माझ्या वाचून जगाचं काहीच अडत नाही किंवा माझं स्वतःच असं काही अस्तित्व नाही असे निराशाजनक विचार मनात येतील तेव्हा या पुष्पाबेन ना नक्की आठवा.
"माझं नाव पुष्पाबहेन आहे. मी 69 वर्षांची आहे. गेली पंधरा वर्षे, मी दररोज सकाळी एकाच रस्त्याने चालत होते. सकाळी पावणे सातला घरातून निघायचं, सोसायटीच्या मुख्य गेटपासून पुढे, मगनकाकांच्या किराणा दुकानाजवळून जायचं, मागच्या गल्लीतून प्राथमिक शाळेजवळून निघून घरी यायचं. बरोबर बेचाळीस मिनिटं. मग थंडी असो किंवा पाऊस...
तो व्यायाम नव्हता. तो एक पळवाट (escapism) होता. माझ्या रिकाम्या घरापासून... माझ्या दिवंगत पतीच्या विचारांपासून, आणि त्या जीवघेण्या शांततेपासून, जी मी जास्त वेळ बसले तर मला पोखरून टाकायची...
पण गेल्या महिन्यात, माझा पाय मुरगळला. डॉक्टरांनी सहा आठवडे चालण्यास मनाई केली. मी निराश झाले, पण मनाच्या एका कोपऱ्यात सुटकाही वाटली. हायसं, आता चालायला जायचं टेन्शन नाही...
चालायला गेल्याने मन हलकं होतं, हा आव आणणं बंद.
स्वतःला अंथरुणातून ओढून उठवणं बंद. बस... सगळं बंद.
पहिला आठवडा तर मजा आली. उशिरापर्यंत झोपले, टीव्ही पाहिला. जणू सुट्टीच वाटली.
दुसऱ्या आठवड्यात, माझ्या घराची डोरबेल वाजली. किराणा दुकानवाले मगनकाका होते. ते काळजीत दिसत होते.
"पुष्पाबहेन, तुम्ही ठीक आहात ना? तब्येत बरी आहे ना?"
"बस पाय मुरगळला आहे काका. मी ठीक आहे."
त्यांनी मान हलवली, पण उभेच राहिले. "काही हवं असल्यास सांगा. दूध किंवा भाजी हवी आहे का?"
"नाही, धन्यवाद."
ते निघून गेले. मला आश्चर्य वाटलं, पण मी फार विचार केला नाही.
तीन दिवसांनी, शाळेच्या प्राचार्य श्रीमती शाह आल्या. मी त्यांना ओळखतही नव्हते.
"पुष्पाबहेन? आम्ही तुम्हाला भेटायला आलो. त्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं की तुम्ही बरेच दिवस दिसल्या नाहीत."
"माझा पाय मुरगळला आहे. पण तुम्हाला काळजी का वाटली?"
"ओह, देवाचे आभार. आम्हाला भीती वाटली होती की काही वाईट तर घडलं नाही ना?"
"तुम्हाला माझी काळजी का असावी? मी तर फक्त तिथून जाते."
त्या हसल्या. "कारण... तुम्ही आमच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनल्या आहात."
मला काहीच कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी, माझ्या दाराखालून एक कागद आत आला. आत एक चित्र होतं. क्रेयॉनने काढलेलं. एक आजीबाई चालत होत्या. खाली लिहिलं होतं: "लवकर बऱ्या व्हा. प्रेम, काव्या (इयत्ता-2)."
मी कोणत्याही काव्याला ओळखत नव्हते.
नंतर तर पत्रांचा पूरच आला. गल्लीतल्या भटक्या कुत्र्यांना पोळी टाकणाऱ्या त्या आजींचं पत्र आलं. आपल्या पोस्टमनदादांची चिठ्ठी आली. मगनकाकांच्या दुकानात काम करणाऱ्या त्या मुलानेही विचारपूस केली. सगळे विचारत होते. सगळे विचारत होते की मी ठीक आहे की नाही.
मी अवाक झाले. मी या लोकांना फारशी ओळखत नव्हते. कधी "कशा आहात" पेक्षा जास्त बोलणंही झालं नव्हतं.
म्हणून मी श्रीमती शाहांना फोन केला. "माझं चालणं इतकं महत्त्वाचं का आहे?"
फोनवर थोडा वेळ शांतता पसरली... "तुम्हाला खरंच माहीत नाही?"
"काय माहीत नाही?"
"पुष्पाबहेन, तुम्ही या भागाचं 'जिवंत अलार्म' आहात. मगनकाका तुम्हाला जाताना पाहिल्यावरच आपल्या दुकानाचं शटर उघडतात. सिक्युरिटी गार्डला माहीत आहे की जेव्हा तुम्ही निघता तेव्हा त्याची गेटवर हजर राहण्याची वेळ झाली आहे. पालकांना माहीत आहे की जर त्यांनी तुम्हाला रस्त्यात पाहिलं, तर त्याचा अर्थ मुलांना शाळेत पोहोचायला उशीर झालेला नाही. त्या आजी तुम्ही तिथून गेल्यावरच कुत्र्यांना खाऊ घालायला सुरुवात करतात.
तुम्ही... तुम्ही संकेत आहात की दिवसाची सुरुवात झाली आहे."
मी थक्क झाले.
"आणि काव्या," श्रीमती शाह पुढे म्हणाल्या, "ती खूप घाबरट आहे. रोज शाळेत येताना रडते. पण ती दररोज सकाळी गेटजवळ उभी राहून तुम्हाला जाताना पाहण्याची वाट बघते. एकदा तिने तुम्हाला पाहिलं की, ती तिच्या आईला सांगते की आता ती आत जायला तयार आहे. तुम्ही तिचं धैर्य आहात. तिला माहीत नाही का, पण तुम्ही आहात."
माझ्याकडे शब्दच नव्हते.
"आम्हाला वाटलं की तुम्ही जाणूनबुजून आमच्यासाठी हे करता," श्रीमती शाह हळू आवाजात म्हणाल्या.
पण मी करत नव्हते. मी तर फक्त... जगत होते. टिकून होते. माझ्या एकटेपणापासून वाचण्यासाठी चालत होते...
काल माझा पाय बरा झाला. मी चप्पल घातली आणि माझ्या रस्त्यावर चालायला निघाले.
मगनकाकांनी हात हलवला. गार्डभाई हसले. त्या आजींनी स्मित दिलं. आणि काव्या, छोटीशी काव्या जिला मी कधीच भेटले नव्हते, तिने गेटजवळ धावत येऊन ओरडून सांगितलं, "तुम्ही आलात! मला तर खूप भीती वाटत होती की तुम्हाला काही झालं असेल!"
तिच्या शिक्षिकेने तिला समजावलं, पण काव्या धावत गेटजवळ आली. "उद्या मी तुमच्याबरोबर चालू का? फक्त त्या कोपऱ्यापर्यंत?"
तिची आईसुद्धा आशेने माझ्याकडे बघत होती.
"नक्की बाळा," मी गहिवरून म्हणाले.
आज सकाळी, काव्याने माझा हात धरून तीन ब्लॉकपर्यंत चाललं. तिच्या बाहुल्यांबद्दल गप्पा मारल्या. जेव्हा शाळा आली, तेव्हा तिने माझ्या पाया पडून मला घट्ट मिठी मारली. "उद्यासुद्धा याच वेळेला ना?"
"हो, याच वेळेला."
मी 69 वर्षांची आहे. पंधरा वर्षांपर्यंत मला वाटत होतं की मी माझ्या दुःखापासून पळण्यासाठी चालते. मला वाटत होतं की मी एकटी आहे, , माझं काहीच महत्त्व नाही.
पण कळलं की, मी तो धागा होते ज्याने कितीतरी अनोळखी लोकांची सकाळ गुंफून ठेवली होती.
मी जे शिकले ते हे आहे: तुम्हाला माहीत नसतं की तुम्ही लोकांसाठी काय महत्त्व ठेवता. तुमच्या छोट्या, सामान्य सवयीही दुसऱ्याचा आधार असू शकतात.
म्हणून थांबू नका. असं समजू नका की तुमचं काहीच महत्त्व नाही. लोक तुम्हाला पाहतात, तुम्हाला अनुभवतात.
तुमचं "फक्त जगणं" हे दुसऱ्यासाठी जगण्याचं कारण असू शकतं.
चालत रहा... कोणीतरी तुमच्या भरवशावर बसलं आहे. जरी तुम्हाला कधीच कळणार नसेल की ते कोण आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा