मी आणि पत्नी घराबाहेर पडताना एक गोष्ट ठरवली होती की दुकानदाराशी अजिबात घासाघीस करायची नाही.बरेच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. दक्षिण महाराष्ट्रात एका देवस्थानी आम्ही गेलो होतो. जेंव्हा त्या देवस्थानाच्या आवारात पोहोचलो तेंव्हा तिथे उसळलेला गर्दीचा महापूर बघून छाती दडपून गेली आणि वाटू लागले आल्या पावली घरी चालू लागावे. माझा स्वभाव प्रचंड भिडस्त. त्यामुळे त्या गर्दीत शिरायचे धाडस होईना. एक तर तिथे दर्शनासाठी कोणतीही रांग नव्हती. मंदिराचा गाभारा आणि मी, आमच्यात अर्धा किलोमीटर अंतर होते आणि ते गर्दीने व्यापून टाकले होते. आम्ही दोघेही असाहाय्य नजरेने त्या गर्दीच्या महापुराकडे पहात होतो. एव्हढ्यात एक असामी आमच्यापाशी आली आणि म्हणाली, "अर्ध्या तासात दर्शन, प्रत्येकी पाचशे रुपये द्या, थांबायला मला वेळ नाही, बोला लवकर" हा माणूस तर दर्शनाचा लिलाव मांडल्या सारखाच घाई करत होता.
मी क्षणार्धात निर्णय घेऊन त्याला नमस्कार करत म्हणालो, "माफ करा, आमची तयारी नाही".
तेंव्हा तो उर्मटपणे म्हणाला "परवडत नसेल तर प्रत्येकी चारशे द्या"
मी त्याला नाही म्हणालो. त्याक्षणी मला गजानन महाराजांच्या पोथीतले एक वाक्य आठवले होते-
श्री महाराज म्हणतात, दर्शन ही काय वस्तू विकत मिळे बाजारात? काही निग्रह करून मी पत्नीला म्हणालो चल परत.
पत्नी म्हणाली, "कोठे ?"
"घरी, पुण्याला !"- मी
"आणि दर्शन ?"
माझ्याकडे उत्तर नव्हते, मी घामाने नखशिखांत भिजलो होतो, घामाची आंघोळ झाली होती.
"दर्शन नाही तर इथे अभिषेक, अन्नदान सेवेसाठी पैसे देऊ"- पत्नी
"आता फक्त घर, पुणे, नशिबात असेल तर पुण्यातही देव भेटेल"- मी
आम्ही तात्काळ पुण्याला परतलो. प्रसाद म्हणून आम्ही येताना काहीही आणले नव्हते. देवाला वस्त्र म्हणून आम्ही पुण्याहून एक भारी किमतीची साडी नेली होती. इतकी भारी की, तेव्हढ्या किमतीची साडी मी आतापर्यंत पत्नीलाही घेतली नव्हती. पुण्याला परत येताना पत्नीने विचारले की आपण आणलेल्या साडीचे काय करायचे?."
मी उत्तर टाळले. दोन दिवसांनी पत्नीला सांगितले, उद्याच्या रविवारी चांगला पुरणाचा साग्रसंगीत स्वयंपाक कर आपण आपल्या मावशींना जेवायला बोलावू". आमच्याकडे स्वयंपाक आणि इतर कामासाठी एक वृद्ध मावशी येत होत्या. रविवारी मावशी जेवायला आल्या, पुरणाचा, चारी ठाव स्वयंपाक केला होता. पाट मांडून मावशींना जेवायला बसवले. जेवायच्या अगोदर ताटापुढे दक्षिणा आणि पानाचा विडा ठेवला. आम्ही दोघांनी मावशींना वाकून नमस्कार केला.आणि मावशींना जेवायला सांगितले. मावशी संकोचाने नको नको करत होत्या, तरीपण पत्नीने त्यांना आग्रहाने जेवायला वाढले. मावशी तृप्त झाल्या. निरोप घेऊन जायला निघताना नमस्काराला वाकल्या. पण पत्नीने त्यांना तसे करून न देता म्हणाली, "मावशी इथे बसा जरा पाटावर, आमचं एक काम आहे. मावशी बसल्या.
पत्नीने आत जाऊन कपाटातून एक साडी आणली जी आम्ही दुकानदाराशी घासाघीस न करता केवळ देवीसाठी घेतली होती. पत्नीने ती साडी आणि एक कापड मावशींच्या हातात ठेवले आम्ही दोघांनी पुन्हा त्यांना वाकून नमस्कार केला..आणि मावशींच्या अश्रूंचा बांध फुटला. तोंडाला पदर लावत मावशी बराच वेळ अश्रू पुसत राहिल्या. दिलेल्या साडीवर अश्रू ओघळत राहिले. ते पाहून आमचाही संयमाचा बांध फुटला. देवस्थानी जाऊन न झालेले दर्शन त्याक्षणी घडले. मावशी घरी जायला निघाल्या तेंव्हा जाताना त्यांना त्यांच्या कुटुंबियांसाठी चार पुडाचा टिफिनचा डबा भरून पुरणाचा स्वयंपाक दिला. घराबाहेर पडताना मावशी
म्हणाल्या,"तुमच्या सगळ्या विच्छा देव पूर्ण करील".
मनात म्हणालो, देवाकडे काहीही मागणे नाही.
या घटनेला आठ दिवस होतात न होतात तोच एक दिवस, एक सुंदर देखणे एनहव्हलप कुरियरने घरी आले. उघडून आतले पत्र वाचले. पत्र मुलाच्या नावाने होते. त्याला जपानच्या एक युनिव्हर्सिटीने जाण्या येण्याच्या व राहण्याचा खर्चासह स्कॉलरशीप दिली होती. दर्शन झाले होते, आशिर्वाद ही मिळाला. पुन्हा नव्याने धडा मिळाला--
ज्याचा त्याचा भगवंत त्याच्या ह्रदयात असतो आणि आपण तो मंदिरात शोधतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा