मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

787. दृष्टिकोन आणि वास्तव

      त्या रात्री खूप वादळ आणि पाऊस होता. एक मध्यमवयीन बाहेरून आलेलं जोडपं त्या शहरात रात्रीपुरता आसरा शोधत होतं. अनेक हॉटेल्स फिरून ते जोडपं आता थकलं होतं परंतु कुठेही त्यांना खोली मिळत नव्हती. पण त्यांनी प्रयत्न सोडले नव्हते. ते दोघे पुन्हा एका वेगळ्या पण छोट्याशा हॉटेलमध्ये शिरले. तिथली व्यवस्था एक तरुण पहात होता. त्या तरुणाला त्यांनी सर्व परिस्थिती सांगितली आणि एक खोलीची रात्रीपुरती व्यवस्था करण्याबद्दल विनंती केली. पण तो तरुण असहाय होता कारण हॉटेलमधल्या सगळ्या खोल्या व्यापलेल्या होत्या. त्या तरुणाला त्या जोडप्याची परिस्थिती समजत होती. त्यानं एक क्षण विचार केला की 'माझी अशी अवस्था झाली असती तर मी काय केलं असतं? मला किती त्रास झाला असता?' या विचारासरशी त्यानं पटकन त्या जोडप्याला सांगितलं 'आता हॉटेलची कोणतीच खोली रिकामी नाहीये आणि या वादळ-पावसाच्या रात्री तुम्हाला हॉटेलबाहेर जाऊ द्यायला सुद्धा माझं मन तयार नाहीये. तुम्हाला हरकत नसेल तर आजची रात्र तुम्ही माझ्या खोलीत झोपाल का? मला आता रात्रपाळी आहे त्यामुळे माझी खोली रिकामीच राहणार आहे.' त्या जोडप्याने एकूण परिस्थिती पाहून त्या तरुणाच्या खोलीत रात्र काढण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी खोली सोडताना त्यातल्या गृहस्थाने त्या तरुणाचं खूप कौतुक केलं ते म्हणाले 'तुझ्या सारख्या तरुणाची प्रत्येक हॉटेल मालकाला खूप गरज आहे, पुढे मागे एखादं हॉटेल मी जर सुरू केलं तर तू माझ्याकडे काम केलेलं मला नक्कीच आवडेल'. त्या तरुणाला खूप आनंद झाला. कदाचित ते गृहस्थ केवळ कौतुकापोटी असं बोलत असतील असे त्याला वाटलं.
      काही वर्षं सरून गेली, तो तरुण अजूनही त्याच हॉटेलमध्ये कामाला होता. एक दिवस त्याच्या नावाने एक टपाल आलं, त्यात न्यूयॉर्क ला जाण्याचं तिकिट होतं आणि सोबतच्या पत्रात त्या वादळी रात्रीच्या प्रसंगाचा उल्लेख होता आणि त्या प्रसंगी त्याच्या खोलीत रात्र काढणाऱ्या त्या गृहस्थाने त्या तरुणाला भेटायला बोलावलं होतं. तरुणाला आश्चर्य वाटलं आणि आनंद ही झाला. तिकीट पाठवलं असल्यानं त्यानं असा विचार केला की 'जाऊ, भेटून तरी येऊ'.
तो जेव्हा न्यूयॉर्क ला दिलेल्या पत्त्यावर पोहोचला, ते एक अत्यंत मोठं आणि आलिशान हॉटेल होतं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या तरुणाची आणि गृहस्थाची भेट झाली. ते गृहस्थ म्हणाले 'हे माझं नवीन हॉटेल आहे आणि माझी इच्छा आहे की तू इथली व्यवस्था पहाविस'. त्या तरुणाचा विश्वासच बसेना कारण तो एक छोट्या शहरातून आला होता आणि इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये काम करण्याचा विचार त्यानं स्वप्नात देखील केला नव्हता. पण त्या गृहस्थाने त्याला भरवसा दिला आणि त्या नवीन मोठ्या आलिशान हॉटेलची व्यवस्था पाहण्याकरिता त्याला कामावर ठेऊन घेतलं. अर्थातच त्या तरुणानं या संधीचं सोनं केलं आणि पुढे तो खूप मोठा हॉटेल व्यावसायिक बनला. त्या तरुणाचं नाव होतं 'जॉर्ज सी बोल्ड्ट' आणि ते रत्नपारखी गृहस्थ होते 'विलियम वॉलडॉर्फ ऍस्टर'.
      एकीकडे आपण पाहतो की सार्वजनिक बसमधलं साधं आसनसुद्धा दुसऱ्याला द्यायला लोक काकू करतात. ते समोरच्याची अवस्था पहायला सुद्धा तयार होत नाहीत. कोण वृद्ध असतं, कोणी महिला गर्भवती असते, पण लोकांना त्याचं काही नसतं. इतर प्रसंगी सुद्धा समोरच्याची अवस्था समजून घेऊन त्याला मदत करण्याचा वृत्तीपेक्षा त्याला उपदेशाचे डोस पाजण्यात लोक धन्यता मानतात किंवा मजा पहात बसतात. बऱ्याच वेळेला हे वास्तव चित्र असतं. पण वरच्या घटनेतून त्या दोन्ही महान माणसांचा दृष्टीकोन पाहिला तर मात्र आपल्या नक्की लक्षात येईल की अशी माणसं मोठी का होतात.

- सोमनाथ जायदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...