मनीऑर्डरच्या काउंटरवरच्या कदमचा आवाज थोडा वाढला होता, “ बाई, तुम्हाला कितीदा सांगितलं की असा फॉर्म आम्हाला घेता येणार नाही. जा, ह्या फॉर्मवर तुमचा पूर्ण पत्ता लिहा आणि मगच घेऊन या.”
कदमच्या चढलेल्या आवाजाचाही त्या बाईवर कांहीच परिणाम होत नसावा कारण हाच संवाद बराच वेळ चालू होता. थोड्या वेळाने मनीऑर्डरच्या रांगेतील इतर लोकांचे आवाज यायला लागले. आता मला ह्या प्रकरणाची दखल घेणं भाग होतं. तेवढ्यात कदमनेच “तुम्हाला काय सांगायचेय तें आंत जाऊन साहेबांना सांगा” म्हणून तिची रवानगी माझ्याकडे केली.
थोड्याच वेळात एक बाई मनीऑर्डरचा फॉर्म हातात घेऊन माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्या बरोबर दुसरीही एक बाई होती. त्यांच्याकडे पहांताच मला त्यांच्याबद्दल साधारण अंदाज बांधता आला. पोस्ट ऑफीसपासून थोड्याशा अंतरावर एक वेश्याव्यवसायाबद्दल बदनाम झालेली वस्ती होती. ह्या बाया तिथल्याच दिसत होत्या. दोघीही स्वस्त पण भडक साड्या नेसल्या होत्या. हातात फॉर्म धरलेल्या बाईने चेहऱ्यावरही तशीच भडक रंगरंगोटी केली होती. तिने केसही चापून चोपून बसवले होते. दुसरी त्यामानाने साधी होती. तिने कपाळावर फक्त एक टिकली लावली होती. बाकी कांहीच रंगरंगोटी केली नव्हती. दोघींचे वय साधारण तिशीच्या आसपास असावे. मनीऑर्डरचा फॉर्म पुढे करत ती म्हणाली, “सायेब, तो खिडकीवरला बाबू फारम घेत नाही. आता आम्ही पुरे पैसे दिल्यावर ह्याचं काय जातय?”
मी तिने पुढे केलेला फॉर्म घेतला व नजरेखालून घातला. पोस्टाच्या बाहेर बसणाऱ्या कुणातरी कारकुनाने तो फॉर्म भरला होता. दोनशे रूपयांची मनीऑर्डर कुणा यशवंतच्या नांवाने पाठवायची होती.
फक्त मनीऑर्डर पाठवणाऱ्याचे नांव आणि पत्ता ह्याच्यासमोर ‘सगुणा, मुंबई.” एवढेच लिहिले होते. कदमने ह्यालाच हरकत घेतली होती. मनीऑर्डर पाठवणाऱ्याचा पूर्ण पत्ता तिथे देणं अत्यावश्यक होतं. फॉर्म पुढे करणाऱ्या स्त्रीला मी विचारले, “तू सगुणा कां?” गडद रंगरंगोटी केलेली ती स्त्री हंसली आणि म्हणाली, “मी आयेषा आणि ही सगुणा. हीला मनीऑर्डर करायची आहे. मी त्यांना विचारलं की सगुणेनं स्वत:चा पूर्ण पत्ता कां लिहिला नाही.
प्रथम त्या पूर्ण पत्याची गरजच काय? म्हणून वाद माझ्याशीही करायला लागल्या. मी शांतपणे त्यांना पूर्ण पत्त्याची आवश्यकता समजावून सांगितल्यावर सगुणा किंचित् करूण स्वरांत म्हणाली, “साहेब, आमचा पत्ता आहे ती वस्ती बदनाम आहे. खोटं कशाला बोलू साहेब, मी पण तोच धंदा करते. मला हे पैसे गांवी असलेल्या माझ्या मुलाला पाठवायचेत. माझा खरा पत्ता माझ्या मुलाला कळू नये अशी माझी इच्छा आहे. पूर्ण पत्ता लिहिला नाही तर चालणार नाही कां?”
हे सर्व सांगतांना तिच्या डोळ्यांत पाणी आले. दोघींच्या बोलण्यावरून मला कल्पना आली ती अशी की कांही महिन्यापूर्वी नवरा वारल्यामुळे कुणाबरोबर तरी आलेली सगुणा शेवटी त्या वस्तीवर पोहोचली होती. गांवी एक म्हातारी मावशी आणि सगुणाचा बारा वर्षाचा एकुलता एक मुलगा यशवंत दोघंच नात्याची माणसं होती. तिचा मुलगा शाळेत शिकत होता. त्या दोघांच्या चरितार्थासाठी व यशवंताचे शिक्षण चालू रहावे म्हणून त्यांना जमतील तेवढे पैसे पाठवणे आवश्यक होतं. सगुणाकडे थोडे पैसे साठताच तिने मनीऑर्डर करायचा विचार केला होता. पण आपला खरा पत्ता कळवायला तिला साहजिकच भीती वाटत होती. तिच्या वस्तीचं, तिच्या गल्लीचं खरं नांव जरी तिच्या पत्त्यात गांवच्या लोकांना दिसलं असतं तरी खरी गोष्ट तिच्या गांवातल्या लोकांना लक्षांत यायला वेळ लागायचा नाही, असे तिला वाटत होते. नियमाप्रमाणे मनीआर्डर पाठवणाऱ्याचा पूर्ण पत्ता लिहिणे आवश्यक होते. मला सगुणेची दया आली. नियमांचे बंधन पाळून ह्यावर काय उपाय करतां येईल, ह्याचा मी विचार करत होतो. शेवटी मला काय वाटले कुणास ठाऊक? पण मी तिला म्हणालो, “ठीक आहे. इथे तुझा पत्ता सगुणा.........., द्वारा पोस्ट मास्तर ......... पोस्ट ऑफिस, मुंबई क्र .........असा लिहितो.
मनीऑर्डरची पावती इथेच येईल. थोड्या दिवसांनी येऊन घेऊन जा.”
मी तसा पत्ता लिहिला आणि त्यांना पैसे भरायला जायला सांगितलं. “तुम्ही एवढया सांगितल्यावर आम्हाला पावतीची काय जरूरी आहे साहेब! तुमचे फार उपकार झाले साहेब आमच्यावर!” असं म्हणत दोघी तिथून गेल्या. कांही दिवसांनी मनीऑर्डर पोहोचल्याची पावती माझ्याकडेच आली. मी ती खणात ठेवून दिली. त्या कांही पावती घ्यायला पोष्टांत आल्या नाहीत. दीड महिना गेल्यानंतर परत आल्या, ते थेट माझ्याकडेच. सगुणाला पुन्हा मनीऑर्डर करायची होती. मी त्यांना पूर्वीच्या मनीऑर्डरची पावती खणांतून काढून दिली आणि पुन्हा तोच पत्ता मनीऑर्डरवर लिहायची परवानगीही दिली. पुन्हा पुन्हा मला हात जोडत त्या दोघी निघून गेल्या. त्यानंतर हा क्रम नेहमीचा झाला. महिना दीड महिन्याच्या अंतराने सगुणा मनीऑर्डर करायला यायची, पूर्वीची पावती घेऊन जायची. प्रत्येकवेळी आयेषा तिच्याबरोबर असेच. मी पोस्टात कडक शिस्तीसाठी नांवाजलेलो होतो. माझ्यासमोर तरी त्यांच्या या माझ्याकडे येण्याबद्दल कोणी कांही बोलत नव्हतं. मागे कांही कुजबुज झालीच असेल तर ती माझ्या कानावर तरी कधी आली नाही. असे सात आठ महिने गेले. एक दिवस एक पोष्ट-कार्ड पोस्टमनने माझ्याकडे आणून दिले.
त्याच्यावर पत्ता होता, “सगुणा....... , द्वारा पोस्टमास्तर, ......... मुंबई क्रमांक.......... मी कार्ड पाहिलं. ते यशवंताने आपल्या आईला लिहिलेलं होतं. पत्रातलं अक्षर फारच सुरेख दिसत होतं. मी ते कार्ड खणांत ठेवून दिलं. कांही दिवसांनी दोघी परत आल्या, तेव्हां मी त्यांना पावती बरोबर कार्डही दिलं.
“कुणाचं कार्ड?” ह्या सगुणाच्या प्रश्नाला मी “तुझ्या यशवंताच!” असं उत्तर देताच ती खूप आनंदीत झाली आणि आनंदाच्या भरांत पत्र पुन्हा माझ्याकडे देत म्हणाली, “साहेब, एवढं जरा वाचून दाखवतां?”
मला तिच्या आगाऊपणाचा थोडा रागच आला. मी म्हणालो, “बाहेर वाचून घे कुणाकडून तरी मला वेळ नाही.”
मी थोडा तुटकपणेच बोललो. तिचा चेहरा पडला. तो पाहून मला वाईट वाटलं, “बरं आण इकडे!” मी तिला पत्र वाचून दाखवलं. पत्रात विशेष कांही मजकूर नव्हताच! थोडंस शाळेबद्दल लिहिलं होतं. खुशाली कळवली होती. सगुणा पत्र व पावती घेऊन निघून गेली. त्यानंतर पत्रव्यवहार माझ्या पत्त्यावर सतत चालू राहिला. त्या दोघी जोडीने येऊन माझ्याकडून पत्र घेऊन जात. पोष्टाबाहेर बसणाऱ्या कारकुनाकडून वाचून घेत व सगुणा उत्तरही लिहित असे. सगुणा प्रथम पोस्टात दिसली त्याला दोन वर्षे झाली असतील. एक दिवस तिने पावती व पत्र घेतले व ती तिथेच घुटमळली. तिला कांहीतरी सांगायचं होतं. शेवटी आयेषाच म्हणाली, “हिचा यशवंता चार दिवस सुट्टीत मुंबईला यायचं म्हणतोय.”
“बरं! मग!” मला हे सांगण्यातला त्यांचा हेतु मला कळला नाही.
थोडंस चांचरत सगुणा म्हणाली, “साहेब, मला माफ करा. मी पत्रांत कळवलं होतं की मी तुमच्या घरी काम करते आणि तुमच्याकडे रहाते. आणखीही दोन घरची कामं करते. आता त्याने मुंबईत मला भेटायला यायचा हट्टच धरलाय! त्याला नाही तरी कशी म्हणू आणि आला तर त्याला वस्तीवर तरी कशी नेऊ?”
सगुणाने मला न विचारतां असं कांही त्याला कळवलं, हे मला फारसं आवडलं नाही.
तरीही तिची अगतिकता मला समजत होती.
मी विचारले, “त्यापेक्षा तूंच कां जात नाहीस चार दिवस गावी?”
“साहेब, आम्ही इथे पिंजऱ्यात आहोत. मला इथून जायची परवानगी नाही. मी गेले तर परत येईन याची आमच्या मालकीणीला खात्री नाही.” सगुणा म्हणाली.
“मग इथपर्यंत तरी कशा येतां? इथून पळून जाल, असं नाही वाटत मालकीणीला?” मी कुतुहलाने विचारलं!
माझ्या प्रश्नाचं उत्तर आयेषाने दिलं, “आमची मालकीण बरी म्हणून हिला मनीऑर्डर करायला इथे येऊ देते. तरी सुध्दा आमच्यावर नजर ठेवायला वस्तीवरचा एखादा नग मागे असतोच. आता तसंच मनांत आणलं तर पळूनही जातां येईल पण मग परत येता येणार नाही.”
सगुणाची समस्या कठीण होती. मी तरी तिला काय मदत करू शकणार होतो? पण तिची माझ्याकडून कांही तरी अपेक्षा होती.
“साहेब, आम्ही मालकीणीशी ह्या बाबतीत बोललोत. ती गांवी जाऊ द्यायला तयार नाही परंतु तीन चार दिवस सुट्टी द्यायला तयार आहे. तुम्हाला ही गोष्ट मंजूर असेल तरच.” सगुणा म्हणाली. नंतर त्यांनी आपला बेत मला सांगितला.
माझं घर पोस्टाच्या वरच्या मजल्यावर होतं.
यशवंतला सांगितल्याप्रमाणे सगुणा माझ्या घरी रहात होती. तेव्हां ती तीन-चार दिवस माझ्या घरी येऊन रहाणार होती व त्याच वेळी ती यशवंताला इथे बोलावून घेणार होती. त्यांनी अत्यंत भाबडेपणाने हा बेत केला होता. ह्या गोष्टीसाठी माझ्या पत्नीची संमती आवश्यकच होती. एका वेश्येला चार दिवस ती मोलकरीण म्हणून घरी ठेवून घेईल? मला शंकाच होती.
सगुणाची इच्छाशक्ती जबर म्हणा की माझ्या बायकोचं औदार्य म्हणा पण यशवंतला तिथे बोलावून त्याला तिथे भेटण्याचा बेत ठरवल्याप्रमाणे पार पडला. माझ्या पत्नीने तर कमालचं केली. अनेक वर्षे आपल्या घरी कामाला असलेल्या मोलकरणीशी जसं सहजपणे वागतात, त्या सहजतेने ती सगुणाशी वागली. सगुणाचही वागणं चांगलं होतं. यशवंता आमच्या कल्पनापेक्षाही हुशार व तरतरीत मुलगा होता. मायलेकांनी चार दिवस मजेत काढले. एकच दिवस ती बाहेर गेली व मुंबईचा समुद्र त्याला दाखवून आली. यशवंत गेल्यावर ती आमचे आभार मानून जाण्याबद्दल बोलू लागली तर माझी पत्नी तिला कायम आपल्याकडे ठेवूया असं म्हणू लागली. कदाचित स्त्री चळवळींचा परिणाम असेल.
सगुणा नम्रपणे म्हणाली, “बाईसाहेब, तुम्ही केलेले उपकार जन्मोजन्मी मी फेडू शकणार नाही. माझी आता मेल्याशिवाय तिथून सुटका होणार नाही. गेले तीन दिवस मणसं घरावर नजर ठेवून आहेत. मालकीणीने एवढी तरी सवलत दिली म्हणून मला माझा पोरगा तरी भेटला! त्याच्यासाठीच तर जीव जगवत्येय.”
“हे बघ सगुणा, तुझी जर तयारी असेल तर आपण पोलिसांची मदत घेऊन तुझी सुटका करू.” मी तिला धीर दिला.
सगुणा म्हणाली, “साहेब, आधीच तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झालाय. पोलिसांच्या आणि वस्तीवाल्यांच्या भानगडीत पडून तुमच्यासारख्या सज्जन माणसांना विनाकारण त्रास होईल.” चार दिवसांत आमच्या मनाला चटका लावून सगुणा परत गेली. असेच कांही महिने गेले. सगुणाच्या नांवाच यशवंताच पत्र येऊन माझ्या खणांत पडलं होतं. मी कटाक्षाने दुसऱ्यांची पत्रे वाचणे टाळतो पण आता ह्या मायलेकांबद्दल एवढी आपुलकी वाटू लागली होती की मी तें पत्र वाचलं. यशवंताने आपला आठवीचा निकाल कळवला होता. त्याने उत्तम गुण मिळवून वर्गात दुसरा नंबर मिळवला होता. त्याने पोस्टमास्तर साहेबांना व बाईसाहेबांना नमस्कार कळवला होता. पत्र वाचून मला आनंद झाला. पोस्टमनला पाठवून तिला लगेच बोलवून घ्यावं असं वाटलं. प्रत्यक्षात मात्र सगुणा येईल, तेव्हा देण्यासाठी मी पत्र खणांतच ठेवून दिलं. बरेच दिवस गेले. सगुणा आली नाही. मी उगीचच अस्वस्थ झालो. एक दिवस सगुणेची मनीऑर्डर घेऊन आयेषा एकटीच आली. सगुणेला आलेल पत्र मी तिच्याकडे दिलं आणि सगुणेची चौकशी केली. “सगुणा नाही आली?”
“साहेब, ती फार बीमार झाली आहे.” आयेषा म्हणाली.
“अरेरे! फार आजारी आहे काय? काय झालं तिला?” मी काळजीच्या सुरात म्हणालो. “काय होणार साहेब? आमच्यासारख्यांच्या नशीबांत दुसरं काय असणारं. त्यांतच हिला क्षयाची बी बाधा झालीय, असं डॉक्टर म्हणत होता. पोरासाठी पै न पै जमा करते. स्वत:च्या जीवाची पर्वा करत नाही.”
आयेषाचं बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं. त्यानंतर पुन्हा महिन्याने आयेषा एकटीच आली. मनीऑर्डरचा फॉर्म हातात होताच.
“कां ग? सगुणाला अजून बरं वाटलं नाही कां?” मी तिला एकटीलाच पाहून विचारलं.
ती गप्प राहिली. तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. माझ्या मनांत शंकेची पाल चुकचुकली. माझी शंका खरी ठरली. सगुणा हे जग सोडून गेली होती. कधीही परत न येण्यासाठी. माझ्याही डोळ्यात पाणी आलं. मला तिच्या यशवंताची आठवण झाली. “ आता त्याचं पुढे काय होणार? त्याचं शिक्षण कसं पुढे चालू रहाणार? आपण तरी त्याला काय मदत करू शकणार? आपल्या तुटपुंज्या पगारात आपलाच संसार कसाबसा चालतो. गरीब मुलांच पालकत्व स्वीकारणाऱ्या एखाद्या संस्थेची मदत त्याला मिळवून देतां येईल कां? मनात हे विचार येत असतांनाच स्वत:चा थोडासा रागही आला. कुणी सांगितलं होतं ह्या मायलेकांत भावनांनी गुंतायला.”
दोन क्षणांनी मन थाऱ्यावर आलं.
मी आयेषाला म्हटलं, “तिच्या मावशीला आणि मुलाला कळवलंत कां? त्या दोघांवर खरं तर दु:खाचा डोंगरच कोसळणार आहे. बिचाऱ्या पोराचं शिक्षणही थांबेल. हुशार आहे तिचा यशवंता.”
थोडं थांबून आयेषा मला म्हणाली, “साहेब, सगुणा गेल्याच मी तिच्या मावशीला किंवा मुलाला कळवलं नाही, मुद्दामच कळवलं नाही. तिच्या मुलाची अशीच समजूत राहिली पाहिजे की सगुणा अजून जिवंत आहे.”
“त्याने काय होईल?” अभावितपणे मी विचारले.
“साहेब, इथून पुढे सगुणाच्या नांवाने मी तिच्या यशवंताला पैसे पाठवणार आहे. मीच तिच्या नांवाची खोटी पत्रं सुध्दा लिहून घेऊन पाठवत जाईन. मला तरी दुसरं कोण आहे? साहेब, मलाही जगायला तेवढंच निमित्त होईल”
आयेषाच्या बोलण्याने चकीत होऊन भडक रंगरंगोटी केलेल्या चेहऱ्याच्या आड दडलेली सुसंस्कृतता शोधण्यासाठी मी तिच्याकडे पहातच राहिलो. आणि दूर कुठून तरी रेडीओवरचे गाण्याचे बोल ऐकू येत होते, “जगी ज्यास कोणी नाही, त्यासी देव आहे, निराधार आकाशाचा..........”
अरविंद खानोलकर
ऋण फिटता फिटेना ह्या माझ्या कथासंग्रहातून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा