डॉ. वरद हे शहरातले नामवंत हार्ट सर्जन. त्यांच्या कौशल्याने आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांनी आजपर्यंत अपयश कधीच पाहिले नव्हते.
आज राजचे ऑपरेशन होते. त्यासाठी काल पन्नास हजार रुपये अॅडव्हान्स भरले होते. साधारणतः एका तासाने राजला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलें जाणार होते. राजची पत्नी नेहा खूप काळजीत होती.
“मॅडम, तुमचे दीड लाख रुपयांचे पेमेंट बाकी आहे.”
“सर, मी सकाळीच डॉक्टरांच्या अकाउंटला ट्रान्स्फर केले आहे.”
“मॅडम, पण पैसे अजून क्रेडिट झालेले नाहीत.”
नेहाने बँकेला फोन केला.
“मॅडम, KYC चा प्रॉब्लेम आहे. तुम्ही उद्या बँकेत येऊन एक सही केलीत, तरच पेमेंट होईल.”
“पेमेंट मिळाले नाही, तर मी ऑपरेशन करणार नाही,” डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले.
नेहाने गयावया केली, पण डॉक्टर पाझरले नाहीत.
“पुढच्या दहा मिनिटांत पैसे मिळाले नाहीत, तर आजचे ऑपरेशन कॅन्सल करू. साधारण दोन आठवड्यांनंतर जी डेट उपलब्ध असेल, तेव्हा ऑपरेशन करू.”
“डॉक्टर, पण तुम्हीच तर सांगितले होते ना की ऑपरेशन त्वरित करावे लागेल?”
“हो, पण पैसे त्वरित भरावे लागतील, हेही सांगितले होते. विसरलात का?”
“एका दिवसाची मुदत द्या, प्लीज,” नेहाने विनवणी केली.
“अहो मॅडम, हे गुंतागुंतीचे ऑपरेशन आहे. काही बरेवाईट झाले, तर तुम्ही मला फक्त दोष द्याल; बाकीचे पैसे नाही.”
काय ते दुर्दैव! पैसे असूनही त्या पैशांचा उपयोग करता येत नव्हता.
“पुढच्या पेशंटला घ्या,” डॉक्टरांनी सांगितले.
नेहाच्या मैत्रिणीने तिच्या ओळखीतील, पण तशा कमी अनुभवी सर्जनशी बोलून दोन दिवसांनंतरची डेट घेतली आणि राजला तिथे तातडीने शिफ्ट केले.
डॉ. वरदच्या सहकाऱ्यांनी पुढच्या पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. प्राथमिक तपासणी करून गुंगीचे इंजेक्शन दिल्यवर डॉ. वरद ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झाले.
ॲापरेशनसाठी इन्स्ट्रुमेंट हातात घेण्यापूर्वी गणरायाच्या फोटोला वाकून नमस्कार करायचा हा त्यांचा शिरस्ता होता.
“अरे, गणरायाला कुठे हलवले?”
“असं काय विचारता, सर? बाप्पा तर समोरच आहे.”
“हो खरंच की," डॉक्टर म्हणाले.
“पण आज बाप्पा प्रसन्न वाटत नाही… उदास वाटतो.”
“सर, किती प्रसन्न मुद्रा आहे गणरायाची! तुम्ही ठीक तर आहात ना?” असिस्टंटने विचारले.
“मला थोडं पाणी द्या,” डॉक्टर म्हणाले.
असिस्टंटने पाणी आणून दिले. डॉक्टरांनी ग्लास तोंडाला लावला… पण पाणी पिण्याआधीच ते धाडकन कोसळले.
क्षणात सर्व काही संपलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमधील बातमी पाहून रीना म्हणाली,
“नेहा, अगं राज खूप लकी आहे.”
“काहीही काय, रीना! आपल्याला लवकरची डेट मिळाली खरी, पण हे डॉक्टर कमी अनुभवी आहेत… म्हणजे रिस्क आलीच ना?”
रीना क्षणभर थांबली. नेहाच्या डोळ्यांत पाहत ती हळूच म्हणाली—
“नेहा… काल संकष्टी चतुर्थी होती.
तुझा कडकडीत उपवास होता.
तू मनोमन फक्त एकच प्रार्थना केली होतीस—
‘बाप्पा, माझा राज वाचू दे.’
पैसे होते… पण KYC चा अडथळा आला.
ऑपरेशन गरजेचं होतं… पण डॉक्टरांनी नकार दिला.
सगळं आपल्याला अडचण वाटत होतं.
पण आज कळतंय.
तो अडथळा नव्हता, तर ते राजचं संरक्षण होतं.”
नेहाला काहीच समजले नाही. ती रीनाकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होती. रीनाने तिला पेपरमधील बातमी सांगितली.
“जर काल डॉ. वरदनी राजचं ऑपरेशन केलं असतं,
आणि ऑपरेशनदरम्यानच ते गेले असते…
तर राजचं भविष्यच तिथे थांबलं असतं.”
नेहा काही क्षण गप्प राहिली. शब्द थांबले, श्वास थांबला.
हळूच तिने राजच्या कपाळावर हात ठेवला आणि मनातल्या मनात पुटपुटली—
गणराया, तूच आमचा पाठीराखा.
नेहाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते—
भीतीचे नव्हे… तर कृतज्ञतेचे आणि नकळत तिच्या ओठांवर मंत्र उमटला—
“ॐ गं गणपतये नमः.”
दिलीप कजगांवकर, पुणे ✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा