"अरे बापरे! तुम्ही तर मेकँनिकल इंजीनियर आहात अशोक. मग तुम्ही आँफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात?" अग्रवालशेठने विचारलं
अशोक ओशाळवाणं हसला. मग म्हणाला
"काय करणार सर, दोन वर्ष झालीत बी.ई.होऊन पण अजून नोकरी नाही.घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही त्यामुळे."
"काय करतात वडिल तुमचे?"
"गणपती मंदिराजवळ फुलांचं दुकान आहे सर आमचं"
" ओह! पण तुम्हाला कल्पना आहे आँफिस असिस्टंटला काय काय काम असतात ती?"
"हो सर. सगळी नाँन टेक्निकल काम असतात. पण ईलाज नाही सर. माझ्या आईवडिलांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या. मी मात्र दोन वर्षांपासून रिकामा बसून आहे. ते मला बोलत नाहीत पण त्यांची मनस्थिती मी समजू शकतो. या नोकरीमुळे कमीतकमी मी कुठेतरी गुंतल्याचं आणि काहीतरी कमवत असल्याचं समाधान तरी त्यांना मिळेल."
अग्रवालशेठ विचारात पडले. गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या फँक्टरीत एक इंजीनियर ची जागा रिकामी होती.अ शोकला तिथे पाठवता आलं असतं पण त्याला इंजीनियरचा पंधरावीस हजार द्यावा लागला असता. शेठ महाधुर्त होते. त्यांनी खेळी खेळायचं ठरवलं
"ठिक आहे अशोक. तुम्ही उद्यापासून येऊ शकता. तुम्हांला पाच हजार पगार देऊ आम्ही. आँफिसची सर्व कामं तुम्हाला करावी लागतील."
"येस सर"अशोक खुष होऊन म्हणाला.जसा तो उठायला लागला शेठ म्हणाले.
"अजून एक,आता तुम्ही इंजीनियर आहात तर आमच्या फँक्टरीत गरज लागली तर जाल ना?"
"जाईन की सर.ते आवडेल मला" शेठ हसले.त्यांचा हेतू साध्य झाला होता.
दोन तीन दिवस आँफिसमध्ये काम केल्यावर अशोकला फँक्टरीत बोलावण्यात आलं.कामकाज समजावून देण्यात आलं आणि दुसरा इंजीनियर मिळेपर्यंत तिथेच काम करावं असं सांगण्यात आलं.अशोकलाही आपल्या शिक्षणाशी संबधित काम मिळालं याचा आनंद झाला.थोड्या दिवसातच तो फँक्टरीत रुळला.मेहनती आणि हुशार असल्याने उत्पादनाशी संबधित सर्व बारकावे त्याने पटकन आत्मसात केले.क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्यासाठी त्याने बऱ्याच सुधारणा केल्या त्या चांगल्याच यशस्वी ठरल्या.त्याच्या लक्षात आलं की इथले कामगार खुप बेशिस्त आहेत.वेळीअवेळी मशीन्स बंद करुन तंबाखू, गुटखा खाणं,केव्हाही चहा प्यायला जाणं,काम सोडून गप्पा मारत बसणं असे उद्योग चालायचे.प्राँडक्शन मँनेजरला सांगून त्याने त्याच्यावर बंधन आणली.त्यामुळे कामगार दुखावले पण उत्पादन वाढलं.कंपनीचा नफा वाढू लागला. तीन महिने झाले तरी दुसरा इंजीनियर आला नाही आणि अशोकचा पगारही पाच हजारावर गेला नाही. वीस पंचवीस हजार पगार घेणारे दुसरे इंजीनियर्स आता त्याची टिगलटवाळी करु लागले.महाधुर्त असणाऱ्या अग्रवालशेठनी त्याचा पाच हजारात कसा बकरा केला यावर हशा पिकू लागला. अशोकलाही ते समजत होतं पण जोपर्यत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत ही नोकरी सोडून चालणार नव्हतं.परत आईवडिलांवर ओझं व्हायची त्याची तयारी नव्हती. मध्यंतरी अग्रवालशेठनी संगळ्या इंजीनियर्सची मिटींग घेतली.त्यात त्यांनी अशोकची खुप प्रशंसा केली."कमी पगारातही अशोकचा परफाँर्मन्स एक्सलन्ट असून वीस पंचवीस हजार पगार घेणाऱ्या इंजीनियर्सनी त्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे" असं ते म्हणाले तेव्हा अशोकची छाती अभिमानाने फुलून आली.अग्रवालशेठनी त्याला पगारवाढीचंही आश्वासन दिलं. अशोकला आता फँक्टरीत ११ महिने झाले होते. अग्रवालशेठनी त्याला दिलेलं पगारवाढीचं आश्वासन पाळलं नाही. तो निराश झाला पण इमानदारीने काम करणं त्याने सोडलं नाही. कधीतरी शेठना दया येऊन ते पगार वाढवतील अशी त्याला खात्री होती.
त्यातच एक दुर्दैवी घटना घडली.फँक्टरीत कामगार युनियनची निवडणूक होऊन गुंड प्रव्रुतीचे प्रतिनिधी निवडून आले.त्यांनी फँक्टरीतील वातावरण बिघडवून टाकलं.अशोकच्या रोजच कामगारांशी कटकटी होऊ लागल्या. एक दिवस तंबाखू खाण्यावरुन एका कामगाराशी अशोकचा वाद झाला .वाद इतका विकोपाला गेला की त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं.आजबाजूच्या कामगारांनी आपापल्या मशीन्स बंद केल्या.आणि अशोकला मारायला सुरुवात केली.सिक्युरिटीने वाद सोडवला पण अख्ख्या फँक्टरीतल्या कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केलं.जोपर्यंत फँक्टरीत अशोक आहे तोपर्यंत काम सुरु होणार नाही अशी भुमिका कामगारांनी घेतली.फँक्टरीच्या डायरेक्टर्स ची तातडीने बैठक झाली आणि त्यात अशोकला फँक्टरीतून काढून टाकायचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी अग्रवालशेठनी अशोकला आँफिसमध्ये बोलावून घेतलं.काय होणार याची पुसटशी कल्पना असल्याने धडधडत्या ह्रदयाने अशोक केबिनमध्ये शिरला.
"या अशोक बसा.जे घडलं ते वाईट घडलं" अग्रवालशेठनी बोलायला सुरुवात केली." यात तुमची काही चुक आहे असं मला वाटत नाही.पण माझा काही इलाज नाही.बोर्ड आँफ डायरेक्टर्सने तुम्हांला काढून टाकायचा निर्णय घेतला आहे"
अशोकचे डोळे अश्रुंनी भरुन आले. "सर मी जे काही केलं ते फँक्टरीच्या हितासाठीच होतं."
"मला मान्य आहे.एक वर्षापासून मी तुम्हाला ओळखतोय. पण तुम्ही जाणताच दोन दिवसांपासून फँक्टरी बंद आहे.लाखोंचं नुकसान होतंय.एका माणसासाठी एवढं नुकसान आम्ही सहन करु शकत नाही."
"सर पण प्लिज मला काढू नका.मी आँफिस असिस्टंट म्हणूनही काम करायला तयार आहे"
"तिथे तर दोन माणसं अगोदरच काम करताहेत.त्यामुळे ते शक्य होणार नाही"
"सर मी माझ्या आईवडिलांना कसं तोंड दाखवू"
दुःखाने अशोकच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले.अग्रवालशेठनी खांदे उडवले.
" तुमचा हिशोब तयार आहे.कँशियरकडून घेऊन घ्या" अशोक जड अंतःकरणाने उठला.दरवाजाजवळ जाऊन त्याने दरवाजा उघडला.
" थांबा अशोक" अशोक वळला.त्याने चमकून शेठकडे पाहिलं.
"या फँक्टरीतून तुम्हांला काढलं असलं तरी आमची नाशिकची कंपनी तुम्ही जाँईन करु शकता"
अशोकला आपण काय ऐकतो आहोत ते समजेना
"काय म्हंटलात सर?"
"होय अशोक तुम्ही योग्य तेच ऐकताहात"
"सर पण तिथे तुम्ही पाच हजार पगार द्याल ना मला?"अशोक अजूनही संभ्रमावस्थेतच होता
"नाही अशोक तिथे तुम्हाला पाच नाही पन्नास हजार रुपये पगार मिळणार आहे"
"सर चेष्टा करताय माझी"अशोक अविश्वासाने म्हणाला.
"नाही अशोक तिथे तुम्ही सुपरवायझर नाही तर प्राँडक्शन मँनेजर म्हणून जाताय.तुमची हुशारी,मेहनत पाहून कधीपासूनच ते माझ्या मनात आलं होतं.ती संधी आज अशा प्रकारे चालून आली.तुमच्यावर नशिबाने, कामगारांनी आणि आम्हीसुद्धा खुप अन्याय केला.आता न्याय करायची वेळ आलीय"
अशोक आनंदला.
" सर पण मला दोन दिवस वेळ द्या पुढची सगळी व्यवस्था करायला"
"काहीच गरज नाही अशोक.तिथे टू बिएचकेचा वेल फर्निश्ड फ्लॅट रेडी करुन ठेवलाय.बाकी सर्व व्यवस्थाही झाली आहे.तुम्ही फक्त बँग पँक करा.उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला गाडी येईल.तुम्ही जोपर्यंत नोकरीत रहाल तोपर्यंत ती कायम तुमच्याकडेच राहील"
अशोकच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहू लागले.तो पुढे येऊन शेठजींच्या पाया पडू लागला.शेठजींनी त्याला उचलून छातीशी धरलं
"अशोक एक गोष्ट मला नेहमी खटकते.तुम्ही मराठी तरुण का नोकरीच्या मागे लागता?जेवढी मेहनत तुम्ही महिना पाच हजारासाठी वर्षभर केलीत तेवढ्या मेहनतीत तुम्ही स्वतःच्या व्यवसायात महिन्याला दोन लाख कमवू शकता"
"सर आमच्याकडे भांडवलाचा प्रश्न असतो.ते असलं तरी कुटूंबाचा आणि आमच्या समाजाचा आम्हांला पाठींबा नसतो.त्यातून धंदा नाही चालला तर नुकसानाची भिती असती"
" अहो तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा.पोहता तुम्हाला आपोआपच येईल.तुम्हांला सांगू मी दोनदा दिवाळखोर झालोय.भीक मागायची वेळ आली होती माझ्यावर.पण चिकाटी ठेवली तर माणूस तरुन जातो.ठिक आहे.यापुढे मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी तुमची!दोन मराठी तरुणांना जरी तुम्ही व्यवसाय सुरु करुन दिलात तरी तुम्ही समाजाला न्याय दिला असं मी म्हणेन"
© दीपक तांबोळी
9503011250
(ही पोस्ट माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा