ईश्वराने माणसाला दोन हात दहा बोटे दिली आहेत. हे दोन्ही हात जोडले की होते "ओंजळ."
ओंजळभर पाणी पिल्यावर मन तृप्त होते.
'महाराज, करतल भिक्षा घेत असत.'
'करतल ' म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी..
मला हा शब्द खूपच आवडला.. ओंजळ
"कराग्रे वसते लक्ष्मी" म्हणत दिवसाची गोड सुरुवात करताना दोन्ही हातांच्या मध्ये केलेल्या ओंजळीत लक्ष्मी,सरस्वतीचे रूप बघत त्याच ओंजळीने आपले नकळत दिवसाचे गणित आपण ठरवत असतो.
अशा ओंजळीची फुले रोज नव्याने साचवत आपल्याच हातात आपले आयुष्य ह्याचीच जाणीव ही, "ओंजळ" रोज देत असावी का ?
ओंजळ दोन हातांची एक खोलगट जागा एवढा तात्विक विचार येऊन जातो, पण केवढा अर्थ सामावला आहे ह्या ओंजळीत.
ओंजळ रितेपणाची भावना न येता भरभरून देण्याची एक मानवी संवेदना म्हणूयात कां..?
असा सहजच माझ्या मनात विचार आला.
मनाच्या कप्प्यात साठवलेल्या अनंत आठवणींची ओंजळ,
तहानलेल्याला भरभरून दिलेल्या पाण्याची ओंजळ, भक्तीच्या भावनेने परमेश्वर चरणी वाहिलेल्या फुलांची ओंजळ, एखाद्या कवीच्या मनातील सुगंधित शब्दफुलांची ओंजळ, प्रेमाची आपुलकीची ओंजळ, स्वतःचे एक विश्व कल्पना सामावून घेणारी ओंजळ,
भरभरून घेणारी पण ओंजळभर घेऊन देण्याची भावना जपणारी एक सखी ओंजळ !
जगण्याचा प्रत्येक क्षण वेचत एका ओंजळीत सामावेल एवढे आयुष्य जगताना, कुठे रिते करायचे हे पण नकळत शिकवणारी ओंजळ....!
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता-देता घेणाऱ्यांचे हात घ्यावेत. ही उक्ती सार्थ करणारी, दातृत्वाची महती दाखविणारी ओंजळ !
कधी कधी भावनाशून्य निरवाच्या ओठी निरवता साजे म्हणत मौनांची ही ओंजळ आपल अस्तित्व दाखवत जातेच .
भविष्यात घडवणारी क्षणरूपी कळ्यांची ओंजळ, पाखरांच्या चोची भरत, दुःखात मायेची सावली देणारी सुखाची ओंजळ !
अशीच काहीशी अवस्था ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातील, डोळ्यातील भावही विरून जातील,मात्र आयुष्यभर देण्याची भावना जोपासणारी ही "आशिर्वादाची ओंजळ" जगण्यास नक्कीच बळ देते.
त्या दोन कुसुमाकरात सामावलेला विश्वास, प्रेम, माया, सुखदुःख, स्वप्ने, आशा, निराशा,आनंद ह्या सगळ्या भावफुलांची ओंजळ जगण्याला नवी ओळख देते.
मात्र ओंजळीत मावेल एवढेच जरूर घ्यावे, सांडलेले इतरांना भरभरून द्यावे.
ओंजळ म्हणजे रीतेपणाची भावना नसून दातृत्वाची संवेदना आहे.
वळणावळणाच्या या आयुष्यात प्रत्येक वळणावर माणुसकीची "ओंजळ" रीती करताना उपकाराच्या भावनेची परत अपेक्षा करणारी नसावी तर त्या वळणावर साथ देणारी असावी.
अशी माणूसकीची ओंजळ , केवळ एक शब्द ओंजळ आणि खूप काही !
माणसाच्या अनेक कृतीशी आणि भावनांशी ओंजळी च अस घट्ट नात असत !
आता करतल
म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी जास्तीत जास्त माप म्हणजे 'करतल' असावे .
करतल म्हणजे ओंजळभर !
आता हेच पहा ना..
खूप तहान लागली आणि ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते.
इतकाच काय ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.
आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते..
खुप दुःख झाले की, आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेच म्हणून समजा. आणि कधी एखादा सलज्ज चेहरा ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच दूर करू शकतो..
बायका ओंजळभर तांदळाने दुसर्या स्त्रीची ओटी भरतात.
ओंजळीभर पाणी पिंडीवर वाहतात.
पंजाबी गुरूद्वारांमध्ये लंगरच्या वेळी दोन्ही हातांची ओंजळ करून प्रसाद घेतात.
बाप रे... केवढे महत्व आहे ना ह्या ओंजळीचे.
म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे आणि त्याचा विसर पडता कामा नये." असेच पटकन मनात आले.
तसेच दोन्ही करतल एकत्र केले की होतो नमस्कार. किती छान पद्धत आहे भारतीयांची हात जोडून अभिवादन करण्याची. समोरच्याचे मन जिंकायला दोन करतल पुरेसे आहेत. कोणाला धीर देतांना त्याचे दोन्ही करतल आपल्या दोन्ही करतलांनी घट्ट धरले तर समोरच्याला किती मोठा दिलासा मिळतो ते शब्दांत सांगणे कठीण आहे.
अर्ध्य देतात तेही ह्याच ओंजळीने आणि एखाद्या स्व:मालकीच्या गोष्टीवर पाणी सोडतात, तेही ह्याच ओंजळीने.
ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि 'पसायदान' मागितले.
खरंच परमेश्वराने केलेल्या या छोट्या छोट्या योजना माणसाला आत्यंतिक समाधान देऊन जातात.
ओंजळीला ओंजळीने झेलण्याचा भाव शिकविते!
म्हणुनच म्हटले जाते तेथे कर माझे जुळती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा