आई - बाबांकडे जेवायला होते ते आज तिघं... तो, त्याची बायको नी त्यांचा सतरा वर्षांचा लेक. आईने त्याचा आवडता मेन्यू बनवलेला. डाळिंबी ऊसळ, बटाट्याच्या काचर्या, वांग्याचं दह्यातलं भरीत, कांदा घालून आमटी आणि लसुणाची चटणी. फक्कड बेत होता. त्याच्या बाबांनी एक हाफ स्मिर्न आॅफही आणलेली. आज एक छोटी बैठकही होणार होती, बाप - लेकाची. वातावरण एकदम मस्त होतं. फक्त बिस्मिल्ला खान साहेबांची सनई मिसींग होती बस्स. बाबांनी ग्लास भरले दोन. चिअर्स वैगरे झालं. पहिला घोट मस्त घशात ऊतरला, आत्मा थंड करत गेला. बायका किचनमधून ह्यांच्या 'काकडी काप जरा', 'अंडी ऊकडून दे ना २-४', चिज क्यूब्ज जरा बर्फांच्या खड्यात घालून आण ना'.अशा फर्माईशी पुर्ण करण्यात लागलेल्या. त्याच्या बायकोला मात्र हे सगळं जरा वरवरचं वाटत होतं. दिखावा केल्यासारखं. ऊसना आव आणल्यासारखं. तिने तसं ते सासुबाईंच्या डोळ्यांतून शोधायचा प्रयत्नही केलेला... पण आईंनी थांग लागू दिला नव्हता. तर बैठक आटपली. राजकारण ते सिनेमा व्हाया म्युच्युअल फंड्स नी शेअर्स असे विषय काढत. पानं वाढली. ते आईच्या हातचं भरलेलं ताट पाहून, तो जाम खूष होता. पण हे काय? ताटात गोड काहिच नव्हतं. ईतरवेळी साध्यासूध्या प्रसंगीही आई फ्रुटसॅलेड करते, शेवयांची खीर करते, अगदीच काही नाही तर गोडाचा शिरा तरी करतेच. पण आज ह्या प्रसंगीही काहीच गोड नाही? त्याच्या चेहर्यावरच्या भुवयांच्या झालेल्या प्रश्नचिन्हांतून, आईला त्याचा प्रश्न न विचारताच समजला. आई बोलली.
"तू परवा दुबईला चाल्लास. कायमचा. मागाहून ही दोघंही येणार. छानेय. आमच्या ह्या वयात मनात आलं तरी आम्हाला भेटणं तर सोड, दिसणारही नाहिस तू. तुझे बाबा ऐंशीचे मी पंच्याहत्तरची आणि वेळप्रसंगी आजुबाजूला कोण त्यांच्या? तर नायर, जोशी आणि देशमुख. ते ही दाराला त्यांच्या कुलूप नसेल तर. अरे हो तुला सांगायसाठी फोन केलेला गेल्या आठवड्यात, तर तू हे दुबईचंच सांगू लागलास. मग नाही बोलले मी. गेल्या आठवड्यात ह्यांना मध्यरात्री जोराचा ठसका लागला. श्वास अडकला. पाणी पिता येईना. जिव घाबरा झाला. मी गेले दोन्ही वाट्या बदललेल्या पायांनी, जमेल तसं पळत बाहेर दार ऊघडून. पण शेजारच्या तिघांच्याही दाराला कुलूप. नायर युके ला गेलेत लेकाकडे, जोशी दापोलीला गेलेत. नी देशमुख नवरा - बायको गेलेले माथेरानला. अख्ख्या मजल्यावर आम्ही दोघंच. खूप घाबरले मी. स्वामींचा अंगारा लावला ह्यांना नी फोन केला तुमच्याकडे. तुझा लेक आला हो दहा मिनिटांच्या आत घरी, रात्री दोन वाजता. हे झाले हळुहळू नाॅर्मल मग. पण नातू मात्र बसून होता हो रात्रभर, आजोबांच्या ऊशाशी. आता ह्यापुढे असं काही झालं तर काय करायचं प्रश्नच आहे. आपलं हक्काचं कोणी अवघ्या दहा मिनिटांवर आहे आपल्या, ही जाणिवच ह्या आमच्या वयात आम्हाला जगायचं बळ देते. म्हणूनच झोपेच्या गोळ्यांची वेगवेगळ्या केमिस्टकडून दहा पाकिटं आणून ठेवलीयेत. असं अचानकच काही झालं कोणा एकाचं, तर मागे ऊरणार्यासाठी. एकटं जगणार तरी कोणासाठी? तर सांगायचा मुद्दा हा की आजचा प्रसंग त्यामूळे गोड - धोड करण्याचा खचितच नाही आमच्यासाठी. बाकी सगळं तुझ्या आवडीचं केलंय.आईच्या हातचं हे कदाचित शेवटचंच. पोटभर जेव हो बाळा".
पहिलाच तोडलेला पोळीचा तुकडा त्याच्या हातात तस्साच होता. त्याचा लेक ताटावरुन ऊठत, पळतच बाहेर गेला गॅलरीत. मोकळेपणाने रडायला. त्याची बायको हात तोंडावर धरुन हमसून हमसून रडत होती. तो सुन्न होऊन बसलेला. आळीपाळीने आई - बाबांकडे बघत. बाबा त्यांचा भिडस्तपणा ईथेही धरुनच होते, गप्प बसून. काहीतरी ठरवत मनाशी, रात्रीच्या दहा वाजता त्याने फोन लावला त्याच्या बाॅसला. सांगायला की he is no more interested in going to Dubai... he doesn't want any promotion & he doesn't care any more about the hike he will b getting in his CTC. त्याने फोन ठेवला आणि पोळीचा तुकडाही तसाच ताटात ठेवला पुन्हा. तोपर्यंत परत आत आलेल्या त्याच्या लेकाकडे पाहून तो बोलला.
"जा एक किलो आम्रखंड घेऊन ये. सिताफळ कुल्फीही आण येतांना पाचशे ग्रॅम. आजी - आजोबांना तुझ्या आवडते ना खूप आणि काही काळजी करु नका म्हणावं त्यांना ठसक्याची वैगरे. त्यांची हक्काची लोकं फक्त दहा मिनिटांवर आहेत त्यांच्यापासून आणि कायमच असतील".
सतरा वर्षांच्या लेकाने तोपर्यंत बाप - लेकात आलेला अवघडलेपणा विसरत, बाबाला कडकडून पापी दिली आणि मग त्याने ही बाजुलाच बसलेल्या त्याच्या बाबांनाही. दोन्ही बायका मुक्तपणे मोकळ्या होत होत्या. आपापल्या पिढीनुरूप, एक तोंडावर पदर ठेऊन तर एक ओढणी धरुन तोंडावर.
--सचिन देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा