शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

765. कर्तव्य

     अहो काय विवेक राव, पुणेकरांच्या वरतान वागायला लागलात की तुम्ही तर, ऐन धंद्याच्या दिवसात सुद्धा ९ वाजता दुकान बंद करता म्हणजे.' शेजारीच असलेल्या दुकानदाराने विवेकला टोमणे रुपी प्रश्न विचारला. विवेक फक्त मिश्किल हसला. तितक्यात तिथे आलेल्या एका ग्राहकाला 'दुकान बंद झालं साहेब' सांगत, त्यानं दुकानाचं शटर खाली ओढलं आणि शटरला कुलूप लावलं. दुकानातल्या शेवटच्या गिऱ्हाईकामुळे आधीच त्याला आज निघायला १५ मिनिटे उशीर झाला होता. त्याची नेहमीची लोकल सुटली असणार या विचाराने त्याची धाकधुक वाढली. सणाच्या दिवसांमुळे रस्त्यावर बरीच गर्दी होती आणि त्यात भरीस एकही रिक्षा रिकामी मिळायला तयार नव्हती. विवेककडे धावत पळत स्टेशन गाठण्याशिवय पर्याय नव्हता. त्याचा डोळ्यासमोर त्याची अस्वस्थ बायको स्मिता आणि त्याची तान्ही लेक इतकंच चित्र दिसतं होतं. कसाबसा घामेजला विवेक स्टेशनवर पोहचला. पुढची गाडी कोणत्याही क्षणी येणार होती. तेवढ्यात एका रडणाऱ्या तान्हुल्याने त्याचं लक्ष वेधून घेतलं. विवेकची नजर बाळाचे कोणी नातेवाईक दिसतात का या विचाराने चहू दिशांना भिरभिरत होती. गजरे विकणाऱ्या त्याच्या आईची तगमग विवेकने घेरली आणि त्याचा जीव भांड्यात पडला. विवेक पुन्हा असोशिने गाडीची वाट बघू लागला. त्याचा जीव घरी ओढला जात होता. काही वेळात गाडी येणार होती. एवढ्यात त्या बाळाच्या रडण्याचा आवाज वाढला होता. येणाऱ्या गाडीवर पाणी सोडतं 'हे देखील आपलं कर्तव्य आहे' हा विचार करून तो त्या गजरेवाली जवळ गेला. 'तुम्ही घ्या बाळाला'. मी बघतो गिऱ्हाईक' असं म्हणत त्याने टोपली जवळ घेतली. गजरेवालीने क्षणभर विवेक कडे बघितले. तिला त्याचा आधार वाटला. तिने धावत जाऊन बाळाला घेतलं. इतक्यात विवेकला गाडी त्याच्या समोरून जातं दिसेनाशी सुध्दा झाली. इकडे गजरे वालीने पदराचा आडोसा घेतं लेकराला दूध पाजलं. काही वेळात गजरेवाली बाळाला घेऊन विवेक जवळ आली. विवेकने टोपली आणि पैसे तिच्या ताब्यात दिले आणि बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला तसं तिच्या कमरेवरचं बाळ विवेक कडे बघून गोड डोळ्यांनी हसलं. जणू हसून ते विवेकच्या मदतीचे आभार मनात होतं. पुढची गाडी आली आणि विवेक त्यात चढला आणि काही वेळात घरी पोहचला. थकल्या पायाने लेकीला हातात घेऊन व्हरांड्यात स्मिता फेऱ्या मारत मारत वाट बघत होती. जेवणाची वेळ केव्हाच टळून गेली. अस्वस्थ स्मिता लेकिशी राहून राहून बोलण्याचा प्रयत्न करायची, लेकीला अंजरायची गोंजरायची. मध्येच तिचे मुके घ्यायची. विवेक धापा टाकत घराच्या गेट मधून आत शिरला. स्मिताने त्याच्याकडे आशेने बघत एक सुटकेचा निःश्वास सोडला. 'अरे किती हा उशीर. तुला हिच्या जेवणाच्या वेळा माहिती आहेत ना...कर्तव्यांची जाण वैगरे काही असते की नाही म्हणते मी ? ही जेवत नाही माझ्या हातून आणि तू आज तर जेवणाची वेळ टळून गेली तरी चेहऱ्यावर जराही भूक दिसतं नाही हिच्या...नुसतीच हसते बघ कशी'
'कर्तव्य? कर्तव्यच पार पडतं होतो ग.'
' काय ' 
' काही नाही आलोच, हाता-पायावर पाणी घेतो जरा आणि घेतोच मी तिला.'
विवेक गडबडीत घरात गेला आणि आधी त्याने टेप रेकॉर्डर चालू केलं.
'काय ग लबाड बाबा हवा काय फक्त खाऊ घालायला तुला? बाबा दिसे पर्यंत भूक वैगरे काही लागत नाही वाटतं. विवेक तू आल्या सरशी बघ कशी रडते ही भुकेने'
''हं'. आण तिला मी भरवतो..'
विवेकने मोकळी वाटी आणि चमचा एका हातात घेत. बाळ दुसऱ्या हातात घेतलं.
.
.
.
.
.
.
.
.
.
एकीकडे बाळाच्या जाण्याने डोक्यावर परिणाम झालेली आणि खोट्या बाळाला खेळवणारी स्मिता. बाळाच्या रडण्याचा आवाज काढणारं ते टेप रेकॉर्डर. या सगळ्या साठी पाळाव्या लागणाऱ्या वेळा या पलीकडे विवेकने आज एक वेगळं कर्तव्य पार पडलं होतं आणि त्याच्यामुळे एका खऱ्या खुऱ्या लेकरच्या आणि त्या बाळाच्या आईच्या चेहऱ्यावरची तृप्तता त्याने बघितली होती.

प्रतीक्षा गुमास्ते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...