(एका आईचं आपल्या दूर असलेल्या लेकीशी केलेलं एक मूक संभाषण आहे हे. याला सुमारे 19 वर्षे होऊन गेलीत)
आठवते आहे ती संध्याकाळ, जेव्हा तुझ्या वडिलांनी एक दिवस golf course वरून येऊन मला सांगितलं," मानसी जानेवारीच्या आठ नऊ तारखेला लग्न करतेय अश्विन बरोबर. तिचा फोन आला होता मी golf खेळत असताना. मी चक्रावून यांच्या तोंडाकडे बघत राहिले अन मग यांचा चेहेरा समोर असूनही दिसेनासा झाला.मन झोक्यासारखे इकडे तिकडे हेलकावे घेऊ लागले.अचानक कानात शब्द घुमले," मी मां ला घेऊन कुठे जाणार आहे?"दोन वर्षांची सुद्धा नव्हतीस तू; पण "मां ला घेऊन कुठे जाणार आहे?"मला तयार झालेली पाहिली की असा तुझा प्रश्न असायचाच. आपण आईबरोबर जाणारच आहोत हे सांगण्याची ही तुझी पद्धत. आई आपल्याला मागे एकटी तर सोडणार नाही ना, ही मनातली भीती तू अशी शब्दांकित करायचीस. सन २००४ नोव्हेंबरची ती सायंकाळ. आपल्या लेकीच्या लग्नाला आपण जाण्याची शक्यता सुद्धा नाही हे मला उमगलं. "बाबुल की दुआएं लेती जा!"या गाण्याच्या पार्श्वभूमीवर मी तुझी पाठवणी करणार होते. तू रडणार नव्हतीस हे मला माहित होते, मात्र माझ्या आईच्या गळ्यात पडून मी निश्चितच रडणार होते. दोन की तीन तास गेले अन् मला अनावर रडू कोसळले. मग कुठल्याशा तंद्रीत दिवस रात्र जाऊ लागले. त्यावेळी आम्ही मुंबईत होतो.
आठ जानेवारीला मी पुण्यात आले होते. रात्री कधीतरी माझे डोळे उघडले. अचानक दोन्ही हात आशीर्वादासाठी उचलले गेले. या क्षणीच लग्न होत असेल तुझे असे मनात आले. तुझ्या जन्मापासून तुझ्या भावी आयुष्याबद्दल खूप स्वप्न जोपासली होती मी. हिला गायन आणि नृत्य अवश्य शिकवीन. माझी ती अतृप्त इच्छा! ही आपल्या पायांवर नक्कीच उभी राहील. ज्या क्षेत्रात तिला आवड असेल, त्याच क्षेत्रात तिला अभ्यास करू देईन. मानसिक आणि आर्थिक स्वातंत्र्य दोन्हीही मला खूप महत्त्वाची वाटायची आणि आजही वाटतात. छोटे छोटे बोलत कधीतरी आपल्या दोघीतल्या संभाषणाला सुरुवात झाली. मुंबईत असताना काही दिवस मी नोकरी केली होती. मी नोकरीवर गेले की, माझ्या मागे माझी एखादी साडी तू घट्ट धरून घरात फिरायचीस. माझं पुन्हा घरात पाऊल पडताच ती साडी भिरकावली जायची. दिवस उलटत गेले. मधल्या काळात तुझ्या छोट्या भावाचं आगमन. रोज आपल्या दोघीत एखादी तरी गंमत जंमत व्हायचीच. तुझी शाळा सुरू झाली. मुंबईत नर्सरीचे एक वर्ष गेले. तू नर्सरी मध्ये असतानाची एक आठवण. तुला शाळेची बस लावली होती. एक दिवस शाळेतून फोन आला की तुला न घेताच बस निघून गेली आहे आणि मी तात्काळ शाळेत येऊन तुला घेऊन जावे. मी धावत पळत शाळेत गेले. तुला शाळेच्या ऑफिसमध्ये बसवले गेले होते. मी पोहोचले तेव्हा तुझ्या गालावर एक अश्रू ओघळलेला होता. मी तो हळूच पुसला तेव्हा तू म्हणाली,"तू लवकर येणार नाहीस असे मला वाटले म्हणून हा थेंब कुठून तरी आला."
मागे वळून बघताना मला वाटते तो अश्रू म्हणजे तू मला दिलेली एक अमूल्य भेट होती. तो एखाद्या डबीत जपता आला असता तर किती छान झाले असते. असो. तुझ्या वडिलांच्या एकापाठोपाठ एक बदल्या होत गेल्या. बदलत्या गावा शहरांबरोबर बदलत्या शाळा. बोलकी बडबडी पोर होतीस तू. कधीतरी कालांतराने मलाही नकळत शांत व एकांत प्रिय बनू लागलीस. खूपच समंजस व शहाणी झालीस तू! आज मला त्याची हळहळ वाटते. तू अल्लडपणे आपले बालपण आणि तारुण्य जगलीस का? मला उगाच या गोष्टीची राहून राहून खंत वाटते! माझं आयुष्य कधीकधी तारेवरची कसरत व्हायचं. तो तोल सांभाळायला तू माझी खूपच मदत केलीस. ते तेव्हा मलाही कळलं नाही. त्यामुळे तुला एकाकी, असुरक्षित वाटलं का? मी कमवायला लागल्यापासून खूप कसोशीने बचत करत राहिले. तुम्हा मुलांच्या भावी आयुष्यासाठी आर्थिक दृष्ट्या तुमचं भविष्य काही प्रमाणात तरी सुरक्षित व्हावं म्हणून. त्या भविष्य घडवण्याच्या धडपडीत मी तुझा वर्तमान काळ कधी दुर्लक्षित केला का? आयुष्याच्या या वळणावरून मागे बघते, तेव्हा मला असेच काहीसे वाटते. चुकले का माझे? मला क्षमा करशील तू? जेव्हा जेव्हा तुझा छोटू कला चेहरा आठवतो तेव्हा तेव्हा पापण्या ओलावतात माझ्या. तुझे दहावीचे वर्ष, मग बारावीचे वर्ष. तुला साहित्याची ही आवड, पर्यावरणाचीही आवड आणि वास्तुशास्त्राचीही. वास्तुशास्त्र केल्यानंतरही पहिल्या दोन्ही गोष्टी शिकता येण्यासारख्या; मात्र पहिल्यांमधली एखादी शाखा निवडल्यानंतर वास्तुशास्त्र करता येणार नव्हते. शेवटी वास्तुशास्त्राला सुरुवात केलीस. तिसऱ्या वर्षाला असताना तुझी अन अश्विन ची ओळख झाली. त्या आधीपासून मी व तुझी मावशी मनोमन तुझी कुणाकुणाशी जोडी जमवत असू! ऐकलं तर तुला गंमतच वाटेल. तू आणि अश्विन एकमेकांच्या बाबतीत सिरीयस आहात हे ऐकल्यावर मला आकाश ठेंगणे झालं. ही गोष्ट मला तुझे वडील पुण्याचे पोलीस कमिशनर असताना समजली. आधी मला वाटलं, अश्विन पुण्याचाच. मग समजलं, तो पुण्यात होस्टेलमध्ये राहून इंजिनिअरिंग करतोय. आई वडील बेंगलोरला असतात. माझा थोडासा विरस झाला पण अगदी थोडा. माझ्या उत्साहाला उधाण आलेलंच होतं. त्यात मला माझ्या आजीचा स्वभाव मिळालेला. आधीपासून तिने आपल्या नातीसाठी म्हणजे माझ्यासाठी कसली कसली जुळवा जुळव केली होती! मी तुझ्यासाठी सुरू केली. हाताने पॅचवर्क चे बेड कव्हर शिव applique चे कुशन कव्हर्स बनव, भरत काम केलेल्या वस्तू बनव, हात मागाच्या प्रदर्शनांमधून तुझ्यासाठी सुरेख वस्तू विकत घे. असे सगळे सुरू केले. चक्क दोन पेट्या भरून गेल्या. सुतावरून स्वर्ग गाठला. मग समजले की अश्विन पुढील अभ्यासासाठी अमेरिकेला जाणार आणि त्याच्या पाठोपाठ तू देखील! बहुधा तो तिथेच नोकरी करेल! सगळे अवसान गळून पडले! पुढील अभ्यासासाठी तू गेलीस अमेरिकेला. तुझ्यासाठी हौसेने गोळा केलेल्या सामानाच्या पेट्या कुलूप लावून पडून राहिल्या. आम्हा पती-पत्नी बरोबर गावोगावी फिरल्या. मध्ये एकदा सुमारे वर्षभरानंतर तू येऊन गेलीस भारतात. तुझ्या भावी सासरी म्हणजे बेंगलोरला आपण सगळे जाऊन आलो. लग्नाची तारीख ठरवण्याचा प्रयत्न केला मात्र काही जुळून आले नाही. अमेरिकेला जाण्याआधीच तुझ्या स्वभावातला बदल मला जाणवू लागला होता. तू चिडचिडी झाली होतीस. तुझ्यातली सहनशीलता कमी होत जात होती. याला कारणीभूत माझी प्रकृती होती का? काही का असेना, तू आलीस आणि भरकन निघूनही गेलीस. मित्र मैत्रिणी व शॉपिंग याच्यातून माझ्याबरोबर गप्पांसाठी वेळ उरलाच नाही. दिवस सरता सरता तुझं शिक्षणही संपलं. तुला अवॉर्डही मिळालं. खूप आनंद झाला. त्या आधी तुझा तो फोन. अश्विन व तू तिथे लग्न करून घेणार. लग्न झाल्यावर मी ईमेल मध्ये विचारले,"इथून नेलेल्यांपैकी कुठली साडी नेसलीस? केसांची काय स्टाईल केलीस?"
"साडी कसली नेसायची? वेळ कुठे होता? शर्ट पॅन्ट वरच रजिस्ट्रेशन झालं. पायात शूज. केसात कापडी इलॅस्टिक बँड."तुझे अगदी शुष्क व्यावहारिक उत्तर. सूट केसेस भरून पडलेल्या पणजी खापर पणजीच्या काळातल्या शुद्ध सोन्याच्या जरीच्या लेसेस, काठ, फुलं जाळ्या या सगळ्यातून मी तुझ्यासाठी सुरेख साड्या आणि ब्लाऊज डिझाईन करणार होते. सामान आवरताना पुन्हा एकदा त्या सूट केसेस मध्ये डांबराच्या गोळ्या टाकल्या. त्याला कपड्यात गुंडाळलं. काही महिन्यांच्या कालावधीनंतर तू आणि अश्विन ने कळवले की, तुम्हा दोघांचे वैदिक विधीने लग्न व्हावे अशी त्याच्या घरच्यांची इच्छा आहे. शेवटी 2004 चा 15 डिसेंबर हा शेवटचा शुभ मुहूर्त आहे हे कळले. त्याला अजून आठ महिने होते; मात्र माझ्यात एक नवाच हुरूप आला. तू याद्या पाठवू लागलीस. आमच्या घरासाठी मला क्रोशे चे lamp shades हवेत...futon cover हवा... पडद्यांची माप आली.. कर्टन होल्डर म्हणून मी क्रोषेच्या लेसेस बनवून घेतल्या. माझ्यासाठी मल्टीमीडिया वापरून फ्रेम्स बनव. इत्यादी इत्यादी. येणाऱ्या जाणाऱ्या बरोबर मी वस्तू पाठवायला सुरुवात केली. अगदी थेट पारंपारिक भारतीय वस्तू... कारागिरांच्या प्रदर्शनांमधून घेतलेल्या. फॅब इंडिया मधले टॉप देखील अगदी एथनिक. तुझ्या लग्नाच्या निमित्ताने मला खूप मित्रमंडळींना, तुझ्या वडिलांच्या सहकाऱ्यांना , सासर माहेरच्यांना आवर्जून भेट वस्तू द्यायच्या होत्या. केव्हापासून मी याची तयारी केली होती. गावा शहरानुसार याद्या केल्या. प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विचार केला. सरसकट असं होलसेल मध्ये काहीच घेतलं नाही. अगदी मनापासून खूप वस्तू स्वतःच बनवल्या. वेगवेगळ्या हात मागाच्या प्रदर्शनांमधून साड्या गोळा केल्या होत्या. याच प्रसंगासाठी वेळोवेळी स्वतःच्याच कमाईतून सोन्याची नाणी घेतलेली होती. त्यातून आईसाठी सोन्याच्या मण्यांचं काळ्या दोऱ्यातलं गंठण, थोरल्या जाऊ बाईंसाठी तसंच, तुझ्या मावशी साठी मोती व पोवळ्याची कर्णफुले, रुनझुन साठी कर्णफुले. माझ्याकडे असलेल्या जुन्या सोन्यातून छोटे छोटे मात्र अगदी पारंपारिक असे तुझ्यासाठी दागिने बनवले. तुझ्या भावी सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या विधींसाठी लागणाऱ्या साड्या घेतल्या. एक नऊवारी देखील. हे सगळे करताना तुझी मावशी बरोबर असायची. तुझ्या सासुबाईंनी मुद्दाम सांगितले होते की साडीत काळा किंवा पांढरा दोरा नको तरीही चुकून दोनदा आम्ही दोघींनी नेमक्या काठात काळ्या दोऱ्याची वीण असलेल्या साड्या आणल्या! धडपडत पुन्हा गेलो परत करायला आणि बदलून आणायला!
सप्टेंबर मध्ये तुझे वडील महाराष्ट्राचे DGP झाले आणि स्वप्नातही सांगून खरे वाटले नसते असे घडले! आम्हाला पुन्हा "सुरुची" मध्ये जिथे दहा वर्षांपूर्वी होतो तोच फ्लॅट मिळाला. इतके दिवस मुंबईत आम्ही भाड्याच्या घरात रहात होतो. तेच अतिशय जिवलग सख्खे शेजारी. या फ्लॅटमध्ये अगदी मोजून सात महिने राहायला मिळणार होते मात्र माझा उत्साह उसंडून वाहत होता. घर बदलताना इतका आनंद कधीच झाला नव्हता. पुन्हा जोमाने घर सजू लागले. लग्नाच्या वेळी पाहुणे येतील, तुम्ही दोघेही याल या दृष्टीने घर खूप सुंदर स्वच्छ दिसले पाहिजे. अगदी कानाकोपरा सुद्धा! ममताने, माझ्या सख्ख्या शेजारीणीने सांगितल्याप्रमाणे लिफ्टच्या बाहेरची आमच्या दोघींच्या घरासमोरील लँडिंग देखील खूप सजवली गेली. तिच्या दिवंगत आईची यावेळी खूप आठवण आली. सर्व काही सजवताना काय करू आणि काय नको असे झाले! ममता चे घर देखील सजवायचे होते की! ममताच्या मुलांना देखील तेवढाच उत्साह. ज्या दिवशी तू येणार, त्यादिवशी बेडरूम मध्ये कुठले बेडकवर आणि पडदे? हे पंख्याच्या डिझाईनचे बेड कव्हर की दुसरे कुठले? मग त्याला मिळते जुळते पडदे! पिवळे गुलाब, पिवळी शेवंती, हे सिरामिकचे फ्लावर पॉट, ही पितळी फुलदाणी, हे जुना राजस्थानी तोरण. कुठे दिवस उगवत होता कुठे मावळत होता. मी घराच्या मध्यभागी उभी अन नजर भिरभिरती. किचन मध्ये ऑरेंज लॅम्प शेड अन हो भिंतीवरचे निळे सिरामिक चे कॅन्डल स्टॅन्ड, एका कोपऱ्यात या चार छोट्या छोट्या फ्रेम्स,ही सिरमिकच्या टाइल्सवर असलेली खुंटी, पिवळे केशरी फुट मॅट, अन हो बाथरूम देखील बैठकी इतकेच सुंदर आकर्षक दिसायला हवेत. तर हे मोठे टावेल... इथेही छोट्या फ्रेम्स... सोप डिश नवीन हवी... काचेच्या शेल्फ वर फ्लावर पॉट देखील. स्नेहल ला सांगेन तिच्या तिथल्या फुल वाल्याला सांगायला की दर दोन दिवसांनी ताजी फुले पाने आणून देईल. तुझे ब्लाऊज शिवायला नाशिकचा टेलर येऊन राहणार होता. सुटकेस मधल्या laces, काठ निघाले. या ब्लाऊज वर हे काठ छान दिसतील. यावर ही लेस. अरे हो, अश्विन साठी चु डीदार कुडते आणायचेत ना. दिवसभराचे वर्णन रात्री मी तुला ई-मेलने कळवी. एकदा तू म्हणालीस,"पुरे आता ही तयारी!"आणि मी उत्तर लिहिले,"इस पल की छांव में उसे पल का डेरा है, ये पल उजाला है बाकी अंधेरा है, इस पल को खोना ना, ये पल ही तेरा है, जीने वाले सोच ले, यही वक्त है,
कर ले तू पूरी आरजू.
आगे भी जाने ना तू,
पीछे भी जाने ना तू,
जो भी है बस यही एक पल है।"
खरंच माझ्या आयुष्यातले तेच स्वर्णिम क्षण होते.
तुला कुठल्या फ्रेम्स आवडतील? अरे बांगड्या कुंकू आणायचं की आणि मग एखाद्या संथ क्षणी मनात विचार डोकावे, वेडे सावधान! अगदी चूटकी सरशी हे दिवस संपतील. मग इथेच उभी राहून भरल्या डोळ्यांनी या सजलेल्या भिंती निरखशील, चुरगळलेले घर आवरशील. तेही काही दिवसांसाठी! सेवानिवृत्ती येऊनच ठेपलीये. हळूहळू बंजारे इथूनही निघतील.शेवटच्या मुक्कामासाठी. अन तसेच झाले. तुम्ही दोघे झंजावाता सारखे आलात... बरोबर पाहुणेही आले... घर भरलं... लग्न घर... लगीन घाई. हातापायांवर मेंदी रचली गेली तुझ्या.. मग बेंगलोरला प्रस्थान. तिथले सोहळे. तुझे कपडे, साड्या, दागिने, बांगड्या, तुझा साधाच पण मोहक शृंगार हेच माझं विश्व बनलं. खूप जुन्या स्टाईलने तुझे ब्लाउज बनवले होते मी! माझी बालिका वधू ती! माझ्या मनात जसे आले तसेच तुझ्या मावशीच्याही. लग्न लागलं अन् मनाचा बंधारा फुटला. आईच्या गळ्यात पडून मी रडले. एक माता दुसऱ्या मातेला रडत रडत सांगत होती, हीच ती जगरीती. मग मुंबईचा स्वागत समारंभ. दुसऱ्या दिवशी दोन दिवसांसाठी तू पुन्हा सासरी गेलीस. तू आल्यानंतर दोन दिवसांनी अश्विन आला. शेवटचे दोन दिवस मी अखंड बडबड केली. कुठले कुठले विसरलेले प्रसंग आळवीत बसले. त्या बडबडी मागे मला लपवायची होती मनाची अस्वस्थता, तुझ्या विरहाचे अश्रू आणि काय काय! तुला विमानतळावर आणायला चालले होते ना त्या दिवशी अति उत्साह अन हजार शंका कुशंका लपवायला मी अशीच बडबड केली होती
आता तू खरोखरच मला परकी झालीस का?
तुला हक्काने काही सांगण्याचे दिवस गेले का?
"चला सामान उचलायला लागा." तुझ्या वडिलांची हाक. मी शेवटच्या क्षणी तुझ्या नऊवारी कांजीवरमच्या साडीच्या दोन राजया शिवल्या होत्या. अश्विनने घेतलेली पुस्तके काढून तू त्या सुटकेस मध्ये कोंबल्या. ही पुस्तके नंतर मी सीमेलने पाठवणार होते. सगळे निरोपासाठी खाली आले. विमान पहाटे निघणार होते. मला विमानतळावर जाण्यापासून सगळ्यांनी परावृत्त केले. तुझे वडील व तुझा भाऊ गाडीत बसले आणि तू व अश्विन देखील. आता हा विरह किती दिवसांचा? माझ्या चिमण्या पाखरा, परत कधी येशील माहेरवासाला? तुझं माझं आकाश वेगळे झाले आहे. तुझ्या आकाशात तू मुक्त भरारी घे; पण कधीतरी विसाव्याला या घरट्यात येत रहा. तुझ्याकडे सूर्य उगवतीला येतो, तेव्हा माझ्याकडे तो मावळतीला जातो. म्हणजे आकाश वेगळेच झाले ना? क्षितिजे वेगळीच झालीत ना? आज माझी मुलगी कित्येकदा तिच्या सासरी भारतात येते मात्र मला साधा फोन देखील करीत नाही. हे अमेरिकेचे पाणी म्हणावे की माझे प्राक्तन?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा