मानवी जीवनात पैशाला जितके महत्त्व आहे तितकेच किंबहुना कांकणभर अधिक महत्त्व पुण्याईला आहे. जीवनात स्वास्थ्य मिळणे हे केवळ पुण्याईचे फळ असते याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते. माणसाच्या जीवनात त्याच्या गाठी म्हणजे "दिव्य बँकेत" सत्कर्माच्या द्वारे बहुत पुण्य जमा झालेले असेल तर तेच पुण्य त्याला त्याच्या जीवनात स्वास्थ्य मिळवून देईल.
🔮 इतकेच नव्हे तर ते पुण्य त्याला अचानक आलेल्या संकट प्रसंगी विलक्षण रूपाने उपयोगी पडेल, अशा प्रसंगी व बिकट परिस्थितीत माणसाला विलक्षण रीतीने अंतर्मनाच्या शक्तीची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कोणाच्या तरी रूपाने मदत होते व माणूस तशा संकटातून किंवा बिकट परिस्थितीतून निभावून जातो.
♻️ सामान्य लोकांच्या भाषेत सांगायचे म्हणजे चमत्कार घडतात. हे चमत्कार कसे घडतात व कोण घडवून आणतो, हे सामान्य लोकांना कळत नाही व त्यांची बुद्धी अक्षरश: चक्रावून जाते. परंतु वास्तविक हे चमत्कार नसतात, तर ते माणसाच्या पुण्याईचे अंतर्मनाच्या द्वारा झालेले आविष्कार असतात. गाठी किंवा पाठी पुण्य नसेल तर अशा स्वरूपाचे चमत्कार घडणार नाहीत.
🚩 याच संदर्भात नामदेव महाराजांचे देवाला उद्देशून काढलेले खालील उद्गार लक्षणीय आहेत.
"घेशी तेव्हां देशी। ऐसा अससी उदार"।।
✅ याचा भावार्थ असा की, परमेश्वर (किंवा निसर्ग शक्ती) भक्ताकडून प्रथम काही तरी घेतो व मग त्याच्या मोबदल्यात भक्ताला जे पाहिजे ते देतो.
🙏 येथे एक महत्त्वाचा सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे तो हा की, माणसाच्या जीवनात ''पुण्याईची कमाई'' जे अलौकिक कार्य करू शकते तसे कार्य ''पैशाची कमाई'' करू शकत नाही. जेथे पैसा उपयोगी पडत नाही तेथे पुण्य उपयोगी पडते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
🌞 सामान्य लोकांना हे सत्य न उमगल्यामुळे ते रात्रंदिवस ''पैसा पैसा'' करीत पैशाच्या पाठीमागे पळत सुटलेले असतात व पुण्य संपादन करण्याकडे मात्र ते पूर्ण दुर्लक्ष करतात. एखाद्या पक्षाला दोन पंख असले तरच त्याला आकाशात सुखाने विहार करता येतो, त्याचप्रमाणे पैसा आणि पुण्य हे दोन पंख माणसाने संपादन केले तरच त्याला जीवनाच्या गगनात आनंदाने विहार करता येईल.
♻️ येथे एक मुद्दा स्पष्ट करणे इष्ट वाटते. अडचणीच्या प्रसंगी ज्या प्रमाणे माणूस बँकेत ठेवलेले पैसे काढू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या संकट प्रसंगी आपले "अंतर्मन दिव्य प्रज्ञा शक्तीच्याद्वारे" (Wonderful Power of Intuition) दिव्य-ईश्वरी बँकेतील पुण्याई खर्ची टाकून विलक्षण चातुर्याने माणसाला संकटातून सुरक्षित व सुखरूप पार करीत असते.
☄️ सर्वात कळस म्हणजे हा सर्व प्रकार अंतर्मन अत्यंत गुप्त रीतीने बिनचूक करीत असते. म्हणून जीवनात सुख-सोयी प्राप्त होण्यासाठी जशी पैशाची कमाई आवश्यक आहे तितकीच किंबहुना किती तरी अधिक पुण्याईची कमाई जीवनात स्वास्थ्य मिळविण्यासाठी आवश्यक आहे. या जगात जे काही चांगले आहे, बरे आहे, उत्तम आहे, ते सर्व प्राप्त होण्यासाठी सतत अट्टाहासाने शुभ कर्मे करीत राहण्याचे प्रयत्न माणसाने केलेच पाहिजेत.
🙏 आई-बाप विचारी व सुबुद्ध असणे, सुलक्षणी पत्नी मिळणे, मुले गुणी निपजणे, चांगला जावई व चांगली सून मिळणे, शिष्याला उत्कृष्ट गुरू मिळणे, गुरुला उत्तम शिष्य मिळणे, शेजारी चांगले मिळणे वगैरे चांगल्या व उत्तम गोष्टी मिळण्यासाठी व मिळालेल्या टिकून राहण्यासाठी माणसाजवळ पुण्याई पाहिजे व सत्कर्म करीत राहण्याची सद्बुद्धी पाहिजे. अन्नदान श्रेष्ठदान
👑 त्याचप्रमाणे सत्ता- संपत्ती, मान-मोठेपणा वगैरेनी युक्त अशी उत्तम व अनुकूल सुस्थिती व परिस्थिती पूर्व सुकृतांनी प्राप्त झाल्याने माणसाची बुद्धी चळायला किंवा फिरायला वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत अहंकाररहित, विनम्र व सावध चित्त राहून सद्बुद्धीची उपासना व जोपासना करीत राहणे फार आवश्यक असते. परंतु याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसल्यामुळे जगात सर्वत्र सुखाचा दुष्काळ व दुःखाचा सुकाळ झालेला आढळतो.
लेखक : सद़्गुरू श्री वामनराव पै
(संदर्भ : तुमचे भाग्य तुमच्या विचारात)
✍️ स. प्र. (sp)1759
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा