसणारा एक तरी हवा, जेणेकरून जाणाऱ्याला वाटावं की कोणीतरी दरवाजा उघडतंय, बंद करत नाहीये.”
नचिकेता आता हिमालयात असतो. तो आपल्या शिष्यांना सांगतो, “वैराग्य जंगलात नाही, स्मशानात मिळतं आणि स्मशानातही तेव्हाच मिळतं, जेव्हा जाळणारा तुम्हाला हसायला शिकवतो.”
कारण मृत्यू हा अंत नाही, तो फक्त ‘लाकडं बदलणं’ आहे. आणि ज्याला हे समजतं, तो जिवंतपणीच कालू सारखा हलका होतो.
- अनामिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा