सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

773. देवा तुझा मी सोनार...

 नरहरीशेठ आहेत का ? सावकाराचा नोकर पेढीवर येऊन चौकशी करत होता. शेठ अजून शिव पूजेत मग्न आहेत. कारकूनाने माहिती पुरवली. बरं,आले की त्यांना सावकारांचा निरोप द्या. वाडयावर बोलावलं आहे.अंगठी, वळं आणि खूप काय काय बनवायचं आहे. नोकर चालता झाला. सकाळपासून किती जण येऊन गेले दुकानावर. पण शेठजींची पूजा काही संपत नाही. त्यात आज सोमवार. मग बघायलाच नको. कारकून स्वतःशीच तक्रार वजा कुरकुर करत होता. नरहरी सोनार पंढरपूरातील एक यशस्वी व्यावसायिक. त्यांच्या कलाकूसरीला आजूबाजूच्या गावात दुसरी तोड नव्हती. त्यामुळे दागिने करायचे तर नरहरी शेठच्याच दुकानात. नरहरी शेठ तुमच्या हातात कला आहे आणि डोक्यावर विठ्ठलाचा वरदहस्त. त्यामुळे एवढया दूरवरून तुमच्याकडे गिऱ्हाईक येतात. आजूबाजूचे दुकानदार तोंड देखलं कौतुक करताना मनातल्या असुयेला वाट करून देत असत. अजिबात नाही. मी फक्त भगवान शंकराला मानतो आणि त्यालाच पूजतो..त्याच्याच आशिर्वादामुळे माझा चांगला जम बसला आहे.. नरहरी सोनार, शंकराव्यतिरिक्त कुणालाच भजत नसत. तासंतास शिवनाम जपत. पंढरपूरातच राहत असल्या कारणाने कित्येक वेळा विठ्ठलाच्या मंदिरा वरून जाणं येणं होत असे. पण नमस्कार करणं तर दूरच, ते मंदिराच्या दिशेने ढुंकून देखील बघत नसत. आज सोमवार. पहाटे लवकर उठून त्यांनी बील्वपत्र गोळा करून आणली. गोठ्यातील गायीचे धारोष्ण दूध आणलं. महादेवाच्या पिंडीला अभिषेक चालू होता तब्बल दोन प्रहर. आज उपवास असल्यामुळे थोडं केशरी दुध घेऊन ते पेढीवर आले. सावकाराकडून बोलावणं आल्याचं समजलं. पेढीवर कारागीर मंडळीना सूचना देऊन ते सावकाराच्या वाड्यावर आले. वाडयावर नुसता आनंदोत्सव सुरु होता. तोरणं, फुलांनी वाडा सजला होता. पाहुणे मंडळीमुळे गजबजला होता. पंगतीची जोरदार लगबग सुरु होती. स्वयंपाक घरातून सुवासिक पदार्थांचा घमघमाट सुटला होता. कारणही तसंच होतं.. लग्नानंतर कित्येक वर्षानी सावकाराच्या वाड्यात पुत्र जन्म झाला होता. आपण आता निपुत्रिक म्हणूनच मरणार हा निराशावाद बळावत असताना अचानक देवाने त्याची कृपा दृष्टी केली आणि सावकाराच्या बायकोला दिवस गेले. हा दिवस बघण्यासाठी त्या माऊलीने विठ्ठलाला आजवर किती आळवणी केली. किती प्रदक्षिणा घातल्या. उपासतापास केले. त्याचं फळ म्हणून उतारवयात देवाने त्यांची कूस उजवली. त्या माऊलीचा आनंद गगनात मावत नव्हता.
अहो ऐकलं का? एक इच्छा होती माझी सावकारीण बाई नवऱ्याला सांगत होती.
अहो एक काय? तुम्ही दहा गोष्टी मागा लगेच हजर करतो. सावकार देखील खुशीत होते.
पांडुरंगाच्या आशिर्वादामुळे आपल्याला पुत्रप्राप्ती झाली. देवाला एखादा दागिना करावा असं मनात आहे. बाईनी इच्छा बोलून दाखवली.
करूया की. आपल्याला कुठे काय कमी आहे. थांबा उद्याच नरहरी शेठला वाडयावर बोलवू. तुम्हाला हवा तो दागिना बनवून घ्या. बायकोची इच्छा पुरवायला त्यांनी शेठजींना वाडयावर बोलावलं. त्याप्रमाणे शेठ वाडयावर आले.
या या शेठजी सावकाराने स्वागत केलं. लगोलग आतून वाळ्याचं सरबत आलं. ते घेऊन झाल्यावर शेठजीं मुद्यावर आले. बोला सावकार काय काय बनवायचं आहे?
पोराला सोन्याचं वळं आणि चेन बनवायची आहे. आणि मालकीणबाई साठी हार बनवून हवा. सावकारानी सांगून टाकलं.
माझ्या हाराचं राहूदे. पण शेठजीं मला विठ्ठलाला सोनसाखळी बनवून हवी.  तीदेखील मुलाच्या बारशाच्या अगोदर. सावकारीण बाईंनी मानस बोलून टाकला. विठ्ठलासाठी सोनसाखळी ? नुसत्या विचाराने सोनाराच्या कपाळावर आठी उमटली. पण गिऱ्हाईकाला नाराज कसं करायचं? ठीक आहे देईन मी त्वरित बनवून.. पण मला साखळीचं माप आणून द्या. नरहरी बोलले.
म्हणजे तुम्ही जाणार नाही मंदिरात माप घ्यायला?  नकळत सावकाराचा आवाज वाढला.
नाही.  मी शिवशंकर सोडून इतर कुणाच्याही मंदिरात जात नाही. तुम्हाला साखळी बनवून हवीय. तुम्ही माप आणून द्या. मी चोख बनवेन. विश्वास नसेल तर दुसऱ्या कुणाकडून बनवून घ्या.माझी हरकत नाही. मी निघतो. एवढं बोलून ते निघाले देखील.
बरं बरं रागावू नका शेठजी. मी व्यवस्था करतो माप आणून द्यायची. मग तर द्याल ना बनवून? पर्याय नसल्याने सावकार देखील अगतिक होता.
ठीक आहे येतो मी. एवढं बोलून नरहरी पेढीवर परतले. थोडयाच वेळात वाडयावरून नोकर आला. सोबत साखळीचं माप म्हणून दोरी आणली होती. दोन दिवसांनी येऊन घेऊन जा सर्व ऐवज. सोनाराने ग्वाही दिली.
ठरल्याप्रमाणे दोन दिवसानी वाडयावरून नोकर आला. सर्व दागदागिने सुरेख घडवले होते. ठरलेली रक्कम अदा करून नोकर वाडयावर दागिने घेऊन आला. आपण उद्याच मंदिरात जाऊन आपला नवस फेडू. सावकार बायकोला म्हणाले. दुसऱ्या दिवशी मंदिरात पूजा अभिषेक करून सावकारानी सोनसाखळी अर्पण केली. पुजाऱ्यानी लगोलग ती देवाच्या कमरेला बांधायला घेतली देखील पण... पण साखळी दोन बोटं छोटी पडत होती.
आजवर असं कधी झालं नाही. नरहरी सोनार बरोबर चोख दागिने बनवतो. मग आजच काय झालं? सावकार थोडा चिडलाच. लगोलग त्यांचा नोकर पेढीवर आला. नरहरी बसलेलेच होते. नोकराच्या हातात साखळी बघून त्यांना देखील नवल वाटलं. इतक्या वर्षात असं कधी घडलं नव्हतं. त्यांनी सावकाराकडून आलेलं माप आणि त्याबरहुकूम बनवलेली साखळी दोन्ही नोकराला दाखवलं. बघ माझं माप जरा देखील चुकलेलं नाही. पण तो नोकर बिचारा काय बोलणार? उद्या या सकाळी. सोनाराने नोकराला पिटाळलं. आणि स्वतः साखळी मोठी करायला बसले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे नोकर येऊन साखळी घेऊन आला सावकाराकडे. पुजाऱ्याने ती देवाच्या कंबरेला बांधली. पण ह्या वेळी साखळी दोन बोटं मोठी होत होती. सावकार स्वतः चरफडत पेढीवर आला. शेठजी तुम्ही स्वतः येऊन देवाच्या कंबरेचं माप घ्यायचं. सावकार गुरकावला. सावकाराला हो म्हटलं तरी पंचाईत नाही म्हटलं तरी पंचाईत... नाईलाजाने सोनाराने विठ्ठलाच्या मंदिरात पाय ठेवला. मात्र डोळ्यावर काळी पट्टी बांधायला तो विसरला नाही. सावकाराला हे बिलकुल आवडलं नाही. पण बोलता येत नव्हतं. आतमध्ये जावं की नाही विचार करत सोनाराने गाभाऱ्यात पाय ठेवला.. पुजाऱ्याच्या मदतीने त्यांनी विठ्ठलाच्या कमरेचं माप घ्यायला सुरुवात केली. त्यांनी कमरेला स्पर्श करताच त्यांना पितांबराच्या जागी व्याघ्राजीनाचा स्पर्श जाणवला. कानात नकळत डमरूचा आवाज घुमू लागला. तोच हात त्यांनी मूर्तीच्या गळ्याशी नेला. तुळशी माळेच्या जागी त्यांना सर्पाचा थंडगार स्पर्श आणि फुत्कार जाणवला. त्यांनी डोळ्यावरली पट्टी काढून पाहिलं. त्यांना डोळ्यासमोर साक्षात त्यांचं दैवत भगवान शंकर दिसले. पापणी लवते न लवते तोच तीथे पांडुरंग उभा दिसला. भगवान शंकर आणि पांडुरंग आलटून पालटून दिसू लागले. त्यांनी मनोमन पांडुरंगाला नमस्कार केला व सावकाराला सांगितलं साखळी बांधून पहा, आता साखळी बरोबर बसेल कमरेला. अहो पण शेठजीं दोन बोटं मोठी होतेय म्हणून तुम्हाला बोलावलं ना स्वतः माप घ्यायला? मग आता कसं काय होईल ती मापात? सावकार वैतागला.
तुम्ही एकदा साखळी बांधायला तर सांगा. सोनार म्हणाले. तसं सावकाराने पुजाऱ्याला इशारा केला. पुजारी ती बांधू लागला आणि काय आश्चर्य? आता ती सोनसाखळी पांडुरंगाच्या कमरेला व्यवस्थित बसत होती.
शेठजी हा काय चमत्कार म्हणायचा? सावकाराने विचारलं.
मी देवळात पाऊल टाकावं म्हणून त्या विठ्ठलाने केलेली ही माया आहे. नरहरी बोलले. शिव काय? विठ्ठल काय? सगळी एकाच देवाची रूपं आहेत. मीच माझा देव श्रेष्ठ म्हणून इतके दिवस विठ्ठलापासून दूर राहिलो. देवा माझं चुकलं. क्षमा कर. इथून पुढे माझा पांडुरंगही तूच शिव शंकरही तूच.
पांडुरंग पांडुरंग.

राजेंद्र भट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...