बीड जिल्ह्यातलं गेवराई गाव. या ठिकाणी एक व्यक्ती अनाथ लेकरांना सांभाळते आहे. ३ वर्षांपासून ते २२ वर्षे वय असलेली लेकरं या सहारा अनाथालयात आहेत. आज हा सहारा अनाथालय परिवार झाला आहे. या परिवारात आज जवळपास एकशे सहा मुलं मुली राहत आहेत.
कोण आहे ही व्यक्ती ? की जी या अनाथ मुलांना सांभाळते ? एखादा राजकीय नेता ? एखादा धनिक माणूस ? की एखादी समाजसेवी संस्था ? आपल्याला आश्चर्य वाटेल या अनाथांचा जो नाथ झाला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे संतोष गर्जे. आडनाव गर्जे असलं तरी अत्यंत शांततेने, कोणताही गाजावाजा न करता त्यांचं काम सुरु आहे. त्यांची कहाणी अत्यंत हृदयस्पर्शी आहे. आईवडील मराठवाड्यातील आष्टी तालुक्यातील ऊसतोड कामगार. दारिद्र्य पाचवीला पुजलेला. दोन वेळेचं जेवण नीट मिळायचं नाही. घरामध्ये सहा भावंडं. आईवडील सहा सहा महिने कामानिमित्त घराबाहेर. अशी परिस्थिती. मोठ्या बहिणींसोबत संतोष लोकांकडे मोलमजुरी करायचा. त्यातच कसं बसं शिक्षण चालू होत. परिस्थितीमुळे जास्त शिक्षण घेता आलं नाही.
एकदा लग्न झालेल्या मोठ्या बहिणीकडून ती खूप आजारी असल्याचा निरोप आला. वडील धावत गेले. पण ती गेलेली होती. नंतर तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले.आणि तिच्यामागे तिची ३/४ वर्षांची छोटी मुलगी होती. पण या मुलीकडे लक्ष द्यायला कोणी तयार नव्हते. संतोषचे वडील त्या चिमुरडीला आपल्या घरी घेऊन आले. संतोषचे वडील या प्रसंगाने खचले. ते स्वतःलाच दोष देऊ लागले. आणि एक दिवशी कोणाला न सांगता घरातून निघून गेले. आता त्यांच्या आईचेही घरात लक्ष लागेना. ती देव देव करू लागली. पण घरात या सगळ्या भावंडांचे प्रचंड हाल झाले. त्यांना नातेवाईक उभं करीत नव्हते. कोणी उधार द्यायला तयार नव्हते. संतोषच्या मनामध्ये विचार आला की आपल्या बहिणीची ही जी मुलगी पोरकी झाली, यात तिच्या बिचारीचा काय दोष ? अशी किती अनाथ लेकरं असतील ? त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. पण काय करणार ? जिथे आपलाच काही ठिकाणा नाही, तिथे इतरांचा विचार करणार तरी कसा ? आणि कामाच्या शोधार्थ तो औरंगाबादला आला. एका ठिकाणी घरगडी म्हणून काम करू लागला. त्या मालकाने त्याच्याकडून संडास, बाथरूम स्वच्छ करण्यापर्यंत सगळी कामे करून घेतली. असे सहा सात महिने गेले. एके दिवशी संतोषच्या मनात विचार आला की हे असं किती दिवस चालणार ? आपण असंच काम करत मरणार का ? हे काही खरं नाही. आपण जे स्वप्न पाहिलं त्याचं काय ? आणि त्या विचारात त्यानं आपली बॅग उचलली आणि तो गेवराईला आला. तिथे आल्यानंतर एका माणसाशी त्याची भेट झाली. त्या माणसाने त्याला आपली काही जमीन त्याच्या स्वप्नातल्या या प्रकल्पासाठी देऊ केली. ती गावापासून तीनचार किमी लांब. कसलीही सोय नाही. आता संतोषने अनाथ मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूचे तांडे, वस्त्या यात तो फिरला. सुरुवातीला लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण कशीबशी सात मुलं त्याला मिळाली. आणि त्यांनी तिथे राहायला सुरुवात केली.
एका व्यक्तीने पत्रे दिले आणि त्यांच्या डोक्यावर एक शेड आली . आता त्या मुलांना खाऊपिऊ कसे घालणार हा मोठा प्रश्न होता. अनेक लोकांकडे त्याने मदतीसाठी याचना केली. नातेवाईकांनी त्यालाच नावं ठेवून हात झटकले. कोणी उधार द्यायला तयार नव्हते. शेवटी व्याजाने पैसे आणून संतोषने त्या मुलांना चार घास भरवण्याचा प्रयत्न केला. अशातच एके दिवशी पावसाळ्यात एका मुलाला काहीतरी चावले. संतोष त्याला ३/४ किमी पायी डॉ कडे घेऊन गेला. त्यावेळी त्याच्या खिशात फक्त ६७ रु होते. डॉ नी मुलाला ऍडमिट करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी २२०० रु बील सांगितले. आता पुन्हा प्रश्न. पुन्हा व्याजाने पैसे आणले. आणि डॉ ना दिले. या घटनेमुळे शेतातील ती जागा सोडून ते गावात भाड्याच्या घरात आले. त्या ठिकाणी सुद्धा अनंत प्रश्न आ वासून उभे राहिले. घरमालकाचे त्याचे वाद झाले. घर बदलावे लागले. या सगळ्या प्रसंगात कधी कधी संतोषच्या मनात हे सगळे आपण कशासाठी करतो आहोत ? जमणार आहे का हे आपल्याला ? आपण आपलाच शेवट का करून घेऊ नये असे अनेक विचार आले. पण त्या अनाथ लेकरांकडे पाहून त्याने ते सगळे विचार बाजूला सारले. तो त्या मुलांना कसेबसे दोन वेळेचं जेवण पुरवत होता. शाळेत पाठवत होता. पण मनातून आपण या मुलांसाठी फार काही करू शकत नाही याची खंत त्याला होती. मुलांना सांभाळणे, त्यांचा स्वयंपाक करणे, त्यांना जेवू घालणे आणि पुन्हा त्यांची सगळी व्यवस्था पाहणे या सगळ्यात त्याची एकट्याची खूपच दमछाक होत होती. जोडीला कोणीतरी हवं होतं .
पण या अनाथांच्या नाथाशी लग्न करायला मुली तयार नव्हत्या. त्याच्याशी लग्न करणं म्हणजे जाणूनबुजून सगळी हौसमौजेला फाटा देणं, कामाला जुंपून घेणं हे करायला कोणाची तयारी नव्हती. पण हे आव्हान स्वीकारलं प्रीतीने . ती त्या वेळी वकिलीचे शिक्षण घेत होती. संतोषची आणि तिची एका कार्यक्रमात ओळख झाली. आणि पुढे त्यांनी एकमेकांचे जीवनसाथी होण्याचा निर्णय घेतला. त्यांचं लग्नंही एका देवळाबाहेर लागलं. वऱ्हाडी म्हणून कोणी नाही. दोघांनी एकमेकांना वरले . आणि संतोषच्या जीवनात आता प्रीती आली. प्रीती खूपच शांत आणि समजूतदार. संतोष चिडला तरी ती शांत. आता तिच्या येण्यामुळे मुलांच्या डोक्यावर मायेचा आणि प्रीतीचा हात फिरू लागले. एकवेळ खायला कमी असलं तरी चालेल, पण मायेचा हात खूप काही देऊन जातो. हळूहळू मुलं वाढू लागली. संतोष आणि प्रीतीचा हा अनोखा संसार सुरु झाला. लग्न करताना आपण पत्रिका पाहतो, कुंडली पाहतो, किती गुण जमतात ते पाहतो. इथे कोणीच कोणाची पत्रिका न पाहता, जातपात न पाहता सगळे गुण जुळले होते. दोघे एकमेकांच्या कार्यात खऱ्या अर्थाने साथ देणारे होते. आज या सहारा अनाथालयात एकशे सहा मुलं आहेत. एक दिवस प्रीती आणि संतोष यांच्या जीवनात एक हृदयस्पर्शी क्षण आला. सगळी मुलं एकत्र जमली. ती संतोष आणि प्रीतीला म्हणाली. तुम्ही आमचे आईबाबा. उद्यापासून आम्ही तुम्हाला आईबाबा म्हणणार. दोघांचेही डोळे पाणावले. तोंडातून शब्द निघत नव्हता. आता ती अनाथ मुलं खऱ्या अर्थानं सनाथ झाली होती. संतोष आणि प्रीतीची ही फुलबाग फुलली होती. हे नातं रक्तापलीकडचं होतं . आज यातील काही मुले मुंबईत इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेत आहेत. काही प्राथमिक तर काही माध्यमिक शाळेत आहेत. ४७ मुली आणि ५९ मुलं आहेत. संतोष आणि प्रितीने यातील एका मुलीचं लग्न सुद्धा नुकतंच करून दिलं आहे. या ठिकाणी असणारी ही मुलं आत्महत्याग्रस्त शेतकरी, अनाथ झालेली, ज्यांचे आईवडील कैदी म्हणून शिक्षा भोगताहेत अशांची आणि लाल बत्ती भागातील महिलांची आहेत.
असे हे संतोष आणि प्रीतीचं अनोखं कार्य गेवराईला सुरु आहे. संतोषला आज झी गौरव पुरस्कारापासून ते अविनाशी पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची समाजाने घेतलेली दखल आहे. पण संतोष आणि प्रीती यांना आज गरज आहे ती समाजाचे मदतीचे हात पुढे येण्याची. www . aaifoundation.org हे त्यांचे संकेतस्थळ आहे. ९०११०८३७११, ९७६३०३१०२० हे त्यांचे फोन नं आहेत.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा