माझा स्वयंपाक चालू होता. इतक्यात लेक धावत आली, "आई, मधू मावशीचा फोन आलाय."
मी कणीक मळत होते. लेकीला म्हणाले टाक स्पिकर वर.
कामाचं बोलून झाल्यावर गाडी आपोआप जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळली..आज स्वयंपाक काय केलास ??
मी म्हणाले...भरीत.
मैत्रिण म्हणाली, "मी पण आज भरीत आणि श्रुती कडे पण आज भरीत." या वर आम्ही दणदणीत हसलो.
इतका वेळ मुलगी माझा स्पिकरवर टाकलेला फोन हातात घेऊन उभी होती. ती, काय विचित्र बायका आहेत, कशावर पण हसतात, अश्या अर्थी चेहरा करून बघत होती.. टाटा, बाय बाय, भेटू, चल ठेवते, चल ठेऊ आता अस साडे नऊ वेळा एकमेकींना म्हणून मग तिने फोन ठेवला.
फोन ठेवल्यावर मुलीनी अपेक्षित असा चेहरा करून विचारलंच "आई, तुम्ही कशावर पण हसता का ग? भरीत केलंय यावर काय इतकं हसायचं.."
"आमचं सिक्रेट आहे ते..."
सिक्रेट म्हणाल्यावर मुलीचे कान सश्या इतके लांब झाले. सांग सांग असा तिचा मंत्र दहा वेळा म्हणून झाल्यावर, भांडी लाव मग सांगते , जरा कोथिंबीर निवड मग सांगते असा तिचा जरा अंत पाहिला.
आता ती माझी मुलगी असली तरी तिच्यात सहन शक्ती कमीच. नको मला ते सिक्रेट, उगाच सगळी काम करून घेत आहेस. माझ्याकडून ती सटकून जायला लागली..म्हणून मी पण जरा सबुरीने घेतलं.
ऐक ग बायडे.
"माझी सासू म्हणजे तुझी आज्जी एकदम कमाल बाई. खूप शांत समजूतदार आणि शांतपणे विचार करण तर त्यांच्या कडून शिकाव.. पण या गुणांच क्रेडिट त्या त्यांच्या सासरे बुवांना देत. अनेक आघात आजीनी लहान वयात सोसले होते. आई खूप लहान वयात गेली त्यामुळे मुळात त्या खूप हळव्या होत्या. मग एकत्र कुटुंबात लग्न झालं. घरात वयानी सगळ्यात लहान त्यामुळे सतत सगळ्यांचे सल्ले ऐकावे लागायचे. घरात मोठ्या जावा, आत्तेसासूबाई, आजे सासूबाई काहीतरी चुका काढून कान उपटायला तयार असायच्या. या वयानी आणि मानानी लहान; त्यामुळे आज काल तुम्ही मुल जसं फटा फट बोलता तस दुरुत्तर करायच्या नाहीत. मग सगळी काम झाली की त्या मागच्या अंगणात तुळशीपाशी रडत बसायच्या. सासरे बुवांनी दोन तीन वेळा हे पाहिलं.. एक दिवस त्यांना सासरे बुवांनी खोलीत बोलवून विचारलं "काही होतय का? तुम्ही का रडत असता... घरची आठवण येते का... कुणी काही बोलत का... आमचे चिरंजीव त्रास देतात का?"
पण आज्जी मान खाली घालून उभी. सासरे बुवांनी वडिलांच्या मायेनी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा आजीला एकदम रडू कोसळले.
"मग आत्ते सासूबाई, मोठ्या जाऊबाई कशा ओरडतात. त्या पण कधी कधी चुका करतात, पण मलाच बोलतात" हे बाल सुलभ भावनेने सांगून टाकलं.
सासरेबुवा हसले आणि म्हणाले, "आज मी सांगतो ते मनापासून ऐका, जपा, खूण गाठ बांधून घ्या. आयुष्यात आनंदी रहाल."
"आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला सगळ कळतं, सगळ येतं.आपण शहाणे बाकी सगळे पौडावरचे वेडे असाच समज असणारी अनेक माणसे असतात. बर ही माणसं वयानी मोठी असतात. जवळच्या नात्याची असतात, त्यामुळे काही बोलायची सोय नसते. कोणताच माणूस परिपूर्ण नसतो. पण अशा अती शहाण्या लोकांना वाटत आपण म्हणजे सर्वगुण संपनतेचा महामेरू आहोत. बर ही माणसं चुकली तर यावर ते स्पष्टीकरण देऊन आपण कसे बरोबरच होतो, समोरचाच चुकला हे पटवून देतात. पण हे स्वारस्य वयानी लहान माणसाला नसते. पण यामुळे नात्यात ताण येतो, मोकळेपणा जाऊन, एक दबून जाऊन नात्यात वागण्यात अलिप्तता येऊ लागते. ज्याला सतत सल्ले ही माणसं देत असतात त्याचा आत्मविशवास डळमळीत होतो, मन हळव होऊन जातं. भीती वाटत राहते आपण चुकलो तर आपल्याला जमले नाही तर..."
"काय असच होतय का ?" आजीला सासरे बुवांनी विचारलं."
सासूबाईंच्या अगदी मनातलं त्यांच्या सासरे बुवांनी ओळखलं होत...
"पण मग वागायचं कसं अशावेळी?" तुझ्या आजीनी घाबरत विचारलं.
"हे बघा, खूप त्रास करून घ्यायचा नाही. त्या दिवशी जेवणात सरळ भरीत करायचं."
आजीला काही उमगल नाही.
"म्हणजे?... "
"कुणी तरी आपल्याला दुखावलं, आपल्याशी वाईट, चुकीचं वागलं की आपल्या मनाला त्रास होतो. मनात विचारांचे द्वंद्व सुरू होतं. हे विचार कुणाशी बोलून मन शांत होणार असेल तर ठीक, पण काही वेळा या गोष्टी ऐकतील असे उत्तम कान आणि सुदृढ मन आपल्या पाशी नसतं. या अस्वस्थ विचारांचा निचरा तर व्हायला हवा, हो ना? नाहीतर त्याची मोठी जखम मन सांभाळून ठेवत."
आजीच वय लहान. मग तिला समजेल अस त्यांना समजवायच होतं.
"ऐका सूनबाई, हे आपल्या दोघांचं गुपित असेल हा.. कुणाला बोलायचं नाही...
एक मोठं वांगं घ्यायचं. ते वांगे म्हणजे अस समजायचं ज्या माणसांनी तुम्हाला दुखावलं आहे ती व्यक्ती. त्याला भाजायला ठेवण्या आधी हळुवार तेल लावायचं. हे हळुवार तेल लावणं म्हणजे तुम्ही त्यांची काढलेली समजूत किंवा तुम्ही तुमच्या वागण्याची दिलेली सफाई असं म्हणू. वांग्याचं चुलीवर भाजण म्हणजे तुम्ही सफाई दिली म्हणून उठलेलं फुगाटा (म्हणजे आलेला राग). आता हे भाजलेलं वांग घ्यायचं आणि त्याला सोलून चांगल रगडून घ्यायचं. मनात आलेला सगळा राग ते वांगे रगडतना काढायचा.. बघा मन आपोआप शांत वाटेल. आणि मग, निर्मळ मनानी भरीत करायचं. कारण जेवणात आपल्या चांगल्या वाईट भावना उतरत असतात. त्यामुळे भरीत करताना मन शांत, आनंदी ठेऊनच करायचं.."
आज्जीला ही कल्पना खूप आवडली होती.. तिने पुढे हे सासरेबुवांच गणित योग्य वेळी वापरल... त्याचा अतिरेक होऊ दिला नाही.
जेवणात भरीत झालं की सासरे बुवा हळूच हसायचे आज्जी कडे बघून... दोघांचे सिक्रेट होत ते.
"एकदा सगळ्या माझ्या मैत्रिणी आपल्या घरी आल्या होत्या, तेव्हा श्रुती मावशी तिच्या सासूबाईंच्या वागण्यामुळे दुखावली गेली होती. त्या सतत तिच्या चुका काढून तिला बोलायच्या... हे ती आम्हाला सांगताना तुझ्या आजींनी ऐकलं आणि आम्हाला ही भरीत कथा सांगितली."
आजी लहान होती, तीचं मन दुखवायचं नव्हत, घरातलं वातावरण बिघडवायचं नव्हतं आणि आजीच्या मनावर फुंकर पण घालायची होती. हे सगळं आजीच्या सासरेबुवांनी खूप छान समजावलं, त्याला रोजच्या व्यवहारातील गोष्टीची उपमा दिली..
आजीनी ही गोष्ट सांगितल्यावर आम्ही सुद्धा भरीत थरपीचे फॉलोअर्स झालो..
"Wow.. हे भारी आहे की", लेक किंचाळली..
"आई, म्हणजे आत्ता गॅस वर जे वांगे भाजायला ठेवलं आहेस तो बाबांवरचा राग आहे वाटत.. त्याला आता रगडून बाहेर काढायचा आहे?"
"गप ग पळ तू आता इथून"
मी मस्त शांत मनाने भरीत केले.. जेवायला वाढले.. तेव्हा लेक आणि तिचा बाबा.. गालातल्या गालात हसत होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा