शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

766. राहून गेलं

     एका लांबच्या नातेवाईकाचा अपघात झाला आणि ती कोमात गेली; डॉक्टर असल्याने तिच्या प्रकृति विषयी मला विचारणा होऊ लागली म्हणून तिला उपचार करणाऱ्या डॉक्टर ला फोन केला, नेमका तो डॉक्टर माझा मित्र निघाला, तो म्हणाला अरे Axonal Injury आहे कदाचित vegetative (कायम स्वरूपी कोमात जाणे) होईल, पेशंट सपोर्ट वर आहे aggressive management न करता सपोर्ट काढले तर सुटका होईल तीची, तू ये मग नातेवाईकांशी बोलू आपण. प्रकरण गंभीर होते, संध्याकाळी वेळ काढून हॉस्पिटलमध्ये गेलो, मन घट्ट करून त्या काकांची भेट घेतली axonal injury म्हणजे काय ते समजावून सांगितले. शांत पणे ऐकून घेऊन ते म्हणाले सगळं बरोबर आहे सपोर्ट काढला तर ती निघून जाईल पण बऱ्याच गोष्टी राहून जातील, मी मुंबईत आणि ती नाशिकला आमच्यात खूप बोलायचं बाकी आहे, मुलींना शिक्षणाला पैसा लागेल म्हणून कुठे फिरायला गेलो नाही ते राहिलंय, तिच्या बरोबर जगायचंच राहिलं आहे म्हणून मी सपोर्ट काढणार नाही, आज तिने थोडी पापणी हलवली आहे लढू शेवट पर्यंत.   त्यांचा निर्णय पक्का होता त्यांनी सपोर्ट चालू ठेवला ती कधीतरी बरी होईल या भरवश्यावर. प्रसंग बरंच काही शिकवणारा होता; 20 वर्ष संसार होऊन बायकोशी बोलायचं आणि जगायचं राहून जातं आणि ते बायको ICU मध्ये असतांना लक्ष्यात येतं किती ही दुर्दैवी वास्तविकता.
      अमुक एक करायचं होतं पण राहून गेल. असं आपण कितीदा म्हणतो. अश्या कित्येक गोष्टी असतात ज्या करायच्या राहून जातात. आत्ता नको पुन्हा कधी तरी. मग अगदी साधीशी गोष्ट करण्यापासून ते अगदी मोठालं स्वप्न पूर्ण करण्यापर्यंत. बऱ्याचदा ज्या गोष्टी आपल्याला अगदी मनापासून करायच्या असतात त्या खूप साध्याश्या असतात. साधं तू आज छान दिसते आहेस आणि भाजी मस्त झालीये आज हा जोडीदाराला आनंद देणारा साधा संवाद देखिल राहून जातो, सहज संध्याकाळी बायकोचा हात हातात घेऊन फिरून यायचं असतं पण राहून जातं, आई म्हणत असते अरे काळा रामाला घेऊन चल फार दिवस झाले पण राहून जातं, मुलींना घेऊन सकाळी पांडवलेण किती दिवसंपासून चढायचं आहे पण राहून जातं, मित्र तर जवळच राहतो पण सहज म्हणून त्याच्या कडे चक्कर टाकायची आहे पूर्वी सारखी पण राहून जातं, कित्येक नातेवाईकां कडे जाऊया म्हणतोय पण राहून जातं, नवीन जागा बघायच्या आहेत नवीन नाटकं बघायची आहेत , क्रिकेट किती दिवस झाले खेळलो नाही, कॅरम धूळ खात पडला आहे, सायकलची तीच तऱ्हा, टेबलटेनिस ची रॅकेट सापडेल का मला,पेटी वर नव गाणं बसवून किती दिवस झाले,कॉलेज चा कट्टा आम्हा मित्रांची किती वर्षा पासून वाट बघतो आहे,काही जवळची लग्न राहून जतायेत, गणपतीचे डेकोरेशन बहुतेक विसरलो आहे मी, पतंगीला मंगळसूत्र घालता येईल का आता, जगणंच राहून जातं आहे का? अनंत अनिश्चित असुरक्षित भविष्काळाचया चिंतेने क्षणिक लगेच आणि निश्चित अशा वर्तमाना कडे लक्ष्य द्यायचे राहून जाते आहे.संसार म्हणजे अशी काय मेख आहे नेमकी कि ज्यामध्ये आपल्या आवडी निवडी बाजूला सारून फक्त देत बसतो आहे  मिळवायचं मात्र राहून जातं आहे, किंवा सगळं उद्यावर ढकलतो आहे. जरा आठवून बघा. गेल्या महिन्यापासून फक्त स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी अशी एखादी गोष्ट केली आहे का तुम्ही? मिड लाईफ क्रायसेस च्या या वयात आता राहून गेलेलं करूया, चाळिशीचा चष्मा लागलाय आता दृष्टिकोन पण बदलूया, थोडा वेळ आणि पैसा स्वतः साठी खर्च करूया, जुन्या मित्रांना फोन गेट टुगेदर, छोट्या मोठया ट्रिप, शनिवारी सुट्टी स्वतःच्या आनंदाच्या गोष्टी ज्या मला आनंदी ठेवतील आणि माझ्या जवळच्या माणसांना.
 देख ज़िंदाँ से परे रंग-ए-चमन जोश-ए-बहार
रक़्स करना है तो फिर पाँव की ज़ंजीर न देख.
       कैदखान्याच्या बाहेर पडून  बागेतले वेगवेगळे रंग बघ, वसंत ऋतूतला उत्साह बघ स्वछंदीपणे नाचायचं असेल तर मग पायाला अडकवलेल्या बेड्यांची पर्वा करू नकोस. कित्येकदा आपण स्वतःच स्वतःला कुठेतरी कैद करून ठेवलं असतं. आपल्याला माहित सुद्धा नसतं की  आपल्यामध्ये असंख्य अमूल्य गुण आहेत म्हणून. आपण आपली दृष्टी,जगणं संकुचित केलं असतं. त्यापलीकडे जाऊन जगाला,स्वतःला बघता यायला हवं. जर बेभान होऊन, मुक्तपणे नाचायचं असेल, उडायचं असेल तर पायांना, पंखांना बांधून ठेवणाऱ्या ह्या ज्या बेड्या आहेत, भयाच्या, समाजाच्या भंपक नितिमत्तेच्या, त्या बेड्यांची पर्वा न करता नाचता आलं पाहिजे, उडता आलं पाहिजे. आणि राहून गेलेलं सगळं करता आलं पाहिजे. मनात आलं म्हणून लिहून टाकलं.. पुन्हा वाटायला नको "राहून गेलं".......

महेंद्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...