एक विद्वान, एका आध्यात्मिक गुरूंकडे आला. तो खूप प्रसिद्ध होता, त्या आध्यात्मिक गुरूंपेक्षा जास्त प्रसिद्ध होता आणि त्यांना शास्त्रांच देखिल ज्ञान होतं. सगळी शास्त्र अथपासून इतिपर्यंत त्यांना कंठस्थ होती, परंतु अंतर्यामी मात्र अपूर्णता होती. शास्त्र तर कंठस्थ झाली होती, परंतु तरीसुद्धा सत्य काही सापडत नव्हतं. शब्द तर सगळे पाठ होते परंतु, नि:शब्द होण्याचा कोणताच मार्ग मिळत नव्हता. म्हणून आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी गुरूचा शोध घेतला. त्यांना गुरु देखील भेटले. गुरूंनी त्या विद्वाना कडे बघितलं आणि म्हणाले, " असो, मला तुझ्यामध्ये खूप अडचणी दिसत आहेत. तुझ्याजवळ ज्ञानाचे भांडार आहे. तुला काय-काय माहिती आहे, ते तू सर्व लिहून आण. तुला तर सर्व माहित आहे, मग त्याची चर्चा कशाला? आपण ते सर्व सोडून देऊ. नंतर,तुला जे माहित नाही ते मी तुला सांगेन."
शिष्य निघून गेला आणि त्याला एक वर्ष लागले. त्याला तर खूप शास्त्रं माहीती होती, तो सगळं लिहित गेला, लिहितच गेला, लिहीतच राहिला. कितीतरी हजार पानं भरली. तो हजार पानांची पोथी घेऊन परत आला. गुरु म्हणाले, "आलास तू. मला तर शंका होती की तू येऊ शकणार नाहीस, कारण इतकी माहिती तुझ्या डोक्यामध्ये होती.मला माहिती नव्हते,की किती काळ लागेल."
हजार पानांची पोथी बघून गुरू म्हणाले की, “हे खूप जास्त आहे. मी म्हातारा झालो आहे, माझा मृत्यू जवळ आला आहे. मी इतकं वाचू शकणार नाही. तू हे सगळं संक्षिप्तमध्ये लिहून आण. त्याचे सार लिहून आण."
त्याला तीन महिने लागले. तो विद्वान परत आला. त्याने ते लिखाण संक्षिप्त करून आणलं होतं. आता फक्त शंभर पानं होती. गुरु म्हणाले, "हे देखील जास्त आहे. माझे दिवस कमी कमी होत चालले आहेत. आता तर मी शंभर पानं देखील वाचू शकत नाही. याला तू आणखीन संक्षिप्त करून आण."
शिष्य परत आला. आता त्याने एकाच पानावर संपूर्ण सार लिहून आणलं होतं. परंतु गुरु मरणाच्या दारात होते. ते म्हणाले, “ हे बंधू, हे तर खूप जास्त आहे, तू आणखी संक्षिप्त करून आण. लवकर बाजूच्या खोलीमध्ये जा आणि त्याला संक्षिप्त करून आण." शिष्याने,ते पूर्ण सार एका ओळीमधे लिहून आणलं,फक्त एकच श्र्लोक.
गुरूंचा शेवटचा श्वास अडकला होता. गुरु म्हणाले, "मी तुझ्यासाठी थांबलो आहे, तुला केंव्हा समज येईल? अजून संक्षिप्त करून आण. संक्षिप्त करण्यामध्ये तू कंजूसी का करतोयस?" तेंव्हा शिष्य भानावर आला. तो दुसऱ्या खोलीमध्ये पळत गेला. एक कोरा कागद घेऊन आला. त्याने गुरूंच्या हातामध्ये कोरा कागद दिला.
गुरु म्हणाले, "आता तू शिष्य झालास! खरंतर मी आता चाललो आहे, परंतु तू शिष्य झालास. तेंव्हा माझ्याबरोबर तुझा संबंध राहील. जेंव्हा मी जिवंत होतो, तेंव्हा देखील तुझा माझा काहीही संबंध नव्हता, कारण ज्ञान मधे उभं होतं. आता तू कोरा कागद झाला आहेस. रिता झाला आहेस, पणं आता मी चाललो आहे. परंतु चिंता करू नकोस, आपलं नातं जोडलं गेल आहे. मृत्यू देखील आता ते तोडू शकत नाही. तसं तर जीवन देखील मला तुझ्याबरोबर जोडू शकत नव्हतं."
त्या रिकाम्या क्षणांमध्ये शिष्याला दिव्यत्व प्राप्त झाले. म्हणजे नक्की काय झालं? ही गोष्ट खूपच अनोखी आहे! कोरा कागद आणताच काय झालं? कोरा कागद आणण्याचा अर्थ होता, अंतर्यामी पूर्ण रितेपण.
भागवत पुराणामध्ये एक सुंदर गोष्ट आहे. त्या गोष्टीनुसार राधेला या गोष्टीची खूप ईर्षा होती, की भगवान श्रीकृष्ण नेहमी बासरीला आपल्याबरोबर ठेवतात. एकदा तिने कृष्णाला विचारलं, "या बासरीला तुम्ही कायम आपल्या ओठांवर का ठेवतात? एकही क्षण तुम्ही तिला वेगळं होऊ देत नाही. इतका वेळ तर तुम्ही माझ्याबरोबर देखील घालवत नाही, जितका वेळ तुम्ही या बासरी बरोबर घालवता. याच्यामागे काय कारण आहे?" यावर कृष्ण नुसतेच हसले.
”राधेला, भगवान कृष्णाच्या बासरीचा इतका हेवा वाटत होता, की बासरीच्या आतमधे काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तीने ती बासरी तोडली. परंतु बासरी तोडल्यानंतर तिला कळलं, की बासरी तर आतून एकदम रिकामी आहे."
तसचं, ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी, आपल्याला आपल्या, अंतरातील प्रत्येक अवांछनीय गोष्टींना हटवून पूर्णपणे शून्यता विकसित करायला हवी. जर ईश्वराने, त्या बासरी प्रमाणेच दिव्य संगीत आपल्या हृदयामधून उमटवावे, असं आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला आपल्या हृदयातून अवांछित इच्छा, विचार, अशुद्धता आणि जटिलता हे सगळं काढून टाकावं लागेल. समजा, बासरी मध्ये बारीकसा कण किंवा काही अन्य काही गोष्ट राहीली, तर त्या बासरीमधून तुम्ही कोणतही मधुर संगीत निर्माण करू शकणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा