शनिवार, २३ मे, २०२६

2853. प्रित विसावली साफल्याच्या कवेत !

 गेल्या तीन चार महिन्यांपासून सुभाषची प्रकृती बरी नव्हती. रस्त्याने दहा पंधरा मिनिटे थोडं भरभर चालल्यावर त्याला थकवा यायचा. तीन जिने चढला तर त्याला धाप लागायची. कधी कधी दिवसभर त्याला मरगळ वाटायची. फारसा उत्साह वाटेनासा झाला होता.
तसं त्याचं वय फार नव्हतं. चार वर्षांनी तो पन्नाशी गाठणार होता !
त्याने आपल्या कौटुंबिक घनिष्ठ संबंध असलेल्या डाॅक्टर राहूलला आपल्या प्रकृतीबद्दल सांगितलं.
राहूलने सुभाषच्या जवळजवळ सगळ्याच टेस्ट करून घेतल्या आणि निष्कर्ष काढला की त्याला हृदय रोग जडलाय आणि त्याचं हार्ट ब-यापैकी कमकुवत झालंय. रक्तातलं कोलोस्टेराॅलसुद्धा खूप हाय होतं. त्याची प्रकृती काळजी करण्यासारखीच आहे.
राहूलने तो काॅलेजला असल्यापासूनची त्याची लाईफ स्टाईल तपासली. केस फाईल बनवली, दोन तीनदा सुभाषबरोबर चर्चा करून अजून माहिती जाणून घेतली. सुभाषच्या केसचा बारकाईने अभ्यास करून तो म्हणाला, "सुभाष, चार दिवसांनी तू नर्मदाला सोबत घेऊन ये. तुझ्या प्रकृतीबद्दल मी तिच्यासमोरच बोलेन. आज तसा काही गंभीर प्राॅब्लेम नाहीये पण तुला खूप काळजी घ्यायला हवी."
चार दिवसांनी आपली बहीण नर्मदाला घेऊन तो राहूलकडे गेला.
राहूल म्हणाला, "नर्मदा, हा इतका प्रकृतीची हेळसांड करत आला हे तुझ्या कधी लक्षातच आलं नाही का गं ?"
नर्मदा कासाविस होत म्हणाली, "काय झालंय याला ?"
राहूल म्हणाला, "हा याचं आयुष्य पूर्ण अस्तव्यस्त करून जगतोय. फॅक्टरीत बारा बारा, चौदा चौदा तास काम करत आलाय. तो त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही. बाहेरचं तेलकट खाणं प्रमाणापेक्षा खूपच जास्त आहे. त्याच्या रक्तातली कोलोस्टेराॅलची पातळी चिंता करावी इतकी हाय आहे. याचं हार्ट कमकुवत झालंय. हे आज अचानक घडलेलं नाही. गेल्या पाच सहा वर्षापासून याचं हार्ट हळुहळू कमकुवत होत आलं असावं. एकटं राहाणं, याची अनियमित जीवन शैली, अति श्रम, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, बाहेरचं खाणं, नियमित व्यायाम, प्राणायामचा अभाव या गोष्टी याचं हार्ट कमजोर करायला कारणीभूत आहे."
नर्मदा म्हणाली, "याला मी सतत सांगत आलेय पण हा दुर्लक्ष करतोय. याची बायको याला सोडून गेल्यानंतर चार पाच वर्षांनी याने स्वतःला फॅक्टरीच्या कामात झोकून दिलंय. हा आपलं मन कामात रमवतोय म्हणून मी पण थोडं दुर्लक्ष करत आले."
राहूल म्हणाला, "आता दुर्लक्ष करून चालणार नाही. याला अजून पंचवीस तीस वर्षे जरी जगायचं असेल तर याला त्याची लाईफ स्टाईल पूर्णपणे बदलायला हवी. नर्मदा, याच्यापासून तू फक्त पंधरा मिनिटांवर राहातेस आणि घरीच असतेस. आता सहा आठ महिने तरी तू याची पूर्ण जबाबदारी घे."
नर्मदा म्हणाली, "हो, तू सांगशील तशी मी याची काळजी घेईन."
राहूल म्हणाला, "तुझा मुलगा याच्या फॅक्टरीत याच्याबरोबरच काम करतो ना, मग फॅक्टरीचं सगळं काम, सगळे व्यवहार  त्याच्यावर सोपव. पुढचे सहा आठ महिने तरी हा कामापासून, कामामुळे येणा-या ताण तणापासून लांब राहायला हवा. याने घरात बेडवर फक्त आराम करायचा.  सकाळ संध्याकाळ याचं पथ्याचं जेवण तू बनवायला याच्या घरी जात जा. तू केलेल्या स्वयंपाकाव्यतिरिक्त हा बाहेरचं काही खाणार नाही याची काळजी घे. याने सकाळ संध्याकाळ बाहेर चालायला जायला हवं. किती चालायचं आणि कसं चालायचं तसंच योगासनं, प्राणायाम कसा व किती करण्याचा याचा चार्ट मी बनवून देतो. आठ दिवस मी एका टिचरला पाठवतो. तो याला योगा आणि प्राणायाम शिकवेल. मी औषधे व टाॅनिक्स, फूड सप्लिमेंट्स लिहून देतो. ती याने न चुकता घ्यायला हवी. याचा बी पी व शुगर नाॅर्मल आहे ही खूप समाधानाची गोष्ट आहे. एक महिन्याने पुन्हा टेस्ट करून औषधाचा परिणाम कसा होतोय ते चेक करू. मी सांगतोय तसं हा जगला तर सहा आठ महिन्यात याची हार्ट कॅपॅसिटी चांगली वाढेल, याचा हार्ट प्राॅब्लेम दूर होईल हा विश्वास मला वाटतो."
सुभाष म्हणाला, "तू सांगतोस तसाच जगेन मी ! आणि तुला दाखवून देईन की माझी हार्ट कॅपॅसिटी चांगलीच वाढलीय."
सुभाषने राहूलने सांगितलेली आपली दिनचर्या सुरु केली. सगळ्या व्यापातून त्याने आधी स्वतःला मुक्त करून घेतलं. योगा टिचरकडून तो आठ दिवस योगा प्राणायाम शिकला. सकाळी संध्याकाळी चालायला जाणं, हळुहळू अंतर व चालण्याचा वेग वाढवणं, दम लागल्यावर त्याच जागी पंधरा वीस मिनिटे आराम करून मागे फिरणं, योगा प्राणायाम करणं, फळं खात राहाणं यात दिवसातले सहा तास तो घालवू लागला आणि सतत अंथरुणावर आडवं पडून आराम करणं किंवा एखादे पुस्तक वाचत राहणं, नर्मदानं बनवलेलं ताजं व गरम जेवण करणं, वेळच्या वेळी औषधं, टाॅनिक्स, फूड सप्लिमेंटस घेणं, नियमित फळं खाणं यामुळे त्याला वाटायला लागले होते की आता तीन चार महिन्यांतच आपण आपल्या हृदरोगावर मात करू शकू. सतत घरात आराम करत असल्यामुळे त्याचा ताण तणाव कमी झाला होता.
घरी आराम करण्याच्या त्याच्या निर्णयाने त्याच्या बहिणीला नर्मदाला खूप बरे वाटले होते. ती सकाळ संध्याकाळ त्याला  भेटायला व त्याचं पथ्याचं जेवण बनवायला यायची. ती आली की त्याला खूप बरं वाटायचं. तिच्याबरोबर खूप गप्पा व्हायच्या. तशी ती त्याची काळजी घ्यायची. काय हवं नको ते बघायची. तिच्या येण्याने तोसुद्धा आनंदी, खुश असायचा.
दोन तीन दिवसाआड त्याचे भावोजी, तिचा मुलगा भेटायला येत. नर्मदाने बंधन टाकल्यामुळे फॅक्टरीचा विषय तिचा मुलगा काढत नसे.
एकदा ती घरी जायला निघाली तेव्हा तो म्हणाला, "वरच्या शेल्फमधलं एखादं पुस्तक देऊन जा."
तिने विचारलं, "चार दिवसांपूर्वी दिलेली युगंधरा कादंबरी वाचून झाली का ?"
तो म्हणाला, "हो, सलग दोनदा वाचून काढली. एकदा त्यातले काही प्रसंग पुन्हा पुन्हा वाचले."
तिनं विचारलं, "इतकी आवडते तुला युगंधरा ?"
तो म्हणाला, "हो. मला सर्वात जास्त आवडलेली ती कादंबरी आहे. ही कादंबरी मी विकत घेऊन पहिल्यांदा वाचली तेव्हाच मी युगाच्या व्यक्तिमत्वाला भारावलो होतो. युगंधरा थेट काळजाला स्पर्श करते, मनाला भावूक करते. ती फुलांपेक्षा कोमल व वज्राहूनही कठीण आहे. तिची अनेक रुपं मनावर मोहिनी घालतात. तिचं व अभीचं उदात्त, निरलस, असीम प्रेम साफल्याच्या उंबरठ्यावर उभं असतं पण अचानक तिला परिस्थितीच्या आधिन व्हावं लागतं. कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागते. आयुष्य मनाविरुद्ध गेलं, प्रेम सफल झालं नाही तरी एखाद्या योगिनीप्रमाणे विरोधाचा एक शब्दही न उच्चारणारी युगंधरा ! ती अभीला लग्नाला नकार देते, अभीचं लग्न होतं पण ती त्याच्यावर आधीसारखंच प्रेम करत राहाते. ती आपल्या हृदयात सात्विक, एकनिष्ठ पण मूक प्रीती जपतच जगते. अभीच्या प्रेमात गुंतून ती मरेपर्यंत लग्न करत नाही. शेवटी ती अभीच्याच मिठीत शेवटचा श्वास घेते. युगंधराचं उदात्त प्रेम माझ्या मनावर कोरलं गेलंय."
नर्मदा म्हणाली, "मला एकदा वाचायला हवी तुझी युगंधरा. बरं वाटलं ना तुला युगंधरा वाचून ! तुला आनंद देणा-या गोष्टीत मन रमवलंस तर तुझी प्रकृती तीन चार महिन्यांत पूर्वस्थितीला येईल."
नर्मदा एका स्टुलावर चढली. एक एक पुस्तक त्याला दाखवत ती विचारत होती, "हे देऊ का ?" "हे देऊ का ?"
चार पाच पुस्तकांनंतर तिने विचारलं, "हे मेघदूत देऊ का ?"
तो म्हणाला, "हो, ते दे."
त्याला ते पुस्तक देऊन ती म्हणाली, "चल, येते मी."
पुस्तक हातात घेऊन त्याचं मन भूतकाळात शिरलं. हे पुस्तक त्याला अनुप्रितानं दिलं होतं. तिने दिलेली ही पहिली व शेवटची भेट होती. काॅलेजचा तो शेवटचा दिवस होता.
अनुप्रिता आपल्या मामांकडे राहून काॅलेज करत होती. काॅलेज संपल्यावर आपण वेगळे झालो होतो. ती तिच्या गावी निघून गेली होती. तीन वर्षे आधीपासून आपण तिच्यावर मनस्वी प्रेम करत होतो. तिच्याबरोबर लग्न होऊ शकलं नाही, सहजीवन लाभलं नाही तरी आजही आपण तिच्यावर नितांत प्रेम करतोय.
काॅलेजला असताना तीन वर्षेआधी एकदा आपण अचानक समोरासमोर आलो होतो. नजरानजर होताच आपण आपल्या नजरा एकमेकांच्या नजरेत सामावून घेऊ पाहात होतो. दोन तीन मिनिटे तरी आपल्या दोघांचंही भान हरपलं होतं. आपण एकमेकांत विरघळू पाहात होतो. भानावर आल्यावर ती मोहक स्मित करत पुढे गेली. आपल्या आयुष्यातला तो क्षण विलक्षण होता. आपण आपले स्वतःचे राहिलो नव्हतो तर तिचा झालो होतो. पण आपली अबोल, मूक प्रित कधी व्यक्त करता आली नाही.
तो काळही मुला-मुलींनी मोकळं वागण्या बोलण्याचा नव्हता. मुली नुकत्याच काॅलेजात शिकायला जायल्या लागल्या होत्या पण मर्यादा व संकोचाचे आवरण पांघरूनच ! मुलंसुद्धा मुलींपासून दूरच राहात असत. मर्यादेला बाजूला सारून मुला-मुलींनी धाडस करावं इतपत पोषक वातावरणही नव्हतं. मुलं मुली अगदी क्वचितच एकमेकांशी एक दोन वाक्य बोलायचे. 
नंतर समोरासमोर आल्यावर तिच्या चेह-यावर स्मित उमटायचं. ते स्मित प्रेमाचं असायचं याची जाणीव आपल्याला प्रत्येक वेळी व्हायची. तिच्या स्मितात विलक्षण ओढ असायची. तिच्या स्मिताने मोहावून आपणही स्मित करायचो. आपलं प्रेम बोलून दाखवायला, व्यक्त करायला आपलं आपलं मन कधी धजावलं नाही. आजुबाजूच्या वातावरणाचा प्रभाव आणि आपला भिडस्तपणा आपल्या इच्छेआड आला होता. तिचाही भिडस्तपणा, संकोच आपल्याला जाणवायचा. शिवाय त्या वेळच्या वातावरणही मुलं मुली एकमेकांशी क्वचितच एक दोन वाक्ये बोलत असत.
आपलं लग्न झाल्यावर दोन वर्षांने अनुप्रिताची एक मैत्रीण वैदेही आपल्याला रस्त्यात भेटली होती. त्यावेळी ती बोलली होती की "अनुप्रितासुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करत होती पण तुमच्या जाती वेगळ्या म्हणून तू नकार देशील या भीतीपायी आपलं प्रेम व्यक्त करायला तिला धाडस करणं कधी जमलं नव्हतं."
काॅलेजनंतर दोन वर्षे आपण तिच्या विरहात कशीबशी काढली. नंतर नोकरी लागल्यावर आईवडिलांनी ठरवलेल्या शेजलशी आपण लग्न केलं पण आपल्या मनातल्या कुठल्या तरी कोप-यात अढळ स्थान मिळवलेली अनुप्रिता आपल्या मनातून क्षणभरही दूर झालीच नाही. आठ पंधरा दिवसांतच शेजलच्या लक्षात यायला लागले की आपण मनाने तिच्याशी कधीच एकरुप होत नव्हतो. हळुहळू तिची चिडचीड होऊ लागली. तिला संशय यायला लागला की आपल्या आयुष्यात तिच्याशिवाय दुसरी कुणी तरी स्त्री आहे. ती असंतुष्ट असायची. तिच्या संशयापायी आपल्यात वाद होऊ लागले. वाद वाढत गेले. भांडणं होऊ लागली. शेवटी पाच महिन्यातच ती घर सोडून कायमची माहेरी निघून गेली.
शेजल माहेरी निघून गेल्याच्या दुस-या दिवशी नर्मदा तिच्याबरोबर बोलली होती. नर्मदानं तिला घर सोडून जाण्याचं नेमकं कारण विचारलं तेव्हा ती नर्मदाला म्हणाली होती की, "तुमचा भाऊ माझ्याशी प्रामाणिक नाहीये. त्याचे दुस-या बाईबरोबर संबंध आहेत पण तो तसं कबूल करत नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून मला जाणवत आलंय की त्यावेळी त्याच्या मनात दुसरीच कुणी तरी असते. कधी कधी तो खूप निरस असतो. त्यावेळी मला जाणवायचं की तो माझ्याबरोबर आहे. पण कधी कधी तो इतक्या उत्कट ओढीने, प्रेमाने मला जवळ घेतो तेव्हा मला जाणवायचं की त्याक्षणी तो मनाने दुस-या स्त्रीशी रममाण झालेला असतो. अशा वेळी तो माझ्या शरीराचा वापर करून माझ्याशी व्यभिचार करत असतो असा माझा ठाम समज झालाय. मला हे असलं वैवाहीक आयुष्य नकोय. त्याच्याबरोबर वैवाहीक जीवन जगत असताना माझी होणारी घुसमट मला आता सहन होत नाही म्हणून मी त्याला सोडून दिलंय."
नर्मदाने तिला विचारले होते की "तुम्ही दोघं एकमेकांशी सामोपचाराने बोलून हा प्रश्न का मिटवत नाही ? काय समज गैरसमज असतील ते बोलून दूर करा."
त्यावर ती नर्मदाला म्हणाली होती की, "या विषयावर आमचं ब-याच वेळा बोलणं झालंय. बोलणं म्हणजे वाद, विसंवाद आणि भांडण. त्याच्या आयुष्यात दुसरी कोणतीही स्त्री नाही असं तो म्हणतो पण तुझ्या मनात, हृदयात कोण मुलगी  बसलीय ? या प्रश्नाचं उत्तर तो देत नाही. एखादा नवरा बायकोबरोबर मानसिक व्यभिचार करतो ही गोष्ट कोणतीही स्त्री सहन करणार नाही. आमच्या बोलण्यात शब्दाने शब्द वाढत जातो मग आमचे वाद होतात. हल्ली तर आमच्या बोलण्याची परीणिती भांडणातच होते."
ती सोडून गेल्यानंतर नर्मदा आपल्याशी बोलली होती. आपण तिला सांगितलं होतं की "मी काॅलेजात असल्यापासून एका मुलीवर प्रेम करतोय. तीसुद्धा माझ्यावर प्रेम करायची असं मला जाणवायचं पण मला तिच्याजवळ परोक्ष प्रेम व्यक्त करायला जमलं नाही. काॅलेज पूर्ण झाल्यावर ती आपल्या गावी निघून गेली. ती वेगळ्या जातीची म्हणून ती माझ्याशी लग्न करायला ती नकार देईल या भीतीपायी मी तिच्याबरोबर बोललो नाही, तिला विचारलं नाही. आईबाबांना तिच्याबद्दल काही सांगितलं नाही कारण ती दुस-या जातीची होती. मग शेजलबरोबर लग्न झालं. ती करतेय ते आरोप अगदी खरे आहेत. माझं मन शेजलशी कधीच एकरुप झालंच नाही. ती माझ्याबरोबर असायची तेव्हा मी खूप निरस असायचो पण ती मुलगी माझ्या मनात असायची तेव्हा माझं मन खूप प्रफुल्लित, उत्कट असायचं."
नर्मदा म्हणाली होती, "ती तुला सोडून गेली, तुम्ही विभक्त झालात ही चांगली गोष्ट आहे. तुझं मन दुभंगलेलं असणं हे वैवाहीक आयुष्याला पूरक ठरलं नसतं. आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस ?"
आपण म्हणालो होतो की "पुढे एकट्यानं जगायचं. शेजलला न्याय देऊ शकलो नाही. आमचं प्रेम सफल झालं नाही. आता एकट्याने जगून निदान त्या मुलीला न्याय दिल्याचं समाधान तरी मला मिळेल."
सव्वीस वर्षे उलटून गेली होती. त्याला काॅलेजच्या शेवटचा आदला दिवस आठवला.
आपण धाडस करून तिला एक छोटंसं प्रेमपत्र लिहिलं होतं, आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. लग्न करून सहजीवन जगण्याचा मानस व्यक्त केला होता आणि शेवटी लिहिलं होतं, "तूसुद्धा माझ्यावर प्रेम करत असशील, माझ्याबरोबर लग्न करून सहजीवन जगायचा तुझा मानस असेल तर उद्या तू अबोली रंगाचा ड्रेस घालून काॅलेजला ये."
दुस-या दिवशी तिच्या अंगावर पांढरा शुभ्र ड्रेस पाहून आपण खूप दुःखी झालो होतो. आपलं मन प्रचंड निराशाग्रस्त झालं होतं. तिच्याशिवाय आयुष्य जगणं ही कल्पनाच सहन होत नव्हती. तिच्याशी नजरानजर झाल्यावर ती आपल्याशी बोलायला खूप उत्सुक आहे असं आपल्याला वाटायचं पण आपलं निराश झालेलं मन तिच्याबरोबर बोलायला राजी झालं नव्हतं. आपलं मन उद्विग्न होतं. आपण दिवसभर तिला टाळत राहिलो होतो.
काॅलेजातून बाहेर पडताना मेघदूत हे पुस्तक आपल्याला देऊन ती संकोचाने मान खाली घालून म्हणाली होती, "तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक देईल."
निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मनाने आपल्याला हे पुस्तक एकदाही उघडून पाहायला दिलं नाही. ते पुस्तक उघडून पाहावं असं कधी वाटलं नव्हतं. पण आपण हे पुस्तक छातीशी धरून कित्येक रात्री जागवल्या होत्या. लग्न झाल्यावर हे पुस्तक जणू अडगळीत गेलं होतं.
आज सव्वीस वर्षांनी ते पुस्तक हातात आल्यावर अनुप्रिताच्या तीव्र आठवणीने त्याचं मन व्याकूळ झालं होतं.
"कुठे असेल आता ती ? तिचं लग्न झालं असेल. मुलाबाळांसह आपल्या संसारात रमली असेल. तिने लग्नाला नकार का दिला हा प्रश्न आजपर्यंत अधांतरीच राहिलाय. एकदा तिच्याबरोबर भेट झाली तर आपलं जगणं सुसह्य होईल. पण तिला कुठे शोधायचं ? शोधलं आणि निरोप दिला तरी ती भेटायला येईल का ? तिला आपली आठवण तरी असेल का ? तिला आपल्याबद्दल काही वाटत असतं तर काॅलेजच्या शेवटच्या दिवशी ती अबोली रंगाचा ड्रेस घालून नक्कीच आली असती.
ते पुस्तक छातीशी धरूनच तिच्या आठवणीतच त्याला झोप लागली.
जाग आल्यावर तो उठला. फ्रेश होऊन त्याने चहा घेतला आणि पलंगावर आडवा होऊन अनुप्रिताची आठवण करत त्याने ते पुस्तक उघडलं.
पहिल्याच पानाला टाचणी लावलेला एक कागद घडी करून लावलेला होता. कागद तसा जीर्ण झाला होता. टाचणी गंजली होती. त्याने अलगदपणे टाचणी काढली. घड्या केलेला तो कागद अलगद उलगडला. अनुप्रितानं लिहिलेलं ते पत्र होतं. अत्यंत उत्सुकतेनं व आतुरतेने त्याने ते पत्र वाचायला घेतलं.
"मत्प्रिय सुभाष,
माझ्याकडे अबोली रंगाचा ड्रेस नसल्यामुळे मला पांढरा शुभ्र ड्रेस घालावा लागला याबद्दल मला क्षमा कर. पांढरा शुभ्र रंग हे शांतीचं, तहाचं व समर्पणाचंच प्रतिक आहे असं मी मानते. काल तुझं पत्र वाचलं. तू माझ्यावर अपार अबोल प्रेम करतोस हे मला गेल्या तीन वर्षापूर्वी आपली पहिली नजरभेट झाली तेव्हापासून जाणवत होतं. पण मीसुद्धा तुझ्यावर अतोनात प्रेम करते हे तुला कधी जाणवलं नाही का रे ? हो, मी तुझ्यावर अतोनात प्रेम करतेय. तुझ्याबरोबर लग्न करून मला सहजीवन जगायचंय. माझा स्वभाव खूप संकोची असल्यामुळे आणि आपल्या आजूबाजूचं वातावरणही इतकं पोषक नसल्यामुळे मी माझ्या प्रेमाची वाच्यता तुझ्याकडे करू शकले नाही पण तुलाही माझ्याशी बोलायला धाडस झालं नाही का रे ? तू मुलगा होतास ना, मग एकदा तरी तसं धाडस तू करायला हवं होतंस ना रे ! मी माझ्या घरचा पत्ता व फोन नंबर देते. तू  केव्हाही ये आणि माझ्या आईवडिलांना तुझा मनोदय सांग. माझे आईवडील माझ्यावर खूप प्रेम करतात. ते नक्कीच आपल्या विजातीय लग्नाला संमती देतील.
तू येईपर्यंत मी तुझी प्रतीक्षा करत राहीन. फक्त प्रतीक्षा ... आयुष्यभरासाठी !
तुझी, फक्त तुझीच - अनुप्रिता.
तिचं पत्र वाचल्यावर त्याला प्रचंड धक्का बसला. त्याचं मन पश्चात्तापदग्ध झालं. तिच्याकडून अबोली रंगाच्या ड्रेसचं अपरोक्ष प्रमाण मागण्याऐवजी आपण तिला समोरासमोर का विचारलं नव्हतं ? आणि तिने दिलेलं पुस्तक आपण लगेच वाचायला का घेतलं नव्हतं ? तरी ती म्हणाली होती की "तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक देईल असं !" तरीही आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाकडून मिळवण्यासाठी हे उघडून का पाहिलं नाही ?
आपल्या वागण्याच्या पश्चात्तापाने त्यांच्या मनाचा संयम सुटला आणि तो ढसाढसा रडायला लागला.
ब-याच वेळाने त्याने आपले अश्रू आवरले.  त्याला जाणीव झाली की आपल्या नशिबाने नव्हे आपल्या करंट्या कर्मानं आपल्या आयुष्यातलं भागदेय आपण हरवू दिलं होतं.
त्याने तिचा पत्ता बघितला. तिच्या गावाच्या नावावरून सात आठ तासांचा एसटी प्रवास असेल असं त्याला वाटलं. इतका प्रवास कारने करायचा म्हटलं तरी आपलं शरीर सक्षम राहिलं नसल्याची जाणीव त्याला झाली. आपल्या अगतिकतेनं तो हताश झाला. त्याचबरोबर सव्वीस वर्षांनंतर ती तिथे असेल हे संभवत नाही हे त्याच्या लक्षात आलं.
तिने तिचा फोन नंबर दिला होता पण गेल्या सव्वीस वर्षात तो तीन आकडी नंबर किती तरी वेळा बदलला असण्याची शक्यता जास्त होती. आज सात आकडी टेलिफोन नंबर आहेत.
त्याला अनुप्रिताची मैत्रीण वैदेही आठवली. तिनेच सांगितलं होतं की "अनुप्रितासुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करत होती पण ते प्रेम व्यक्त करायला तिला धाडस झालं नव्हतं."
त्याने आपल्या आठवणींना ताण दिला. वैदेही आपला मित्र सौरवची कौटुंबिक संबंधातली मुलगी होती. त्याने आपल्या जुन्या फोन डायरीमध्ये बघितले पण सौरवचा फोन नंबर त्याच्याकडे नव्हता. डायरीमध्ये सौरवच्या आत्येभावाचा सुशांतचा फोन नंबर मात्र होता. पाच एक वर्षांपूर्वी तो आपल्याला भेटला होता तेव्हा आपण त्याचा फोन नंबर घेतला होता. त्याचा तो नंबर बदलला असेल तर असा प्रश्न त्याला पडला.
त्याने सुशांतला फोन लावला. नशिबाने तो नंबर बदललेला नव्हता. सुशांतला आपलं नाव सांगितल्यावर तो म्हणाला, "अरे, कसा आहेस तू ? कुठे असतोस ? इतक्या वर्षांनंतर माझी आठवण कशी आली ?"
वैदेहीशी तुझा काही संपर्क आहे का असं त्याने सुशांतला विचारलं.
तो म्हणाला, "अरे, ती सौरवची बायको आहे. मी दोघांचे फोन नंबर देतो. लिहून घे."
त्याने वैदेहीला फोन लावला आणि म्हणाला, "मी सुभाष बोलतोय. ओळखलंत का मला ? तुम्हाला वहिनी म्हणू की वैदेही ?"
ती म्हणाली, "मला वैदेही असंच बोल. आज इतक्या वर्षांनी माझी कशी आठवण आली तुला ?"
तो म्हणाला, "मला अनुप्रिताची खूप आठवण होतेय. तिच्या आठवणीने मी व्याकूळ झालोय. तिला भेटायची खूप तगमग होतेय माझ्या जीवाची ! तिच्यामुळे तुझी आठवण झाली. तुझा अजूनही तिच्याशी संपर्क आहे का ? तिचा फोन नंबर, पत्ता तुझ्याकडे असेल तर मला हवा आहे."
ती म्हणाली, "इतक्या वर्षांनी तिच्या  आठवणीने तू व्याकूळ व्हावंस याचं मला आश्चर्य वाटलं. मी तुला बोलले होते ना की ती तुझ्यावर खूप प्रेम करत होती म्हणून ! आता तिची आठवण झाली, तिच्यासाठी व्याकुळ व्हावंस, तिचा फोन नंबर, पत्ता मिळवण्याची धडपड करतो आहेस, सुभाष, तू बरा आहेस ना ? तुझी तब्येत चांगली आहे ना ?"
तो म्हणाला, "हो, मी ठीक आहे. मला अनुप्रिताची खूप आठवण येतेय. मला एकदा तिला भेटायचंय. मी खूप व्याकुळ झालोय तिला भेटायला !"
ती म्हणाली, "माझ्याकडे तिचा सात आठ वर्षांपूर्वीचा फोन नंबर आहे. तो बदलला असेल तर प्रश्नच आहे. आता आठवलं, तुला ती आरती आठवत नसणार. ती अनुप्रिताच्या संपर्कात असावी. मी तुला उद्या परवा तिचा फोन नंबर व पत्ता तिच्याकडून मिळवून देते. ती इथेच पुण्याला राहते."
तो म्हणाला, "तिच्याकडूनच तिचा पत्ता घेणार असशील तर माझा काहीही उल्लेख करू नकोस."
ती म्हणाली, "नाही करणार !"
नंतर थोडं अवांतर बोलून त्याने फोन ठेवला. 
दुस-या दिवशी वैदेहीने अनुप्रिताचा फोन नंबर व पत्ता फोनवर त्याला  सांगितला.
थोड्या वेळाने त्याची मोठी बहीण आल्यावर तिने विचारलं, "तू खूप विचारात दिसतोयंस. काय झालं ? ताण तणाव करून घ्यायचा नाही असं राहूलने बजावलंय ना तुला ?"
थोडा वेळ तो गप्प बसला. नंतर त्याने अनुप्रिताचं पत्र तिला दिलं. ते वाचल्यावर तिने विचारलं, "तू हिच्यावर प्रेम करत होतास ? तिचा होकार होता तरी ..."
तिला थांबवत तो म्हणाला, "मी तुला आमची प्रेम कहाणी सांगतो."
त्याने आपल्या अबोल, मुग्ध प्रीतीबद्दल तिला सांगितलं. काल तिचं पत्र अचानक कसं हातात आलं, तिचा फोन नंबर व पत्ता कसा मिळवला ते सांगून तो म्हणाला, "मला तिला भेटायचंय. माझ्या प्रकृतीबद्दल आपण उमेद बाळगतोय पण दुखणं हार्टचं आहे. आयुष्याचे किती दिवस शिल्लक आहेत हे अनिश्चित आहे. मला मरणापूर्वी एकदा तिला भेटायचंय. फोन करून तिला भेटायला बोलावू का या दुविधेत मी पडलोय."
गंभीर होत नर्मदा म्हणाली, "सव्वीस वर्षे झाली या गोष्टीला. तिच्याकडे काय परिस्थिती असेल याची आपल्याला काहीच कल्पना नाहीये. तिचं लग्न झालं असेल, ती तिच्या संसारात रमली असेल. ती तुझी युगंधरा नक्कीच नसेल ! तू फोन करण्यापेक्षा मी थोड्या वेळाने तिच्याकडे जाऊन तिला समक्ष भेटते. तिच्याशी बोलते. तिला चाचपडून बघते. अनायासे आज रविवार आहे. ती घरीच असेल."
तो म्हणाला, "तू म्हणतेस ते योग्य आहे. तू तिला भेट आणि कसंही करून एकदा  मला भेटायला तिला बोलाव. हवं तर तिला माझ्या आजाराबद्दल सांग. तिला हेही सांग की मी किती दिवस जगेन हे अनिश्चित आहे."
ती म्हणाली, "तू काही काळजी करू नकोस. मी तिला मनावून नक्कीच सोबत घेऊन येईन."
काम आटोपल्यावर नर्मदा आधी आपल्या घरी गेली. तिथून ती अनुप्रिताकडे गेली. दारावर तिच्या नावाची पाटी होती.
तिने बेल वाजवल्यावर अनुप्रितानंच दार उघडून तिला आत घेतलं. नर्मदा म्हणाली, "मला अनुप्रिताला भेटायचंय म्हणून मी इथे आलेय."
ती म्हणाली, "मीच अनुप्रिता. बसा. कोण आहात तुम्ही, काही काम आहे का माझ्याकडे ?"
तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहून नर्मदाला कल्पना आली की तिचं लग्न झालंय आणि ती आपल्या संसारात रमली असेल.
तिने आणलेलं पाणी पित नर्मदा म्हणाली, "तुम्ही मला ओळखत नाही. हे माझं आधार कार्ड. यावरून माझं नाव, पत्ता तुम्हाला समजेल. माझी ओळख मी नंतर देते. तू आता घरात एकटीच आहेस का ?"
अनुप्रिता म्हणाली, "हो, मी एकटीच आहे."
नर्मदा म्हणाली, "हे चांगलं झालं. आपल्याला मोकळेपणानं बोलता येईल."
अनुप्रितानं विचारलं, "फक्त दोघींनीच बोलावं असं काही काम होतं का माझ्याकडे ?"
नर्मदा म्हणाली, "हो, मला तुझ्या वैयक्तिक खाजगी आयुष्याबद्दल थोडं बोलायचंय. मोकळेपणी बोलशील ना ?"
अनुप्रिता विचारात पडली. तरीही या बाईने आपलं आधारकार्ड दाखवलं, आपला एकेरी उल्लेख करतेय हे विचारात घेऊन ती म्हणाली, "आपली ओळख नाहीये तरीही तुम्ही बोला. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जेवढं सांगणं मला उचित वाटेल ते मी मोकळेपणाने बोलेन."
नर्मदानं विचारलं, "तुम्ही काॅलेजला असताना सुभाष नावाचा मुलगा तुझ्या वर्गात होता. आठवतो का तो तुला ?"
इतक्या वर्षांनी सुभाषची कुणी आठवण काढली म्हणून अनुप्रिता लगेच भावनाधिन झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर ओघळू लागले.
अश्रू भरलेल्या डोळ्यांनी नर्मदाकडे पाहत तिने कातर स्वरात विचारलं, "तुम्ही ओळखता का त्याला ? कसा आहे तो ? कुठे असतो ?"
नर्मदानं विचारलं, "तू त्याच्यावर प्रेम करत होतीस ना?"
अनुप्रिता म्हणाली, "तुम्ही माझ्या खाजगी आयुष्याबद्दल नको इतकं विचारताय असं नाही वाटत का तुम्हाला ?"
नर्मदा म्हणाली, "हो वाटतं ना, पण त्याशिवाय मी ज्या हेतूने इथं आले, तो हेतू सफल होणार नाही. मी सुभाषचा उल्लेख केला तेव्हा तुझं डोळे अश्रूंनी डबडबले होते मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं का टाळतेस ?"
अनुप्रिता म्हणाली, "ठीक आहे. तुमचं आडनाव व त्याचं आडनाव वेगळं आहे म्हणून सांगते. आमचं लग्न होऊ शकलं नाही, आमचा संपर्क राहिला नाही, तो कुठे आहे हे मला माहीत नाही तरी मी आजही त्याच्यावर प्रेम करते. तो माझं पहिलं प्रेम होता आणि शेवटचंही !"
आपल्या भावना संयमित करत ती उठली आणि नर्मदेसाठी चहा घेऊन आली.
चहा घेत अनुप्रितानं विचारलं, "आता तरी सांगा ना, तुम्ही सुभाषला कशा ओळखता ते ?"
नर्मदा म्हणाली, "मी सुभाषची मोठी बहीण नर्मदा आहे."
अनुप्रिता म्हणाली, "सुभाषची मोठी बहीण माझ्या समोर आहे याचा मला खूप आनंद झाला. आता तुम्हीच सगळं सांगा त्याच्याबद्दल !"
नर्मदानं तिला सुभाषबद्दल सगळं  सांगितलं. आधी त्याची प्रकृती कशी आहे हे सांगितलं. मेघदूत हे पुस्तक त्याच्या हातात कसं आलं, त्याने तुझी चिठ्ठी पहिल्यांदा वाचल्यावर त्याची काय अवस्था झाली हे ही तिने सांगितलं. ते ऐकून भाववश होत अनुप्रिता रडायला लागली.
थोड्या वेळाने आपल्या मनाला संयमित करून तिनं विचारलं, "सुभाषची बायको आणि मुलं कुठे असतात?"
नर्मदानं त्याच्या पत्नीबद्दल सगळं  सांगितल्यावर अनुप्रिता भारावली. तिने रुद्ध आवाजात विचारलं, "असा एकटा जगत राहिला सुभाष माझ्यासाठी, त्याच्या आठवणीत मला जपत ?"
नर्मदा म्हणाली, "हो, तो तुला, तुझ्यावरच्या प्रेमाला कधीच विसरू शकला नाही. वडिलांच्या सांगण्यावरून त्याने लग्न केलं पण बायकोशी तो एकरुप होऊ शकला नाही. तू त्याच्या मनात असायचीस. कुणी तरी मुलगी त्याच्या हृदयात, मनात आहे हे त्याच्या बायकोच्या लक्षात आल्यावर त्यांच्यात वाद, भांडणं होऊ लागली. मग पाच महिन्यातच त्याची बायको त्याच्या आयुष्यात असलेल्या तुझ्या अप्रत्यक्ष अस्तित्वामुळे त्याला कायमची सोडून गेली. त्याने पुन्हा लग्न केलं नाही."
थोड्या वेळाने स्वतःला सावरत अनुप्रितानं विचारलं, "मी त्याला कालीदासाचं मेघदूत हेच पुस्तक का दिलं असेन असं वाटतं तुम्हाला ?"
नर्मदा म्हणाली, "तुझ्या मनातलं मला कसं सांगता येईल ? तूच सांग ना !"
अनुप्रिता म्हणाली, "मी त्याला संदेश दिला होता की प्रेयसीच्या विरहात व्याकुळ होशील, तिचा विरह तुला असह्य होईल तेव्हा तुझ्या प्रेयसीला आर्त साद दे. ती साद हवं तर एखाद्या मेघाकडून माझ्यापर्यंत पोहोचव. प्रियकराच्या विरहात तडफडणारी आणि त्याच्या विरहात व्याकुळ होऊन प्रियकराची आतुरतेनं प्रतीक्षा करणारी तुझी प्रेयसी तिच्या प्रियकराच्या सादेला अति उत्कटतेनं साद देईल. सुभाषने ते पुस्तक उघडू वाचलं नाही त्याला हा आशय समजला नाही हे मला आता समजतंय म्हणून त्याने मला आर्त साद दिली नाही. दिली असेल तर ती साद माझ्यापर्यंत पोहोचली नाही असं मला वाटतंय."
तिचं बोलणं ऐकून नर्मदा चकित झाली. ही सुभाषवर किती प्रेम करत होती व फक्त प्रेमच जगत होती याची कल्पना नर्मदाला आली. ही सुभाषची युगंधरा तर नव्हती ना अशी तिची भावना झाली.
कपबशा उचलत अनुप्रिता म्हणाली, "त्याला भेटायची अतीव ओढ माझ्या मनात उभरून आलीय. तुम्ही बसा. मी माझं आटोपते. मग निघू आपण त्याला भेटायला."
पंधरा एक मिनिटांनी एक सुटकेस घेऊन अनुप्रिता बाहेर आली आणि म्हणाली, "चला, मी येते काही दिवस सुभाषची काळजी घ्यायला."
नर्मदा वेड्यासारखी तिच्याकडे पाहतच राहिली. सुभाष एकटा राहातो हे हिला समजलंय तरी ही सुभाषकडे राहायला येतेय, हिचं त्याच्यावरचं प्रेम इतकं मोठं धाडस करतंय हे पाहून ती चकित झाली तशी भारावलीसुद्धा !
अनुप्रिता दाराला कुलुप लावत असताना नर्मदानं विचारलं, "तू बॅग घेऊनच बाहेर पडतेयंस. काही दिवस सुभाषबरोबर राहाणार आहेस. इतकं मोठं धाडस तू करतेयंस याचं भान आहे ना तुला ?"
अनुप्रिता म्हणाली, "हो, मला पूर्ण जाणीव आहे. सव्वीस वर्षांपूर्वी मी साधं बोलण्याचंही धाडस करू शकले नव्हते. आज सुभाषसाठी मी कुठलंही धाडस करेन."
नर्मदा म्हणाली, "तुझ्या घरच्यांना काय सांगशील तू ?"
अनुप्रिता स्मित करत म्हणाली, "माझ्या घरचे ? कोण ? नाही, माझ्या घरचे कुणीच नाहीत. मी एकटीच राहते. मी अजून लग्न केलं नाही. माझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र सुभाषच्या नावाचंच आहे."
नर्मदा म्हणाली, "काय सांगतेस ? खरं ?"
अनुप्रिता म्हणाली, "हो, खरं आहे हे ! सुभाष जसा माझ्या आठवणीत जगत आला तसं मीसुद्धा त्याच्या आठवणीतच जगत आलेय पण सुभाषला हे सांगू नका, प्लीज. प्रसंग बघून मीच त्याला सांगेन."
नर्मदाला खात्री पटली की अनुप्रिता ही सुभाषची युगंधराच आहे !
सुभाषकडे आल्यावर नर्मदानं बेल वाजवली. दार उघडून अनुप्रिताला समोर पाहून तो स्तब्ध झाला. आपल्यासमोर अनुप्रिता उभी आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.
नर्मदानं त्याला भानावर आणलं. ती म्हणाली, "मी तुझ्या अनुप्रिताला तुझ्याकडे घेऊन आलेय."
त्याला पाहून अनुप्रिता उन्मन झाली आणि व्याकुळ होत सुभाषच्या प्रचंड ओढीने आत शिरून त्याला घट्ट मिठी मारून तिने आपल्या कोंडून ठेवलेल्या भावनेला अश्रू रुपाने मोकळी वाट करून दिली !
अनुप्रिताने अशोकला घट्ट मिठी मारलेली पाहून नर्मदा स्वतःशीच म्हणाली, "प्रित सामावली साफल्याच्या कवेत !!

© रमेश नागपुरे
मुलुंड (पूर्व), मुंबई ४०० ०८१
मोबाईल # 98690 75238

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...