शनिवार, २ डिसेंबर, २०२३

725. मी कोण आहे ?

    हिंदू धर्मातील दर्शनशास्त्रांचा थोडाफार अभ्यास करताना मला  मी १९७८ साली वाचलेल्या एका ब्रिटिश माणसाने लिहिलेल्या  ज्याचे नाव आहे  "पॉल ब्रॉम्टन"  यांनि लिहिलेल्या मराठी भाषांतरित  एका पुस्तकाची  आठवण झाली.  त्याचे नाव होते  "आध्यत्मिक भारताचा रहस्यमय शोध"  पॉल ब्रॉम्टन याला  ईश्वर खरोखरीच असतो  काय ? आत्मा असतो काय ? याबद्दल खूप उत्सुकता होती आणि याचा शोध घेण्यासाठी तो भारतात आला होता,  सुमारे एक वर्षभर राहिला होता  आणि त्याला रमण महर्षी भेटले होते आणि त्यांनी त्याचे समाधान केले होते  एवढे मला आठवत होते,  म्हणून  नुकतेच मी ते पुस्तक  ते अमेझॉन वरून मागवून घेतले आणि नुकतेच ते वाचून संपविले . आत्मा म्हणजे काय ?आत्मा  खरोखरीच अस्तित्वात असतो काय ? ईश्वर म्हणजे काय ? तो खरोखरच अस्तित्वात आहे काय? आपला जन्म होण्यापूर्वी आपण कोठे होतो?आपल्या जन्माला आलो त्याचे उद्दिष्ट काय ?  मेल्यांनंतर आपण कोठे जाणार आहोत ? याबाबत  सत्य काय आहे याचा शोध घेण्यासाठी " पॉल ब्रॉम्टन "   विसाव्या शतकाच्या प्रारंभी तो भारतात आला . ब्रिटनमध्ये तो पत्रकार होता, योग म्हणजे नेमके काय ? यासाठी तो भारतातील निरनिराळ्या योग्यांना भेटत राहिला . 
      सर्वप्रथम तो मुंबईत आला आणि एका हॉटेलमध्ये उतरला त्या हॉटेलात त्याला एक ईजिप्शियन  जादूगार भेटला  त्या जादूगाराने पॉल ब्रॉम्टन ला त्याच्या मनातला  प्रश्न  एक कागदावर लिहायला लावला ,त्या कागदाची  बारीक घडी करून तो कागद आणि त्याच्याबरोबर एक पेन्सिल उजव्या हाताच्या मुठीत ठेवायला सांगितली, तो जादूगार लांब उभा होता नंतर , त्या जादूगाराने तो प्रश्न आणि त्याचे उत्तर बरोबर सांगितले एवढेच काय तर ते उत्तर त्या कागदावर पेन्सिलने लिहिले होते , असे तीन वेळेस निरनिराळे प्रश्न ज्याची उत्तरे केवळ पॉल ब्रॉम्टन यालाच माहित होती ती विचारली  आणि दरवेळी असेच घडत गेले,यात कोणतीही नजरबंदी नव्हती याची खात्री पॉल ब्रॉम्टन यांनी करून घेतली होती . जेव्हा त्या जादूगाराला विचारले कि हे तू कसे साध्य करतोस तेव्हा त्याने सांगितले कि त्याने काही आत्म्यांना वश करून घेतले होते आणि काही जिन त्याचे गुलाम होते तो जादूगार पुढे इजिप्तला निघून गेला पॉल ब्रॉम्टन यांनी  तो कागद बरेच दिवस जपून ठेवला होता आणि कागदावर पेन्सिलने लिहिलेले उत्तर दोन तीन माणसांना दाखवून ती नजरबंदी तर नाही याची खात्री करून घेतली होती , त्यानंतर एका माणसाच्या सांगण्यावरून पॉल ब्रॉम्टन मुंबईहून  नगरला आला आणि मेहेरबाबा याना भेटला पण काही दिवस राहूनही  मेहरबाबा काही त्याचे समाधान करू शकले नाहीत . पुण्यात "हजरत बाबाजन" नावाची एक स्त्री होती ती पुणे स्टेशनच्या बाहेर एका लिंबाच्या झाडाखाली रहात असे तिचे हिंदू व मुसलमान शिष्य होते त्या स्त्रीने मेहेरबाबांच्या कपाळाचे चुंबन घेऊन शक्तिपात केला हॊता असे त्याला मेहेरबाबांनी सांगितले तेव्हा  मेहेर बाबांच्या भेटीनंतर तो पुण्यात आला आणि हजरत बाबाजानला भेटला हि हजरत पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारात एका लिंबाच्या झाडाखाली रहात असे तिचे हिंदू व मुसलमान शिष्य होते  हजरतने त्याच्याकडे पाच मिनिटे रोखून पाहिले आणि  ती दुभाष्याला म्हणाली  "त्याला भारतात बोलावले आहे. "
     पुढे पॉल मद्रासला गेला तिथे एका गृहस्थाच्या घरी राहिला . त्याने त्याला एक ३५ वर्ष  वयाचा एक तरुण दाखविला, त्याला सर्वजण योगी म्हणत तो कोणाशीही बोलत नसे.  पण तो योगी पॉलबरोबर बोलण्यास तयार झाला .  मग तो योगी आणि पॉल दोघेही एका झाडाखाली बसले . मग पॉल ब्रोमटन ने  त्याला काही प्रश्न विचारले, त्यावर त्याने सांगितले कि मी शरीर आणि श्वासोस्वास नियंत्रण करतो आणि याचा फायदा शारीरिक स्वास्थ्य ,तसेच  त्याने मनावर ताबा मिळविता येतो.  मग त्याने निरनिराळी आसने करून दाखविली त्यात शवासन , पद्मासन ,वज्रासन ,सर्वांगासन होते आणि प्राणायाम सुद्धा होता.  तो योगी त्याचे हृदय , पोट ,आणि मूत्राशय यावर नियंत्रण ठेवू शकत होता.  नंतर त्याने पॉल याला त्याच्या छातीवर हात ठेवायला सांगितले सुरुवातीला त्या योग्याच्या हृदयाचे ठोके जाणवत होते ,हळूहळू ते मंद मंद होऊन पूर्णपणे थांबले आणि परत काही मिनिटांनी पुन्हा सुरु झाले आणि पूर्ववत झाले . नंतर त्याने नाडीचे  ठोके बंद करून दाखवीले ,नंतर श्वासोस्वास  बरच वेळ बंद करून दाखविला, नंतर त्याने सांगितले कि त्याच्या गुरूंचे वय ४०० वर्षाचे आहे आणि हे दीर्घायुष्य मिळविण्यासाठी तीन गोष्टी कराव्या लागतात . एक  तर हि सगळी आसने  करणे ,श्वसनाच्या व्यायामांचा नित्य सराव करणे  , आणि तो सुद्धा एखाद्या गुरूच्या देखरेखीखाली , आणि दुर्मिळ वन औषधींचे सेवन करणे या गोष्टी दीर्घ  आयुष्यासाठी आवश्यक आहेत, ते गुरु हिमालयात राहतात आणि आवश्यक असेल तर त्याच्याशी बोलू शकतात . कालच त्यांनी सांगितले कि उद्या तुला एक परदेशी माणूस भेटेल, तो ज्ञान मिळविण्यासाठी आसुसलेला आहे आणि त्याला गुरु भेटेल.  
      दुसऱ्या दिवशी ते त्या योग्याच्या घरात गेले , तेव्हा त्या योग्याने एक कागद त्यांच्या हाती  दिला , त्यावर पारंपरीक गूढ विदेशी चिन्हे होती , सूर्य चंद्र आणि मानवी डोळ्यांची चित्रे होती.  मध्यभागी एक  रिकामा चौकोन होता त्या योग्याने सांगितले कि त्या  चौकोनात तुम्ही माझा फोटो लावा आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे तुमचे विचार या फोटोवर केंद्रित केले तर मी स्वप्नांत तुमची भेट घेईन . जाताना त्या योग्याने एक सोन्याची अंगठी त्याला भेट दिलीआणि सांगितले कि माझ्या एका शिष्याने मला ती दिली होती, ती आता तुम्ही वापरा , ज्यायोगे तुमच्यातील शक्ती जागृत होतील.  त्या कागदाचा फोटो सुद्धा पुस्तकात छापला आहे 
     नंतर पॉल ब्रॉमटम त्या योगी  बरोबर एका मौन साधूच्या भेटीला गेला, तो मौनी साधू फक्त संध्याकाळी फळे खात असे  बाकी दिवसभर काहीही खात नसे ,त्याच्या डोक्यावर कोणतेच छत्र नव्हते आणि अंगात एक लुंगी असे, त्या मौनी साधूचा कोणताच शिष्य नव्हता.  तो साधू नेहमीच देहातीत ध्यानमग्न अवस्थेत असे पॉल ने त्याला विचारले कि" हे जग कायम समस्याने घेरलेले असते काय ?"त्यावरत्या मौन साधूने लिहून दिले कि "तुम्ही स्वतःलाच समजून घेऊ शकत नाही तर ब्रह्मांडाला कशासाठी समजून घेऊ लागता ?"  त्यानंतर  त्या मौन साधूने लिहून दिले कि "शुद्ध ज्ञान ,अमृताचा प्रचंड साठा तुझी वाट पाहत असताना , ज्ञानाचा एक एक थेम्ब गोळा करण्यासाठी तू इतरत्र का भटकत आहेस ?" मग पॉल ने त्याला विचारले कि एखाद्याने त्याचा शोध घ्यायचा तरी कसा ? तेव्हा तो मौनी साधूने लिहून दिले कि स्वतःचाच शोध घ्या मग तुम्हाला तिथे दडलेले आंतरिक सत्य समजून येईल ,अज्ञान केवळ तुमच्या विचारात आहे ,जेव्हा तुला सत्य कळून येईल तेव्हा आपोआपच मानवतेच्या सेवेसाठी काय करायला हवे ते  कळेल, त्यासाठी लागणाऱ्या शक्तीचा अभावही तुला जाणवणार नाही . त्या योग्याबरोबरची मुलाखत आटोपत असताना  पॉल ब्रॉम्टन  याने त्या मौन साधूला  संदेश मागितला, तेव्हा त्याने कागदावर उत्तर लिहिले कि "तू इथे आलास म्हणून मला खूप आनंद झाला , याला मी दिलेली दीक्षा समज "आणि हे उत्तर वाचल्यावर पॉल ब्रॉमटम याने असे लिहून ठेवले आहे कि त्याच्या  शरीरात विलक्षण शक्तिसंचार झाला . तो शक्तिस्रोत त्याच्या पाठीच्या कण्यात वर येत मानेला ताठ करून मेंदूत शिरला आणि त्याच्या अनुभवाला  आले कि त्याची इच्छाशक्ती तिच्या परमोच्च पातळीवर  पोहोचली आहे . स्वतःवर विजय मिळविण्याची एक गतिमान उर्मी जागृत झाली आहे आणि हे दुसरे काही नसून तो आत्म्याचा आवाज आहे आणि हाच आवाज चिरस्थाई सुख देऊ शकतो "
      नंतर  पॉल ब्रॉम्टन  कुंभकोणम येथील शंकराचार्य याना भेटण्यास  गेले, त्यावेळी ते नेपाळच्या राजाच्या निमंत्रणावरून नेपाळला चालले होते ,पण त्यांच्या पद्धतीनुसार वाटेत  जे गाव येईल त्या गावात मुक्काम करावा लागे . तिथे तसेच आमंत्रण येईल त्या गावात जाऊन आध्यत्मिक प्रवचन द्यावे लागे, त्यामुळे कित्येक वर्षे झाली तरी ते नेपाळला पोहोचू शकले नव्हते आणि अजून कित्येक वर्षे त्यांना नेपाळला पोहचण्यासाठी लागणार होती . तेव्हा पॉल ब्रॉमटम  याने त्यांना विचारले कि मला ईश्वरी साक्षात्कार किंवा खरे ज्ञान झाले नाही तर मुक्तीसाठी मी तुमच्याकडे येऊ शकतो काय ? तेव्हा त्यांनी सांगितले कि" मी फक्त ३ तास झोपतो उर्वरित वेळा मला माझ्या कामासाठी द्यावा लागतो तेव्हा मला ते शक्य नाही पण  तेव्हा तू अरुणाचल येथे  रमण महर्षी याना भेट " 
      यानंतर  पॉल ब्रॉम्टन  रमण महर्षींना भेटण्यासाठी अरुणाचल येथे गेले जेव्हा ते महर्षींना भेटण्यास गेले, तेव्हा महर्षी हॉलमध्ये ध्यानस्थ होते.  समोर त्यांचे शिष्य बसले होते . सुमारे तासानंतर ते समाधी अवस्थेतून बाहेर आले तेव्हा पॉल ब्रॉमटम  याने त्यांना विचारले कि "खरोखरीच मानवी  जीवन भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काही असते काय ? आणि असेल तर ते मला कसे जाणवेल ? तुम्ही मला साक्षात्काराचा अनुभव घडवून  आणण्यास मदत करू शकाल काय ? कि असा शोध हाच मुळात एक भ्रम , मृगजळ आहे ?
      त्यावर महर्षींनी त्याना विचारले कि "तुम्ही म्हणता मी जाणू  इच्छितो, मला सांगा , हा मी  कोण आहे ? मग पॉल ब्रॉमटम याने स्वतःच्या छातीकडे बोट दाखवून  स्वतःचे नाव सांगितले ,.त्यावर महर्षी म्हणतात "आणि तुम्ही त्याला ओळखता काय ?त्यावर पॉल ब्रॉमटम  चे उत्तर "हो अगदी जीवनभर "त्यावर महर्षी म्हणतात "पण हे तर तुमचे  केवळ शरीर आहे , मी परत  विचारतो तुम्ही कोण आहेत ? आधी "मी " ला जाणून घ्या ,मग तुम्हाला सत्य समजेल.  करता येण्यासारखी एकच गोस्ट आहे ,स्वतःच्या आत डोकवा .  आणि हे योग्य रीतीने करा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सापडतील . स्वतःच्या स्वरूपाविषयीच्या सखोल चिंतनातून आणि सत्याच्या अखंड ध्यानांतून प्रकाश  दिसू लागेल . मनुष्य ज्या ज्या गोष्टीच्या शोध घेतो त्या सगळ्या गुरु देऊ शकतो ..  अशा गोष्टी व्यक्तिगत अनुभवातून समजून घ्यावयाच्या असतात . गुरूंच्या मदतीने आत्मसाक्षात्कार होतो, पण ते सर्व शिष्याच्या मानसिक परिपकव्यतेवर अवलंबून असते , दारुगोळ्याने आग पटकन लागते पण कोळसे पेटायला वेळ लागतो '
     परत संध्याकाळी पॉल ब्रॉमटम महर्षींना भेटतो तेव्हा महर्षी त्यांना म्हणतात "तू जेव्हा परत जाशील , तेव्हा आता अनुभवत असलेली शांती तुझ्यासोबत असेल. पण त्याची किंमत तुला मोजावी लागेल ती म्हणजे यापुढे तुला हि कल्पना बाजूला ठेवावी लागेल कि तू हे शरीर आहेस किंवा  हा मेंदू आहेस किंवा बुद्धी आहेस , जेव्हा हि शांती तुझ्यात प्रवाही होईल, तेव्हा तू स्वतःला विसरायला हवंस .  हे करून तुला तुझे जीवन त्या दिशेने वळवायचे आहे ."
     पॉल ब्रॉम्टन   त्या ठिकाणी तीन आठवडे राहिला आणि तेथून जाताना महर्षींना भेटावयास गेलाl, तेव्हा त्याने विचारले "सत्यशोधकाने या जगाचा त्याग करून जंगलात एकांतवासात जायला हवे काय ?त्यावर महर्षी म्हणाले "सत्याच्या शोधासाठी जीवनाचा त्याग करण्याची गरज नाही . दररोज केवळ एक दोन तास योग्य पद्दतीने ध्यान केले तरी तुमच्या मनाला वळण लावलेला हा प्रवाह तुमच्या रोजच्या कामा दरम्यान  प्रवाही राहील आणि तुम्ही असे सातत्त्याने करत राहिल्यास तुमचा  ध्यानधारणेला अनुसरेल .  जगाशी बांधून ठेवणाऱ्या वैयक्तिक स्वार्थीपणाचे माणसाने समर्पण करायला हवे . खोट्या अहं ला सोडून देणे हाच खरा सर्वसंग परित्याग आहे .   त्यावर  पॉल ब्रॉम्टन   याने विचारले "हे कसे साध्य केले जाते ? त्यावर महर्षी म्हणाले "त्यासाठी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा कि "मी कोण आहे ?' हा शोध घेतलात तर तुम्हाला असे काही सापडेल जे मनाच्या पलीकडील आहे . या मोठ्या प्रश्नाचे उत्तर मिळवा मग त्यातून तुमचे इतर सगळेच प्रश्न आपोआप सुटतील " 
      तिथून पॉल ब्रॉमटन जगन्नाथपुरीला गेला तिथून पुढे कलकत्याला गेला . रेल्वेत त्याला रामकृष्ण परमहंसाचा एका. शिष्याचा शिष्य भेटला . त्याने त्याच्या गुरूचा पत्ता  पॉल ब्रॉमटन याला दिला . तो गुरु रामकृष्णांच्या सहवासात शेवटची पाच वर्षे राहिला होता आणि त्याने रामकृष्णांची वचने बंगालीत लिहून घेतली होती त्यामुळेच आज आपल्याला रामकृष्ण वचने वाचता येतात आणि त्यांचे म्हणणे काय आहे ते समजते .  त्या गुरूला त्याने विचारले "जो माणूस फक्त बुद्धी आणि तर्काला प्रमाण मानतो आणि केवळ श्रद्धेवर जीवन जगू शकत नाही , अशा माणसाविषयी रामकृष्ण  यांचे काय मत होते किंवा अशा माणसाविषई रामकृष्ण काय म्हणाले असते ? तेव्हा त्यांनी उत्तर दिले कि "त्यांनी अशा माणसाला प्रार्थना करायला सांगितले असते . प्रार्थनेत प्रचंड शक्ती आहे , प्रचंड बळ आहे ,खुद्द रामकृष्ण यांनी अशी प्रार्थना केली होती कि 'अध्यात्मिक बळ असलेल्या माणसांना माझ्याकडे पाठव " त्यांनतर बरेच लोक त्यांच्याकडे यायला लागले व नंतर त्यांचे शिष्य बनले . प्रार्थना हा शेवटचा आधार असतो , मानवाच्या हाती असलेले ते अंतिम साधन असते , जिथे बुद्धी मदतीला येत नाही , तिथे प्रार्थना मानवाची मदत करते , ज्याला प्रार्थना करण्याची बुद्धी किंवा इच्छा होत नाही त्याना  पवित्र लोकांच्या सहवासात येऊ दयावे , त्यांच्या सततच्या सहवासाने त्यांची सुषुप्त अध्यात्मिकता जागृत होईल. उच्च स्थितीला गेलेले लोक इतरांना अध्यात्मिक जीवांविषयीची उत्कट इच्छा प्रेरित करतात .'
      तिथून पॉल ब्रॉमटन बनारसला आले  पॉल ब्रॉमटन याला मुंबईत स्वामी विशुद्धानंद यांचा एक शिष्य भेटला होता आणि त्याने सांगितले होते कि बनारसला  स्वामी विशुद्धानंद योगी आहेत त्यांच्याकडे अद्भुत शक्ती आहे, पण त्या शक्तीचे ते कधी प्रदर्शन करीत नाहीत . पॉल ब्रॉमटन मग स्वामी विशुद्धानंद याना भेटले आणि त्याने स्वामींना विंनती केली कि" माझी योगशास्त्राविषयीची आवड लक्षात घेऊन तुमच्या नियमात अपवाद करावा आणि तुमच्या योगशास्त्राचा प्रत्यय मला  आणून दयावा "ते स्वामीजी यांनी मान्य केले आणि पॉल कडून  त्याचा हातरुमाल घेतला मग त्यांनी एक भिंग घेतले आणि पॉल याला विचारले तुमाला कोणता सुगंध  आवडतो ? त्यावर पॉलने जाईच्या फुलांचा असे उत्तर दिले . मग त्यांनी आपल्या एका शिष्याला बाहेर एक आरसा घेऊन पाठविले त्या आरशावर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन ते किरण भिंगावर पडले.  फक्त २ सेकंद ते किरण त्या रुमालावर पडले आणि मग तो रुमाल त्यांनी पॉल कडे परत केला रुमाल नाकासमोर धरताच जाईचा सुवास त्याला आला . हातरुमालावर कोणतेही थेम्ब नव्हते, तसेच कुठलंही ओलसरपणा सुद्धा नव्हता.  नंतर असाच प्रयोग करून त्यावर गुलाब आणि चमेलीचे अत्तर तयार केले शेवटी जी फुले केवळ तिबेट मध्ये मिळतात त्या फुलांचा सुगंध त्यांनी तयार केला.  पॉल ने ते भिंग त्यांच्याकडे मागितले ते त्यांनी दिले ते पहिले आणि यात कोणतीही हातचलाखी नाही ना याची खात्री करून घेतली .  त्याने विशुद्धानंद याना विचारले कि हा चमत्कार कसा झाला तर त्यांनी सांगितले हा काही योगाभ्यास नव्हे ,तर हा सौर विज्ञानाच्या ज्ञानाचा परिणाम आहे . सूर्यकिरणांमध्ये जे जीवनदायी घटक आहेत ते घटक वेगळे करण्याचे ज्ञान तुम्हाला अवगत झाले तर तुम्हीही हा तथाकथित चमत्कार करू शकता .  पॉल ब्रामटन पुढे बरेच फिरले 
      पॉल ब्रामटन शेवटी पुन्हा रमण महर्षी यांचेकडे आले आणि त्यांच्या पर्वतावर राहू  लागले . रोज हॉलमध्ये येत, सामूहिक साधनेत भाग घेत आणि अधूनमधून महर्षी यांचेबरोबर वार्तालाप करत तेव्हा त्यांनी महर्षींना विनंती केली  कि मला तुमचा शिष्य करून घ्या तेव्हा महर्षी म्हणाले 'गुरु शिष्य नात्याबाबत इतका उहापोह का ? ज्याला स्वतःचा स्व कळला आहे त्याच्यासाठी ना कोणी शिष्य आहे ना कोणी गुरु आहे . अशी व्यक्ती संपूर्ण जगाकडे सम दृष्टीने  पाहू शकते , तुम्हाला गुरु हा स्वतःच्याच आध्यत्मिक "स्व" मध्ये अंतरंगात शोधायला हवा . हे शरीर हा खरा "स्व " नव्हे   आणि हळूहळू आपल्या विचाराना  आंतरिक गहनतेच्या बिंदूंपाशी घेऊन जावा  आणि गाढ शांतीचा अनुभव घ्या  . महर्षी बरच काळ मौन धारण करीत असत ,त्यामुळे त्यांना मौनाचे खरे महत्व लक्षात येऊ लागले होते . हळूहळू  पॉल ब्रामटन स्वतःच्या अंतर्यामी पाहू लागले होते .
 "मी कोण आहे ? मी हाडामासाचे एक शरीर आहे कि मी एक मन आहे ?
 " मला इतरांपासून वेगळे करणारे माझे  विचार आणि भावना म्हणजे मी आहे काय ?"
 असे प्रश्न ते महर्षींना विचारत. महर्षींच्या संदेशाचा सारांश खालीलप्रमाणे होता
"मी कोण आहे ? या प्रश्नाचा अथकपणे पाठलाग करा . स्वतःच्या समग्र व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करा . हे शोधून काढण्याचा  प्रयत्न करा कि हा "मी " याचा विचार कुठून सुरु होतो . ध्यान करीत रहा .तुमचे लक्ष बाह्य गोष्टीपासून दूर करून आत वळवा . एके दिवशी विचारचक्राची गती कमी होईल आणि अचानक एक अंतःस्मरण गूढपणे जन्म घेईल , त्याचा पाठलाग करा , त्याच्या मागोमाग जावा . तुमचे विचार थांबवा .मग ती हळूहळू तुम्हाला तुमच्या इच्छित लक्ष्याकडे घेऊन जाईल . '
"माणूस त्याच्या  गहन अशा " स्व "मध्ये जर ठामपणे स्थिर झाला तर तो त्याच्या यातनांकडे  शांतपणे पाहू शकतो . माणसाला शाश्वत दैवी  संरक्षण उपलब्द असताना क्षणिक ऐहिक आशांना घट्ट धरून ठेवणे हा शुद्ध मूर्खपणा आहे .ग्याल्यालियोने त्याच्या शिष्याना उद्याचा विचार करू नका , असे सांगितले कारण एक उच्च शक्ती आपल्या उद्याचा विचार करीत असते "
    आणि शेवटी तो साक्षात्कार घडला ." स्व " चे अस्तित्व अजूनही होते , पण ते संपूर्ण बदललेले , प्रकाशमान ,तेजस्वी बनले होते . सध्या असलेल्या साधारण व्यक्तिमत्वापेक्षा उच्च , उदात्त पातळीचे असे काहीतरी दैवी अस्तित्वाच्या जाणिवेत उगम पावूं लागले होते .  पॉल ब्रामटन याला भूतकाळातील कडवट आठवणींचा आणि भविष्यातील चिंतेचा विसर पडला होता . त्याला सखोलतेने हे लक्षात आले होते कि सगळ्यांना समजून घेणे म्हणजे केवळ त्यांना क्षमा करणारे नव्हे तर सर्वांवर प्रेम करणे होय  पॉल ब्रामटन याचे हृदय ब्रह्मानंदात मग्न झाले होते .
     एका भेटीत महर्षी म्हणाले होते कि "भव्य उद्दिष्ट ठेवा , माणसाची सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःला दुर्बल समजणे , मुळातच मी दुर्बल आहे असे मानणे .चूक आहे .  माणसाचे मूळ स्वरूप शक्तिशाली , पवित्र आणि दैवी आहे . त्याच्या सवयी ,त्याच्या इच्छा ,त्याचे विचार दुबळे आणि दुष्ट असतात ,तो स्वतः नव्हे . जेव्हा लक्ष्यप्राप्ती होते तेव्हा ज्ञाता कोण आहे हे कळते , तेव्हा तुम्ही लंडनच्या घरात राहता कि जंगलात  एकांतवासात राहता या गोष्टीने काही फरक पडत नाही . भारतीय लोकांनी भौतिक उन्नतीकडे दुर्लक्ष्य  केले असले तरी भारतीयांच्या गरजा अतिशय कमी आहेत, पण भारतीय लोक युरोपियन लोकांपेक्षा कमी वस्तूत समाधानी राहू शकतो  . त्यामुळे भौतिक विकासात मागे असण्याचा अर्थ असा होत नाही कि आम्ही कमी सुखी आहोत. रामय्या नावाच्या महर्षींच्या शिष्यासोबत ध्यान करताना पॉल ब्रामटन लिहितात "माझ्या अस्तित्वावर पसरणाऱ्या वाढत्या शांतीच्या लहरीत मी यथेच्छ डुंबू लागलो  जसजसा मी माझ्या दैवी गहनतेचा अनुभव घेऊ लागलो , तसेतसे एखाद्या चित्राचे विखुरलेले तुकडे एकत्र जुळून यावेत आणि एक अर्थपूर्ण चित्र उभे  रहावे असे भासू लागले . सांसारिक जगातील सगळे बदल व साऱ्या शक्यता आपापल्या जागी चपखल वाटू लागल्या . माणूस त्याच्या गहन "स्व"मध्ये जर ठामपणे स्थिर झाला तर तो यातनांकडे शांतपणे पाहू शकतो . माणसाने आपला स्वीकार करावा म्हणून माणसाच्या प्रतीक्षेत असणारे शाश्वत दैवी संरक्षण उपलब्ध असताना क्षणिक ऐहिक आशांना घट्ट धरून ठेवणे हा शुद्ध मूर्खपणा आहे "
     पॉल ब्रामटन याच्या मुक्कामाचा शेवटचा दिवस . महर्षी समोर बसले होते पॉल ब्रामटन लिहितात "आमच्यात एकही शब्दाची देवाणघेवाण न होताही मला पुन्हापुन्हा जाणवू लागले कि महर्षींचे मन माझ्या मनाकडे  काहीतरी पाठवीत आहे . माझ्या डोळ्यसमोर महर्षींची ध्यानस्थ बसलेली आकृती तरळत होती . त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार मी त्या निराकार मानसिक चित्रात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू लागलो . माझ्या आंतरिक विश्वात एक नवे आणि शक्तिमान बळ गतिशील झाले . एक सुखद आनंदी सहज जाणीव  क्षणार्धात पराकोटीला पोहोचली . मनाच्या बुद्धीच्या , सगळ्या कृतीपासून , सगळ्या विचारापासून दूर राहून ते विचार माझंही नाहीतच असे मानून न्याहाळायचे होते .विचार कसे उठतात आणि कसें  नष्ट होतात हे पाहणे देखील पुरेशी विलक्षण गोष्ट असते . महर्षींनी कधीच असे सुचविले नाही कि विचार लक्षपूर्वक थांबवा , परंतु विचारांच्या उगमाचा शोध घ्या , असाच सल्ला ते देत .
       "मन त्यांच्या देहातीत , अलौकिक , स्रोतात उगम पावू लागले . मेंदूने  झोपेत करतो तसे काम करायचे पूर्णतया थांबविले होते .मी कोण आहे आणि काय घडत आहे याविषई मी पूर्णपणे शांत व जागृत होतो. माझ्या जाणिवेची संवेदना सर्वाना आपल्या कवेत घेणाऱ्या एका उदात्ततेत रूपांतरित झाली होती .  सध्या असलेल्या साधारण व्यक्तिमत्वापेक्षा उच्च उदात्त पातळीचे गहन असे काहीतरी दैवी अस्तित्वाच्या प्रारंभाच्या बिंदूपाशी मी परतलो .आता मी एक नवा मी बनलो होतो .पवित्र अत्यानंदाच्या मांडीवर मी विसावलो  होतो . मला माझ्या कालच्या कडवट आठवणींचा आणि भविष्यातील चिंतेचा विसर पडला होता .
   " जेव्हा मानवाला त्याच्या खऱ्या भव्य स्वरूपाचा साक्षात्कार होतो तेव्हा त्याला भरभरून आनंद  होतो . मग त्याला बाहेर कुठेच धाव घ्यावीशी वाटत नाही . कारण विचारांमध्ये व भावनांमध्ये जे योग्य उदात्त असते ते न बोलविता , न शोधता  त्याच्या पायाशी विसावलेले असते . याच तेजोवलयांकित प्रकाशात बुद्धाला ज्ञान झाले ''
     रात्र झाली होती आणि पॉल ब्रामटन  यांनी डोळे उघडले आणि महर्षींकडे पाहिले तेव्हा त्यांच्या शांत डोळ्यातील तेजाने तो अक्षरशः दिपून गेला . त्याने असे लिहून ठेवले आहे कि "भारतीय   ऋषी  परंपरेच्या या शेवटच्या ऋषींच्या डोळ्यासारखे तेज मला इतर कोणाच्याही डोळ्यात पहायला मिळाले नाही "
     अशा रीतीने पुस्तकाचा शेवट झालेला आहे हे पुस्तक एकंदर २० निरनिराळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे पॉल ब्रामटन  यांची एकंदर सहा पुस्तके  प्रकाशित झाली आहेत आणि आता इंग्लंडमध्ये त्यांच्या नावाची एक संस्था सुद्धा आहे त्यांनतर ते भारतात  येऊन गेले दुसऱ्या महायुध्याच्या काळात ते भारतात होते महात्मा गांधी यांची भेट त्यांनी घेतली होती.

लेखक : विद्याधर जोशी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...