आरुणी तिच्या बागेत खेळणार्या मुलीकडे एकटक पाहत होती. तिच्या मुलीकडे पाहून तिला तिच्या बालपणीची आठवण होत होती. आरुणीचे बालपण अगदी आनंदात, मौजमजेत गेले होते. पण पुढे अशी काही भयावह,आकस्मिक घटना घडली की तिचे आयुष्य पुरते बदलून गेले.
ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती.आठवीत होती ती.अचानक काका तिला घ्यायला आला शाळेत. शाळेतून लवकर निघून का जावे लागते आहे. ते आरुणीला काही कळत नव्हते. घरी पोहोचली तेव्हा लोकांची गर्दी,रडारड हे सगळे पाहून ती संभ्रमित झाली. घरात प्रवेश करताच आई-वडिल पांढर्या वस्त्रांमध्ये निपचित पडलेले पाहून तिला काहीच कळेना. काका-काकू तिला गोंजारत होते. काहीतरी समजावत होते. आजीजवळ घाबरलेल्या सशासारखी आरुणी बसुन होती. आरुणीला आई-वडिलांचा आकस्मिक मृृृत्यु झालाय हे कटू सत्य आत्तापर्यंत कळाले. पण त्या दुःखाची तिव्रताच एवढी होती की तिला रडूच येईना. एखाद्या पुतळ्याप्रमाणे ती झाली होती. मध्येच आई-वडिलांशी काहीतरी बोलत होती. त्यांना हलवत होती. थोड्यावेळाने सर्व अंतिम विधी उरकण्यासाठी स्मशानभूमीमध्ये जेव्हा आरुणीच्या आई-बाबांना नेण्यात येत होते, तेव्हा आरुणीने जोरदार हंबरडा फोडला. तिला सावरणे मोठ्या माणसांनादेखील अवघड जात होते. आरुणीची समजूत कशी काढावी हे तिच्या आजीलाही कळत नव्हते. आजीनेही तिचा धाकटा मुलगा गमावला होता. एका कार अपघातात आरुणीचे आई-बाबा जागच्या जागी गेले होते. पोलिस केस असल्यामुळे पोलिस सर्वांची विचारपुस,चौकशी करत होते. त्यांना हा अपघात नसुन,घातपात असावा असे वाटत होते. आरुणी पुरती भांबावून गेली होती.ती एकुलती एक लाडकी लेक होती, तिच्या आई-बाबांची. त्यादिवशीही शाळेत जाण्यापुर्वी ती आई-बाबांना भेटली होती. आई-बाबा काही कामानिमित्त परगावी जाणार होते.रात्री उशीरापर्यंत परत घरी येणार होते. तिला"नीट आजीपाशी रहा, आम्ही येतोच"असे सांगून ते निघाले होते. ते परगावाहून परतून येत असताना गाडीचा जबरदस्त मोठा अपघात झाला. एका मोठ्या कंटेनरची मागून जोरात धडक बसली. गाडी पुढे जोरात धडकून लांब फेकली गेली. पोलिसांनी गाडीतले सर्व सामान आरुणीच्या आजीकडे सुपुर्त केले. बरेच दिवस तपास सुरु होता.शेवटी तो घडवून आणलेला अपघात होता हे कळून चुकले. आरुणीचे दोन काका होते. मोठा काका व मधला काका आरुणीचे बाबा धाकटे होते. भरपुर श्रीमंत कुटुंब होते. आरुणीच्या आजोबांच्या निधनानंतर तिची आजी आरुणीच्या घरीच त्याच्यासोबत राहत होती. मोठ्या आणि मधल्या काकाने अगदी तुरळक संबंध ठेवले होते त्यांच्या आईबरोबर. त्यांची मालमत्ता, जमीनजुमला बरेच होते. आरुणीच्या बाबांच्या नावावर आजीने अलिकडेच मुळ राहते घर आणि काही जमिनी असे केले होते. ते आरुणीच्या काकांना मान्य नव्हते.त्यांच्या मनात सलत असावे बहुतेक. म्हणून त्यांनी हा घातपात घडवून आणला होता. आरुणीचे आई-बाबा यापासुन अगदी बेसावध होते. अतिशय सरळमार्गी,प्रेमळ होते दोघेही. त्यामुळे त्यांच्या जीवावर आपले भाऊच उठतील याची पुसटशीदेखील कल्पना त्यांना नव्हती.
जेव्हा आजीला हे सर्व समजले, पोलिसांनी सर्व पुरावे त्यांना दाखवले. त्या कंटेनरच्या चालकाला ताब्यात घेतल्यावर त्याची घेतलेली जुबानी ऐकवली, तेव्हा आजीला खुप मोठा धक्का बसला. तिच्याच एका मुलाला,सुनेला तिच्याच दोन मुलांनी मारले होते. हे सगळे केवळ मालमत्तेसाठी घडवून आणले होते. क्रुरपणाची सीमाच पार केली होती मुलांनी. आजीने सरळ पोलिसांना सांगितले." कडक कारवाई करा त्यांच्याविरोधात. माझ्या मुलाला-सुनेला या दुष्ट माणसांनी तोडले माझ्यापासुन कायमचे." आरुणीला यातले काहीच आजीने आतातरी सांगितले नव्हते. कारण तिच्या बालमनावर याचा ताण खुप आला असता. पण ती जाणती झाल्यावर तिला आजी सर्वकाही घडलेले सांगणार होती. आता बराच काळ लोटला होता. आजी आणि आरुणी राहते घर बंद करुन शहर सोडून दुसर्या गावी राहू लागले. पुन्हा नव्याने जीवन जगणे सुरु झाले. आरुणी आता मोठी होत होती. तिच्या मनात बरेच प्रश्न अनुत्तरीत होतेच.पण आजीने तिला सांगितले होते, "योग्य वेळ आली की सर्वकाही सांगेन तुला."त्यामुळे आरुणी शांत शांत राहायची. तरीदेखील ती आता हळूहळू सावरत होती.आई-बाबांचा फोटो जवळ घेवून झोपायची. रडू कोसळायचे खुपदा. पण आजीकडे बघून शांत रहायचा प्रयत्न करायची. खुपच समजूतदार झाली होती ती. अभ्यासाबरोबरच तिचे छंदही ती जोपासत होती. त्यात मन रमवत होती. आजी आता थकत चालली होती. पण नातीसाठी ठामपणे उभी राहत होती. आता काॅलेज संपत आले होते आरुणीचे.आरुणी अगदी गोड आणि समजूतदार मुलगी होती. तिच्या मैत्रिणीही खुप होत्या. आता तिला सर्व सांगावे असे आजीने ठरवले. एक दिवस तिला जवळ घेतले आजीने आणि सर्वकाही तिला हळूहळू सांगितले. आता तिचे दोन्ही काका तुरुंगवास भोगत आहेत तसेच आता त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबाशी कोणाशीही आपण संपर्क ठेवला नाही हेही सांगितले तिला. तिला खुप खुप वाईट वाटले. खुप रडली आरुणी आजीच्या कुशीत शिरुन. जे काका लहानपणी तिचे खुप लाड करत. ते असे पराकोटीचे वाईट कसे काय वागले? केवळ मालमत्तेसाठी? एक ना अनेक प्रश्नांनी तिच्या मनात थैमान घातले. आजी तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवत होती. आरुणी आजीला सारखे विचारत होती,"आई-बाबांनी काय बिघवडले होते काकांचे? त्यांना मालमत्ता हवी होती तर त्यांनी मागायची होती ना,बाबांजवळ? आई-बाबांनी हसत हसत दिली असती सर्व मालमत्ता. माझ्यापासुन माझ्या आई-बाबांना तोडण्याचा हक्क त्यांना कोणी दिला?"आरुणी मन मोकळं करत होती आजीजवळ. तिच्या आजीलाही हे सर्व तिला सांगताना खुप त्रास होत होता.पण आरुणी एवढे वर्ष जे प्रश्न विचारत होती. त्याची सर्व उत्तरे तिला आज मिळाली होती. आजीला तिने व आजीने तिला आत्तापर्यंत अगदी काळजीने सांभाळले होते,व यापुढेही त्यांचे प्रेमाचे नाते तसेच राहणार होते. आजीच आरुणीसाठी सर्वकाही होती. तिची आईही तिच होती आणि वडीलही.
अनेक वर्ष उलटली होती आरुणीच्या आई-वडिलांना जाऊन. काळ भराभर जात होता. आरुणीचे शिक्षण पुर्ण होवून ती आता एका साॅफ्टवेयर कंपनीत नोकरी करु लागली होती. तिच्या लग्न करण्याबाबत आजी अधेमधे तिला विचारत होती. पण आरुणी आधी तिच्या पायांवर उभी राहणार होती. मगच लग्नाचा विचार करणार होती. आरुणीच्या आॅफिसमध्ये अनेक तरुण-तरुणी तिचे सहकारी होते. त्यातील एकाला म्हणजेच अंबरला पाहताक्षणी ती आवडली होती. त्याने सुरुवातीला तिला तसे काही जाणवू दिले नाही. त्यांच्यात खुप निखळ मैत्री झाली थोड्याच दिवसांत. आरुणीलाही त्याचे खोडकर मनमोकळे बोलणे आवडू लागले होते. अंबर-आरुणी आॅफिसनंतर थोडा वेळ एकमेकांसाठी दररोज राखून ठेवत असत. आॅफिसवरुन बसथांब्यापर्यंत हळूहळू चालत जात असत. हळूहळू मनातले सारे ते दोघेही एकमेकांना सांगू लागले. सुख-दुःखाच्या आठवणींत हरवून जाऊ लागले. अंबर म्हणजे आता तिच्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती झाली होती. अर्थात बरेच निरखून,पारखून तिने त्याच्याशी दाट मैत्री केली होती.
आरुणी अगदी खुष असायची हल्ली.आॅफिसमध्ये जायला वेळेच्या आधीच तयार व्हायची. आजीला तिच्या अनुभवी नजरेतून हा आरुणीतला बदल कधीच जाणवला होता. तिच्या लक्षात आलं होतं,की ही पठ्ठी नक्कीच कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे पण ती स्वतःच जेव्हा हे सांगेल तेव्हाच आपल्याला कळले असे तिला दाखवायचे ,हे आजीने ठरवले होते. ती अधेमधे आरुणीची थट्टामस्करी करायचीही यावरुन. ईकडे अंबर-आरुणी एकमेकांकडे प्रेमाची कबूली काहीकेल्या देत नव्हते. त्यांना थोडी भिती वाटत होती की एकमेकांचं याबाबतीतलं उत्तर नाही असलं तर मैत्रीचं नातंही संपून जाईल. आता एव्हाना आॅफिसमधल्या त्यांच्या सहकार्यांना हे कळून चुकले होते. पण हे काही प्रेमाची कबुली देत नव्हते.तेव्हा आॅफिसमधल्या मित्रमैत्रिणींनीच पावसाळी सहलीचं आयोजन केलं आणि त्या दोघांना एकांत कसा मिळेल याची काळजी घेतली. संध्याकाळ दाटून आली होती. समुद्रकिनारी हवाही गार होती. अशातच एका क्षणी मुद्दामून एक आरुणीची मैत्रीण अंबरजवळ आली आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली,"मला तू खुप खुप आवडतोस.माझ्याशी लग्न करशील,अंबर?" हे ऐकताच आरुणी संतापाने लालबूंद झाली. अंबरजवळून उठली आणि जोरजोरात चालू लागली. अंबरला सगळे असे अनपेक्षित झाल्यामुळे तो गोंधळून गेला. त्या दुसर्या सहकारी मैत्रिणीचा हात झटकून तो धावतधावत आरुणीपाशी गेला आणि तिचा हात हातात घेवून,गुडघे जमिनीवर टेकवून आरुणीला म्हणाला,"आरु,माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे.या रम्य सायंकाळी,तु तुझा हा हात माझ्या हाती कायमसाठी देशील का? माझं पुढचं आयुष्य मला तुझ्यासमवेत व्यतीत करायचं आहे. तु माझ्याशी लग्न करशील का?" आरुणीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले.तिचे गाल गुलाबी गुलाबासारखे खुलून गेले. ती हासत हासत मानेनेच त्याला हो म्हणाली.आणि मागून जोरजोरात टाळ्या वाजवत समुद्रावर थोड्या अंतरावर असलेली मंडळी त्यांच्यासमोर आली. त्यांचा प्लान यशस्वी झाला होता.ती मघाशी अंबरला लग्नाचे विचारणारी सहकारी पुढे आली आणि त्यांचे अभिनंदन करीत आरुणीला म्हणाली,"आरु,अंबर तुझा होता,आणि यापुढेही राहील.मी केवळ अंबरने तुला प्रेमाची कबुली द्यावी यासाठी हे केले." सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि एकदिवसीय पावसाळी सहल छान मौजमजा करीत पार पडली.आता मात्र सहलीहून परत आलेली आरुणी काही वेगळीच वाटत होती आजीला.एका नव्या भावविश्वात ती रमली होती. मागचे सगळे दुःख आता अंबरने प्रेमाने धुसर केले होते. आजीलाही आता तिला आनंदी पाहून छान वाटत होते.मन भरुन आले होते आजीचे. लेका-सुनेच्या तसबिरीकडे समाधानाने बघत होती आजी.
आरुणी सकाळी नेहमीप्रमाणे उठली. सारे आटोपुन ती आजी देवघरात होती तिच्याजवळ जावून बसली. आजीची देवपुजा कधी पार पडते याची वाट पाहू लागली. तिचे हावभाव आजीला कळाले. आजीने मध्येच तिला विचारले,"काही बोलायचयं का,आरु?"आरुणी अडखळत हासत म्हणाली,"होऊदे तुझं.मग बोलू.तसं काही फार नाही विशेष." आजी गालातल्या गालात हसली.तिला माहित होते की आरुणी एक दिवस नक्कीच आपल्याला येवून सर्वकाही सांगेल.तिने आरुणीवर केलेल्या संस्कारांवर तिचा पुर्ण विश्वास होता म्हणून तर आजी निर्धास्त होती. बाकी नाती तर केव्हाच तुटून गेली होती.हेच एक हक्काचे,प्रेमाचे नाते राहिले होते. आजीची देवपुजा झाली.आजी हळूच उठून स्वयंपाकघरातील आरुणीचा नाश्ता आणि आॅफिसला न्यायचा डबा आणण्यासाठी जावू लागली. आरुणीने आजीला थांबवले..म्हणाली.."आधी आपण बोलूया का?"
आजी आणि आरुणी बाहेरच्या खोलीत आले. आरुणीने आधी आजीचा हात हातात घेतला आणि तिच्याशी बोलू लागली,"आजी (मोठा आवंढा गिळून मध्येच क्षणभरासाठी थांबली) .मला तुला काही सांगायचं आहे. कसं सांगू काही कळत नाहीये."
आजी तिचा हातातला हात थोपटून तिच्याशी बोलली,"आरुणी एखाद्या राजकुमाराच्या प्रेमात तर पडली नाहीस ना?" आरुणी लाजेने चूर झाली होती.तिला एकदम आश्चर्य वाटले."आजी,तुला कसं कळतं गं..सगळचं? मला खरतर हे कधीच तुला सांगायचं होतं पण थोडं दडपण आलं होतं की तुला हे पटेल का?"आरुणी सांगू लागली. आजी हळूवार हसत हसत आरुणीला म्हणाली,"मला तुझ्या वागण्या-बोलण्यातला हा बदल बरेच दिवसांपासुन जाणवतो आहे. पण मी, तु मला कधी आपणहून सांगतेस, याची वाट पहात होते. सांग बरं मला,मुलगा काय करतो? कुठे राहतो?"
"अंबर त्याचं नाव. माझ्या आॅफिसमध्ये माझ्यासोबतच काम करतो. तोही साॅफ्टवेयर इंजिनियर आहे. मुंबईतच राहतो तो. त्याच्या घरी त्याचे आई-बाबा,आजी-आजोबा असतात. तो एकुलता एक मुलगा आहे. अगदी हसतमुख,स्वभावाने मनमिळावू,खुप प्रेमळ आहे.पण त्याने अजूनतरी घरी सांगितलेले नाही. आधी तुला तो भेटेल. मगच त्याच्या घरी आपण जाऊ त्याच्याबरोबर. मुख्य म्हणजे त्याला आई-बाबांचे सारे माहित आहे. मी तुला नेहमी सुखात ठेवेन असे त्याने मला वचन दिले आहे.तसेच तुझी आजी आपल्यासोबतच राहील असेही सांगून माझी काळजी मिटवली त्याने."आरुणीने आजीला सर्व सविस्तर सांगितले. आजीने नातीला बाहुपाशात घेतले आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले.दोघीही काही क्षणांसाठी निःशब्द झाल्या होत्या. आजीने अंबरला घरी घेवून यायला सांगितले,आरुणीला.आता आजी थकून गेली होती .पण ही बातमी कळताच आजी उत्साहित झाली. देवापुढे साखर ठेवायला,देवाचे आभार मानायला निघून गेली.आरुणी आॅफिस सुटल्यानंतर अंबरला तिच्या घरी आज घेवून येणार होती.आजीची संमती होती. त्यांच्या नात्यासाठी.फक्त एकदा तिला अंबरला भेटून त्याच्याशी गप्पा मारायच्या होत्या. आरुणीची जोडीदाराची निवड योग्यच असणार,ह्याची खात्री आजीला होतीच. कधी एकदा अंबरला भेटते आणि सर्व सांगते असे आरुणीला झाले होते.आरुणी आॅफिसला पोहोचली.अंबर आलेला होता.पण कामाची वेळ असल्यामुळे तिला त्याच्याशी फार काही बोलता आले नाही.डबा खाताना एकत्र असु तेव्हा बोलू असे आरुणीने ठरवले.दुपारची जेवणाची वेळ झाली.आरुणी अंबरला जेवता जेवता सर्व काही सांगू लागली.आजीचाही आपल्या नात्याला होकार आहे,पण एकदा तुला आजीला भेटायला हवं."असं तिनं त्याला सांगितलं.आजच आपण जातोय आजीशी बोलायला आॅफिसनंतर हेही त्याला बजावलं.तोही आनंदात होता हे ऐकून.आता घरी बोलायला हवं. आई-बाबांशी,असं त्याला वाटलं. संध्याकाळी आॅफिस सुटल्यानंतर आरुणी-अंबर दोघेही आजीला भेटायला गेले.आजीनेही अंबर घरी पहिल्यांदा येणार म्हणून बदाम घालून शिरा केला होता.आजीची प्रतिक्षा संपली.नात आणि होणारा नातजावई घरी हजर झाले होते.अंबरला बघता क्षणी आजी खुष झाली.उंच,रुबाबदार,देखणा अंबर आणि गोड नाजूक आरुणी अगदी एकमेकांना साजेसे होते.अंबरने आजीला नमस्कार केला.आजीने भरभरुन आशिर्वाद दिला त्याला.दोघांना जवळ घेतले.अंबरला बसायला सांगून आलेच हं मी,असे म्हणून आजी स्वयंपाकघराकडे वळाली.आरुणी-अंबर सोफ्यावर बसुन निवांत गप्पा मारत बसले.पाच-दहा मिनिटांत आजी दोघांसाठी गरमागरम वाफाळता शिरा घेवून आली."आता गप्पा मारुयात,मुलांनो."आजी म्हणाली. अंबर बोलू लागला, "आजी,तुमची आरु मला खरतरं पाहताक्षणी आवडली.पण आधी मैत्री केली तिच्याशी.तिचाही कल माझ्याकडे आहे,हे जाणवू लागले हते मला. पण तब्बल सहा महिने एकमेकांना नीट निरखून-पारखून मगच आम्ही लग्नाच्या निर्णयाप्रत पोहोचलो."
मध्येच दोघेही शिरा खात होते बोलता-बोलता.आजी अंबरशी बोलू लागली,"अरे,मला हे जाणवले होते केव्हाच की आपली आरु कुणाच्यातरी प्रेमात आकंठ बुडाली आहे.पण मी तिने मला हे आपणहून सांगावं याची वाट पाहत होते.तु खुप समजूतदार वाटतो आहेस.आरुला नीट सांभाळशील ना? ती थोडी हळव्या स्वभावाची आहे. राग अगदी तिच्या नाकावर असतो,पण तो लगेच शमतोही. तिला लहानपणापासुन अगदी लाडात वाढवले आहे. लहान वयातच तिला नात्यांचे अनेक रंग अनुभवायला मिळाले. ती जाणती झाल्यावर,तिचे शिक्षण पुर्ण झाल्यावरच तिला मी सर्व सत्य परिस्थिती सांगितली आहे. ऐकल्यावर तिला खुप त्रास झाला. बरेच दिवस ती शांत शांत रहायची. आता सावरली आहे. तिच्या आई-बाबांच्या स्मृृती तर कायम मनात आहेतच. त्यांचा आशिर्वादही आरुच्या पाठीशी सदैव असेल. ती खुपच समजुतदार आहे. तु मला नातजावई म्हणून पसंत आहेस. माझेही आशिर्वाद तुम्हा दोघांच्या पाठीशी कायम असतील. घरी कधी येवू आम्ही,तुझ्या आई-बाबांना भेटायला?"
अंबर-आरु-आजीचे छान खेळीमेळीच्या वातावरणात बोलणे झाले.त्याला आजीला आपण प्रथमच भेटलोय असे वाटलेच नाही.आजी खुप छान वाटल्या त्याला.अंबरने "लवकरच भेटूयात आजी.मी आधी घरी सांगतो सर्वकाही.मग ठरले की सांगतो निरोप आरुपाशी."असे आजीला सांगितले आणि चहा घेवून तो घरी जायला निघाला.आरुही खुप आनंदीत झाली होती.आजीला मिठी मारुन तिने आजीचा गालगुच्चा घेतला.घरात छान मंगल वातावरण झाले होते.लवकरच सनई-चौघड्यांचे सुर कानी ऐकू येणार होते.आजीही एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त होणार होती. अंबर आरुणीकडून निघाला,घरी पोहोचला. अगदी खुष होता.आईच्या नजरेने लगेचच त्याच्यातला बदल हेरला.त्याला थांबवून आईने विचारले,"चिरंजीव,काय विशेष? अगदी छान मूडमध्ये दिसतो आहेस?" अंबर पटकन् बोलून गेला,"आरुणीच्या आजीने होकार दिला."आणि लगेच आत पळाला. अंबरची आई आरुणीला ओळखत होती.एका ठिकाणीच ते दोघे नोकरी करत असल्यामुळे,आरुणी एक-दोनदा घरी आली होती. कामानिमित्ताने. आई मात्र जरा गोंधळून गेली.होकार कसला? आजीने? अनेक प्रश्न तिच्या मनात रेंगाळत राहिले.
अंबर धावत-धावतच आजी-आजोबांच्या खोलीत गेला आणि बसलेल्या आजीला उठवुन गरागरा फिरवू लागला.ती,"काय झाले अंबर?बरा आहेस ना? एवढा खुष कशामुळे झालास? मुलगी पटली वाटते एखादी"असे त्याला म्हणाली. अंबरने आजीला बसवले. आजोबाही तिथेच होते. त्या दोघांना समोर बसवून अंबर आरुणीबद्दल सर्वकाही सविस्तरपणे त्यांच्याशी बोलला. आई त्याला शोधत आलीच आजी-आजोबांच्या खोलीपाशी. अंबरने आजी-आजोबांना सर्व सांगताना तिनेही दारात उभे राहून ऐकले. तिने तसे काही दाखवले नाही. सरळ दारावर थाप देत. ती खोलीत आली.अंबर शांत झाला एकाएकी. आईने त्याला चहा घेण्यासाठी बोलावले बाहेर हाॅलमध्ये. अंबर बाहेर आला.आईशी बोलायला सुरुवात करणार, तेवढ्यात आईनेच विषय काढला,"अरे अंबर, तुझ्यासाठी अनेक छान, सुस्वभावी मुलींची स्थळे येत आहेत.पाहायला सुरुवात करुयात का,मुली?"
अंबर जोरात ओरडला, "नाही." "अरे का रे,अंबर? मग आरुणीला विचारुयात का आपण तुझ्यासाठी? छान सालस मुलगी वाटली मला ती. "आता मात्र अंबरचीच त्याच्या आईनेच विकेट काढली होती. तो गोंधळला पण लगेच स्वतःला सावरुन म्हणाला,"आई,मी तुला आणि बाबांना तेच सांगणार होतो. बाबा कुठं आहेत? त्यांना बोलव. मग सर्व सांगतो मी."
अंबरच्या आईने त्याच्या बाबांना बोलवले.आता अंबर बोलू लागला,"आई-बाबा, माझे आणि आरुणीचे एकमेकांवर खुप प्रेम आहे. आम्ही दोघेही विवाह करु ईच्छितो. आरुणी खुप समजूतदार आहे.हवं तर,एकदा भेटा तिला मग ठरवा. तिच्या आजीला मी आत्ताच भेटून आलोय. त्यांची आमच्या नात्याला संमती आहे."
आता हाॅलमध्ये दोन मिनिटे शांतता झाली. त्यानंतर बाबांनी हसत हसत अंबरला म्हटले,"तुझी निवड योग्यच असणार. पण तू एवढे दिवस आम्हाला का नाही सागितलेस? छुपा रुस्तम निघालास तू आरुणीला आणि तिच्या आजीला उद्याच आपल्या घरी घेवून ये. आपण बोलूयात सविस्तर."अंबरने आश्चर्याने, "खरचं?"असा प्रतिप्रश्न केला आई-बाबांना.अंबरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.त्याने लगेचच आरुणीला काॅल केला व उद्याच संध्याकाळी घरी ये असेही सांगितले. दुसरा दिवस कधी उजाडतोय आणि आरुणीला आपण कधी भेटतोय असे अंबरला झाले होते.सकाळ झाली.अंबर आॅफिसला गेला.आरुणी केव्हाच आॅफिसला पोहोचली होती.ती अंबरची वाटच पाहत होती.अखेर अंबर आॅफिसला पोहोचला.आरुणीने त्याला काल आई-बाबा,आजी-आजोबा यांच्याशी झालेल्या संभाषणाबाबत विचारले.अंबर आणि आरुणी कँटीनमध्ये नाश्ता करत-करत सर्व बोलत होते. आरुणी खुप आनंदात होती.जवळपास अंबरचे आई-बाबा तयारच झाले होते. फक्त एकदा आरुणीची व आजीची भेट त्यांना घ्यायची होती. आॅफिसमधील कामे आटोपुन दोघेही आरुणीच्या घरी आधी गेले.नंतर आजीला घेवून तिघेही अंबरच्या घरी जाण्यासाठी निघाले.आजीने बेसनाचे लाडू करुन घेतले होते.पहिल्यांदाच अंबरकडे जाणार होते. गोडाचे न्यायलाच हवे. असे आजीला वाटले.एवढी गोड बातमी मुलांनी दिली होती.अंबरच्या घरीदेखील अंबरचे आई-बाबा,आजी-आजोबा सर्व हाॅलमध्येच थांबले होते अंबर-आरुणीची वाट पाहत.दारात अंबरच्या आईने छान फुलांची रांगोळी काढली होती. दारावरची घंटी वाजली.अंबरचे बाबा दारात त्यांच्या स्वागताला उभेच होते. त्यांच्या आधीपासुनच हाॅलमध्ये येरझार्या सुरु होत्या. अंबर एवढा मोठा,समजुतदार झाला.आता त्याचे लग्न होणार. या विचारांनी ते थोडे भावुक झाले होते. आरुणी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुप छान दिसत होती.आजी अंबरचे घर,त्याच्या घरची सर्व माणसे पाहून खुप आनंदित झाली होती.आपल्या नातीची निवड योग्यच आहे. याचा तिला अभिमान वाटला. अंबरची आई आली, वाफाळता चहा व खमंग पोहे घेवून. पोहे खाता-खाता अंबरचे आजी-आजोबा आरुणीशी बोलू लागले. सर्वप्रथम आरुणीने सर्व मोठ्यांना नमस्कार केला. आजी-आजोबांच्या सर्व प्रश्नांची सालसपणे, नम्रपणे आरुणीने उत्तरे दिली. अंबरचे आई-बाबाही आधीच आरुणीला पाहुन खुष झाले होते."नक्षत्रासारखी पोर आहे हो तुमची. मुली सुखी रहा." असे अंबरच्या आजीने आरुणीच्या आजीला सांगितले. अंबरच्या आई-बाबांनी काही जुजबी प्रश्न आरुणीला विचारले. आरुणीही अगदी छान अंबरच्या कुटुंबाशी गप्पा मारताना त्यांच्यातलीच एक होवून गेली होती. अंबरच्या आईने सर्व घर आरुणीला दाखवले. घरापुढचा बगीचा दाखवला. वातावरण छान प्रसन्न झाले होते अगदी. यात मिठाचा खडा पडू नये, यासाठी अंबरने आदल्या दिवशीच,आरुणीच्या आई-बाबांचा,तिच्याच काकांनी घडवून आणलेला घातपात व नंतर ते शहर सोडून मुंबईत स्थिरावलेले आरुणी व तिची आजी सारे काही सविस्तर घरात सर्वांनाच सांगितले होते. त्यामुळे तो विषयच निघाला नाही,लग्नाची बोलणी करताना. नाहीतर अचानक जर सर्वांना हे कळाले तर अंबर-आरुणीच्या नात्यावर याचा परिणाम होवून,ते तुटेल की काय, असे अंबरला वाटत होते. पण अंबरच्या घरचे सर्वच खुप सज्जन, समजुतदार होते. त्यामुळे त्यांनीही आरुणीची अगदी नीट काळजी घेवू आम्हीही असा शब्द दिला अंबरला. त्यांना सर्वांना फार वाईट वाटले ते ऐकून.
लगेचच अंबरच्या आईने गुरुजींना विचारुन,जवळचीच तारीख साखरपुड्यासाठी ठरवली.काहीच दिवसांत अगदी साधेपणाने अंबरच्या घरीच साखरपुडा झाला.तसेच काही महिन्यांनी अंबर-आरुणीचे लग्नही झाले.दोघांनी आधीच अगदी साध्या पद्धतीने अंबरच्या मोजक्या नातेवाईकांच्या साक्षीने रजिस्टर लग्न करायचे हे ठरवलेलेच होते.खरेतर अंबरच्या घरच्यांना आणि आरुणीच्या आजीला धुमधडाक्यात दोघांचेही लग्न करायचे होते.पण मुले त्यांच्या विचारावर ठाम होती.त्यामुळे तशाच प्रकारे लग्नसोहळा पार पडला.आरुणी देशमुखची आरुणी कुलकर्णी झाली होती. हळूहळू आरुणी अंबरच्या घरात रुळू लागली.अंबरने वचन दिल्याप्रमाणे आरुणीची आजीदेखील अंबरच्याच घरी राहू लागली.अंबरच्या आजी-आजोबांबरोबर आरुणीची आजीही 'जेष्ठ नागरिक संघात' विविध कार्यक्रमांना,सहलीला जावू लागली. पुर्वीपेक्षा आरुच्या आजीची तब्बेत आता चांगली व्हायला लागली. आरुणीही हे सर्व बघून अगदी सुखाने संसार करत होती. अंबरचे बाबा नामांकित शल्यचिकित्सक होते. तर अंबरची आई प्राध्यापिका होती. एका नामांकित महाविद्यालयात.अंबर-आरुणीदेखील त्यांच्या आॅफिसमध्ये थोड्याच दिवसात रुजू होणार होते. अंबरचे आजी-आजोबादेखील प्रेमळ व समजूतदार,नव्या पिढीशी मिळतेजुळते घेणारे होते. अगदी छान चालले होते सगळे.आरुणीला तरीही तिच्या आई-बाबांची प्रकर्षाने उणीव भासत असे. अंबर तेव्हा तिला सावरायचा.असेच दिवस आनंदात चालले होते. पुढे दोन वर्षांनी त्यांच्या संसाराच्या वेलीवर एका गोंडस कळी उमलली. त्यांनी मुलीचे नाव 'आरोही'ठेवले. सर्व घर तिच्या बाललीलांत रमून जायचे. आरुणी-अंबरचे नाते अधिकच खुलले होते. आरुणीचा दुःखाचा काळ संपुन तिच्या आयुष्यात सुखाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. प्रेमळ नात्यांच्या या गहिर्या सप्तरंगी रंगात आरुणी पुर्णपणे रंगून गेली होती.
आज जेव्हा ती बागेत मुलीशी,आरोहीशी खेळत होती,तिला बघता-बघता, तिच्या डोळ्यासमोरुन एखाद्या चित्रपटासमान आज या आठवणी,ते क्षण सारे तरळून गेले.आज मात्र वर्तमानकाळात आरुणी व तिचे कुटुंब अतिशय सुखासमाधानात,आनंदात जीवन व्यतीत करत होते.
© सौ.स्वाती अभय लोमटे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा