मी एकंदरीतच भयभीत झालो होतो त्या अचानक झालेल्या मारामारीत. त्याचे असे झाले होते की आम्ही जेवायला गेलेल्या बार मध्ये निव्वळ पाय लागल्यामुळे झालेल्या वादावादीची सुरवात बार बाहेर झालेल्या हमरातुमरीवर येऊन ठेपली होती. शिव्या द्यायला सुरवात झाली आणि बाह्या सरसावून एक दोघेजण आमच्या मित्रांच्या अंगावर धावून आले . माझ्यावर उगारलेल्या हाताला मात्र कोणीतरी वरच्यावर थांबवले आणि त्या मुलाला बाजूला ढकलून दिले. मला वाचवणाऱ्या माणसाकडे मी पहिले पण मला काही तो ओळखीचा वाटला नाही. अंगाने तो चांगलाच दणकट होता. व्यायामशाळेत जाऊन पिळदार शरीरयष्टी कमावलेला .
"दादा, तुम्ही ठीक आहेत ना ? त्या माणसाने मला विचारले. " हो मी ठीक आहे . पण मी तुम्हाला ओळखलेलं नाही " मी उत्तरलो .
"दादा, मी अस्लम. धारावीत पूर्वी राहायचो".
"माफ करा पण मी नाही ओळखले आपल्याला ."
"अहो जाहो नका करू मला. माझी लायकी नाही तेवढी. तुम्ही देव माणूस आहात. पण तुमचे बोलणे ऐकण्याचे माझ्या नशिबात नव्हते. आम्ही पोरं तुमची नेहेमी टिंगल करत बसायचो."
मला हळूहळू लक्षांत यायला लागले .
जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वी एका संस्थेच्या मार्फत मी धारावी झोपडपट्टीमध्ये मुलांना समाज प्रबोधनाचे धडे द्यायला जायचो. जरी गरिबी असली तरी चांगले आचार विचार करत परिस्थितीवर मात करून चांगले नागरिक बनून आपले राहणीमान कसे सुधारायचे ह्या बाबत मी माझे विचार त्यांच्यासमोर ठेवत असे. सुरवातीला नाही पण हळूहळू आमचे विचार ऐकायला मुलांची गर्दी होऊ लागली होती. काहीतरी चांगले शिकण्याची आणि बनण्याची धडपड त्यांच्यात जागृत झालेली आम्हाला दिसत होती. तिथेच एक मुलांचे टोळके आम्हाला उपद्रव देण्याचे काम चोखपणे पार पाडे. अस्लम बहुतेक ह्याच टोळक्यातला असावा.
"आता आठवलास मला तू. अरे जाऊ दे रे. त्याचं काय एवढे मनांवर घेतोस. सध्या काय करतोस तू? आणि आज एवढ्या रात्री तू इथे पार्ल्यात कसा?
"माझा धंदा आहे ट्रान्स्पोर्टचा. त्याच संदर्भात एक मिटिंग होती आज ह्याच बार मध्ये. आज तुम्ही जेवायला बसला होता त्याच्या दोन टेबले मागे मी बसलो होतो एका माणसाची वाट बघत. तो उशिरा येईन असे म्हणाला खरा. पण शेवटी तो आलाच नाही. तुमच्या मित्रांची काही चुकी नसताना समोरची पोरं तुमच्या ग्रुपला भिडायला बघत होती. मी आणि माझी माणसं बरोबर लक्ष ठेऊन होतो. काय बिशाद तुम्हाला हात लावायची होती त्यांची. गेम करून टाकला असता त्यांचा ."
अस्लमची भाषा ऐकूनच घाम फुटला होता मला . ते त्याने बरोबर जाणले .
"दादा , पाया पडतो आशीर्वाद द्या ".
आता ह्याला आशीर्वाद तरी काय द्यायचा असा मला प्रश्न पडला. पण मी तो चुटकीत सोडवला. "आयुष्यमान भव: सदा सुखी, निरोगी आणि यशस्वी भव :"
माझे मित्र घरी जायची चुळबुळ करत होते. मी त्यांना निघायला सांगितले. त्यातले दोन जण माझ्या घरीच झोपून दुसऱ्यादिवशी सकाळी निघणार होते.
दादा, कुठे राहता तुम्ही ?
इथे जवळच. चला तुमच्या घरी. माझी कहाणी सांगतो आणि नंतर मी कल्टी मारतो. अस्लम आणि त्याच्या दोन मित्रांना घेऊन आम्ही तिघे जण माझ्या घरी आलो. घरी आल्यावर अस्लमने मला कडाडून मिठी मारली आणि तो ओक्सबोक्शी रडायला लागला. मला काही कळेच ना अचानक ह्याला काय झाले ते?
तो जमिनीवर बसला माझ्या पायाशी. मी इथेच बरा आहे. दादा तुम्ही सांगायचा ते ऐकलं असतं तर कदाचित चांगला माणूस झालो असतो. पण ते नशिबात नव्हते. घरची गरिबी. आई बाबा अशिक्षित. आम्ही चार भाऊ . वस्तीमध्येच झालो मोठे. आजूबाजूला जास्त करून मराठी राहायचे. त्यामुळे आम्ही घरात सुद्धा मराठीतच बोलायचो .बाबा जवळच असलेल्या लेदरच्या दुकानात बॅग बनवायचे काम करायचे. आई धुणीभांड्याची कामं करायची . आमच्या डोक्याला काही काम नाही त्यामुळे वाईट लायनीला लागलो. छोटीमोठी कामं करायचो आणि मिळालेला पैसे विडीकाडीत आणि जुगारात उडवायचो. माझे दोन भाऊ थोडे शिकले आणि तुमचे विचार ऐकून मोठे झाले . दोघेही शेअर ब्रोकरच्या ऑफिसमध्ये कामाला लागले. मी आणि हा इम्तियाझ मात्र असेच राहिलो . पण एक दिवस तुमचे बोलणे आठवले. खूप विचार केला त्यावर आणि माझी मलाच लाज वाटली. आई बाबांच्या पाया पडलो. आशीर्वाद घेतला. प्रामाणिकपणे मेहेनत करू लागलो. पैसे साठवून एक जुनी मोटार विकत घेतली . टुरिस्टचा धंदा सुरु केला आणि नंतर मागे वळून नाही बघितले. आज २० वर्षांनी माझ्या ५० मोटारी आहेत. ८ लक्झरी बसेस आहेत , ३ ट्रक आहेत. मी आणि इम्तियाझ मिळून धंदा सांभाळतो. तुमच्या सारखाच एक मराठी माणूस मला भेटला . माझ्या ट्रान्सपोर्ट कंपनीची नोंदणी करून दिली. तो आता कंपनीच्या हिशोबाचे कामं बघतो. चार्टर्ड अकाउंटंट आहे तो. ट्रान्सपोर्ट शिवाय आम्ही पासपोर्ट, हॉटेल बुकिंग, फॉरीन एक्सचेंजचा पण व्यवसाय करतो . शेयर ब्रोकरकडे नोकरी करणाऱ्या दोघं भावांना पण आता आमच्या धंद्यात घेतले आहे . सगळ्यांच्या नावाने एकेक धंदा आहे . मोठा झालो पण वस्तीला विसरलो नाही. तिथल्या काही मुलांना आमच्या धंद्यात कामाला लावले आहे. काही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलतो मी. तुमचे विचार पुढच्या पिढीला देण्याचे कामं करतो मी दर रविवारी वस्तीत जाऊन . हळूहळू बदल घडतो आहे. आम्ही चार भाऊ आईबाबांबरोबर एकत्र राहतो . सगळ्यांची लग्न झाली आहेत तुमचा फोन नंबर किंवा पत्ता माहीत नसल्यामुळे गेले कित्येक वर्षे तुम्हाला भेटू नाही शकलो ह्याचे खूप वाईट वाटायचे. कळत नव्हते तुम्हाला शोधू कुठे मुंबईत.
दादा तुम्ही काय करता." मी त्याला माझी कहाणी सांगितली. आई वडिलांची त्यांच्या आजारपणात सेवा कशी केली ते सांगितले. ते ऐकून तो गहिवरला .
"उगाच नाही मी तुम्हाला देवमाणूस म्हणत.
दादा, आता तुम्ही एकटे नाहीत. मी आहे तुमच्या सोबतीला. २४ तासात कधीही फोन करा. मी हजर होईन तुमच्या सेवेला.
दादा मी तुमचा एकलव्य आहे. बोला काय देऊ तुम्हाला गुरुदक्षिणा? "
"अरे तू भेटलास, बोललास ह्यातच सगळे आले. उशिरा का होईना पण तू माझ्या बोलण्यावर गंभीर विचार केलास आणि आज सुखात राहतो आहेस ह्याचे खूप समाधान आहे मला आणि हीच माझी गुरुदक्षिणा. मला आणखी काही नको. माझं कामं तू पुढे चालवतो आहेस हे ऐकून आनंद झाला आहे मला. एक लक्षांत ठेव माणसाला शिकवण्याचे, शहाणे करण्याचे, स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत करण्याचे पुण्य काम कधीही थांबवू नकोस . वस्तीत मुलं तयार कर जी हे कामं पुढे नेत राहतील म्हणजे मग मला आज जे समाधान तुझी कहाणी ऐकून मिळाले आहे, तसेच समाधान तुला कायम मिळत राहील.
जायचे तर प्रत्येकाला आहे ह्या जगातून. पण तुझ्या जाण्यानंतर देखील इथली माणसं जर तुझी आठवण काढत राहतील तर ते बघून देव सुद्धा समाधानी होईल .
आम्ही किती गप्पा मारल्या आमचे आम्हालाच समजले नाही .
"भाई तीन वाजले . आपल्याला जायला हवं . कधीपासून गप्पा असलेला इम्तियाझ अस्लामला म्हणाला.
दोघांनी पाया पडून माझा आशीर्वाद घेतला आणि गहिवरलेल्या अवस्थेत मी त्या दोघांना निरोप दिला.
© सतीश बर्वे
०८.०५.२६.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा