सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

754. इगो

 नाडकर्णी वहिनींना दोन मुलगे. मोठ्ठा 'उमेश' अन धाकटा 'महेश'. दोघांच्यात प्रचंड फरक. उमेश अतिशय अभ्यासू तर महेश एकदम वांड. 'तो' शाळेत नेहेमी पहिला आणि 'ह्याचे' मात्र पास व्हायचे सुद्धा वांदे. नाडकर्णी वाहिनी महेशच्या बाबतीत कायम विवंचनेत असायच्या. शंभरदा नवस बोलल्या असतील त्या मंगेशाला. अप्पांचा तर पारा नेहेमीच चढलेला असे त्याच्या बाबतीत. बारावीला पहिल्यांदा तो नापासच झाला होता. अप्पांनी त्याला बडवूनच काढला असता, पण त्या वेळी भाऊकाका मध्ये पडले. म्हणाले, "मी घेऊन जातो त्याला माझ्याकडे." भाऊकाका आणि विमल काकीला मूल बाळ नव्हतं. दोघांनी मिळून या उनाडटप्पू च्या कधी कलाने घेत तर प्रसंगी वचक घालून अभ्यास करून घेतला आणि बारावीला परत बसवला. आणि गंगेत घोडं न्हालं एकदाचं .
      महेश कसाबसा का होईना, पण बारावी पास झाला. अप्पा भाऊकाकांना म्हणाले भाऊ फार मोट्ठे उपकार झाले रे तुझे. पुढे इलेकट्रिशिअन वायरमन चा कोर्से करून तो नोकरीलाही लागला. खटपट्या लटपट्या स्वभावानुसार मित्राबरोबर वर्किंग पार्टनरशिप घेऊन छोटी मोट्ठी वायरिंगची कामं करत असे तो. आणि आता तर एक हार्डवेअरचं दुकानही थाटल होतं त्याने अप्पांच्या मदतीने. नोकरी, दुकान सगळी कसरत तो अगदी लीलया सांभाळत होता. रीटायरमेंट नंतर अप्पांचीही सोय झाली होती वेळ घालवण्याची. दुपारपर्यंत ते दुकानात बसत असत. संध्याकाळी महेश येईपर्यंत शिवराम दुकान सांभाळत असे. पूर्वीचा वांड महेश आता नोकरी व्यवसायात चांगलाच रमला. हाच का तो उनाड महेश? असं वाटायला लागलं होतं सगळ्यांना. भाऊ काकांनी मध्यस्थी करून त्याला आपल्याकडे नेलं नसतं, तर कदाचित महेश वाया गेला असता. तो त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला होता. स्थिर स्थावर झालेल्या महेशचे लग्न ठरवले तेही भाऊकाकांनीच. विमल काकीच्या मावस भावाची मुलगी उमा. वहिनींना स्थळ पसंत नव्हते, कारण मुलगी गरीब घरातली होती. पण अप्पानी आणि उमेशनी मुलगी पसंत केली म्हंटल्यावर त्यांचे काही चालले नाही. 'उमा' शाळेत शिक्षिका होती.
    सावंतवाडीची कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातली परंतु अतिशय समाधानी आणि समजूतदार. परिस्थितीने आलेलं शहाणपण, शिकवलेली नम्रता आणि असेल त्या परिस्थितीत आनंदी राहण्याची कला तिला अवगत होती. मॅथेमॅटिक्स मध्ये युनिव्हर्सिटीत पहिली आलेली होती. स्वाभिमानी होती, पण गर्विष्ठ नव्हती. नवराही उच्चशिक्षित असावा अशी तिची माफक अपेक्षा होती, पण विमल आत्याने तिचाच पुतण्या आहे, नोकरी व्यवसायात चांगला जम बसलेला आहे, तेंव्हा नाही म्हणू नकोस असं समजावल्यावर तिनेही आपल्या अपेक्षेला मुरड घातली आणि होकार दिला. बाकी तिला स्थळ पसंत होते, महेशचा बोलका, मोकळा स्वभावही तिला आवडला होता. आणि मुख्य म्हणजे त्यांची परिस्थिती ओळखून लग्नाचा सगळा खर्च तेच करणार होते. तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्यायचा असं अप्पा म्हणाले होते. तिच्या आजारी विकलांग बाबांच्या डोक्यावर कसलाही भार पडणार नव्हता, हे तिच्या होकाराचे फार मोट्ठे कारण होते. अशी समजूतदार उमा आणि अगदी त्याविरुद्ध उमेश ची बायको 'नंदिनी'. स्वतःच्या शिक्षणाचा, रूपाचा प्रचंड गर्व. उमेश आणि ती दोघंही अतिशय महत्वकांक्षी आणि उच्चशिक्षित. दोघंही आय टी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत. मिळणाऱ्या सहा आकडी गलेलठ्ठ पगाराने नंदिनी चा इगो हि चांगलाच लठ्ठ झाला होता. माहेरही तालेवार गर्भश्रीमंत. माहेरच्या त्या श्रीमंतीचा एक 'अहं' घेऊनच ती या घरात आली होती. नाडकर्णी वहिनींना ही या श्रीमंत सुनेचे कोण कौतुक. उमेशला लग्नात सासऱ्याने गाडी आणि फ्लॅट दिला म्हणून जास्तच कौतुक. चार चौघात त्या हे बोलून दाखवत त्याबद्दल काही नाही पण हे बोलताना त्या उमाकडे तिरपा कटाक्ष टाकत. उमाला वाईट वाटे, पण त्याकडे दुर्लक्ष कसे करायचे हे तिला चांगलेच ठाऊक होते. तिची आई तिला नेहेमी सांगे "हे बघ उमा आपल्याकडे जे नाही, त्याची खंत करायची नाही; आणि जे आहे, त्याचा माज करायचा नाही. जीवनाच्या शर्यतीत प्रयत्न शंभर टक्के करायचेच, पण तेवढे यश नाही मिळाले, तर त्याचे दुःख करत बसायचे नाही. अपयशाची करणीमिमांसा करायची आणि पुढच्या गोष्टीसाठी परत शंभर टक्के प्रयत्न करायला उभे राहायचे. आयुष्य म्हणजे पावलोपावली लढाई असते बघ; ती लढताना प्रत्येकाला कुठे ना कुठे कधी ना कधी तडजोड करावीच लागते; अगदी देवादिकांना हि ती चुकली नाही बरं का; असं म्हणून; पात्रता असूनही कोवळ्या लहान वयात समाजाकडून सहन कराव्या लागलेल्या अन्यायाच्या, अवहेलनेच्या आणि त्याला तोंड देत आपल्या वागणुकीतून समाज प्रबोधन करून आपली पात्रता सिद्ध करणाऱ्या 'ज्ञानेश्वरांचे' उदाहरण देत असे ती. हे बघ बाळा 'ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले' हे नेहेमी लक्षात ठेव."
    आई गेली तरी तिचे हे शब्द उमाच्या मनात कायमचे कोरले गेले होते. आणि तोच मंत्र घोकत ती इथवर आली होती. तिची जडणघडणच तशी झाली होती. नाडकर्ण्यांच्या घरात आज अगदी सुन्न वातावरण होते. स्वतः नाडकर्णी वहिनी तर अतिशय हताश दिसत होत्याच, पण नेहेमीच तोऱ्यात असलेली नंदिनी आज थोडीशी का होईना पण नरमलेली दिसत होती. त्याला कारणही तसंच भयानक घडलं होतं. नंदिनीच्या मुलीने 'इशा' ने आज गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. तिला बारावी नंतर आर्ट स्कुल ला जायचे होते. आर्ट्स आणि क्राफ्ट्स हा तिचा जिव्हाळ्याचा विषय. सायन्स, मॅथ्स ह्याच्याशी तिचा छत्तीसचा आकडा होता. आणि नंदिनीला मात्र तिने इंजिनीरिंगलाच जाऊन हवे होते. आणि ते सुद्धा आय टी इंजिनिअरिंग. सगळ्या विषयांना स्पेशिअल ट्युशन्स, तरतऱ्हेच्या नोट्स, पुस्तकं सगळं काही नंदिनी करत होती. पण तरीही इशाला मनाजोगते मार्क्स पडत नव्हते. युनिट टेस्ट, टर्मिनल, प्रिलिम दर वेळेस तीच तऱ्हा. मग नंदिनीची चिडचिड, आदळआपट, इशाची रडारड आणि उमेशचे मधल्यामध्ये होणारे सँडविच. पण नंदिनीच्या पुढे बोलायची सोय नव्हती. आणि त्याच्या शब्दाला काडीची किंमतही नव्हती. तिचा स्पर्धात्मक आणि आक्रमक स्वभाव त्याच्या चांगलाच परिचयाचा होता. आणि असं सगळं झालं कि प्रत्येक वेळी इशा काकूकडे धाव घेई. नंदिनीने आपल्या सासू सासऱ्याशी सुद्धा नातं जोडलं नव्हतं, तिथे जावेचं काय! पण मॅथेमॅटिक्स शिकवण्यात उमाचा हात कुणी धरू शकत नव्हतं म्हणून नाईलाजानं तिनं इशाला तिच्याकडे पाठवलं होतं. मॅथ्स शिकताना इशाची काकूशी फार जवळची गट्टी झाली होती. शिक्षक या नात्यापेक्षा एक मैत्रीचं, प्रेमाचं आश्वासक असं नातं तयार झालं होतं दोघीत अगदी नंदिनीने कसोशीने तसं न होण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा. नंदिनी उमाला दर वेळेस सुनावून दाखवे "माझ्या मुलीची आई होण्याचा प्रयत्न करू नकोस" म्हणून. नंदिनीला अगदी कानकोंडं होऊन जाई. इकडे आड तिकडे विहीर. तिला इशाने आधारासाठी मागितलेला हात दिसत होता आणि नंदिनी मात्र तो आधार तोडून टाकायला बघत होती. फक्त बारावी शिकलेला दीर आणि गरीब घरातली जाऊ हे सगळं नंदिनीला बिलो डिग्निटी वाटत असे. अतिशय तुच्छ लेखत असे ती त्यांना. परंतु महेश काकाची लाडकी होती इशा. महेश आणि उमा त्यांच्या परीने इशाचे कोडकौतुक करत असत. उमाची मुलगी मानसी हि देखील इशाच्या बरोबरीची होती. त्यामुळे इकडे येण्याचं ते आणखीन एक कारण होतं इशासाठी. मानसी कॅटरिंग कॉलेज जॉईन करणार होती. बारावीचा रिझल्ट लागला आणि इशाला जेमतेम मार्क्स मिळाले ते सुद्धा उमाने मॅथ्स करून घेतलं म्हणून अन्यथा कठीणच होतं तिचं. आणि एंट्रन्स एक्झॅम मध्ये ५० टक्के पडले होते. झालं. नंदिनीच्या रागाला पारावार उरला नव्हता तिनं नेहेमीप्रमाणे इशाला टोचून बोलायला सुरुवात केली. "आई बाप आय टी इंजिनीअर आणि मुलीला मार्क किती तर पन्नास टक्के!!" बोल बोल बोलली तिला ती. अगदी आमचे पैसे फुक्कट घालवलेस इथपासून आमचं नाक कापलस इथपर्यंत. आणि मग तशीच तणतणत ऑफिसला निघून गेली.
     उमेशला एक अर्जंट मिटिंग होती म्हणून तो सकाळीच टाऊन साईड च्या ऑफिसला गेला होता. उमाला इशाची अतिशय काळजी वाटत असे. प्रसंगी चार अपमानित करणारे शब्द ऐकून घेऊनही तिने तो आधार ठाम उभा ठेवला होता. इशाच्या डोक्यात आईचे शब्द वादळासारखे घोंघावत होते. सततच्या घालून पडून बोलण्यामुळे तिचा आत्मसम्मान साफ लयाला गेला होता. अतिशय निराश झाली होती ती. नंदिनीच्या धारदार महत्वाकांक्षेपोटी इशा फरपटली जात होती आणि शेवटी ती फरपट, सततचे टोचणे सहन न होऊन तिने आज जीव देण्याचा प्रयत्न केला होता. केवळ उमा मुळेच ती आज वाचली होती. उमा ला तिच्या मानसिक स्थितीची कल्पना असल्यामुळे ती दुपारी तिला भेटायला गेली आणि त्याच वेळेस मोलकरणीने जाताना तिला सांगितलं कि ताई मी जाते आता माझं काम झालाय. कपडे भांडी सगळं झालं. इशा बेबी नं सांगितलंय त्या झोपनार हाईत त्यांना डीशटरब करू नका म्हनल्यायती.उमानं आत जाऊन खोलीचं दार ढकललं तर इशा उंच स्टुलावर उभी राहून गळ्यात फास अडकवायच्या तयारीतच होती. अचानक काकूला आलेलं पाहून ती दचकली अन धाय मोकलून रडू लागली. तिला खाली उतरवून जवळ घेऊन शांत करेपर्यंत घराचा मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला. लॅच कि ने दार उघडून उमेश आणि दोन लेडी पोलीस ऑफिसर्स धावतच घरात शिरल्या. इशाने आत्महत्या करायच्या आधी तिच्या मैत्रिणीने दिलेल्या सल्ल्यानुसार आईच्या द्वेषापोटी 'मेंटल' हॅरॅसमेंट साठी आईविरुद्ध फोनवरून पोलीस कम्प्लेंट केली होती आणि भावनेच्या भरात मी आता आत्महत्या करतीय असं पण म्हणाली. त्यामुळे पोलिसांनी फोन नम्बर ट्रेस करून ऍड्रेस शोधून इकडे धाव घेतली होती. आणि उमेश मिटिंग संपवून काही कागदपत्र घेण्यासाठी म्हणून नेमका त्याच वेळेस घरी आला.
     आपल्याच घरात पोलीस येतायत हे पाहून तो मुळापासून हादरला. त्याने ताबडतोब फोन करून नंदिनीला पण बोलवून घेतले. मग पोलिसांनी इशाशी गोड बोलून तिच्या मनातलं सारं काही काढून घेतलं. कमालीचा संताप, द्वेष व्यक्त केला होता तिनं आईबद्दल. ती त्वेषानं जोरजोरात ओरडत, संतापानं थरथरत रडत बोलत होती. वर्षभर सहन केलेला पराकोटीचा ताण, वाह्यलेलं अपेक्षांचं ओझं तिनं त्याच तीव्रतेनं आईवर भिरकावून दिलं होत. आणि ते सगळं सहन न होऊन ती चक्कर येऊन पडली. तिला शुद्धीवर आणून पोलिसांचा मामला निस्तरेपर्यंत संध्याकाळ झाली होती. मला इथे थांबायचं नाही आता असं म्हणून ती काकूबरोबर त्या घरी निघून गेली. एवढं होऊनही खजील वाटण्याएवजी उलट नंदिनी कमालीची अपमानित झाली होती. पोलिस स्टेशन मध्ये नेऊन केलेली कानउघडणी आणि इशाने उमाशी केलेली जवळीक या दोन गोष्टी तिला अंकुशासारख्या टोचत होत्या. पोलीस स्टेशन ची वारी टाळण्यासाठी तिने आणि उमेश ने वरती ओळख लावायचा प्रयत्न केला होता, पण आत्महत्येच्या प्रयत्नाची केस म्हंटल्यावर सगळ्यांनी हो हो केलं, पण प्रत्यक्षात काम कुणीच केलं नाही. परिस्थितीने मारलेल्या चपराकीचा राग नंदिनीच्या चेहेऱ्यावर स्पष्ट वाचता येत होता. वर पोलिसांनी एका कौन्सिलरचा फोन नम्बर दिला आणि इशा, उमेश आणि तिने त्यांना जाऊन भेटायचं आणि त्याला पर्याय नाही असे निर्णायकपणें बजावलं होतं. इशा आणि नंदिनी दोघींकडूनही सद्वर्तनाची लेखी हमी घेऊन त्या अटीवरच आत्महत्येच्या प्रयत्नांची केस नोंदणार नसल्याचं सांगितलं होतं. ते या केसचा फॉलो अप घेणार असंही ते म्हणाले. इशा थोडी शांत झाल्यावर दोन दिवसांनी अपॉइंटमेंट घेऊन तिघंजणं कॉऊन्सिलरला भेटायला गेले. न जाऊन चालणारच नव्हतं. पोलिसी बडगा डोक्यावर होता अन्यथा नंदिनीसारखी आढ्यताखोर बाई जायला तयार होणं शक्यच नव्हतं. त्या लेडी कॉऊन्सिलर म्हणजे दहावी नंतर ज्यांच्याकडे इशाची ऍप्टिट्यूड टेस्ट केली होती, त्या देशमुख मॅडमच निघाल्या. अपॉइंटमेंट घेतेवेळी काही ऍप्टिट्यूड टेस्ट केली असेल तर त्याचा रिपोर्ट प्रत्यक्ष भेटीच्या वेळी घेऊन येण्यास त्यांनी सांगितलं होतं. पोलिसांतर्फे या केसची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच होती. आणि पोलिसांनी फॉलोअप करण्यासाठी या केसचा रिपोर्ट त्यांना द्यायला सांगितला होता. भेटीच्या दिवशी बोलण्याच्या ओघांत त्यांनी तो ऍप्टिट्यूड टेस्ट चा रिपोर्ट बघायला मागितला. आणि तो बघताच त्या विस्मयाने नंदिनी आणि उमेश कडे पाहू लागल्या. इशाची न्यूमरिकल स्किल्स अगदीच पुअर होती. अनॅलिटीकल माईंड नव्हतंच तिचं. परंतु तिच्याकडे क्रीएटीव्ह आणि व्हर्बल स्किल्स चांगली होती. रिपोर्ट क्लीयरली सांगत होता कि, इंजिनीरिंग इज नॉट सुटॆबल फॉर हर. पण नंदिनीने त्या रिपोर्टला काडीचीही किंमत दिली नव्हती. नंतर देशमुख मॅडम; इशा, उमेश आणि नंदिनीला वेगवेगळं घेऊन त्यांच्याशी बोलल्या. काही दिवसांच्या फरकानं आणखीन चार पाच सेशन्स झाली. आता इशा खूपच स्टेबल झाली होती आणि तिने पक्का निर्णय घेतला होता कि, ती आर्ट स्कुललाच ऍडमिशन घेणार. तसंही मिळालेल्या मार्कांच्या आधारावर तिला डिग्री इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली नसतीच. पण नंदिनी आपला हेका सोडायला अजूनही तयार नव्हती. ती तिच्या मागे लागली होती कि, दहावीच्या मार्कांच्या आधारावर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घे म्हणून. उमेशही तिला समजावून थकला होता आता. इशाने काकू कडे राहायची इच्छा व्यक्त करतांच उमेशच्या संमत्तीने महेश आणि उमा ताबडतोब तिला आपल्याकडे राहायला घेऊन गेले. भाऊ काकांचा रोल आज महेशच्या वाट्याला आला होता. आणि तो साकारताना आज महेशला एक वेगळंच आंतरिक समाधान जाणवलं होतं. 'हिस्ट्री रिपीटस' असं काहीसं उमा पुटपुटली.
     शेवटी देशमुख मॅडमनी उमेशला बोलावून स्पष्ट शब्दात सांगितलं कि, तुमच्या मुलीला नाही; परंतू तुमच्या बायकोला कौन्सिलिंग ची नितांत आणि लॉन्ग टर्म गरज आहे. चिक्कूच्या झाडाला सफरचंद लागावं अशी अपेक्षा करतायत त्या. असं होईल का कधी सांगा बरं ! चिक्कूची गोडी वेगळी आणि सफरचंदाची चव वेगळी. दोन्ही आपापल्या परीनं उत्तमच आहेत. नाही का? उमेशला सगळं पटत होतं पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
इतक्या उच्चशिक्षित स्त्रीला आपल्या मुलीचं मन कळू नये? कल ओळखता येऊ नये ? कुणाला सांगितलं तर अतिरंजित गोष्ट आहे म्हणतील पण प्रत्यक्षांत असं घडतं. होय घडतं. माणसातला 'इगो' इरेला पेटला कि अगदी काहीही घडू शकतं. माणसाच्या दर्शनी चेहेऱ्यामागे एक खूप खोल अशी मन नावाची गुहा असते. त्यात निरनिराळी जनावरं नांदत असतात. आणि त्यातलीच काहीं क्रूर जनावरं कुरघोडी करून माणसाला आपली शिकार बनवतात. आपण वेळीच सावध होऊन त्यांना जेरबंद करणं आवश्यक असत. नंदिनीतल्या आईला तिच्यातल्या महत्वाकांक्षी आणि हेकेखोर बाईनं ठार मारलं होतं. आज नंदिनी तिच्या मुलीला हरवून बसली. आयुष्यभरासाठी एक मोट्ठी दरार त्या दोघींच्या नात्यात पडली होती. जीवनात अनेक अश्या छोट्या छोट्या गोष्टी असतात कि ज्यात आपण थोड्या काळासाठी का होईना 'नंदींनी' होत असतो. पण तीच वेळ असते बदलायची अन्यथा आपण मूठ घट्ट आवळून बसतो अन तिथेच सारं बिघडतं. बोटांमधल्या फटीतून हळू हळू सारंच निसटतं!!!

संगीता मुकुंद परांजपे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...