शनिवार, २३ मे, २०२६

2831. मिस्टर अँड मिसेस तो आणि ती

  ती,“ आरे ऐक ना!” 
 तो,“ पण मला नाही ऐकायचं काही.  या चहासारखे तुझं ही बोलणे आता पांचट झाले आहे.” तो चहाचा कप टिपॉयवर आपटत म्हणाला. 
 ती,“ आता तुला सगळंच पांचट वाटणार रे! म्हणूनच मी जातेय!” ती रागाने म्हणाली आणि आत निघून गेली. 
 तो,“ आता ही कुठे निघाली?” तो स्वतःशीच पुटपुटला. 
  आणि ती कपडे बदलून पर्स घेऊन बाहेर पडली. त्याने तिला काहीच विचारले नाही. 
 तो,“ जाणार कुठे? येईल सहा वाजेपर्यंत मुलं घरी यायचा वेळी ” तो स्वतःशीच बोलून तोही बाहेर निघून गेला. 
   तो सहा वाजता घरी आला तरी ती अजून आलीच नव्हती मुले ही घरी आली. आई कुठे आहे म्हणून त्यांनी विचारलं तर येईल म्हणून त्याने सांगितलं. 
त्यांना याने पिझ्झा मागवून दिला. मुलांनी शूज, सॉक्स, दारातच तसेच सोडून दिले होते. पिझ्झा खावून त्याचे बॉक्स तसेच हॉलमध्ये टिपॉय वर लोळत पडले होते. मुलं खेळायला निघून गेली.
  सात वाजले अंधार पडायला लागला तरी ती अजून घरी आली नव्हती. आता मात्र त्याच्या काळजात चर्र झालं. त्याने तिला फोन केले पण ती ते ही उचलत नव्हती. वेळ पुढे सरकत होता तसं तो अस्वस्थ व्हायला लागला. तो आता स्वतःच तिला शोधायला जायचं म्हणून तयार झाला आणि घराबाहेर पडणार तर ती दारात हजर होती.त्याने तिला दारातच मिठी मारली. 
 तो,“ कुठे गेली होतीस?” 
ती,“ अरे घरातले मीठ आणि बाकी किराणा संपला होता. तुला मीठ घेऊन ये म्हणून सांगणार होते बाकी सामान मी उद्या घेऊन येईन असा विचार केला तर तुझा मुड खराब होता. मग मीच पडले घरा बाहेर आणि घेऊन आले सामान पण येताना नेमके  स्कुटीचे चाक पंचर झाले आणि मला घरी यायला वेळ झाला. आता सोडतो का मला एक तर हातात ओझं आहे माझ्या ” ती चिडून म्हणाली.
तो, “आण त्या पिशव्या इकडे.(त्याने तिच्या हातातून पिशव्या घेतल्या.) कॉफी करतो मस्त वेलची घालून.बस तू.” तो हसून म्हणाला 
ती,“ अरे वा तीन तासांपूर्वी तर साहेबांचा मुड खराब होता. माझे बोलणे सुध्दा पांचट वाटतं होते.  अचानक काय झालं इतकं प्रेम कुठून आले अचानक  आणि इतकं घाबरायला काय झालं होतं?” तिने रोखून पाहत विचारलं.
 तो,“ सॉरी मी उगीचच चिडचिड केली. पण तू आहेस म्हणुन माझ्या आयुष्याला चव आहे. तू असलीस की कळत नाही पण नसली की आयुष्य पांचट आणि आळणी होते अगदी मिठासारखी आहेस तू माझ्या आयुष्यात!” तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला आणि ती फक्त हसली. 

©स्वामिनी चौगुले.   ✍️
 टीप - कथा कॉपी राईटेड आहे तर खुली आहे म्हणून स्वतःच्या नावावर डकवू नका आणि निनावी देखील फिरवू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...