फ्रॅंक आणि ली यांनी कॅथॉलिक चर्चमध्ये अनुक्रमे ‘सेमिनरी स्टुडन्ट’ व ‘नन’ म्हणून सेवा बजावल्यानंतर १९४८ साली विवाह केला. त्यांनी घरकुल सजवल्यानंतर ‘ली’नं ठरवलं की आपल्या संसाररूपी बागेत सहा फुलं उमलायला हवीत.
त्यांना पहिला अपत्य झालं १९५१ साली… त्यानंतर पुढल्या अकरा वर्षात त्यांना एकूण पाच मुलं झाली. मात्र पाचवं अपत्य- ‘टॉम’ झाला, तेव्हा मात्र ली ‘आता आणखी एका मुलाला सांभाळायला जमणं अवघड आहे…’ अशा टप्प्यावर आली होती.
टॉम सहा महिन्यांचा झाला होता; पण अजून तो मान सावरत नव्हता की समस्यांना भरवलेलं खाऊ शकत नव्हता. ‘ली’ला वाटलं की एकंदरीतच याची वाढ मंद दिसतीये. त्यामुळं तिनं त्याला बालरोगतज्ञांनाही दाखवलं; पण ते म्हणाले…
“तुम्ही उगाच बाऊ करताहात… तसं काहीच नाहीये! चमच्यानं खायला शिकताना बऱ्याच बाळाला त्रास होतो. यात असाधारण काही नाही…”
“मला वाटतं, ‘सर्वसाधारण’ काय आणि ‘असाधारण’ काय हे मला समजतं.” ली त्यांना शांतपणे म्हणाली, “मला आणखी चार मुलं आहेत. याच्या बाबतीत काहीतरी चुकतंय हे नक्की!”
मग तिनं टॉमला दुसऱ्या एका डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलं,
“तुम्ही त्याच्यात काही प्रगती होतीय का, याची वर्षभर वाट पहा.”
त्यानुसार ती थांबली… काय घडतंय ते पाहू लागली.
पुढच्या वर्षभरात टॉम मान सावरू लागला; पण इतर बऱ्याच बाबतीत त्याचं वागणं भयानक बिघडलं… तो बरेचदा खायला नको म्हणायचा किंवा फक्त‘ स्क्वॅश’च खायचा… अगदी अंग नारंगी दिसू लागे तोवर!
त्याच्यातली सगळ्यात काळजी करण्याजोगी बाब म्हणजे, त्याचा वाढत चाललेला हिंसक उद्रेक… त्याची मोठी भावंड टीव्ही बघत असली, की तो त्यांच्यावर धावून जाऊ लागला. ली गाडी चालवत असली, की तिला मागच्या सीटवरून मारू लागला.
लहान मुलांना असे संतापाचे झटके येत असतात, हे ‘ली’ला माहिती होतं; पण टॉमच्या संतापाच्या झटक्यांची तीव्रता पाहून ती संचित झाली होती.
टॉम दीड वर्षांचा झाल्यानंतर ‘ली’नं पुन्हा डॉक्टरांचे, तज्ज्ञांचे उंबरठे झिजवले. मात्र एका खेपेला तिला ‘टॉम नॉर्मल आहे’, असं कुणीही सांगितलं नाही…
एका डॉक्टरांनी निदान केलं, “त्याला ‘पीकेयू’ हा चयापचयाचा आजार आहे, त्यामुळं त्याला मंदत्व येऊ शकतं!”
दुसरे डॉक्टर म्हणाले की “हा ‘पीकेयू’ नाही… त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या मेंदूला इजा झालीय. त्यामुळं त्याच्या मेंदूला प्राणवायू मिळालेला नाही!”
असंच वर्षभर या डॉक्टरांकडून त्या डॉक्टरांकडे हेलपाटे घातल्यानंतर ‘ली’ला सांगण्यात आलं…
‘टॉम सर्वसामान्य आयुष्य जगू शकणार नाही…! त्याला कुठल्यातरी संस्थेत ठेवावं, हे बरं!’
‘ली’च्या पोटात गोळा आला… तीन वर्षाच्या एवढ्याश्या पोराला खूप दूर कुठेतरी संस्थेत, जिथं त्याच्या निरोगी वाढीची शक्यता कायमची नाहीशी होईल, अशा ठिकाणी कसं ठेवायचं?
ली व फ्रँक डॉक्टरांनी सुचवलेल्या संस्था पाहून आले… तिथली सगळी मुलं मानसिकदृष्ट्या अत्यंत विकलांग होती. बर्याच मुलांना तर काही सांगता बोलता सुद्धा येत नव्हतं!
मग ‘ली’नं निर्णय घेतला— ‘टॉमला बऱ्याच समस्या असल्या, तरी त्याला अशा ठिकाणी पाठवायचं नाही!’
मग एका परिचारिकेकडून ‘ली’ला ॲन आर्बरमधल्या एका रुग्णालयाविषयी समजलं… तिथं कदाचित टॉमसाठी काही सहाय्य मिळू शकलं असतं.
…पण तिथल्या डॉक्टरांनी मानसोपचारतज्ञांनी निष्कर्ष काढला की ‘तो मानसिक दृष्ट्या विकलांग असल्यामुळं तो हायस्कूलचं शिक्षण कधीही पूर्ण करू शकणार नाही.’
रुग्णालयातली एक सामाजिक कार्यकर्ती फ्रँक ‘ली’ला म्हणाली,
“तुम्ही दोघंही कॉलेजमध्ये गेलेले आहात… तुम्हाला अशा मर्यादित क्षमता असलेल्या मुलाला वाढवणं अडचणीचं वाटेल!”
“तो खुदाई कामगार बनण्यापलीकडे काही करू शकणार नाही!” ती म्हणाली.
“म्हणून काय झालं…?” ली गरजली… “तुम्हाला एक गोष्ट सांगते, तो उपजीविकेसाठी काय करतो, या गोष्टीची मी पर्वा करत नाही… माझं माझ्या सगळ्याच मुलांवर प्रेम आहे. मी त्यांच्यावर त्यांच्या बुद्धीसंपन्नतेनुसार प्रेम करत नाही! टॉम खास कुणी नसला, तरी माझं त्याच्यावरचं प्रेम तिळमात्रही कमी होणार नाही!”
मात्र टॉमनं डॉक्टरांच्या अपेक्षेबाहेर प्रगती केली…!
डॉक्टरांनी त्याला नियमित शाळेला जाण्याची परवानगी नाखुषीनंच दिली. तिथं त्याला अडचणींचा सामना करावा लागला; पण त्यानं हायस्कूलच काय तर कॉलेजची अडीच वर्षे सुद्धा पूर्ण केली!
यादरम्यान त्याची मानसिक विकलांगता भावनाधारित असल्याचं आढळून आलं आणि त्यावर योग्य उपचार केले गेले.
‘ली’नं त्या मुलाला सोडून दिलं नाही
याचा मला फार आनंद वाटतो; कारण……
आयुष्याचा असा काटेरी प्रारंभ होणारा
तो मुलगा मीच आहे!
सध्या मला भावनिक चढउतार थोपवण्यासाठी औषधांचा आधार घ्यावा लागतो. मी भूतकाळात डोकावून बघतो, त्यावेळी मी मला अशी खंबीर आई दिल्याबद्दल परमेश्वराच्या आभार मानतो…! डॉक्टरांच्या माझ्या भकास भवितव्याबाबतच्या निराशावादी अंदाजांना न बधता ती ठाम राहिली!
याउलट आपल्या मुलासाठी लढताना ‘दृढ श्रद्धा’ व ‘आत्यंतिक प्रेम’ हीच सर्वोत्तम शस्त्र असतात, हा तिच्या मनानं दिलेला कौल तिनं मानला, इतकं तिचं माझ्यावर प्रेम होतं!
— टॉम मुलिगन
— अनुवाद : सुप्रिया वकील
(चिकन सूप फॉर द मदर्स सोल)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा