शनिवार, २३ मे, २०२६

2872. पलिकडचं विश्व

      ती फारतर १५-१६ महिन्यांची होती. तिचे आई बाबा तिला बॅास्टन मधील एका पार्कमध्ये घेऊन गेले होते. कुरळ्या केसांची वर्तुळं, गोबरे गाल, गुलाबी पॅंट व त्यावर पांढरा शर्ट घातलेली सोनू फारच गोड दिसत होती.
हवेत हलकासा गारवा होता. रात्री पाऊस पडून गेल्याने गवताच्या पात्यावर दवबिंदू जमले होते. ते सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होते. सोनू आपल्या स्ट्रोलर मधे बसून आजूबाजूला टुकूटुकू बघत होती. त्या वयाला सारचं कसं नवं असतं. गवत, रोपं, वनराजी, फुलं, पानं, सगळंच. ते चिमुकले डोळे जमेल ते सारं साठवून घेत होते.  आ आ, बा बा बा च्या भाषेत आई बाबांना कित्ती काय काय सांगणं चाललं होतं. बॅाल, ममा, बाबा, नो, हाय असे काही शब्द बोलायला सुरवात झाली होती.  चालता चालता त्यांना एक बेंच दिसला. बराच वेळ चालत असल्याने जरा बसु व सोनूला दूध देऊ म्हणत ते दोघे बेंचवर बसले. सोनूला स्ट्रोलरमधून बाहेर काढलं..ती इकडे पळ तिकडे पळ करत तिथे बागडू लागली परंतु दोन मिनिटात ती बेंचकडे बोट दाखवून एक शब्द बोलली. 
“टॅाम” 
आई वडिलांना वाटलं की तिच्या डे केअरला एखादा मुलगा असेल टॅाम नावाचा. त्याची खेळताना आठवण झाली वाटतं. पण आई वडिलांना आपणं बोललेलं कळलं नाही हे तिला जाणवलं व ती त्या बेंचकडे तिची छोटी तर्जनी दाखवत परत म्हणाली, “टॅाम ! हाय टॅाम !” 
आई बाबांनी आठवून बघितलं. तिच्या डे केअर मध्ये पाच मुलं तिच्या वर्गात होती व त्यात एकही टॅाम नव्हता. 
“हाय, टॅाम” हे दोन शब्द सोनूच्या तोंडून बाहेर आले आणि आई बाबा पूर्ण गोंधळून गेले.. 
“कोण आहे ग टॅाम?” बाबांनी विचारलं.  
“टॅाम, टॅाम, टॅाम.. टॅाम” म्हणून ती तर्जनी दाखवत होती. जणू काही त्या बेंचमागे कोणी टॅाम उभा होता. त्याला ती हात हलवून दाखवत होती. 
बाबांनी उठून त्या बेंच भोवती गोल फिरून बघितले. बेंचच्या मागच्या बाजूला काही अक्षरं लिहलेली दिसली. 
“Dedicated in memory of Mr. Tom Collins”
हा मजकूर बघून आई बाबांच्या अंगावर काटा आला. त्या गारव्यात देखील त्यांना दरदरून घाम फुटला. पार्क रेंजरला विचारलं तेव्हा समजलं की टॅाम कॅालिन्स या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या मुलाबाळांनी त्याची आठवण म्हणून तो बेंच त्या पार्कला भेट दिला होता. टॅाम त्याच्या हयातीत नेहमी तिथे चालायला व पळायला येत असे.  कोणत्याही चमत्कारावर आपण पटकन विश्वास ठेऊ शकत नाही परंतु सोनूला समोर टॅाम नक्की दिसला असावा यात काही संदेह नव्हता. आपण ऐकलं आहेच की बाळ लहान असताना त्याला पूर्वजन्म आठवत असतो. म्हणजे त्या जन्मातील लोकही आठवत असतील. एकदा बाळ मोठं झालं की त्या आठवणी पुसट होत जातात. आई‑बाबा घरी परतताना नि:शब्द होते. सोनू त्यांच्या मांडीवर झोपली होती..हलका श्वास घेत, तो निरागस चेहरा आत्ताच कोण्या टॅामला भेटून आला होता. सोनू झोपेत स्मितहास्य करत होती..कितीवेळा आपण झोपेत स्मितहास्य करणारं बाळ बघितलं आहे..
माणूस मोठा झाल्यावर जग फक्त डोळ्यांनी पाहतो. बाळ मात्र जगाकडे डोळे, मन, जाणीव यातून बघत असावं.. 
त्यांच्या दृष्टीला भिंती नसतात, तर्क नसतो, भीती नसते.
त्यांच्या नजरेतून कधी कधी आपल्याला जे दिसत नाही तेही दिसतं..
त्या दिवशी सोनूने जणू क्षणभरासाठी दृश्य आणि अदृश्य यांच्या मधला पडदा हलवला होता..
कदाचित टॅामचं चैतन्य त्या जागेत अजूनही तरंगत असेल. 
कदाचित त्याची ऊर्जा, त्याचा आनंद, त्याची उपस्थिती..त्या बेंचभोवती अजूनही जिवंत असेल.
कदाचित जीवन हे फक्त जन्म‑मृत्यूचं गणित नसेल. प्रत्येक आत्मा काहीतरी मागे ठेवून जात असेल.. एक स्पंदन, एक आठवण, एक हलकीशी चाहूल.
बाळं मोठी झाली की हे दरवाजे हळूहळू बंद होत जातात. पण अशा काही क्षणांनी नक्की खात्री पटते.. 
जगात दिसतं त्यापेक्षा खूप काही असतं..
आणि सत्य कधी कधी तर्कापेक्षा सरळ व साधं असतं. 
देव बोलतो बाळमुखातून। देव डोलतो उंच पिकातून॥
कधी होऊनी देव भिकारी। अन्नासाठी आर्त पुकारी॥
खरंच देव बाळमुखातून काही सांगतो आहे का याकडे लक्ष असलं पाहिजे. देवच काय पण आपले पलीकडच्या विश्वात पोचलेले जिवलग सुध्दा कदाचित उंच पिकातून, दऱ्या-खोऱ्यातून, वृक्षराजीतून, आपल्याशी बोलत असतील.. 
जे दिसतं त्याच्या पलिकडचं विश्व समजून घेण्यासाठी आजवर माणसांचे प्रयत्न चालू आहेत आणि चालू राहतील ! 
असे छोटेसे क्षण खूप मोठं काही देऊन जातात हे खरं ! 

©® ज्योती रानडे
2026 JyotiRanade. All rights reserved.
सत्य घटनेवर आधारित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...