मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

821. किस्से पोस्टमनचे...नावात काय आहे ?

 नोव्हेंबर उत्तरार्धात होता. या महिन्यात दोनशेहून अधिक पेंशनरांना मोफत आणि घरपोच सेवा देण्याचे भाग्य लाभले." या भाग्याच्या मखमली गालिचावर बसून समाधानात काही दिवस घालवावेत " या मनाच्या मंगळवाराची खिचडी शिजते न् शिजते तोच विवेक गायकवाड सरांचा फोन आला.
" पोस्टमन साहेब, तुम्ही पेंशनरांचे प्रश्न मार्गी लावत आहात म्हणून एक काम सांगतो..केसनंद मधील पारुबाई भंडलकर यांची पतीच्या पश्चात मिळणारी पेंशन गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यांचा कर्ता सवरता मुलगाही मागच्या महिन्यात अपघातात मरण पावला. आता त्यांच्या घरात धावपळ करणारं कुणी नाही. कृपया आपण लक्ष घालावे. " 
तसे पाहता केसनंद आमच्याच सबऑफिसचे शाखा डाकघर आहे. त्यामुळे तिथे सतत येणेजाणे असते. दुसर्या दिवशी ऑफिसला जाता जाता भंडलकर आज्जींच्या घरी गेलो.
बाहेरुनच आवाज दिला. " भंडलकर आज्जींचे घर हेच का..? " आज्जी बाहेरच धुणं धूत होत्या. खाकी डगला घातलेल्या पोस्टमनला अर्थात मला पाहताच त्या काहीश्या कुतुहलल्या. मीच पारुबाई भंडलकर..या पोश्टमन भाऊ.."
गाडी बाजूला लावून मी आज्जींच्या दारात दाखल झालो. दारासमोर दोन गाई बांधलेल्या होत्या. तिथून पुढे काही अंतरावर कोंबड्यांचे उकिरडा उकरुन चविष्ट खाद्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. आज्जी धूत असलेल्या कपड्यांच्या पाण्यावर अळूंचे छोटेसे बेट उभे राहिले होते. 
मी दारात येताच जून्या जीर्ण कपड्याला आज्जींनी शेवटचा घसाडा दिला, क्षीण हातांनी वेडेवाकडे पिळले. त्याच दगडावर ते पिळलेले धुणं टाकून आज्जींनी साबणाच्या पाण्यात हात बुडवून अंगाला पुसत मला घरात बोलवले. आज्जींचे घर तसे पक्के आणि दुमजली होते परंतु त्याचा पाया खचून‌ बराच काळ लोटला होता. आज्जींचे पती BSNL मध्ये नोकरीस होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन बायका असा मोठा लवाजमा होता. दूसरी बायको आज्जींचीच सख्खी बहिण..दोघीही एकमेकींना समजून घेत. शिक्षण नसल्याने पडेल ते काम करत असत. नवरा ठणठणीत होता तोपर्यंत फिकीर नव्हती.
पण एखाद्यावर नियतीची वक्रदृष्टी पडली की होत्याचे नव्हते होते. आज्जींच्या बाबतीतही तेच झाले. पतीला अचानक देवाज्ञा झाली अन् हसत्या-खेळत्या संसाराला खीळ बसली. तीन तीन मुले, परंतु कुणाचेच धड उत्पन्नाचे मेळ बसत नव्हते. सगळे मोलमजुरीची कामे करत. वडिल हयात असताना त्यांनी मुलांना शिकवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मुले शिकली नाहीत. परिणामी वडिलांच्या पश्चात त्यांची दयनीय अवस्था झाली. सगळे आपापला संसार थाटून दिवस काढत होते. आज्जींना मात्र पतीच्या पश्चात कौटुंबिक पेंशन सुरु झाली. तोच काय तो जगण्याचा आधार..म्हातारपणाची काठी. पेंशनवर आज्जींची कशीबशी गुजराण सुरु होती. तीच पेंशन सिस्टिमच्या घोळामुळे बंद झाली. आज्जींचे पेंशनच्या पासबुकवरील नाव पारुबाई भंडलकर असे होते आणि आधार कार्ड व पॅनकार्ड वर पार्वती भंडलकर..अचानक सिस्टिमला याची जाणीव झाली आणि आज्जींच्या पेंशनला भलीमोठी उटी बसली. आज्जींचा एक धाकटा मुलगा यासाठी धावपळ करत होता. त्याने बरेच हेलपाटे मारले परंतु पदरी निराशाच आली. सरकारी खात्यात खरतरं लोकांची कामे एका चकरेतच व्हायला हवीत पण तसे होत नाही. भस्म्यारोग झालेले भ्रष्ट  अधिकारी हजार पाचशेसाठी सामान्य जनतेची नको तेवढे पिळवणूक करतात. प्रत्यक्षात जे काम सहजासहजी होणार असते त्यासाठी महिनोंमहिने वाट पाहावी लागते.  मी सरकारी क्षेत्रात असूनही मला याची झळ बसली आहे. परंतु मी चिकाटीने आणि पाठपुराव्याने अनेक प्रश्न धसास लावले आहेत. कधी प्रेमाने,कधी विनंतीने तर कधी अधिकार्यांना त्यांच्या कर्तव्याची कठोर शब्दात जाणीव करुन देऊन.
तर आज्जींचा करतासवरता मुलगा या पेंशनच्या धावपळीत अपघातग्रस्त झाला आणि मरण पावला. त्यालाही दोन मुली आहेत. अशा या पेंशनला वैतागून आज्जींनी हात टेकले. एव्हाना पेंशन बंद होऊन सहा महिने होत आले होते. नोव्हेंबर सुरु झाला तशी ही पेंशनची कामे मी घरोघर जाऊन अगदी पोस्टाच्या अत्यल्प दरात करुन देत होते. काही वृद्धांची अवस्था पाहून तर ती अत्यल्प फीही घ्यायचे धाडस झाले नाही. मग मी सरळ पैसे घेणं बंद केलं. जी काय फी असेल ती मी पदर भरु लागलो. या सर्व गोष्टींची माहिती मी स्टेटस द्वारे लोकांना देत होतो. हाच स्टेटस पाहून मा. विवेक गायकवाड सरांनी मला आज्जींची परिस्थिती सांगितली आणि विश्वासही व्यक्त केला की " त्यांची पेंशन तुम्ही नक्की पूर्ववत सुरु करुन द्याल." घरात आल्यावर आज्जी मला बसायला टाकू लागल्या. मी नको म्हटल्यावर म्हणतात कशा, " घरात आल्याल्या पावन्याचं बूड आपून तोलून धरायचं आसतयं मास्तरं..तुमची उठबसं करण आमचा धरम हाय..आमी तुमच्या घरी आल्यावर तुमी आमाला आसचं ठेवशाल का..? सांगा बरं.."
आज्जींच्या प्रश्नाने मी भारावून गेलो. त्यांची माणूसकीची, पराकोटीची मौलिक समज पाहून माझं दुनियादारीबद्दलचं तोकडं ज्ञान गळून पडलं. अशा माणसांमुळे तर माझं माणुसपण वेळोवेळी अधिक उजळून निघतं. मला त्यात सुधारणा करता येते. कोर्या चहाचा गरम घोट घशातून खाली उतरला तशी माझी तंद्री भंग पावली. पटापट चहा संपवून मी आज्जींची सर्व परिस्थिती जाणून घेतली. पारुबाईची पार्वती झाली म्हणून पेंशन बंद पडली होती. त्यांची कागदपत्रे घेऊन तात्काळ ई-सेवा केंद्रात फोन करुन त्यांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड दुरुस्तीस पाठवले. आज्जींचा मोबाईल आधारला लिंक असल्याने लगेचच ओटीपी घेऊन आधार व पॅनकार्डचा फॉर्म सबमिट केला. पेंशनसदर्भात संबंधित अधिकार्यांना फोन‌ करुन आज्जींची आपबिती कळवली. थोडी माझ्या सामाजिक कामाची ओळख करुन दिल्यावर त्यांनी बिनशर्त सहकार्याची तयारी दर्शवली. 
आज्जींच्या पारुबाई भंडलकर नावाने मी हयातीचा दाखला आँनलाईन सबमिट केला. आज्जींची ही कामे मार्गी लावून मी तिथून निघून आलो. तीनच दिवसांत आज्जींचे दुरुस्त केलेले आधार व पॅनकार्ड आले. ते पुढे पाठवून दिले. 25 नोव्हेंबरला मी आज्जींच्या घरी गेलो‌ होतो. 
त्यानंतर सतत पाठपुरावा करुन अवघ्या पाचंच दिवसात आज्जींच्या खात्यावर 15 हजार रुपये पेंशन जमा झाली. आज्जी व त्यांचा नातू बँकेतून थेट पोस्टात आले. मला पाहताच आज्जींनी मायेने माझ्या तोंडावरुन हात फिरवला आणि दोन्ही हातांची बोटे ओवाळून कानाजवळ मोडली. माझी दृष्ट काढली.  
" मास्तरं..काय म्हणू तुमाला, मला काय सुचना..पण लय बेस काम केल तुमी.." 
असं म्हणून आज्जींनी डोळ्याला पदर लावला.
याच पेंशनसाठी त्यांनी त्यांचा मुलगा गमावला होता. तीच पेंशन मी अवघ्या पाचच दिवसात एकही हेलपाटा न मारता, एकही रुपया खर्च न करता सुरु करुन दिली होती. आज्जींना अक्षरशः आकाश ठेंगणं झालं‌ होतं. त्यांनी मला आवर्जून घरी यायला सांगितले. एकदा सवड काढून मी गेलोही..तेव्हा आज्जी म्हणाल्या, " मास्तरं..तुमचं पैसं किती देयाचं..? तसं तर कितीबी दिलं तरी कमीच हाय पण सांगा.."
"आज्जी..तुम्ही माझ्या चेहर्यावरुन मायेने हात फिरवला..तोच माझा मेहनताना..! "
गायकवाड सरांना ही बातमी कळवताच त्यांनाही आनंद झाला. जाता जाता आज्जींनी मला माझे नाव विचारले.." मास्तरं..तुमचं नाव सांगा की..."
" नावात काय आहे आज्जी. पोस्टमन गवळी लक्षात असू द्या बसं.." 
" नाव ओ.."
" नामदेव.."
" मास्तरं..नावात काय न्हाय पण ज्याच्या नावातच देव हाय त्याला काय बी औघडं न्हाय.."

©️®️ लेखक नामदेव सुखदेव गवळी
9767041875

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...