जगातल्या ६०० कोटींहून अधिक स्मार्टफोन्सच्या स्क्रीनवर जी काच वापरली जाते , त्या काचेचं म्हणजे ‘गोरिल्ला ग्लास’चं तंत्रज्ञान तब्बल ४० वर्षं कॉर्निंग कंपनीच्या एका जुन्या गोदामात धूळ खात पडलं होतं. हे तंत्रज्ञान १९६० च्या दशकातच शोधलं गेलं होतं, पण त्याचा उपयोग काय करावा हे समजत नव्हतं. परंतु एका माणसाच्या खिशातल्या चाव्यांनी आणि त्याच्या अहंकारानं या विस्मृतीत गेलेल्या तंत्राला पुन्हा जिवंत केलं.
स्टीव्ह जॉब्स म्हणजे तंत्रज्ञान विश्वातला असा ‘कडक’ मास्तर, ज्याच्यासमोर बोलायला भलेभले घाबरायचे. पण एकदा एका माणसानं चक्क जॉब्सना “शट अप” (गप्प बसा) म्हणण्याची हिंमत केली होती.
तो माणूस होता कोर्निंग ग्लास कंपनीचा सीईओ– वेंडेल वीक्स !
२००७ मध्ये, जेव्हा पहिल्या आयफोनचा प्रोटोटाइप जॉब्सच्या हातात आला, तेव्हा जॉब्स आपला फोन सामान्य माणसासारखाच वापरायचे. खिशात चाव्यांसोबत फोन टाकणं, टेबलवर कसाही फेकणं ही त्यांची सवय होती. काही दिवसांतच त्या आयफोनच्या स्क्रीनवर ओरखडे (scratches) उमटले. त्याकाळी आयफोनची स्क्रीन प्लास्टिकची होती. जॉब्स संतापले. “मला हे चालणार नाही, स्क्रीन काचेचीच हवी,” असा फतवा त्यांनी काढला. त्यांच्या टीमनं हात टेकले. काच वजनाला जड असते, पडली की फुटते आणि टच स्क्रीनसाठी ती वापरता येईल का, याची शाश्वती नव्हती… पण जॉब्स म्हणजे पुण्याच्या पेठेतल्या एखाद्या हट्टी आजोबांसारखे होते; एकदा ‘नाही’ म्हटलं की विषय संपला. त्यांनी वेंडेल वीक्स यांना क्युपर्टिनोला बोलावून घेतलं.
गंमत म्हणजे, वेंडेल जेव्हा जॉब्सना भेटायला आले, तेव्हा जॉब्स स्वतः त्यांना ‘काच कशी बनवतात’ यावर लेक्चर देऊ लागले. जणू काही एखादा नवशिका आचारी विष्णू मनोहर यांना पुरणपोळी कशी करायची हे शिकवत होता. वेंडेल काही वेळ शांतपणे ऐकत राहिले, पण शेवटी त्यांचा संयम सुटला. त्यांनी जॉब्सना मधेच अडवलं आणि ठणकावून सांगितलं, “विल यू शट अप? लेट मी टीच यू सम सायन्स.” (तुम्ही गप्प बसता का? मला तुम्हाला थोडं विज्ञान शिकवू द्या.)
सगळीकडे शांतता पसरली. जॉब्सना असं गप्प करणारा माणूस त्या काळात दुर्मिळ होता. पण वेंडेल यांनी व्हाईटबोर्डवर ‘आयन-एक्सचेंज प्रोसेस’ समजावून सांगितली आणि जॉब्स चक्क प्रभावित झाले. त्यांनी पुढच्या सहा महिन्यात लाखो स्क्रीनची मागणी केली.
वेंडेल म्हणाले, “एवढी क्षमता आमच्याकडे नाही.”
त्यावर जॉब्सनी शांतपणे सांगितलं, “घाबरू नका, तुम्ही हे करू शकता. मनावर घ्या, नक्की होईल.”
‘कॉर्निंग’नं ते करून दाखवलं ! आज २०२६ मध्ये, हे नातं इतकं घट्ट झालंय की, ‘ॲपल’नं ‘कॉर्निंग’मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलीय. ताज्या बातम्यांनुसार, ‘ॲपल’नं अमेरिकेतल्या केंटकी इथल्या ‘कोर्निंग’च्या प्लांटमध्ये २.५ अब्ज डॉलर्सची नवी गुंतवणूक जाहीर केलीय.
ध्येय एकच - आयफोन आणि ॲपल वॉचसाठी १०० टक्के ‘मेड इन अमेरिका’ काच तयार करणं. इतकंच नाही, तर ‘कोर्निंग’नं नुकतंच ‘गोरिल्ला ग्लास सिरॅमिक ३’ लाँच केलंय, जे दोन मीटर उंचीवरून काँक्रीटवर पडलं तरी फुटत नाही, असा दावा केला जातोय.
आज आपल्या खिशातल्या फोनच्या काचेकडे पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा… त्या चमकणाऱ्या तुकड्यामागं एका जिद्दी माणसाचा अपमान सहन करण्याची ताकद आणि दुसऱ्याची ‘शट अप’ म्हणण्याची हिंमत दडलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा