शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

809. नकार

 सदाशिवराव मुलाकडच्यांचा लग्नाला होकार आल्यामुळे खूप आनंदात असतात. संध्याकाळी मुलाच्या घरी लग्नाची बोलणी करायला जायचे असल्यामुळे ते आपल्या कपड्यांना इस्त्री करत असतात. तेवढ्यात त्यांचा फोन वाजतो.
 "हॅलो, सदाशिवराव बोलताय ना?"
 "हो, आपण कोण बोलताय?"
"मी अनुपची आई शुभदा बोलतेय. तुम्ही आणि अनघा आज येताय ना आमच्या घरी लग्नाची बोलणी करायला?"
"हो, अनघा कामावरून आली की निघतो आम्ही सव्वासहा -साडेसहापर्यंत."
"ठीक आहे. आता मुलांनी एकमेकांना ऑलरेडी पसंत केलंय म्हंटल्यावर तसं मुलांना तर विशेष काही बोलायचं नसेलच पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे."
"ठीक आहे, बोलू आपण संध्याकाळी भेटल्यावर."
"नाही, संध्याकाळी नको, मला आत्ताच तुमच्याशी बोलायचं आहे फोनवर."
"आत्ता...??"
"हो, का वेळ नाहीये का आत्ता तुम्हाला?"
"नाही तसं काही नाही, बोला ना."
"ओके, मग मला सांगा, लग्नात तुम्ही अनघा आणि अनुपला काय देणार आहात?"
"काय म्हणजे?"
"म्हणजे जरा स्पष्टच बोलते आता, तुम्ही अनघाला सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या पाटल्या, बांगड्या तर करणारच असाल ना? अनुपला पण निदान दोन तोळ्याची सोन्याची चेन करतालच तुम्ही. अनुपचं बऱ्याच दिवसांपासून ती मार्केटमध्ये नवीन आलेली दोन लाखांची बाईक घ्यायचं चाललंय, शक्य असेल तर ती बाईकपण देता आली तर बघा लग्नात. आणि हो, लग्नात आमच्याकडचे कमीतकमी हजार लोकं तरी येतीलच, त्याप्रमाणे कार्यालयाची सोय करा. आणि कार्यालय जरा चांगल्यातलंच बघा, आमच्याकडचे लोकं सगळे उच्चभ्रू आहेत, त्यांची चांगली सोय झाली पाहिजे."
"अहो एवढा खर्च करायची ऐपत नाहीये ओ माझी. मी एका खाजगी कंपनीत नौकरीला आहे त्यामुळे मला फार मोठा पगार नाहीये."
"ऐपत नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही? आता मुलीचं लग्न म्हंटल्यावर एवढा खर्च तर करावाच लागणार ना." 
 "अहो मुलीचं लग्न करायचंय, मुलीची किंमत करून विकायचं नाहीये तिला."
 "अहो काहीही झालं तरी मुलीकडची बाजू आहे तुमची. त्यामुळे मुलाकडच्यांच्या एवढ्या माफक अपेक्षा तर पूर्ण कराव्याच लागणार ना तुम्हाला?" 
 "माफक? या माफक अपेक्षा आहेत तुमच्या? अहो अनघाचं अनुपवर प्रेम आहे म्हणून हात दगडाखाली अडकले आहेत माझे, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुमच्या स्थळाला नकार दिला असता."
 "अहो द्या ना मग नकार. अजून काही वेळ गेलेली नाहीये आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलीशिवाय आम्हाला दुसरं स्थळच मिळणार नाही का?"
 "अहो पण म्हणून काय काहीही अवास्तव मागण्या करायच्या का?"
 "अवास्तव... अवास्तव मागण्या? हे तुम्ही म्हणताय सदाशिवराव?"
 "हो, मीच म्हणतोय. आणि काय चूक आहे त्यात?"
  "सदाशिवराव, पंचवीस वर्षांपूर्वी तुम्हीही अशाच मागण्या केल्या होत्या, तेव्हा तर त्या मागण्या अवास्तव नव्हत्या वाटल्या तुम्हाला, बरोबर ना? तेव्हा ते सगळं योग्यच वाटत होतं तुम्हाला."
 "एक मिनिट... कोण बोलताय तुम्ही? आणि तुम्ही कोण मला हे सर्व विचारणाऱ्या?"
 "मी कोण? अजूनही नाही ओळखलं मी कोण ते? नाव सांगायची गरज आहे मला?"
 "श्रद्धा देशमुख...??"
 "हो, बरोबर. लग्नाआधीची श्रद्धा देशमुख आणि लग्नानंतरची शुभदा सुभेदार म्हणजेच अनुपची आई. अजून माझं नाव लक्षात आहे म्हणजे मेमरी चांगली आहे तुमची सदाशिवराव."
 "आता इतक्या वर्षांनी माझ्याकडून झालेल्या चुकीचा बदला तुम्ही माझ्या मुलीचा संसार मोडून घेणार आहात का? मला माहितीये माझ्याकडून खूप मोठी चूक झाली त्यावेळेस आणि त्याची खूप मोठी शिक्षा मला दैवाने दिलीये शुभदाजी." (सदाशिवरावांना फोनवर बोलता बोलता रडू यायला लागले.)
 "शिक्षा तुम्ही नाही, मी भोगली आहे तुम्ही त्यावेळेस लग्नाला नकार देऊन लग्न मोडल्यानंतर. किती मानसिक त्रास झाला होता मला, माझ्या आईबाबांना, किती नाव ठेवले होते लोकांनी आम्हाला. 'हिच्यातच काहीतरी दोष असेल म्हणूनच मुलाकडच्यांनी नकार दिला असेल' असे म्हणायचे त्यावेळेस लोक मला. तुम्ही नकार दिल्यानंतर दोन वर्ष लागले माझं लग्न जमायला. मी तर आशाच सोडली होती लग्नाची पण नंतर अनुपच्या बाबांनी एक पैसाही न मागता लग्नाला होकार दिला आणि पुढे माझा सुखाने संसार झाला. पण खरंच आभार मानले पाहिजे तुमचे, कारण तुम्ही नकार दिल्यामुळे मला सुभेदारांसारखा देवमाणूस नवरा म्हणून मिळाला."
 "शुभदाजी, नंतर तुमचा संसार तर सुखाचा झाला पण माझ्या नशिबात संसार करण्याचं सुख नव्हतं. तुम्हाला नकार दिल्यानंतर सहा महिन्यांनी अनघाच्या आईशी, विनिताशी माझं लग्न झालं. विनिताच्या बाबांनी हुंडा पण भरपूर दिला. विनिताला दिवस गेल्यावर पुन्हा माझ्या आईने तिला माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला आणि दिवस गेले असल्यामुळे विनिताचे हात आता दगडाखाली अडकले होते त्यामुळे ती घटस्फोट मागण्याचा विचारही करू शकत नव्हती. तिने पुन्हा माहेरून पैसे आणले. काही दिवसांनी अनघाचा जन्म झाला. अनघाचा जन्म झाल्यावर विनिताला वाटलं आता सगळं सुरळीत होईल, पण नशिबाला ते सुख मान्य नव्हतं. एक दिवस आम्ही रात्री झोपलेलो असताना अचानक घराला आग लागली. मी अनघाला घेऊन कसाबसा घराबाहेर पडलो पण आई आणि विनिता त्या आगीतून नाही वाचू शकल्या. माझं राहतं घर गेलं, आई गेली, बायको गेली... खूप मोठी शिक्षा मिळाली मला माझ्या चुकीच्या कर्मांची. खरंतर अनघा त्यावेळेस वाचली म्हणून तिच्यासाठी जगण्याचा निर्णय मी घेतला नाहीतर त्याचवेळेस आत्महत्या करण्याचा विचार माझ्या मनात आला होता." 
"म्हणतात ना इथली पापं इथेच फेडावी लागतात ते अगदी खरंय सदाशिवराव."
"हो, पण आता मी केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही माझ्या मुलीला देऊ नका, तिचा संसार मोडू नका एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे शुभदाजी." 
"सदाशिवराव तुम्ही अजूनही माणसं ओळखण्यात कच्चेच आहात ओ. तुम्हाला वाटतेय तितकी वाईट नाहीये मी. तुम्ही केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून मी तुमच्या मुलीला माझ्या घरची सून करून घेण्यासाठी नकार देईल इतकी दुष्ट नाहीये मी. मला अनुपने जेव्हा त्याचं अनघावर प्रेम आहे सांगितलं आणि तिचा फोटो दाखवला तेव्हाच मी तिला पसंत केलं होतं. अनुपने जे तिचे ४ - ५ फोटो दाखवले त्यातला एक फोटो तुमच्यासोबतचा होता. आणि तुमचा फोटो पाहून मला पुन्हा माझा भूतकाळ आठवला आणि तेव्हाच मी ठरवलं की आता हुंडा मागायचं नाटक करून तुम्हाला दाखवून द्यायचं की मुलीच्या बापाला मुलाकडच्यांनी हुंडा मागितल्यावर किती त्रास होतो ते."
 "खरंच शुभदाजी, आज मला कळतंय की मुलीच्या आईवडीलांची मुलाकडच्यांनी हुंडा मागितल्यावर काय अवस्था होत असेल ते आणि आपण हुंडा दिला नाही तर आपल्या मुलीचा संसार मोडेल याचा त्यांच्या मनाला किती त्रास होत असेल ते. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे पण माझ्या मुलीला पदरात घ्या शुभदाजी. माझ्याकडून घडलेल्या चुकीची मी पुन्हा माफी मागतो पण माझ्या मुलीला तुमच्या घरची सून करून घ्या." असं म्हणून सदाशिवरावांना पुन्हा रडायला आले.
"सदाशिवराव रडू नका प्लीज, मी तुम्हाला आधीच आमचा होकार आहे लग्नाला असं सांगितलंय. आम्हाला तुमच्याकडून एक रुपयासुद्धा नको आहे, फक्त तुमची मुलगी आणि नारळ एवढंच लग्नात द्या तुम्ही आम्हाला, आत्ता जे आपल्यात बोलणं झालंय ते सगळं विसरून जा आणि संध्याकाळी लवकर या, आता कधी एकदा मी माझ्या सुनेचा चेहरा बघते असं झालंय मला."
"तुम्ही लग्नाला होकार देऊन माझी काळजी दूर केली शुभदाजी. संध्याकाळी लवकर येतो, आता मलापण माझ्या जावयाला भेटायची उत्सुकता लागलीये, तर भेटू मग संध्याकाळी." असं म्हणून दोघेही हसली आणि फोन ठेवला.

©संदीप.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...