सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

768. वृद्धत्वी निज शैशवास जपणे...

 ( माझ्या आकाशझुला या पुस्तकातील लेख )
     माझ्या एका मित्राने एक व्हिडिओ मला पाठवला होता. आपले वृद्धत्व असे असावे असे त्याचे शीर्षक होते. त्यात एक वृद्ध गृहस्थ आपल्या काही मित्रांसोबत एका गाण्याच्या तालावर नाचताना दाखवले होते. एकंदरीतच सगळे आनंदी वातावरण होते. आणि खरोखरीच कोणालाही क्षणभर असे वाटून जावे की वा.. वृद्धापकाळ असावा तर असा आनंदी . मलाही त्यावेळी तसे वाटले. नंतर मी त्यावर विचार करू लागलो. त्यापूर्वी सुद्धा वृद्धापकाळातील जीवन कसे असावे यावर भरपूर मेसेज सोशल मीडिया मध्ये येऊन गेले होते. त्यात म्हटले होते की वृद्धत्व म्हणजे सेकंड इनिंग. ती जोरदारच झाली पाहिजे. आपले राहिलेले छंद आपण जोपासले पाहिजे. नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. नवीन मित्रमैत्रिणी जमवले पाहिजेत आणि अजून बरेच काहीबाही.
      अलीकडे अशा गोष्टींवर अनाहूत सल्ला देणाऱ्यांचे पेव फुटले आहे. अरे, सर्वसामान्य माणूस गोंधळून जातो रे अशाने. काय काय करायचे त्याने? आजोबा जर गाण्यांच्या तालावर नाचायला लागले तर घरातल्या सुनबाईचा आणि मुलाचा गैरसमज नाही का होणार?  ते म्हणतील या वयात हे नको ती थेरं  करताहेत. म्हातारचळ लागलाय यांना .आता समजा दुसऱ्या सल्ल्यानुसार नवीन मित्रमैत्रिणी जमवल्या तर ते तरी चालणार आहे का सून मुलांना? असो. ज्याला जे जमेल ते त्याने करावे. आणि जसे जमेल तसे करावे. दुसऱ्याचे अनुकरण अजिबात नको करायला कारण प्रत्येक घरातले वातावरण वेगळे असू शकते. सगळे तुम्हाला समजून घेतील असे नाही. पण तुम्ही मात्र सगळ्यांना जमेल तसे समजून घ्या. त्यांच्यासाठी असे नाही तर ते तुमच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. 
     आता हे सगळे वाचल्यावर कोणी तरी असे म्हणण्याची शक्यता आहे की, काय गंभीर माणूस आहे हा.  काही हौसमौज असते की नाही. सतत काय गंभीरच राहायचं ? कोण म्हणतंय सतत गंभीर राहा असं ? अहो, पण वयाला शोभेल असं राहा म्हणजे झालं! वृद्ध झालात म्हणून हसायला बंदी नाही. अगदी नाचायलाही बंदी नाही पण प्रसंग पाहून. एखादा विनोद कोणी केला, तर त्याला मनमोकळे हसून दाद द्या. खुशाल सातमजली हसा नाही तर गडगडाटी हास्य करा. तुम्हीही नर्म पण खुसखुशीत विनोद करा आणि वातावरण आनंदी ठेवा. एखादी पार्टी आहे, आनंदाचा समारंभ आहे, तर नाचगाण्यात व्हा सामील. नातू किंवा नात मागे लागलीय आजोबा, नाचा ना माझ्यासोबत. तेव्हा खुशाल लहान होऊन जा. आणि त्यांच्यासोबत आनंद घ्या. 
     तुम्हाला एक रहस्य सांगू ? जी माणसे लहान मुलांसोबत खेळतात, त्यांना समजून घेतात, ती सगळ्यात जास्त आनंदी असतात. लहान मुलांचे बोबडे बोल ऐका. संगीत भरलेले असते त्यात. लहान मुलाला सांभाळणारी आई का आनंदी असते? ते केवळ तिचे मूल आहे म्हणून? तुम्हाला असे वाटत असेल तर चुकताहात  तुम्ही. अहो,  ती आनंदी  असते कारण ती त्या सानुल्यात सर्वस्व विसरून जाते म्हणून. ती आई कदाचित डॉक्टर असेल, प्राध्यापक  असेल, इंजिनिअर असेल नाहीतर शास्त्रज्ञ असेल, ती कितीही बुद्धिमान असू द्या, ती जेव्हा आपल्या छकुल्यासोबत खेळते तेव्हा ती ते सगळे विसरून जाते. मूल होऊन त्याच्यात खेळते. त्यांच्यासमवेत बोबडे बोल बोलते. चिऊकाऊचा  खेळ खेळते. एका वेगळ्या आनंदविश्वात रममाण होते. त्यावेळी तिला होणारा जो आनंद असतो त्या आनंदाची तुलना केवळ स्वर्गीय आनंदाशीच होऊ शकेल. जेव्हा एखादी गोष्ट करण्यात तुम्ही स्वतःला विसरून जाता, तेव्हा त्यातून मिळणारा आनंद अवर्णनिय असतो. त्यासाठी मी विसरावा लागतो. अध्यात्मात सुद्धा जेव्हा आपण मी बाजूला ठेवतो, अहंकार बाजूला ठेवतो, तेव्हाच त्यात प्रगती होते.समाधी, समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे स्वतःला विसरून जाणे. आपण सारखे मी मी करत असतो. हे मी केले, ते मी केले. मी असतो तर असे होऊ दिले नसतो किंवा केवळ मी त्या ठिकाणी होतो म्हणून असे झाले इ इ . कधीतरी हा 'मी 'विसरून बघा. दुसऱ्याला श्रेय द्यायला शिका. श्रेय ही द्यायची गोष्ट असते. ते दुसऱ्याने स्वतःहून तुम्हाला देऊ द्या. 
     माझ्या मुलीचा मुलगा, माझा नातू पाच वर्षांचा आहे. मी त्याच्याकडे गेलो की त्याला इतका आनंद होतो की तो घरभर पळतो आणि लपतो. काय करू आणि काय नको असे त्याला होऊन जाते. आणि मग मी त्याला शोधून काढतो. आणि त्याला पकडून त्याला दोनतीन गालगुच्चे घेतो. तो आनंद पैसे देऊनही कुठे मिळणार नाही. मग काय आजोबा त्याच्यासाठी हक्काचे खेळगडी असतात. तो कॅरम काढेल किंवा अजून काही खेळ काढेल आणि आजोबांना त्याच्यासोबत खेळण्याशिवाय पर्याय नसतो. क्रिकेट खेळताना बॅट त्याच्याकडेच असते. तो औट होत नाही. झाला तरी एखादे दोन बॉल आपल्याकडे टाकेल की आपण आउट व्हायचे आणि पुन्हा तो फलंदाज. मला कधी कधी तो गंमतीने टकले आजोबा म्हणतो, तर कधी व्हाईट केसवाले आजोबा म्हणतो. पण तो इतका निरागस आहे की त्याचा राग येत नाही. रोज माझ्याशी तो फोनवर बोलतो. बरेचदा व्हिडिओ कॉल करायला लावतो. त्याला जर म्हटले की स्वराज, मी येतो आहे तुला भेटायला, तर म्हणतो आता या. लगेच बसा गाडीत. गाडी, रिझर्वेशन या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी. त्याच्या लेखी या गोष्टींना महत्व नाही. आणि त्याच्याकडून निघताना म्हणतो, आता इथेच थांबायचं, जायचं नाही. खरंच लहान मुलांची निरागसता, त्यांचं निष्पाप मन या गोष्टींची तुलना फक्त परमेश्वराशीच होऊ शकते. म्हणूनच कदाचित ती परमेश्वराच्या सर्वात जवळ असतात. साने गुरुजी म्हणायचे, करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे. 
     कदाचित तुम्ही म्हणाल की मी विषयांतर करतो आहे. पण मी त्याच विषयाबद्दल बोलतो आहे. अहो, मला सांगा, मुलात मूल होऊन खेळणे म्हणजे 'वृद्धत्वी निज शैशवास जपणे ' नाही का ? त्याने तुम्ही तरुण राहाल, फ्रेश राहाल. तुम्ही काळे असा वा गोरे, तुम्ही थकलेले असा वा वाकलेले, डोक्यावरचे केस असोत वा नसोत, त्वचा तरुण असो वा त्वचेवर सुरकुत्या असोत, मनाने  तुम्ही तरुण राहाल. येथे मला पिकलेल्या हापूस आंब्याचे उदाहरण आठवते. पिकलेला हापूस कसा गोड असतो ! त्या पिकलेल्या हापूस आंब्याला चार आठ दिवस तसेच राहू दिले तर त्याच्यावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते. पण इतर आंब्यांसारखा तो उतरून जात नाही. आपला गोडवा कायम ठेवून असतो. आपल्याला जमेल का असा गोडवा टिकवून ठेवायला ? होता येईल का असा हापूस आम्हाला ? स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. अजून एक उदाहरण मला आठवते ते पिकल्या पानाचे. पिकल्यावर झाडावरून कसे अलगद गळून पडते ? पानाचा रंग फक्त पिवळा झालेला असतो. पण त्या पिवळेपणातही ते पान आपले सौंदर्य टिकवून असते. टिकवता येईल का असे सौंदर्य आपल्याला? हे सौंदर्य भलेही बाह्य नसेल, शरीर वृद्धत्वाच्या खुणा दाखवील, पण मन तरुण असेल. चेहऱ्यावर एक आगळेच तेज असेल. तुमच्या आंतरिक सौंदर्याची ती खूण असेल. 
     या शिवाय तुम्हाला तरुण आणि आनंदी ठेवण्यात पुस्तके मदत करतील. त्यांच्यासारखा कोणी मित्र या वयात नसेल. कारण तुम्हाला जेव्हा कोणी वेळ देणारे नसेल, तेव्हा पुस्तके तुमची मित्र होतील, तुमच्याशी बोलतील, तुम्हाला चार गोष्टी सांगतील आणि त्याबद्दल काही मागणार नाहीत. शिवाय परमेश्वर निसर्गाच्या रूपात प्रकट झाला आहे. अशी तुमची भावना असेल तर निसर्ग तुम्हाला तरुण ठेवील. मग तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जा, त्याचे निरीक्षण करा. किंवा शांततेने त्याला समजून घ्या. तो बोलेल तुमच्याशी. आपली रहस्ये तो तुमच्याजवळ उघड करील. संगीत ऐका . संगीत तुम्हाला ताजेतवाने ठेवील. गाणी ऐका , गुणगुणा, वा एखादे वाद्य वाजवा. जर शक्य असेल तर आपला वेळ इतरांसाठी द्या. एखाद्या आजारी माणसाजवळ बसा. त्याला एखाद्या पुस्तकातला एखादा परिच्छेद वाचून दाखवा. त्याचे मन आनंदी होईल. आपण जे देतो ते आपल्याकडे परत  येते, शतपटीने. आनंद वाटला तर तो शतपटीने आपल्याकडे परत येईल. दुसऱ्यांना फुले वाटणारांच्या हाताला सुगंध येणारच. देऊन तर पाहा.

विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...