शनिवार, २३ मे, २०२६

2823. पराभूता

    ऑफिसातून घरी आल्यावर चहा घेत समीर म्हणाला, "शाले, पंधरा दिवसांपूर्वी माझ्या ऑफिसात शेखर नावाचा एक ज्युनियर कलिग ट्रान्सफर होऊन आलाय. दोन चार दिवसांतच आमचं छान ट्युनिंग जमलंय. परवा सुट्टी आहे. मी त्याला व त्याच्या बायकोला दुपारी आपल्याकडे जेवायला बोलावलंय."
शाली म्हणाली, "छान केलंस. माझीही त्याच्याबरोबर व त्याच्या बायकोबरोबर ओळख होईन. जेवण काय बनवू?"
तो म्हणाला, "तुझ्या हातची सुंदर, चविष्ट चिकन रस्सा भाजी, वडे आणि अंडी पुलाव बनव. आपल्या नेहालाही अंडी पुलाव खूप आवडतो. शेवटी बटरस्काॅच फ्लेवरचं आईस्क्रीम खाऊ."
तिस-या दिवशी सकाळी साडेअकराच्या आत सगळा स्वयंपाक उरकून शाली मोकळी झाली आणि आपलं आटोपून, चांगली साडी नेसून तयार झाली. खिडकीच्या मार्बल कट्ट्यावर बसून दोघे चहा घेत गप्पा मारत बसले. त्यांची नजर खाली कम्पाऊंडच्या गेटकडेच होती.
अर्ध्या तासाने एक कार त्यांच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये शिरली. समीरचा मित्र व त्याची बायको कारमधून बाहेर पडले. समीर म्हणाला, "तो शेखर आणि ती त्याची बायको."
त्याच्या बायकोला पाहून शाली चकित झाली. क्षणात निर्णय घेत ती म्हणाली, "आता मी काय सांगते ते तू ऐक. मला त्याच्या बायकोसमोर जायचं नाहीये. तू त्यांना सांग, काही महत्वाच्या कामानिमित्त मला बाहेर जावं लागलं. तू सांभाळून घे. मी नंतर घरी आल्यावर तुला सगळं सांगेन."
तो चकित होत म्हणाला, "अगं पण...."
ती म्हणाली, "आता वेळ नाहीये बोलायला. ते लिफ्टने लगेच वर येतील. त्यांची चांगली खातिरदारी कर. चल, मी निघते." असं म्हणून आपली पर्स घेऊन पायात चपला अडकवून ती बाहेर पडली.
तो चक्रावला होता पण त्याच्या लक्षात आलं की शाली शेखरच्या बायकोला ओळखतेय पण समोरासमोर येऊन तिला ओळख द्यायची शालीची इच्छा नाहीये.
त्याने शेखरचं व त्याच्या बायकोचं स्वागत केलं. शेखर म्हणाला, "ही माझी बायको, मालिनी."
तिचं नाव ऐकून समीर दचकला. शालिनी आणि मालिनी. या दोघी बहिणी आहेत की काय ?
समीरने तिला नमस्कार केला तसा तिनेही त्याला नमस्कार केला.
त्याने त्यांच्यासाठी प्यायला पाणी आणून दिलं. ते दोघे सोफ्यावर आरामशीर बसले. समोरच्या भिंतीवरचा शाली व समीरचा फोटो पाहात ती जागेवरून उठली. फोटो फ्रेमजवळ जवळ जाऊन शालीचा फोटो चांगला न्याहाळून पाहात ती म्हणाली, "दाजी, माझ्या स्वागताला ताई नाही समोर आली ? स्वयंपाकघरात आहे का ती ?"
तिच्या 'दाजी' संबोधण्याने काहीसा दचकत समीर म्हणाला, "नाही. एक इमर्जन्सी काम आलं म्हणून तिला बाहेर जावं लागलं. तुमच्या खातिरदारीत मी काही कमी पडू देणार नाही."
ती म्हणाली, "हरकत नाही, दाजी. पुढच्या रविवारी तुम्ही आमच्याकडे जेवायला या. मग होईलच तिची ओळख !"
आपल्याला 'दाजी' म्हणून संबोधतेय आणि आपल्या बायकोचा एकेरी उल्लेख करतेय याचं समीरला आश्चर्य वाटले. हीसुद्धा शालीला ओळखत असणार. ती ओळख बहिणीच्या नात्याची आहे की काय असा प्रश्न त्याला पुन्हा पडला. पण शालीला बहीण नाही हे त्याला लग्न झाल्यापासून माहीत होते आणि तेरा वर्षांत शालीची कुणी बहीणही समोर आली नव्हती.
तेवढ्यात समीरची दहा वर्षांची मुलगी बाहेर आली, तसं माली उठली आणि तिला जवळ घेऊन म्हणाली, "किती गोड मुलगी आहेस गं तू ! नाव काय तुझं ?"
नेहाने तिचं नाव सांगितलं तसं तिला जवळ घेऊन माली सोफ्यावर बसली. तिने नेहाची, तिच्या शाळेची चौकशी केली. आपल्या पर्समधून एक मोठं चाॅकलेट काढून तिला देत माली म्हणाली, "हे माझ्या लाडक्या परीला !"
'माझ्या लाडक्या परीला' हे ऐकून समीर पुन्हा काहीसा चक्रावला. शाली आणि मालीचं काही तरी नातं असणार असं त्याला ठामपणानं वाटलं.
चौघे जेवायला बसले. त्यांच्या गप्पा चालू झाल्या. मालीच जास्त बोलत होती. पहिल्याच भेटीत तिचं इतकं मनमोकळं वागणं बोलणं पाहून समीर काहीसा विचारात पडला होता. मालीनं जेवणाची खूप तारीफ केली आणि म्हणाली, "ताई, इतका रुचकर, स्वादिष्ट जेवण बनवत असेल असं मला वाटलं नव्हतं ! स्वयंपाक शिकायला मला तिच्याकडे यायला हवं !"
तिचं वागणं बोलणं पाहून तिचा नवरा शेखरही काहीसा विचारात पडला होता.
जेवण झाल्यावर आईस्क्रीम खात गप्पा मारताना मालीला समजलं की समीरचा बारा वर्षाचा मुलगा, नचिकेत हा पाचगणीला एका रेसिडेंट पब्लिक स्कूलमध्ये शिकतोय.
गप्पांच्या ओघात ती म्हणाली, "दाजी, मला नेहा खूप आवडली, तुम्हीसुद्धा मला आवडलात. ताईसुद्धा मला खूप आवडेल ! आता पुढच्या रविवारी तुम्ही तिघं आमच्याकडे जेवायला या. ताईला भेटायला, तिची ओळख करून घ्यायला मी खूप उत्सुक झालेय."
समीरच्या मनात विचार आला. बायका सहसा नव-याच्या मित्राला नव-याचा भाऊ समजतात. बहिणीचा नवरा नाही. ही आपल्याला बहिणीचा नवरा म्हणून समजायला लागली आणि पहिल्या भेटीतच आपल्याशी मेव्हणी या नात्याने मोकळेपणाने वागतेय. ही शालीची बहीण असावी ही शंका पुन्हा त्याच्या मनात उमटली.
शालीला मालीसमोर जायचं नाही हे आठवून तो म्हणाला, "रविवारी तिचा काही प्लॅन आहे का ते बघायला हवं. ती सोशल अॅक्टिव्हिटीमध्ये खूप बिझी असते. मी नंतर शेखरला सांगतो, रविवारी जेवायला यायला आम्हाला जमेल की नाही ते !"
माली म्हणाली, "दाजी, ते मला काही सांगू नका. ताईला सांगा, एक दिवस तुझ्या सोशल अॅक्टिव्हिटी, तुझे प्लॅन्स गुंडाळून बाजूला ठेव म्हणून ! तुमच्या मेव्हणीचा हा लाडाचा हट्ट समजा."
समीर म्हणाला, "बघतो."
नंतर ती म्हणाली, "दाजी, तुमचा मोबाईल बघू जरा ! मी माझा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून देते."
त्याचा फोन घेऊन तिने त्याच्या मोबाईलमध्ये आपला नंबर सेव्ह केला आणि आपल्या मोबाईलला तिने एक मिसकाॅल दिला. मोबाईल परत घेतल्यावर त्याने बघितलं, "माली १४/८" असं नाव तिने सेव्ह केलं होतं. त्याने विचारलं, "हे १४/८ काय आहे ?"
ती म्हणाली, "दाजी, ती माझी बर्थ डेट आहे. पुढच्या महिन्यात माझा बर्थ डे आहे. मला विश करायची आठवण राहील ना !"
तो हसत म्हणाला, "ओहो, शुअर !"
ती म्हणाली, "एखादा पुष्पगुच्छ घेऊन मला शुभेच्छा द्यायला माझ्याकडे आलात तर मला जास्त आवडेल. खूप खुश होईन मी !
तो म्हणाला, "बघतो, हिला कसं जमतंय ते !"
ती हसत म्हणाली, "दाजी, ती सोशल वर्कमध्ये बिझी असते ना ! म्हणजे तिला जमणार नाही. तुम्ही एकटे आलात मला आवडेल. आता मी काही तुम्हाला परकी राहिलेली नाही. तुमची धाकटी मेव्हणीच आहे."
शेखर आपल्या बायकोचं वागणं बोलणं पाहून खूप विचारात पडला होता.
अजून तासभराने ते गेले. जाताना नेहाला जवळ घेऊन ती म्हणाली, "लव्ह यू माय स्वीट हार्ट !"
गळ्यात पडतेय की काय असं तिच्या वागण्या - बोलण्यातल्या मोकळेपणाने समीर विचारात पडला होता. शालीला कुणी बहीण असल्याचे त्याला माहीत नव्हते.
संध्याकाळी पाच वाजता शाली घरी आली. घरात शिरताच ती म्हणाली, "पाच तास मस्त गेले माझे ! एक सिनेमा बघितला. पाॅपकाॅर्न, समोसा खात एकटीने सिनेमा पाहाताना थोडं वेगळेपण जाणवलं. नंतर माॅलमध्ये मस्त विंडो शाॅपिंग केलं. खरंच, आज एकटीने मी खूप एन्जाॅय केलं. आता मी ठरवलंय, अधूनमधून एकटीने असं भटकायला जायचं. मनाला आवडेल तसं एक दिवस एकटीनं जगायचं."
त्याने विचारलं, "जेवलीस का ?"
ती म्हणाली, "कुठे जेवणार ? असंच सटरफटर काही काही खाल्लं. त्या बयेपायी जेवणाला मुकले मी !केव्हा गेली ती बया आणि तिचा नवरा ?"
तो म्हणाला, "त्याच्या बायकोला तू कशी ओळखतेस ? तिला पाहून तू अचानक बाहेर का पडलीस ?"
ती म्हणाली, "आधी मला फ्रेश होऊ दे. मग बोलू आपण."
ती फ्रेश होऊन आल्यावर त्याने पुन्हा विचारलं तशी ती म्हणाली, "हो, ती माझ्या खूप जुन्या ओळखीची आहे. ती माझी खूप जिवलग होती, खूप प्रिय होती मला ! आता झाली तेरा चौदा वर्षे ! आपल्या लग्नाआधी सहा महिने काही कारणाने आमच्यात वितुष्ट आलं. तिनेच जाणूनबुजून तशी परिस्थिति निर्माण केली होती. खूप एककल्लीपणानं, कठोरपणे मनमानी करून ती माझ्याशी वागली होती. तेव्हाच मी ठरवलं होतं की यापुढे तिचं तोंडसुद्धा पाहायचं नाही. खाली कम्पाऊंडमध्ये तुझ्या मित्राची बायको म्हणून तिला पाहिलं तेव्हा या योगायोगाचा मला थोडासा धक्का बसला पण क्षणात निर्णय घेऊन मी बाहेर पडले. आधी वरच्या मजल्यावर गेले. उगीच लिफ्टमधून बाहेर येऊन तिने माझ्यासमोर यायला नको म्हणून. मग मी लिफ्टने खाली गेले. ते जाऊ दे, कधी तरी सांगेन तुला, ती कोण आहे आणि नेमकं काय घडले होतं ते !"
तो म्हणाला, "तू मला कोड्यात पाडते आहेस !"
ती म्हणाली, "आता मला अगदी जसंच्या तसं सांग, इथं काय काय घडलं, ती कशी वागत बोलत होती ते ? तिच्या वागण्या बोलण्यातला एक शब्दही मला सांगायला विसरू नकोस. कारण समोरच्या भिंतीवरचा माझा फोटो पाहून तिने लगेच ओळखलं असणार की तू माझा नवरा आहेस ते !"
शालीला तिचं तोंडही पाहायचं नाही हे ऐकून तिला सगळं सांगावं की नाही या विचारात तो पडला होता पण त्याने ठरवलं की ती शालीची जुन्या ओळखीची आहे, जिवलग होती तेव्हा शालीपासून काहीही लपवायचं नाही.
त्याने अगदी बारकाव्यासह तिचं वागणं बोलणं तिला सांगितल्यावर ती म्हणाली, "मग ती तुलाही आवडली असेल ना, मेव्हणी म्हणून ! तिच्याबद्दल सांगताना तुझ्याही बोलण्यात मला तिचं कौतुकच जाणवलं."
तो म्हणाला, "शाले, हे काय बोलतेस तू ! नशीब माझं, लाडकी मेव्हणी असं नाही बोललीस."
ती म्हणाली, "मेव्हणी म्हणून ती तुला आवडली असेल तर तिचे लाड केलेस, तिच्यावर प्रेम केलंस तर मला काही प्रत्यवाय नाहीये. लाडकी मेव्हणी म्हणून तिच्याशी हवं तसं वाग, गप्पा मार. अगदी तिच्याशी हवं तसं फ्लर्ट केलंस तरी चालेल. चालेल नाही तर तुला तसंच वागायचं आहे. फक्त असं होऊ देऊ नकोस की साली होती है आधी घरवाली !"
तो म्हणाला, "बाप रे ! तुझी मजल असा विचार करण्यापर्यंत गेली ! तुझ्या बोलण्यावरून मला असं वाटायला लागलंय की तू तिच्याशी काही तरी मोठा खेळ खेळायचं ठरवलं आहेस ! आता मला खरं सांगशील का की ती कोण आहे ते ? आणि तिनं माझ्याशी नेमकं बहिणीच्या नव-याचंच नातं कसं जोडलं ?"
ती म्हणाली, "तुझ्याशी ते नातं जोडताना तिने काही तरी विचार केला असेलच ना ! तिच्या मनात काही तरी तशीच भावना निर्माण झाली असेलच ना ! तू तिला आवडला असशील. ती कोण आहे हे मी तुला नंतर कधी तरी सांगेन. चल, आता मी चहा ठेवते."
तो म्हणाला, "तू बैस. मी चहा आणि खायला काही तरी बनवतो."
रात्री नऊला दोघे आपल्या रुममध्ये गेले. समीरचा फोन वाजला. फोन हातात घेत शाली म्हणाली, "घे, तुझ्या मेव्हणीचाच फोन आहे. स्पीकर ऑन कर."
फोन घेऊन समीर म्हणाला, "हॅलो ..."
माली म्हणाली, "दाजी, आली का तुमची बायको घरी ? कुठे गेली होती ती भटकायला ? तिला एवढंही भान बाळगता आलं नाही का की आपल्या नव-याने मित्राला व त्याच्या बायकोला घरी जेवायला बोलावले आहे म्हणून !"
तो म्हणाला, "हो, पाच वाजता आली ती घरी ! तिला तातडीने बाहेर जावं लागलं होतं. तिला त्याचं वाईटही वाटतंय !"
ती म्हणाली, "दाजी, बायकोची बाजू घेऊ नका. मला माहीत आहे, ती का बाहेर गेली होती ते ! काही तातडीचं काम नव्हतं तिचं ! मस्त भटकून आली असेल ती, माॅलमध्ये विंडो शाॅपिंग करून ! एखादा सिनेमासुद्धा पाहिला असेल तिने !"
तो म्हणाला, "ती असं का करेल ? तिला महत्वाचं काम आलं आणि तिला बाहेर जावं लागलं."
ती म्हणाली, "दाजी, मी म्हणते  तसंच तिने केलं असणार ! पण दाजी, एक खरं सांगते, ती बाहेर गेली हे बरंच झालं. तुमची बायको समोर नसल्यामुळे मला तुमच्याशी हवं तसं मनमोकळेपणाने वागता बोलता आलं. तिचं दडपण नव्हतं माझ्यावर ! मला खूप बरं वाटलं. जेवण खूप छान होतं. तुमच्यासमोर बसून मी समाधानाने जेवले. सुगरण आहे तुमची बायको ! तिच्याकडे फोन द्या. मीच तिला विचारते, मुद्दाम बाहेर का गेली होतीस ते !"
प्रसंगावधान राखत तो म्हणाला, "ती इथे जवळ नाहीये. तुमचा फोन आलाय हे पाहून ती नेहाच्या रुममध्ये गेली."
ती म्हणाली, "समंजस आहे तुमची बायको ! मेव्हणी मेव्हण्याचं चेष्टेचं, मस्करीचं बोलणं ऐकणं तिला सहन झालं नसतं !"
तो म्हणाला, "फोन काय सहज केलात ?"
ती म्हणाली, "मेव्हण्याला फोन करायला माझ्यावर काही बंधनं नाहीयेत. तुमच्याकडून निघाले पण मला तुमची सारखी आठवण येतेय. आता यापुढे आठवण आली की तुम्हाला फोन करत जाईन."
तो म्हणाला, "माझी बायको येतेय. चला, ठेवतो फोन."
त्याने फोन बंद केल्यावर शाली म्हणाली, "पक्की निलाजरी आहे ! धरबंध सोडून बोलत होती. समीर, तू तिच्याशी फ्लर्ट करावंस अशी माझी इच्छा आहे पण तू मात्र सावध राहा. तुझ्या गळ्यात पडायला ती खूप आतुर झालीय असंच मला वाटतं."
तो म्हणाला, "तू काय माझी चेष्टा करतेस ? तिचं वागणं बोलणं तू समक्ष अनुभवलं नाहीस तरी असं बोलतेस ?"
ती म्हणाली, "मी कशाला चेष्टा करू तुझी ? दुपारी तिचं वागणं बोलणं तू अनुभवलंस ना ? आताही फोनवर ती कसं बोलत होती तेही तू अनुभवलंस आणि नव-याच्या मित्राबरोबर तिनं कोणतं नातं निवडलं, तर मेव्हणी मेव्हण्याचं ! नव-याचा मित्र म्हणून दिराचं नातं तिच्या मनात यायला हवं होतं ना ! आणि महत्वाचं म्हणजे मी तिला चांगली ओळखते."
तो म्हणाला, "तिने माझ्याशी मेव्हण्याचं नातं का जोडलं ते मी कसं सांगू ? आता तूच सांग, तू तिला चांगली ओळखतेस ना, मग तिने तुझ्याशी बहिणीचं नातं कसं जोडलं ते ! आपल्या लग्नाआधीपासून तू तिला कशी ओळखतेस, ती तुझी जिवलग होती, तुला प्रिय होती असंही तू बोललीस तरीही तू तिच्या समोर जायचं तू का टाळलंस ?"
ती म्हणाली, "तुला समजायलाच हवं पण आता लगेच नाही. वेळ आली की सांगेन मी ! आता मलासुद्धा बघायचंय, मेव्हणी म्हणून तुझ्याशी वागता बोलताना तिची मजल कुठपर्यंत जाते ते ! तू तिला पुरेपूर साथ दे पण गळ्यात पडू देऊ नकोस."
तो म्हणाला, "मला वाटतं, तू तिच्याशी काही तरी खेळ खेळायचं ठरवलं आहेस, तिला जबरदस्त धक्का बसेल असा !"
ती म्हणाली, "हो, माझ्या खेळाला तू साथ दे."
माली दररोजच रात्री नऊ वाजता त्याला फोन करू लागली. सुट्टीच्या दिवशी ती केव्हाही फोन करत असे. एकदा त्याने विचारलं, "तुम्ही दररोज रात्री बरोबर नऊ वाजता न चुकता मला फोन कसा करता ?"
ती म्हणाली, "दाजी, त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे रात्री नऊ वाजले की तुम्हाला माझ्या फोनची वाट पाहायची सवय व्हावी, आणि मी फोन केला नाही तर तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटावं म्हणून ! दुसरं कारण म्हणजे यावेळी माझा नवरा हाॅलमध्ये कम्प्युटरवर बसलेला असतो. मी खोलीत येऊन तुमच्याशी बोलते. तो जवळ नसल्यामुळे माझ्यावर त्याचं काही बंधन नसतं आणि मी तुमच्या संपर्कात आहे, तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारते हे त्याला कळणारही नाही  ! मी तुमच्यावर भाळले आहे अशी त्याला उगीच शंका यायला नको. तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलून मला खूप बरं वाटतं."
त्याने फोन ठेवल्यावर शाली म्हणाली, "बघ, किती बिलंदर बाई आहे ही ! तुला तिच्या मोहात अडकावयाला बघते. तुझ्याशी गप्पा मारते हे नव-याला कळूही देत नाही. ती तुझ्यावर भाळलीय हे कबूल करून मोकळी झाली. पक्की निलाजरी आहे ती ! समीर, ती तुझी मेव्हणी म्हणून तू तिच्याशी फ्लर्ट करतच बोलत जा, तिला बरं वाटेल पण तितकाच तू सावध राहा. मी ओळखते तिला, तुझ्या गळ्यात पडायचाच विचार तिच्या मनात असणार !"
तो म्हणाला, "चल, काहीही वाटेल ते बोलू नकोस. एका भेटीत तिची इतकी मजल गाठेल असं मला वाटत नाही. तू तर मला तिच्याबद्दल काही सांगत नाहीस."
ती म्हणाली, "मी वाटेल ते काहीही बोलत नाहीये. ती तुझ्यावर फिदा झालीय हे सरळ सरळ कबूल करून ती मोकळी झालीय. शिवाय तुझ्याही ते लक्षात आलं असेलच ना ? मजा आहे बुवा एका माणसाची ! बायकोबरोबर मेव्हणीपण लाभली."
तो म्हणाला, "चेष्टा सोड आणि मला खरं खरं सांग, कोण आहे ती ?"
ती म्हणाली, "वेळ आली की सांगेनच ना ! तोपर्यंत फोनवर बोलताना तिच्याशी फ्लर्टिंग करत राहा. ते मला आवडेल. तू तिच्याशी फ्लर्टिंग करावंस ही माझी इच्छा आहे ! ती किती वाहावत जाते ते मला बघायचंय. तूसुद्धा दोनदा तिचा एकेरी उल्लेख केला होतास. आता तू तिला 'अगं, तुगं' असा एकेरी उल्लेख करायला सुरुवात कर. तिलाही तेच हवं असेल. तुलाही आवडायला लागली आहे ना ती ?"
समीरला आश्चर्य वाटे की शाली इतकी सहजपणे आपली चेष्टा कशी काय करू शकते ? मालीचं माझं नातं नेमकं काय आहे हे शाली जाणतेय म्हणून शाली असं वागत असेल का ?"
नंतर शालीने दोनदा तिला 'अगं तुगं' करावं असा हट्ट धरला. तेव्हा तो म्हणाला, "तू काय मला मुद्दाम तिच्याकडे ढकलते आहेस का ?"
ती म्हणाली, "मला हवं तेच मी घडवून आणतेय. तू मला साथ दे. तू सरळ तिला 'अगं तुगं' कर. मेव्हणी म्हणून तिची चेष्टा करत जा, थोडी फार चावट चेष्टा केलीस तरी चालेल. तिलाही तेच हवं असेल !"
तिच्या वाढदिवशी सकाळी शाली म्हणाली, "तिचा आज वाढदिवस आहे. फोन करून तिला विश कर. मेव्हण्याने विश केलं म्हणून ती खूप खुश होईल."
त्याने विचारलं, "तिचा वाढदिवस तुझ्या आठवणीत आहे ?"
ती म्हणाली, "अरे, मी तुला बोलले ना, ती माझ्या खूप जुन्या ओळखीची आहे आणि माझी जिवलग होती म्हणून ! चल, तिला फोन करून शुभेच्छा दे. नाही तर असं कर ना, ऑफिसला जाताना एक फुलांचा बुके घेऊन तिला विश करायला जा. ती कुठे राहाते हे तू माहीत करून घेतलं असशीलच ना ! थोडं उशिरा नीघ, म्हणजे तिचा नवरा ऑफिसला गेला असेल. ती खूप खुश होईल."
तो म्हणाला, "नाही. मी तिला फोन करून विश करणार नाही आणि फुलांचा बुके घेऊनही तिच्याकडे जाणारही नाही. सगळंच माझ्यावर लादू नकोस. तिचा फोन येईल तेव्हा मी विश करेन."
रात्री तिचा फोन आला. ती म्हणाली, "दाजी, माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा देण्यासाठी एक फोनही करावासा वाटला नाही तुम्हाला ? किती हिरमुसले मी ! खरं तर फुलांचा गुच्छ घेऊन तुम्ही याल असं मला वाटत होतं पण ... माझा सगळा दिवस निरस गेला."
तो म्हणाला, "साॅरी ! तुझा वाढदिवस माझ्या लक्षात राहिला नाही. मी आता शुभेच्छा देतो."
ती म्हणाली, "भावोजी, खोटं बोलू नका. माझ्या नावाबरोबर माझ्या वाढदिवसाची तारीख मी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केली आहे. तुम्ही फोन का केला नाही ते लक्षात आलं माझ्या ! तुमची बायको म्हणाली असेल की काही गरज नाही, तिला विश करायची."
तो म्हणाला, "नाही. ती काही मला अडवत नाही. रात्री तुझा फोन आला की ती नेहाच्या रुममध्ये निघून जाते. आपलं काय बोलणं झालं याबद्दल ती चौकशीही करत नाही. चल, ठेवू का फोन. ती आत येतेय."
फोन ठेवल्यावर शाली म्हणाली, "मला वाटलंच होतं की ती नाराजीनं, काहीशा रोषानं तुझ्याशी बोलेल असं !"
असेच दोन महिने गेले. माली त्याला दररोज फोन करायची. तो तिच्याशी 'अगं तुगं' असं बोलायला लागला होता. थोडीशी चेष्टा करायचा. एकदा ती म्हणाली, "दाजी, तुम्ही मला 'माली', 'ए माले,' असं म्हणता ते ऐकून मला खूप बरं वाटतं. असं वाटतं, मी तुम्हाला आवडायला लागलेय आणि तुम्ही तुमच्या लाडक्या मेव्हणीवर हक्क गाजवायला लागला आहात !"
तो म्हणाला, "तसं काही नाही आहे."
ती हसत म्हणाली, "दाजी, बायकोला इतकं घाबरू नका. तुम्हाला मी चांगली ओळखायला लागलेय."
एक दोन दिवस आड ती त्याला जेवायला यायचा आग्रह करायची आणि तो तिला काही तरी कारण सांगून टाळायचा. एकदा ती म्हणाली, "दाजी, मी तुम्हाला माझ्या घरी जेवायला बोलावते आणि तुम्ही प्रत्येक वेळी काही तरी सबब सांगून मला नाही म्हणता. त्याचं मला वाईट वाटत नाही कारण मला माहीत आहे, तुमची तुसडी बायकोच माझ्याकडे यायला नाही म्हणत असणार ! तुम्ही माझ्याशी संबंध ठेवावे हेसुद्धा तिला आवडत नसणार !"
तो म्हणाला, "तसं काही नाही आहे. तू फोन करतेस त्याबद्दल ती काहीच बोलत नाही. उलट तुझा फोन आला की ती खोलीतून बाहेर पडते आणि आपल्याला मनमोकळं बोलायची संधी देते."
ती म्हणाली, "दाजी, कशाला बायकोची बाजू घेता ? आता पुढच्या रविवारी तुम्ही आला नाही तर मी तुम्हाला फोन करणं बंद करेन. मग मात्र तुमची लाडकी मेव्हणी फोन करत नाही म्हणून तुम्ही बेचैन होत जाऊ नका." असं म्हणून तिने फोन बंद केला.
शाली म्हणाली, "समीर, सांभाळून राहा. ती तुझ्यावर पहिल्याच भेटीत का भाळलीय हे मी जाणून आहे. आणि तुला गुंतवायला बघतेय. तूपण तिच्यावर भाळला आहेस असंच मला जाणवत राहातं !"
तो म्हणाला, "मी फक्त तुला साथ देतोय. मला आधी सांग, ती कोण आहे ? आणि तू तिच्याशी कोणता खेळ खेळते आहेस ?"
ती म्हणाली, "तुला तिचा मोह वाटायला लागलाय ना, मग आता मी तुला काही सांगणारच नाही. वेळ आली की तुला सगळं आपोआप समजणारच आहे आणि ती वेळ लवकर आणायला ती खूप उत्सुक, आतुर असणार !"
एकदा रात्री फोन करून ती म्हणाली, "दाजी, उद्या ऑफिसला दांडी मारा. आपण एखाद्या सिनेमाला जाऊ. थोडं फिरू, मग बाहेर जेवण करून घरी जाऊ."
तो म्हणाला, "कल्पना चांगली आहे. मलाही आवडेल तुझ्याबरोबर बाहेर फिरायला, सिनेमा बघायला पण माझ्या बायकोला आपली इतकी जवळीक आवडणार नाही. तिच्या मनात उगीच संशय का निर्माण करायचा ? तुझ्या नव-यालाही ते नक्कीच आवडणार नाही. मग घरात उगीच ताणतणाव कशाला हवा !"
ती म्हणाली, "दाजी, इतकं घाबरता तुम्ही तुमच्या बायकोला ! अहो, तिला सांगायची काय गरज आहे ? मीसुद्धा माझ्या नव-याला कळू देणार नाही."
तो म्हणाला, "तरी नको. मी माझ्या बायकोला सांगितलं नाही तरी तिला कुठून ना कुठून समजेलच. तिच्या सोशल वर्कमुळे तिचं सर्कल खूप मोठं आहे. तिच्या ओळखीचं कुणी तरी आपल्याला नक्की पाहील."
ती म्हणाली, "दाजी, तुम्ही मला नाराज करता आहात. चला, ठेवते फोन. आता मी तुम्हाला फोनही करत जाणार नाही."
त्याने फोन ठेवल्यावर शाली म्हणाली, "तिची इच्छा का मोडतोस ? जा तिच्याबरोबर एक दिवस ! मजा करा."
तो म्हणाला, "शाली, तुझा खेळ तुझ्या अंगलट येऊ देऊ नकोस."
ती म्हणाली, "तशी वेळच येणार नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझ्या खेळाला तू फक्त मला साथ दे. ती पराभूता आहे, मला तिला हरलेलं पाहायचंय !"
समीरने तिला एखाद्या रोमॅन्टिक सिनेमाला घेऊन जावं यासाठी शालीने त्याचा पिच्छा पुरवला. शेवटी तो वैतागून म्हणाला, "शाली, तू तिच्याबरोबर एक खेळ खेळतेयंस पण त्यासाठी माझा असा वापर करून तो खेळ तुझ्याच अंगलट येईल अशी वेळ आणू नकोस."
ती म्हणाली, "समीर, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू माझ्या खेळाला फक्त साथ देतो आहेस एवढं फक्त लक्षात ठेव. माझी इच्छा म्हणून तू तिला जेवायला आणि सिनेमाला घेऊन जा."
शालीनं शेवटी त्याला तयार केलंच. रात्री तिचा फोन आल्यावर त्यानं तिला तसं सांगताच ती खूप खुश झाली. ती म्हणाली, "दाजी, मला हवं ते तुम्ही देता आहात. थँक यू, समीर."
समीरने फोन ठेवल्यावर शाली म्हणाली, "समीर, शेवटी ती बोलून गेलीच, तिला काय हवं आहे ते !"
तो म्हणाला, "तुझ्या खेळापायी तू खूप मोठा धोका पत्करते आहेस असं नाही वाटत तुला ?"
ती म्हणाली, "तुझ्यावर माझा विश्वास नसता तर तुझं म्हणणं बरोबर ठरलं असतं."
दुस-या दिवशी तो मालीला सिनेमाला घेऊन गेला. दोघे बाहेर हाॅटेलमध्ये जेवले. ती खूप खुश झाली.
घरी आल्यावर समीर म्हणाला, "ती कशी बोलत होती, काय बोलत होती, कशी वागली हे मी तुला सांगणार नाही. यापुढे तुझा खेळ तूच खेळत बस. मला नको तिच्या कचाट्यात देऊस."
शाली हसत म्हणाली, "नाही देणार मी तुला तिच्या कचाट्यात ! मला एकदाच हा प्रयोग करायचा होता. मला एकच सांग, तिच्या वागण्या बोलण्यात तुला वेगळं काही जाणवलं का ?"
तो म्हणाला, "तिच्या वागण्या बोलण्यावरून मला जाणवलं की तीसुद्धा तुझ्याबरोबर काही तरी खेळ खेळतेय."
ती म्हणाली, "हो, ती तिच्या मूळ स्वभावावर जाणारच ! तिला खेळू दे तिचा खेळ पण ती जिंकणार नाही. तिला हरलेलं मला बघायचंय."
तो म्हणाला, "मला एकदा सगळं सांगून मोकळी का होत नाहीस ?"
ती म्हणाली, "तुला सगळं समजणारच आहे. ती वेळ लवकरच येईल आणि त्यासाठी तीच पुढाकार घेईल."
अजून एक महिना असाच गेला. दररोज तिचा फोन यायचा. दोघांचं चेष्टा मस्करीचं बोलणं शाली ऐकायची आणि मनातच खुश व्हायची. एकदा तिच्याशी बोलून तो म्हणाला, "शाले, मी खरोखर तिला धाकटी मेव्हणी मानायला लागलो तर ?"
शाली हसत म्हणाली, "तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू काही तिच्याशी नको इतकी जवळीक निर्माण करणार नाहीस हे मी जाणून आहे. जे नाटक चाललंय ना, ते तसंच चालू राहू दे. मी तिला ओळखते, तिच्या मनात नेमकं काय आहे याची मला कल्पना आहे. ती लवकरच त्यासाठी तिचं पाऊल पुढं टाकेल."
अजून एक आठवडा गेला. एका सुट्टीच्या दिवशी माली अचानक शालीकडे आली.
माली कुठली पावलं उचलणार याचा अंदाज शालीने आधीच बांधला होता. एक दिवस ती अचानक आपल्या समोर येईल याचीही कल्पना शालीला होती आणि तिला कसं हाताळायचं हा विचार तिने आधीच करून ठेवला होता.
माली आत येऊन सोफ्यावर बसताच शाली म्हणाली, "नेहा, तू तुझ्या खोलीत जाऊन अभ्यास करत बस. दार लावून घे."
नेहा आत गेल्यावर शाली म्हणाली, "कशाला आलीस इथं ? काही काम आहे का माझ्याकडे ? तुला भेटायची मला अजिबात इच्छा नाही हे त्याच दिवशी तुझ्या लक्षात आलं होतं ना, जेव्हा तू माझ्याकडे जेवायला आली होतीस आणि मी बाहेर निघून गेले होते !"
माली काही बोलणार तोच शाली म्हणाली, "असं तर नाहीये ना की तू माझ्या नव-याला भेटायला आली आहेस ? माझ्या नव-याला भेटायला आली असशील तर मी आत जाते."
शालीच्या बोलण्याने समीर विचारात पडला.
माली म्हणाली, "तुझ्या नव-याने मला एकदा सिनेमाला नेलं, आम्ही बाहेर हाॅटेलात जेवलो. नंतर चारदा बोलले पण त्याला माझ्याबरोबर बाहेर यायला जमलं नाही म्हणून त्याला भेटायला सरळ तुझ्याकडे आले."
शाली म्हणाली, "मग भेटत बस त्याला, मी आत जाते. नेहासुद्धा आतच आहे."
ती म्हणाली, "साडेतेरा वर्षांनी आपण अचानक भेटल्यावर आधी तू मला मिठीत घेशील, ब-याच वर्षांनी भेटतोय म्हणून आपण दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू, मग तू माझे अश्रू पुसून मला माझं सुख दुःख विचारशील आणि तू तुझीही सुख दुःख मला सांगशील असं मला वाटलं होतं. पण तू तर ..."
शाली म्हणाली, "मला त्याची गरज वाटली नाही कारण आपले संबंध तुटावेत अशीच तू वागली होतीस. तू माझ्या नव-याकडे नाही तर माझ्याकडे आली आहेस हे मी जाणून आहे. कशाला आलीस ते सांग. काही हवंय का तुला ?"
माली काहीशी रोषातच म्हणाली, "मला काय हवंय हे तुला समजलं नसेल असं मला वाटत नाही. गेले साडेतीन महिने मी तुझ्या नव-याबरोबर फोनवर कशी वागते बोलते आणि तोही माझ्याबरोबर कसा वागतो बोलतो हे तू अनुभवत नाहीस का ? तो तर आता मला 'ए माली' नाही तर 'ए माले' असं एकेरी बोलायला लागलाय. मेव्हणी म्हणून माझी चेष्टा मस्करी करतो. ब-याच वेळा माझ्याशी चावटही बोलतो. मला खात्री आहे, फोनचा स्पीकर ऑन ठेवून तूसुद्धा माझं बोलणं ऐकतेस !"
शाली मालीला चांगलं ओळखून होती. ती काय मागणार याची तिला कल्पना आली होती. ती म्हणाली, "हो, तुझी मजल कुठपर्यंत जाते हे बघण्यासाठी मी तुमचं फोनवरचं बोलणं ऐकत असते. तुला काय हवंय याची मला कल्पना आली आहे पण मला तुझ्याकडून ऐकायचंय. तू हक्क गाजवते की याचना करतेस ते मला बघायचंय !"
माली म्हणाली, "मी तुझ्याकडे भीक कशाला मागू ? मी माझा हक्कच गाजवेन ना ! लहानपणापासून मी तुझं सगळं काही हिसकावून घेत आलेय. खरं सांगू, मी तुझ्यावर खूप प्रेम करायचे. त्या प्रेमापोटीच माझी अशी भावना झाली होती की तुझं जे जे आहे ते सगळं माझंच आहे पण तू मला देणार नाहीस म्हणून मी तुझं असलेलं सगळे अट्टाहासाने हिसकावून घेत आलेय. आताही मी तुझं आहे तेच हिसकावून घ्यायला आलेय हेही तू चांगली जाणतेस. तू एक चांगलं केलंस, नेहाला आत पाठवलंस."
शाली म्हणाली, "माझं काय हिसकावून घेण्यासाठी तू इथं आलीस ?"
माली म्हणाली, "आता मोकळेपणाने तुला सांगते, मला तुझा नवरा हवाय. त्याला हिसकावून घ्यायला मी आलेय."
आपल्या बोलण्याचा शालीला अजिबात धक्का बसला नाही हे पाहून ती पुढे म्हणाली, "मला तुझा नवरा हवाय, माझा मेव्हणा म्हणून ! मला त्याची लाडकी मेव्हणी म्हणून जगायचंय ! माझे लाड करतच त्याने वागायचं, बोलायचं. त्याने माझ्यावरही प्रेम करावं एवढीच माझी इच्छा आहे ! तसा तो आपली लाडकी मेव्हणी समजूनच माझ्याशी वागतो बोलतो, माझी हवी तशी चेष्टा मस्करी करतो हे तुझ्या लक्षात आलं असेलच ना ! त्या दिवशी सिनेमा पाहताना तो माझ्याशी कसा वागला हे मात्र तुझ्या नव-याने तुला सांगितलं नसणार !"
शाली शांतपणे म्हणाली, "तुला माझा नवरा हवाय. अजून काही नकोय का ?"
माली म्हणाली, "आधी तुझ्या नव-याला माझा प्रिय मेव्हणा म्हणून पूर्णपणे हंशील करते. मग ..."
शाली म्हणाली, "माझ्या नव-याला हिसकावून घेतलंस तरी माझी काही हरकत नाही पण मी एक गोष्ट ठामपणाने सांगते, माझा नवरा तुझ्या हाती कधीच लागणार नाही. तू त्याला माझ्यापासून हिसकावून घेऊ नकणार नाहीस. माझ्याकडून अजून काय हिसकावून घ्यायचा विचार आहे तुझा ?"
माली म्हणाली, "मला अजूनही काही हवंय, ते मात्र मला तुझ्याकडून हिसकावून घेता येणार नाही. ते मी तुझ्याकडे याचना करून मागेन. मला काय हवंय ते मी नंतर सांगते."
समीर चकित होऊन दोघींचं बोलणं ऐकत होता. दोघींच्या बोलण्यामध्ये आपण काय बोलावं हा प्रश्न त्याला पडला होता. या दोघी बहिणी आहेत याची त्याला पूर्ण कल्पना आली होती म्हणून तो गप्प बसला पण मालीच्या धार्ष्ट्याचं त्याला नवल वाटत होतं. ती उघडपणे शालीला तिचा नवरा मागतेय हे पाहून तो स्तब्ध झाला होता.
शाली म्हणाली, "लहानपणापासून जे माझ्या हक्काचं आहे ते तू सतत हिसकावून घेत समाधान मिळवत आली आहेस पण तुझं ते समाधान भ्रामक, फसवं असायचं. आई बाबांनी तुला आणि मला ड्रेस, फ्राॅक, साडी परकर आणि इतर काही आणले तर तुला माझाच ड्रेस, फ्राॅक हवा असायचा, माझ्याच साड्या परकर व इतर वस्तूवर तू हक्क गाजवून हिसकावून घ्यायचीस. तू माझ्या वस्तू हिसकावून घ्यायचीस असा तुझा भ्रम आहे. दोनदा तू माझे फ्राॅक हिसकावून घेतल्यावर आई बाबांना ते आवडलं नव्हतं. मग ते तुझ्याशी कपट करायला लागले होते. माझ्यासाठी आणलेले कपडे ते आधी मला न देता तुला द्यायचे. तुझ्यासाठी आणलेले मला द्यायचे. हे कपडे, साडी मला उठून दिसेल म्हणून आई बाबा माझ्या कपड्यांचं खूप कौतुक करायचे. मग तू माझ्या हातातले कपडे हिसकावून घ्यायचीस. तू तसं केल्यावर माझ्यासाठी आणलेले कपडे, साड्या व काही इतर वस्तू मलाच मिळायच्या."
माली म्हणाली, "काय सांगतेस ? आई बाबा माझ्याशी असे छळ कपट करून वागायचे ?"
शाली म्हणाली, "हो, तुझं वागणं त्यांना कधीच पसंत पडलं नव्हतं. माझे ड्रेस, फ्राॅक, साड्या परकर व इतर वस्तू हिसकावून घेण्याचीच तुझी भावना असायची, बाकी तू प्रेमानं वागायचीस, आतताईपणा करत नव्हतीस म्हणून आई बाबांनी तुझ्या स्वभावावर तोडगा शोधला होता. माझं सगळं काही हिसकावून घेण्याचा तुझा आनंद, तुझी खुशी ही आभासी, मिथ्या असायची. जे माझं आहे ते मलाच मिळायचं ! तेव्हा तू माझं हिसकावून घेत आलीस या भ्रमात राहू नकोस."
माली म्हणाली, "मी भ्रमात जगत नाहीये. मी तुझा होणारा नवरा हिसकावून घेतला होता."
ती म्हणाली, "गेली साडेतेरा वर्षे तू या भ्रमात जगते आहेस की मला पाहायला आलेला माझा होणारा नवरा तू माझ्यापासून हिसकावून घेतलास ! हाही भ्रम आहे तुझा ! काय घडलं ते सांगते. तुझा नवरा मला पाहायला आला होता. तूच पुढे पुढे मिरवत होतीस. तुझं वागणं बोलणं, तुझं वावरणं पाहून तुझ्या सासूने तुला पसंत केलं. आई बाबांना धक्का बसला होता. नकार द्यायचं त्यांनी ठामपणाने ठरवलं होतं. पण तीन दिवस मी आई बाबांचं मन बदलवत राहिले. मी त्यांना म्हटले, तो मला फक्त पाहायला आला होता. त्याने मला नीट पाहिलंही नाही. पसंती नापसंतीची वेळच आली नाही. तोच मला हवा अशी माझी भूमिकाही नव्हती आणि मला त्याची ओढही वाटली नव्हती, मला त्याच्याविषयी काही वाटतच नाही मग त्यांनी मालीला पसंत केलंय तर तुम्ही होकार द्या. मी आई बाबांचं मन बदलवलं होतं म्हणून त्यांनी तुझ्यासाठी होकार दिला होता तेव्हा माले, तू या भ्रमात राहू नकोस की मला पाहायला आलेला मुलगा तू माझ्यापासून हिसकावून घेतला होतास. खरं तर ती भीक मीच तुझ्या पदरात टाकली होती."
माली म्हणाली, "तुझ्या नव-यासमोर खोटं बोलून लपवू नकोस. तो तुलाही पसंत पडला होता, आवडला होता. तो तुझ्यासमोर सतत येत राहिला तर तुला त्रास होत राहील, खंत वाटत राहील म्हणून तूच माझ्याशी संबंध तोडलेस आणि आई बाबांनीही आपण कधी एकत्र येऊ नये म्हणून तुला साथ दिली."
शाली म्हणाली, "किती भ्रमात जगते आहेस गं तू ! मी तुझ्या सासू व नव-यासमोर पोह्याच्या डिश ठेवून आत गेले होते. पोहे खात तुझ्या सासूने तुला पसंत केल्याचं सांगितलं. मी आतच होते. तुझं लग्न ठरल्यानंतर तुझ्या नव-यासमोर मी जावू नये अशी पावलं तर तूच उचलत गेलीस. तुला भीती वाटायची की तुझ्या नव-याच्या मनात मला कुठे तरी जागा निर्माण होईल. तुझ्या मनाच्या अस्थिरतेपायी तू काय केलंस ते सांगू ? मला तुझ्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला थांबू दिलं नव्हतंस. मला काकांकडे पाठवलं होतंस. त्यासाठी तू आई बाबांशी भांडली होतीस, आकांडतांडव केलं होतंस. तुझं लग्न चार महिन्यांनी झालं. या चार महिन्यांत तो आपल्या घरी सहा सात वेळा आला असेल. प्रत्येक वेळी तू मला काकांकडे पाठवायचीस. त्यासाठी आकांडतांडव करायचीस. आई बाबांशी तू भांडायचीस. तू समजत होतीस तसं माझ्या मनात काही नव्हतं पण तूच माझ्यापायी स्वतःला असुरक्षित समजायला लागली होतीस. माले, तू खूप स्वार्थी आणि आप्पलपोटी आहेस !"
माली म्हणाली, "हो, आहे मी आप्पलपोटी ! तुझं असायचं ते सगळं मला हवं असायचं पण मी स्वतःला तुझ्यापायी अजिबात असुरक्षित समजत नाही."
शाली म्हणाली, "असं काही नव्हतं तर तुझ्या लग्नात मला चार दिवस काकांकडे राहायला का पाठवलं होतंस ? मी लग्नात थांबू नये, वावरू नये यासाठी दोन दिवस आई बाबांशी का भांडत होतीस, का आकांडतांडव करत होतीस ? माले, शेवटी मीच आई बाबांना समजावलं आणि तुझ्या लग्नात मी चार दिवस काकांकडे राहायला गेले. आई बाबा आणि मीसुद्धा तुझ्या स्वभावाला चांगले पारखून होतो. तुझ्या मनात भीती असायची की तुझा नव-याच्या मनात माझीही जागा निर्माण होईल."
माली म्हणाली, "तू म्हणतेस ते मी मान्य करणारच नाही. माझ्या मनात असं काही नव्हतं. उलट तुला पाहायला आलेला मुलगा मी तुझ्यापासून हिसकावून घेतला याचं मला समाधान होतं."
शाली म्हणाली, "तू त्याच भ्रमात जगत राहा. तू हेही विसरू नकोस की मला तुझ्यापेक्षा जास्त चांगला नवरा मिळाला. आमचं एकमेकांवर अपार प्रेम आहे. आम्हाला एक मुलगा व एक मुलगी आहे. आम्ही सुखात, समाधानात जगतोय. ऑफिसात माझा नवरा तुझ्या नव-याचा साहेब आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या नव-याला त्याच्या मेव्हणीची ओढ कधीच वाटली नाही आणि वाटणारही नाही !"
माली म्हणाली, "फोनवर तो मला 'ए माली' म्हणतो, सतत माझी चावट चेष्टा मस्करी करत असतो. मला लाडक्या मेव्हणीसारखं वागवतो. एकदा मला सिनेमाला घेऊन गेला. तो माझ्याकडे ओढावलाय पण तुझ्यासमोर तो कबूल करणार नाही."
समीर म्हणाला, "नाही मालिनी, तू नको त्या भ्रमात राहू नकोस. मला सत्य माहीत नव्हतं म्हणून मी तुझ्या वागण्या बोलण्याने विचारात पडायचो पण तुझ्याशी फोनवर बोलताना मला तुझी ओढ कधी वाटली नाही. शाली तुझ्याशी एक खेळ खेळत होती आणि फोनवरचं माझं वागणं बोलणं, तुला सिनेमाला घेऊन जाणं हे तिच्या खेळाचाच एक भाग होता. मी तुला झुलवत असायचो. असं करून तू तुझ्या बहिणीच्या नव-याला हिसकावून घेशील या तुझ्या सुप्त इच्छेला भ्रामक बळ देऊन तुझी इच्छा पेटवत ठेवण्यासाठीच मी शालीच्या इच्छेनुसार वागलो. आमच्या लग्नानंतर साडेतेरा वर्षे माझ्या आयुष्यात आणि मनात मेव्हणीची जागाच नव्हती. आता तू मेव्हणी म्हणून समोर आलीस पण गेल्या साडेतीन महिन्यात मेव्हणीबद्दल असायला हवी ती ओढ, ती आत्मियता, ते चेष्टेचं नातं, ती ऋजुता माझ्या मनात कधीच निर्माण झाली नाही आणि पुढेही कधी होणारही नाही."
शाली म्हणाली, "माली, ऐकलंस का माझा नवरा काय म्हणतोय ते !"
माली काही बोलली नाही तशी शाली म्हणाली, "लहानपणापासून तू माझं सगळं हिरावून घेत आलीस हा भ्रम आधी तुझ्या मनातून काढून टाक. माझा नवरा माझ्यापासून हिसकावून घेण्याचा विचार करून तू फोनवर तशी वागत बोलत आलीस तेही विसरून जा. तू माझं काहीच हिरावून घेतलं नव्हतंस आणि यापुढेही हिरावून घेऊ शकणार नाहीस. जे माझं होतं आणि आहे ते शाश्वत माझंच राहाणार आहे."
शाली आपले वाभाडे काढतेय हे पाहून माली उदास होऊन शांत झाली होती. काही तरी बोलायचं म्हणून ती म्हणाली, "मी तुझं आहे ते हिसकावून घेईन या भीतीपायीच  गेली साडेतेरा वर्षे तू माझ्यापासून दूर राहिलीस ना ?"
शाली म्हणाली, "नाही ! तुझ्या लग्नात तू आपलं बहिणीच्या नात्याचं बंधन झुगारून मला चार दिवस काकांकडे राहायला पाठवलंस. नंतर तू जेव्हा जेव्हा तुझ्या नव-याला घेऊन आई बाबांकडे यायचीस तेव्हा तेव्हा तू मला घराबाहेर राहायला सांगायचीस. तुझ्या मनाच्या अस्थिरतेपायी तू माझ्याशी नातं तोडलंस हे माझ्या व आई बाबांच्या लक्षात आल्यावर मी विचार केला की तुला आपल्या रक्ताच्या नात्याची चाड नाही, तुला आपलं नातं जपायचं नाही ना, मग मी कशाला तुझं नातं जपत बसू ? तेव्हाच मी ठरवलं की तुझ्याशी संबंध ठेवायचे नाहीत. नंतर माझं लग्न जमलं, सहा महिन्यांनी माझं लग्नही झालं पण मी आणि आई बाबांनी तुला माझ्या साखरपुड्याला आणि लग्नालाही तुला बोलावलं तर नाहीच पण तुला ते कळूही दिलं नाही. माझं लग्न झाल्याचं तुला नंतर सहा महिन्यांनी काकूंकडून समजलं होतं. काकूला बरं नाही म्हणून तू काकूला भेटायला गेली होतीस तेव्हा काकूनं तुला विचारलं होतं की तू शालूच्या लग्नाला का आली नव्हतीस. तेव्हा तुला माझं लग्न झाल्याचं समजलं होतं. माले, तू भ्रमात जगू नकोस. तू कितीही अट्टाहास केलास तरी तो फसवा आहे. माले, तू सतत भ्रमात जगत आली आहेस. माझा नवरा तुला मिळणार नाही. अगदी तुझा मेव्हणा म्हणूनसुद्धा नाही. माझ्या नव-याची लाडकी मेव्हणी म्हणून जगायची तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. आजपासूनच तुला अनुभव येत जाईलच ! तू इथं येऊन चूक केलीस. माझ्या नव-याबरोबर फोनवर बोलून तू आनंदाने जगत होतीस पण आता तुला तो आनंदही मिळणार नाही. तुला अजून काय हवं ते तू मागणार होतीस. काय हवंय तुला ?"
माली म्हणाली, "मला हवं ते तू देशील मला ? मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन."
शाली म्हणाली, "काय हवंय तुला ?"
माली म्हणाली, "माझ्या आयुष्यातली एक उणीव दूर कर. मी आई होऊ शकले नाही याची खंत माझ्या मनात आहे. तुझी नेहा तरी मला दे. तिला मी आईच्या मायेनं जपेन, वाढवेन. तुला अजून एक मुलगा नचिकेत आहेच ना, मग तुझी नेहा मला द्यायला तुला काही हरकत नसावी."
शाली म्हणाली, "माले, हिसकावून घेण्याच्या भूमिकेतून तू मागायच्या भूमिकेत शिरलीस इथंच तुझी मोठी हार आहे. तू पराभूत होतीस यावर शिक्कामोर्तब केलंस. माझी नेहा तुला देऊन मी तुला आई होण्याचं सुख लाभू देणार नाही. तुझ्या लग्नानंतर दोन वर्षांनी तू गरोदर राहिली होतीस पण तुझं बाळ मृतावस्थेत जन्माला आलं होतं. नंतर तू पुन्हा गरोदर राहिली नाहीस. तुम्ही खूप उपचार केले, अगदी कृत्रिम गर्भधारणेचे दोन प्रयोग केले पण तुम्हाला यश आलं नाही. तुझ्याकडे घडणा-या सगळ्या गोष्टी मला आई बाबांकडून समजायच्या. तुझ्या नशिबात आई होण्याचं सुख नाहीये. निसर्गाधिन असलेल्या या तुझ्या नशिबाला मी बदलू शकणार नाही. तुला माझी नेहा देऊन आई होण्याची संधी मी तुला देणार नाही. तू एक विसरू नकोस की बालपणी दोन फ्राॅक सोडले तर त्यानंतर तू माझं काहीही हिसकावून घेतलं नव्हतंस आणि पुढेही तू माझं काही हिसकावून घेणार नाहीयेस. माझा नवराही नाही. माझ्या नशिबात माझ्या हक्काचं जे आहे ते मला बालपणापासून मिळत गेलंय. माझं हिसकावून घेण्याच्या तुझ्या अट्टाहासापायी तू मात्र बरंच काही गमावून बसली आहेस, अगदी आपलं बहिणीचं नातंसुद्धा !"
शाली म्हणते तसं आपण हरतच आलोय, आपण भ्रमात जगत होतो या जाणिवेने माली हतबल झाली. नकळत भावनेच्या आधिन होऊन तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. बराच वेळ अश्रू ढाळत बसल्यावर काहीशी हताश नजरेने शालीकडे पाहात ती अचानक उठली आणि पायात चपला अडकवून ती बाहेर पडली.
शाली समीरला म्हणाली, "तिला पराभूत असल्याची जाणीव झालीय, आता आपली हार पचवतच ती यापुढे पराभूता म्हणूनच जगत राहाणार आहे !"

... (c) रमेश नागपुरे 
मोबाइल # 98690 75238

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...