रविवारी घरात टी व्ही पाहत असताना अचानक सौं नी विचारलं.
“बाहेर कुठं जायचं नाहीये ना”
“नाही,घरातच आहे, का गं’?
“मग माझ्याबरोबर चला, किरकोळ खरेदी करायचिये” सौं चा विनंती वजा आदेश मानून गुमान बाहेर पडलो.
“आधी भाजी नंतर किराणा सामान घ्यायचयं आणि फुलपुडा घ्यायची आठवण करा”
“येस मॅडम”
“चला.” डोळे वटारत सौ म्हणाल्या.
किराणा दुकानात गर्दी असल्यानं बाहेरच थांबलो. थोड्या वेळानं पैसे देण्यासाठी आत गेलो तेव्हा सौ. दुकानदाराशी बोलत होती आणि तो वजनात जास्त असलेली साखर थोडी थोडी कमी करण्यात गुंतलेला.
“शेटजी,थोडी जास्त आली तर काही बिघडणार नाही.”
“बरोबर हाये पण हिशेबात चोख पाहिजे. तुमच्याकडून मोजून पैशे घेणार तवा मालबी तेवडाच दिला पायजे ना.”
“नेहमीचं गिर्हाइक आहे. थोडं कमी जास्त झालेलं चालतं.”
शेटजी हसले पण हात थांबवला नाही. बरोब्बर वजन करूनच साखर दिली.
“पक्का धंदेवाला!!घरच्यांना सुद्धा फुकट चहा पाजणार नाही”
“जाऊ दे. त्याचं त्याच्यापाशी. आपल्याला काय करायचंय.”सौ.
“फुलपुडा घ्यायचाय”
“बरं झालं.आठवण केलीत”
चौकात गेलो तर दोन ठिकाणी थोड्या अंतरानं फुलं विकायला होती. एका ठिकाणी तिशीतलं जोडपं तर दुसरीकडे डोक्यावर पदर, काळा गॉगल लावलेल्या वयस्कर काकू. तरुण जोडप्याकडं जास्त फुलं, हार, गजरे होते. काकूंच्या समोर मात्र पाच प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये फुलं ठेवलेली. सौ दोन्ही दुकानांच्या मधोमध जाऊन उभी राहिली.
“फुलं घ्यायचीत ना”
“हो.”
“मग इथं का थांबलीस.”
“थोडं कंफ्यूजन आहे.”
“आता फुलं घ्यायची तर त्यात कसलं कंफ्यूजन?”
“फुलं कोणाकडून घ्यावीत?”
“कोणाकडूनही घे. त्यात काय?”
“दोन्हीकडं छान फुलं आहेत”सौ.
“त्या काकूंकडून घे”
“मनातलं बोललात. काही वेळेला मनातलं बरोबर ओळखता”
“काही वेळेला नाही, प्रत्येक वेळेलाच”
“बास. उगीच जास्त एक्साईट होऊ नका”
“जा फुलं घे” सौ काकूंकडे गेली.
“एक फुलपुडा द्या”
“कितीचा”
“वीसचा”पुडा बांधताना काकूंनी प्रत्येक पिशवीतून मूठभर फुलं घेतली. किमतीच्या मानानं फुलं जास्त होती.मी आणि सौनं एकमेकांकडे पाहिलं.
“काकू, वीस रुपयांचा फुलपुडा पाहिजेय”सौ.
“माहितीये”
“मग एवढी फुलं”
“घ्या हो. तेवढीच माज्याकडून देवाची सेवा” प्रसन्न हसत काकू म्हणाल्या.
“खूप जास्त देतायेत”
“असू द्या.” काकूंच्या प्रेमळ बोलण्यानं क्षणात माणुसकीचं नातं जोडलं गेलं.
“डोळ्याचं ऑपरेशन कधी झालं” सौनी आस्थेनं विचारलं.
“आठ दिस झाले”
“घरी आराम करायचा”
“असं कसं चाललं, पोटाची खळगी भरावी लागते ना. मी ही अशी म्हातारी, पोरं मोठी झाली. सुना आल्यात पण आज बी म्या कुणावर अवलंबून नाय. माज्या पैशानं फुलं आणून इकते. पैसे मिळवते म्हणून घरात अजूनही मान हाये.”
“या वयातही काम करता कौतुक वाटतं”
“तेत माजा स्वार्थ हायेच की”
“म्हणजे”
“इथं फुलं इकायला बसते त्यात जीव रमतो.येगयेगळी लोकं भेटतात. ईचारपुस करतात ते बरं वाटतं. घरी नुसतं बसून डोकं कामातून जातं. माज्याशी कुणालाबी बोलायला येळ नाई. काई ईचारल तर वसकन वरडतात. त्यापरिस इथं बसलेलं बरं”
“काकू,एक विचारू”
“काय ईचारणार ते माहितेय. जास्त फुलं का देता”
“बरोबर”
“ताई, आतापतूर लई पुडे दिले पण ह्ये इचरणारी तूच पयली.”
“इतर दुकानदार असं करत नाही. माल देताना हात आखडता घेतात. वर परवडत नाही असं ऐकवतात.”
“ते बी खरंय."
“कमी फुलं दिली तर पैसे जास्त मिळतील की”
“जास्त दिल्यानं डबल फायदा व्हतो. माज्याकडून फुलपुडा घेतलेलं गिर्हाइक पुना पुना येतं. जास्त फुलं मिळाल्यावर लोकाला जो आनंद व्हतो ते पावून लई बरं वाटतं.”
“पण यात तुमचं नुकसान होतं ना”
“हा आता पैशे कमी मिळतात पण माल संपतो. फुलं ताजी हायित तोपतूर मागणी एकदा का शिळी झाली की मग फेकूनच द्यायची. माणसाचं जगणं सुद्धा फुलासारखच उपयोग हाय तवर मान, नायतर....”
“म्हातारपणी पैसा उपयोगाला पडतो”सौ
“तो कितीबी कमवला तरी कमीच. पैसा हा पाणीपुरी सारखा असतो, कधीच मन भरतं नाई. अन गरजंपेक्षा जास्त मिळालं की जगण्याला फाटे फुटतातच”
“वा,कसलं भारी बोललात.”
दोन दुकानदारांचे टोकाचे अनुभव.परिस्थिती भिन्न. एक माल देताना हात आखडणारा पक्का व्यवहारी तर दुसरी सढळ हातानं फुलपुडा देणारी.दोघेही आपआपल्या जागी बरोबर!!पहिल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक तर दुसऱ्या ठिकाणी भावनेची.
“निघतो,आता भेट होत राहिलच” आम्ही फुलपुडा घेऊन निघाल्यावर गुलाबांचं टपोरं फुल देत काकू म्हणाल्या “ माणसानं घेताना आवर घालावा पर देताना हात कायम सैल सोडवा.” खूप मोठी गोष्ट काकूंनी अगदी सहज सांगितली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा