अमेरिकेतल्या ह्यूस्टन गावाच्या एका शांत उपनगरात रीड वाइजमन नावाचा इंजिनिअर व त्याची पत्नी कॅरोल यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची स्वप्नं रंगवली. कॅरोल एक उत्तम पेडियाट्रिक नर्स होती. नवजात बाळांची काळजी घेणारी, कोमल हातांनी त्यांना जवळ घेऊन औषधोपचार देणारी कॅरोल समाजात प्रिय होती. त्यावेळी रीड नेव्ही मधे काम करत होता. नासा (NASA) या कंपनीनं अवकाशात जाण्यासाठी अंतराळवीर शोधण्याची मोहीम सुरू केली होती, त्यात त्याची निवड झाली होती. अंतराळवीर म्हणून मिळणाऱ्या ट्रेनिंगसाठी घर दार सोडून त्या कार्याला वाहून घ्यावं लागलं. मुली लहान होत्या. त्या भेटत नसत.
तेव्हा कॅरोलनं त्याला एकच सांगितलं होतं, “रीड, तू अवकाशात जा. ताऱ्यांजवळ जा. मी इथून तुला पाहात राहीन!”
दोन मुलींची काळजी घेत, नर्सिंगच्या शिफ्ट सांभाळत, रीडचं मनोधैर्य वाढवत कॅरोल आला दिवस चंदेरी करत होती..
पण एके दिवशी त्यांच्या आयुष्यात प्रचंड वादळ आलं.
कॅरोलला कॅन्सरचं निदान झालं ! मात्र, रीड व मुली तिच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या.
तरीही ती रीडला त्याच्या प्रत्येक मोहिमेच्या तयारीसाठी प्रोत्साहन देत राहिली.
“Don't stop your dream because of me. Keep reaching for higher places!”
(तुझं स्वप्न साकार करणं माझ्यासाठी थांबवू नकोस… तुझ्या प्रगतीचा आलेख सतत नवी उंची गाठू दे !)
तिनं पाच वर्षं धैर्यानं, शांतपणे, आणि अविश्वसनीय ताकदीनं आजाराशी लढा दिला… पण परमेश्वरी इच्छेपुढं कुणाचं काही चालत नाही. १७ मे २०२० रोजी, वयाच्या केवळ ४६ व्या वर्षी, कॅरोलनं जगाचा निरोप घेतला.
रीडच्या आयुष्यात खोल, कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली होती. एक पोकळी, एक प्रचंड खड्डा, एक विवर.
पण त्यांच्या मुलींसाठी तो घट्ट राहिला. आयुष्याला अर्थ देणारी, त्याला प्रोत्साहन देणारी कॅरोल त्यांना सोडून अनंताच्या प्रवासास निघून गेली होती. रीड सतत जगण्याचा अर्थ शोधत होता.
‘कॅरोलला अंतराळ, तारे किती आवडायचे…! तिनं ते पाहिले असतील का? मला दिसेल का ती परत? कुठं शोधू मी तिला…?’ अशा अनेक प्रश्नांची साखळी रीडला उत्तरं शोधण्यास भाग पाडत होती..
२०२६ च्या ‘Artemis II’ या चंद्राभोवती दहा दिवसांची फेरी मारण्याच्या मोहिमेसाठी रीडची निवड झाली.
जुलै १९६९ ला नील आर्मस्ट्रॅांग व बझ ॲाल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवलं; त्यानंतर तब्बल सत्तावन्न वर्षांनी अमेरिकेनं चार अंतराळवीर ‘मिशन आर्टेमिस’मध्ये चंद्रावर पाठवले. त्यांतला एक अंतराळवीर होण्याचा सन्मान रीड वाईजमन याला मिळाला.
१ एप्रिल २०२६ रोजी ‘आर्टेमिस क्रू’ ‘इंटेग्रिटी’ नावाच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळात झेपावले. रीडनं त्याच्या दोन मुलींना भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिलेला साऱ्या जगानं पाहिला. कॅरोलनं दिलेली जिद्द, तिनं दिलेलं प्रोत्साहन व तिनं केलेलं प्रेम सोबत घेऊन रीड पृथ्वीपासून २,५२,७५६ मैलांवर चंद्राजवळ त्याच्या इतर तीन साथीदारांसह पोहोचला. चंद्रावरून निळ्या रंगाची गोल पृथ्वी पाहताना डोळ्याचं पारणं फिटलं.
साऱ्या जगाचे डोळे त्यांच्याकडे लागले होते. दुर्दम्य महत्त्वाकांक्षा व अविरत कष्ट करून ‘आर्टेमिस क्रू’ चंद्रावर पोहोचला होता.
चंद्रावर जाऊन तिथले फोटो काढताना त्यांच्या नजरेस एक अतिशय तेज:पुंज विवर पडलं… लक्ष वेधून घेणारं… स्वत:कडे खेचणारं… विवर… crator… दरार.
त्या विवराकडे बघत चारही अंतराळवीर थबकले. एकमेकांत चर्चा करून हॅन्सन या रीडच्या साथीदारानं नासाला विचारलं,
“It's a bright spot on the moon.
And we would like to call it ‘Carroll.”
(या तेजस्वी विवराला कॅरोलचं नाव दिलं तर?)
रीडच्या नासामधल्या सहकाऱ्यांनी त्याच्या भावनेचा सन्मान केला आणि मग एक दिवस अधिकृत घोषणा झाली व त्या विवराला ‘कॅरोल’ हे नाव देण्यात आलं.
रीडनं चंद्राकडे पाहिलं.
त्या रुपेरी पृष्ठभागावर चमकणारं ते विवर... आता फक्त ते निनावी विवर नव्हतं.
ते होतं कॅरोलचं स्मारक… तिच्या प्रेमाचं… तिच्या धैर्याचं… तिच्या प्रोत्साहनाची आठवण करून देणारं स्मारक!
त्याच्या डोळ्यांत पाणी आलं, पण चेहऱ्यावर हसूही उमटलं.
“कॅरोल, तू मला आजवर अवकाशात… ताऱ्यांपर्यंत… चंद्रापर्यंत पाठवलंस.
“आज मी तुझं नाव चंद्रावर लिहिलं. “आता तू कायम माझ्यासोबत आहेस. मी चंद्रावर असतानाही!”
त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. कॅरोलचं चंद्रावरचं स्मारक बघण्यासाठी फक्त चंद्र साक्षीला होता! केवळ तीन क्रू मेंबर्स रीडच्या दाटून आलेल्या भावनांची साक्ष होते..
रीड चंद्रावरून १० एप्रिल २०२६ ला पृथ्वीवर परत आला. सुखरूप. ‘आर्टेमिस - II’ला अभूतपूर्व यश मिळालं. या यशस्वी मोहिमेमुळं मानवी अंतराळ संशोधनात एक नवीन अध्याय सुरू झालाय!
आणि आता जेव्हा जेव्हा रीड चंद्राकडे पाहतो, तेव्हा त्याला तिथं दिसते.
एक पत्नी.
एक माता.
एक कॅन्सरशी झगडलेली वीरांगना.
आणि
एक शाश्वत प्रेमकहाणी.
- ज्योती रानडे
(सत्य घटना… एप्रिल ६, २०२६ ला घडलेली. ‘Artemis II’ १ एप्रिल रोजी चंद्रावर जाऊन १० एप्रिल रोजी सुखरूप परत आलं, त्यावेळी घडलेली गोष्ट!)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा