सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

753. या वळणावर....

 "भले बुरे जे घडून गेले 
  विसरून जाऊ सारे क्षणभर
 जरा विसावू या वळणावर....
          या वळणावर...."
     आयुष्य हे मुठीतल्या रेती प्रमाणे अलवारपणे हळू हळू निसटून जातं आहे . गेला क्षण पुनः पुन्हा आपल्याला जगायला मिळतं नाही ‌. जसं नदीतून एकदा वाहून गेलेलं पाणी पुन्हा नाही धरता येत ओंजळीत अगदी तसंच अगदी तसंच आपलं आयुष्य असतं. आयुष्य ही एक अशी कॅसेट आहे की ज्याला रिवाईंडच किंवा फास्ट फॉरवर्डचं ही बटणं नाहीये त्याला फक्त आहे ते एकच माहिती "जस्ट प्ले" . त्यामुळे जगा आणि जगू द्या.... हा मंत्र जपला तरच फक्त या जगात निभाव लागू शकतो. कसं आहे ना की प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे असतातच. तुम्हाला काय वाटतं .... ऐश्वर्या राय.... करिष्मा कपूर... झालंच तर शाहरुख खान... गेला बाजार.... टाटा.... बिर्ला..‌ अंबानी. यांच्या आयुष्यात संकटं... काळज्या.... कटकटी नसतील का... ? अहो आयुष्य आहे ते सुखदुःखाची सुरेखशी विण घातलेलं वस्त्र ते कुणाचं मऊशार उबदार गोधडीसारखं तर कुणाचं अगदी सुरेख काश्मिरी शालीसारखं....मिठा-पिठासाठी प्रत्येकजण हा रोज सकाळी धावत सुटतो ‌. मग त्यात काहींच्या कष्टांना हि-या-मोत्यात यश येतं तर.... काहींना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असते . पण म्हणून माणूस कष्ट करणं सोडतं नाही कारणं जबाबदा-या आणि चिमटीभर पोटाची भूक ही कुणालाच चुकलेली नाही ... हो की नाही ...?? यशापयशाच्या या तारड्यात प्रत्येकजण हा तोलला जातोच कधी कुणाचं पारडं भारी होईल ते नाही सांगता येत. म्हणूनच तर म्हटलं आहे की ..‌
  "घटा घटाचे रूप आगळे...
      प्रत्येकाचे दैव वेगळे..." 
प्रत्येकजण हा पैशासाठी जीव तोडून धावत असतो ‌मग त्याकरिता वेळप्रसंगी तो आपल्या जन्मदात्या मात्या-पित्याचाही गळा कापायला पुढे मागे पहात नाही. सध्या समाजात उच्च स्थान मिळवायला गरजेचं आहे ते पद आणि प्रतिष्ठा,मग त्या करिता त्या माणसानं नितीमत्तेच्या कितीही मर्यादा ओलांडल्या असल्या तरी चालतील.... कित्येकदा वाम मार्गाने कित्येक माणसांच्या ईच्छा आकांक्षांची राखरांगोळी करुन तो पुढे आलेला असला तरी चालेल पण सर्वोच्च पदावर पोहचणं आज प्रत्येकाची गरज आहे आणि ती तहान प्रत्येक क्षेत्रात वावरतांना जागोजागी ठळकपणे दिसून येते. आयुष्याची गणितं ही हल्ली अधिकाधिक अवघडच होतं चालली आहेत . अगदी परवा परवा कल्याण सारख्या सुशिक्षित शहरात घडलेली घटना.. बायको रूसून माहेरी निघून आली म्हणून एका नव-याने आपल्या सासूलाच पळवून नेऊन कोंडून ठेवलं . या पध्दतीची मानसिकता का बरं निर्माण होत आहे आज सर्वांमध्ये...?  याचा कधीतरी विचार आपल्या मनाला शिवला आहे का ॽ
     नक्की आयुष्याच्या या गणिताचं उत्तर आपण कसं मिळवायचा प्रयत्न करतोय आपण ....? खरं सांगू.... सुखाने गुणायच्या ऐवजी आपण आपल्या आयुष्याला सुखाने भाग देतोय .... त्यामुळे दुःखाची बाकी ही डोंगराइतकी वाढतं जाते आहे . कित्येकदा जे प्रश्न चर्चेने सुटण्याजोगे असतात ना त्यांना आपणं उगाचंच जास्त महत्त्व देत असतो . अर्थातच प्रत्येक वेळी आपणच पडतं घेऊन पुढे चाला असं ही मी सांगणार नाही.जर एखाद्याला कानफटात देण्याची गरज असेल तर , 'सुसरीबाई तुझी पाठ मऊ' असं मुळीच वागू नका .... पण वरील प्रसंगात मात्र हा प्रश्न  चर्चेने सुटू शकतं होता पण याला गुन्हेगारी वळणं मिळालं. मग हे सगळं कशासाठी आयुष्य जगताना आठवणींचे दवबिंदू मनाच्या कोनाड्यात जपून ठेवावेत म्हणजे अश्या प्रसंगात ते मनाचा कोपरा न कोपरा भावनांच्या ओलाव्याने भिजविण्यास कामी येतो असं नाही का वाटतं ॽ   बघा ना सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कित्येक सुंदर, सुरेख, आल्हाददायक घटना आपल्या आजूबाजूला घडतं असतात, त्यांच्याकडे डोळसपणे पहाण्याचा प्रयत्न करा की अगदी सकाळी सकाळी गाडीत एखादी चिमणी मामाच्या गावाला जाऊया म्हणून आपल्या बोबड्या भाषेत चिवचिवत असते. नाही गडबडीत घरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडता पाडता आपल्याला मॅचिंग तर सोडाच पण साधा केसांवरून कंगवा ही फिरवायला वेळ मिळतं.  पण समोर एखादं अपटूडेट व्यक्तीमत्व आलं तर जाणून घ्या त्यांच्याकडून कसं बरं धावपळीच्या धकाधकीच्या या जगात यांना हे जमतं. शोधलं ना तर जगात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकेल फक्त चौकस नजरेची आणि गुणग्राहकता हवी . जे जे चांगलं आणि उदात्त आहे ते शोधून आत्मसाद करण्याची सवय लागायला हवी आणि ते प्रत्यक्षात अंगीकारणे याचीही हिंमत अंगात हवी . 
     दिली नं एखाद्याने शिवी तर त्याला शासन हे कराचं पण त्या प्रसंगातून आपणं कसं वागलं बोललं पाहिजे ते शिका. वागला एखादा वशिल्याचा  तट्टू सत्तेच्या गुर्मीत उद्दामपणे तर त्याला तिथल्या तिथे त्याची जागा दाखवायला घाबरू नका पण आपणं सत्ता हातात आल्यावर कसं जगायचं ती दिशा ठरवा . वागला एखादा वासनांधपणे तर निकोप निर्मळता तुमच्या वर्तनात येऊ द्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...