शनिवार, २३ मे, २०२६

2873. डक का ईगल?

 ग्रॅंड सेंट्रल टर्मिनल, न्यूयॅार्क ! ट्रेन स्टेशन कसलं ! एखादं लहान गावच म्हणायचं. शंभर वर्ष जुन्या इमारतीतील उंच कमानी व लखलखणारी झुंबरं यांनी खरोखरच ग्रॅंड वाटणारं ! जगातील सर्व प्रकारच्या पदार्थांची दुकानं दुतर्फा विराजमान झालेली ! फुलांची दुकानं सुध्दा सुगंधित लहरींनी आपलं अस्तित्व जाणवून देत होती. ट्रेन काय धावेल अशा वेगाने माणसं धावत होती. 
     पूजा ग्रॅंड सेंट्रल स्टेशनवर उतरली. ब्ल्यू जीन्स, त्यात खोचलेला पांढरा शर्ट व सरळ केसांचं नाचणारं पोनीटेल असलेली पूजा कंपनीच्या न्यूयॉर्क हेडक्वार्टरला चालली होती. आजचं प्रेझेंटेशन खूप महत्वाचं होतं. तिनं मनातल्या मनात ते पन्नास वेळा घोळावलं होतं पण तरी आज काहीतरी कमी पडलय असं वाटत होतं. बाहेर पडण्यापूर्वी कॅाफी आणि ताजे क्रसांट रोल घ्यावेत म्हणून ती समोर असलेल्या बेकरीकडे वळली. त्या लहानशा बेकरीतून ब्रेड, बेगल, क्रसांट, मफिन्सचा घमघमाट सुटला होता..”चार्लीज् पॅराडाईझ” असं छान नाव होतं. लहान असली तरी नीटनेटकी ठेवलेली जागा, कॅाफीचा हवाहवासा अरोमा, फोमनी बदाम काढलेले कॅाफीचे कप आणि सगळी भिंत व्यापणारं आकर्षक स्टेन्ड ग्लास पेंटि्ग्ज! टिफनीचं वाटावं असं.. मन प्रसन्न करत होतं. 
“रेग्युलर ब्लॅक कॅाफी विथ हेझलनट ॲंड स्किम मिल्क, ॲंड ए प्लेन क्रसांट प्लीज” पूजानं कॅाफी व क्रसांट विकत घेतला.
पूजाची उभ्याउभ्या क्रसांट व कॅाफी घेण्याची कसरत चालली होती.
तेवढ्यात एक नाकेला मुलगा जाड कुशन असलेली सुंदर खुर्ची व छोटं टेबल घेऊन आला. 
“बसा मॅडम..निवांतपणे घ्या कॅाफी!” त्याच्या शर्टावर चार्ली लिहले होते. 
मऊ खुर्ची व छोटं टेबल बघून ती खूष झाली. त्याने त्या दिवसाचे ताजे वर्तमानपत्र समोर ठेवले. थंड पाण्याची लहान बाटली आणून दिली. कमरेत लवून एक टपोरे लाल गुलाबाचे फुल  दिले. 
“आणि काही हवंय का मॅडम?” त्यानं मनापासून विचारलं! 
न्यूयॅार्क मधील कुठल्या डेस्टिनेशनला जायचंय व त्यासाठी काही मदत हवी आहे का हे ही विचारलं. या जादूनगरीत माणसं गोंधळून जातात हे त्याला माहित होतं. 
पूजा आश्चर्यचकित झाली होती. 
चार्ली पुढच्या गिऱ्हाईकाशी पण तसाच वागत होता..
त्यापुढील गिऱ्हाईकाशी ही..आणि त्यापुढील गिऱ्हाईकाशी पण.. तसाच वागत होता.. 
पूजा उठून चार्ली जवळ गेली..
“मॅडम, परत ग्रॅंड सेंट्रलला कधीही याल तेव्हा चार्लीच्या ब्रेकफास्टनंच दिवसाची सुरुवात करा हं” चार्लीनं प्रेमळ आग्रह केला.
“नक्की येईन..पण चार्ली तुला एक विचारू का? न्यूयॅार्क मधे हजारो लोक ये जा करत असतात..इथं एवढा वेळ कोण कुणाला देतं? हे गिऱ्हाईक परत कदाचित सहा महिने काय कधीच दिसणार नाही हे तुला माहित आहे. मग तू एवढा वेळ त्यांना कसा देऊ शकतोस? नेहमीचं गिऱ्हाईक असेल तर मी समजू शकते पण सतत ट्रेन मधून उतरणारी नवी माणसं येतात इथे! कसं जमतं तुला हे? प्रत्येकाशी प्रेमानं बोलणं, त्या फॅमिलीला तर तू मॅप दाखवत, टॅक्सी शोधत, त्यांचं जाण्याचं ठिकाण व तिकडे कसं जायचं वगैरे मदत करताना दिसलास! How do you manage all this?” पूजाला फार कुतूहल होतं. 
चार्लीने पुढच्या गिऱ्हाईकाच्या कॅाफीवर एक सुंदर बदाम काढत होता. त्याने तो कप त्याला दिला व तो पूजाजवळ एक पुस्तक घेऊन आला. 
“The Magic of Thinking Big” by Dr. David J. Schwartz हे पुस्तकाचं नाव पूजानं वाचलं. 
“ताई, मी पूर्वी असा नव्हतो. सतत तक्रार करायचो. सगळा दिवस प्रत्येकाला शिव्या, तक्रार आणि चिडचिड यात जात असे. येणारं गिऱ्हाईक व त्यांचा विचित्रपणा, जराशी चूक झाली की ओरडणं, ही अफाट गर्दी, माझी बायका मुलं..
प्रत्येकाबददल माझी काही ना काही तक्रार होती. दोन वर्षांपूर्वी हे पुस्तक हातात आलं.. आणि पॅावर ॲाफ चॅाईस या विचारसरणीशी माझी ओळख झाली. 
Power of choice is that you can be a duck or an eagle.  
Don’t be a duck. It only complains. Be an eagle! Eagle soars new heights! 
बदक आयुष्यभर क्वॅक क्वॅक आवाज करत तक्रार करत जगतं. गरूड रोज नवी उंची गाठण्याचा प्रयत्न करतो. ना तो दोष देतो वाऱ्याला, ना तपमानाला, ना हिमवादळांना, ना वाटेत आलेल्या हजारो अडथळ्यांना! तो केवळ नवी उंची कशी गाठायची याचा विचार करत जगतो. बदक मात्र सतत आरडाओरड करत तिथल्या तिथं फिरत रहातं.. मी इतके दिवस बदकासारखाच जगलो पण दोन वर्षांपूर्वी मी एक निश्चय केला.. आता गरूड होऊन जगायचं! एकदा हा निर्णय घेताच पुढच्या गोष्टी आपोआप घडत गेल्या..
मी गिऱ्हाईकाला देव समजून त्याची सेवा करतो.. त्यांचे आदरातिथ्य करतो.. माणूसकीचा ताजा ब्रेड देतो. प्रेमाचं फोम घातलेली कॅाफी देतो..त्यांची पसंती विचारून तसे पदार्थ बनवतो. त्यांना माझे पदार्थ आवडले नाहीत तर त्यांची माफी मागतो व सुधारणा करतो. 
जेव्हा एकदा इथे येऊन गेलेला माणूस माझं हे लहानसं दुकान शोधत परत येतं ना तेव्हा मी गरूडभरारी घेतली याची मला जाणीव होते व मी उत्साहाने कामाला लागतो..नवी उंची गाठली आता यापुढील नव्या उंचीसाठी काय करायला हवे ते ठरवतो..
माझी जागा लहान आहे. इथे शेजारीच केवढी मोठी बेकरी आहे पहा पण आज गर्दी माझ्या दुकानात आहे!  हा बघा The New  York Times नं लिहलेला माझ्या बेकरीवरील लेख.. त्याने फ्रेम केलेला लेख पूजाला दाखवला. 
मॅडम, रोजच्या आयुष्यात सुध्दा नवी उंची गाठता येते हे कळलं की आयुष्यच बदलतं बघा!”
चार्लीच्या चेहऱ्यावरून अभिमान ओघळत होता.. पूजाने त्याला घसघशीत टीप दिली व ती ग्रॅंट सेंट्रल स्टेशन मधून बाहेर पडून टॅक्सी घेऊन तिच्या कंपनीच्या हेड क्वार्टर कडे रवाना झाली. 
दुसरे दिवशी सकाळी तिच्या प्रेझेंटेशनची वेळ झाली होती. कंपनीच्या नव्यानं लागलेल्या लोकांचं स्वागत करून त्यांना कंपनीच्या कामाची पध्दत शिकवायची होती. त्यांनी मन लावून काम करावं म्हणून त्यांना असं काही द्यायचं होतं की ते कायम लक्षात ठेवतील. 
तिनं भाषण सुरू केलं.. 
My friends! Welcome to R & R company! मी आज तुम्हाला चार्लीची गोष्ट सांगणार आहे. 
एक लहानशी बेकरी..
रोज येणारे नवं गिऱ्हाईक.. जे परत येईलच याची खात्री नसते.. पण लोकं चार्लीची बेकरी शोधत येऊ लागलेत..
कारण त्याला पॅावर ॲाफ चॅाईस म्हणजे काय हे कळलं आहे.. 
 तुम्हाला पण  पॅावर ॲाफ चॅाईस आहे. आपण कोण व्हायचं ते तुम्ही ठरवा..
Duck or an Eagle?  तक्रार करत जगायचं का नवी उंची गाठायची हे तुम्ही ठरवायचं आहे! 
Please welcome Charlie, the owner of Charli’s Paradise! 
चार्ली दबकत दबकत स्टेजवर आला.. 
“मित्रांनो तुम्ही नामांकित विद्यापीठातून शिकून आला आहात. MBA सारखी डिग्री मिळवली आहेत. दहावी पास झालेला मी तुम्हाला काय सांगणार? मॅडमने फार आग्रह केला म्हणून मी आलो. पण बेकरी बंद नाही हं! माझी बायको लहान मुलाला घेऊन मी परतेपर्यंत गिऱ्हाईकाची सेवा करेल.. 
जेव्हा तुम्ही पॅावर ॲाफ चॅाईस वापरता व ईगल बनता.. तेव्हा तुमची विचारसरणीच बदलते.. गिऱ्हाईक देव वाटू लागतो. त्यांची सेवा मनापासून केली की त्यांच्या काळजात अशी पोचते की ते तुम्हाला शोधत येऊ लागतात. तुमच्या जॅाब डिस्क्रिप्शन मधे ठराविक गोष्टी नसतात.. घरच्या माणसाची आपण कशी काळजी घेऊ तशी त्यांची काळजी घेतली जाते.. कारण तुम्हाला डक होऊन जगायचं नाही. तुम्हाला ईगल व्हायचं आहे! मी निघतो.. मला बेकरी कडे जायला हवं..
टाळ्याच्या कडकडात चार्लीनं लवून त्यांना नमस्कार केला.. व गरूडभरारी घेण्यासाठी तो तिथून बाहेर पडला.. उच्चशिक्षित नवीन हायर्सना पुस्तकाबाहेरील काहीतरी शिकवत.. 
डक का ईगल? आपला पॅावर ॲाफ चॅाईस वापरून कोण बनायचं आपणच ठरवा! 
©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...