शनिवार, २ डिसेंबर, २०२३

724. बंधनं

 "दादा मी काय म्हणतोय, आम्ही मुलांच्या शाळेजवळ एक फ्लॅट बघितलाय आणि तिथे शिफ्ट व्हायचं म्हणतोय" मंदार चाचरत म्हणाला.
" काय? शिफ्ट व्हायचं म्हणजे तू हे घर सोडून जाणार?" रवी विश्वास न बसून त्याच्याकडे पहातच राहिला.
" हो दादा. अरे मुलांनाही शाळा जवळ पडेल शिवाय मुलं आता मोठी होताहेत. चारुचंही फ्रेंड सर्कल मोठं झालंय. तुम्हाला याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय. स्वतंत्र झालं की आम्हांलाही आमच्या जबाबदाऱ्या समजतील"
ते ऐकून रवी सुन्न झाला.त्याने रेखाला हाक मारली.
" रेखा बघ गं हा मंदार काय म्हणतोय!"
रेखा बाहेर आली.
" ऐकलं का रेखा हा मंदार वेगळं व्हायचं म्हणतोय"
"काय्य?भाऊजी अहो तुमच्या मनात हा विचार आलाच कसा? अहो काय कमी आहे इथे?" रेखाचा बोलता बोलता गळा दाटून आला. चारु तिथेच उभी होती ती पटकन पुढे आली.
"अहो वहिनी वेगळं होतोय म्हणजे फक्त आम्ही वेगळ्या घरात रहाणार आहे. मनाने तर आपण एकत्रच आहोत. एकमेकांकडे आपलं येणंजाणं सुरुच राहीलं."
रेखाने तिच्याकडे रागाने पाहीलं. मंदारला नाहीतर हिलाच वेगळं व्हायचंय हे तिच्या लक्षात आलं आणि कितीही समजावलं तरी ती ऐकणार नाही हेही तिला माहित होतं.
" तुम्हाला काय वाटेल ते करा" ती रागाने बोलली आणि किचनमध्ये निघून गेली.
दोन दिवसांनी रवीने आपलं सामान ट्रकमध्ये घालून शिफ्ट केलं. सगळ्यात अवघड गेलं ते मुलांना समजावणं. मुलं रवीकाकाचं घर सोडायलाच तयार नव्हती. रवीच्या मुलांशी त्यांचं एवढं सख्य होतं की एकमेकांशिवाय ती जेवणसुध्दा करत नसायची. सोबत खेळणं,सोबत अभ्यास करणं यामुळे त्याचं एकमेकांवर खुप प्रेम होतं. निरोप घेतांना ती एकमेकांना सोडत नव्हती. रवीची मुलंही " काका राहू द्या ना त्यांना इथेच. आम्हाला करमणार नाही त्यांच्याशिवाय" असं म्हणत होती. रडारडी सुरु झाली तशी चारुने आपल्या मुलांच्या पाठीत धपाटे घातले आणि बळजबरीने त्यांना कारमध्ये बसवलं. फ्लॅट मध्ये आल्यावर चारुने सगळं सामान व्यवस्थित बसवलं मग मंदारला म्हणाली
"कसलं मोकळं मोकळं वाटतंय मंदार. शेवटी आपलं घर ते आपलं घर. किती स्वातंत्र्य आहे बघ इथे. केव्हाही झोपा केव्हाही उठा. वाटेल तेवढा टीव्ही पहा नाहीतर मोबाईलशी खेळत बसा कुणी काही म्हणणार नाही. आता आपण काहीही खायला करु शकतो. मी माझ्या कितीही मैत्रिणींना बोलवू शकते,पार्ट्या करु शकते."
"चारु,दादाकडेही आपल्याला खुप स्वातंत्र्य होतं. तिथेही तू सकाळी नऊपर्यंत झोपायचीस. रात्री अकरापर्यंत टिव्ही बघायचीस. कधी कुणी तुला अडवलं नाही"
" अरे पण शेवटी ते रवीदादांचं घर ना. नाही म्हंटलं तरी बंधनं येणारच."
मंदार काही बोलला नाही.
रात्री झोपतांना मंदारला आठवलं त्यांचं लग्न झाल्यावर सहाच महिन्यांनी वेगळं होण्यासाठी चारुने मंदारवर दडपण आणलं होतं. पण ' तू आलीस आणि सहाच महिन्यात एका घराची दोन घरं केली असं होईल आणि लोकं तुलाच नांव ठेवतील. तेव्हा वर्ष होऊन जाऊ दे मग बघू ' असं सांगून मंदारने तिला गप्प केलं होतं. वर्ष संपतासंपता चारु गरोदर राहीली आणि तो विषय बारगळला.चारुला आईवडील नव्हते. एक भाऊ जर्मनीत होता तर बहिण पुण्यात होती. 'चारुचं पहिलं बाळंतपण पुण्यात माझ्याकडेच करु' असं तिच्या बहिणीनेच सांगितलं होतं. पण सातवा महिना उलटला तरी तिचा फोन आला नाही. म्हणून चारुनेच तिला फोन लावला. बाळंतपणाचा विषय काढताच ती म्हणाली
"अगं चारु जरा गडबड झालीये. फ्रान्सच्या दोन मुली माझ्याकडे वर्षभर रहायला येताहेत. त्याच्यासाठी घराचं नुतनीकरणाचं काम सुरु आहे. घरात इतका पसारा आहे की तुला इथे रहाणं मुश्कील होईल. तुझ्या होणाऱ्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून मला वाटतं तू तुझं बाळंतपण तुझ्या सासरीचं केलेलं उत्तम राहील. मात्र पुढच्या बाळंतपणाला माझ्याकडे नक्की ये. तेव्हा मी तुला हक्काने पुण्याला घेऊन येईन"
कुण्या दुरच्या देशातल्या मुलींसाठी आपल्या बहिणीने सख्ख्या बहिणीला झटकून टाकावं ही गोष्ट चारुच्या मनाला खुप लागली. ती रडायला लागली. मंदारने ती गोष्ट रेखा वहिनीला सांगितली. वहिनीने चारुला जवळ घेतलं आणि म्हणाली
" अगं वेडे रडतेस कशाला? मी आहे ना. हे तुझं माहेरच आहे असं समज. आपण करु सगळं व्यवस्थित. काही काळजी करु नकोस"
चारुची डिलीव्हरी झाली. सिझेरियन झालं.प्रतिक्षाचा जन्म झाला.प्रतिक्षा वर्षाची झाली आणि चारुच्या अंगात समाजसेवेचं वारं संचारलं.एक वर्षाच्या प्रतिक्षाला रेखावहिनीवर सोपवून चारुच्या महिला मंडळाच्या मिटिंग्स्,कार्यक्रम सुरु झाले. आकर्षक व्यक्तिमत्व आणि उत्तम वक्तृत्व यामुळे ती लवकरच प्रसिद्ध झाली.वर्तमानपत्रात तिचे फोटो झळकू लागले तसं चारुचं घरातलं लक्ष कमी झालं. स्वतःची दोन मुलं आणि चारुची मुलगी यांना सांभाळताना रेखा वहिनींचा दिवस कधी उलटायचा ते कळायचं नाही पण रेखा वहिनींनी कधीही तक्रार केली नाही.उलट ती चारुचं कौतुक करायची. चारुच्या महिला मंडळात अशाच महिलांचा सामावेश होता ज्यांनी आपल्या सासूसासऱ्यांना हाकलून दिलंय किंवा त्या स्वतःच एकत्र कुटूंबातून बाहेर पडल्या आहेत. चारुच्या संयुक्त कुटुंबाबद्दल त्या तिची चेष्टा करायच्या.मग चारु मंदारवर आगपाखड करायची. मंदारला बायकोचं वागणं खटकायचं.तो ते बोलूनही दाखवायचा.अशावेळी रेखावहिनीच त्याला समजावयाची. प्रतिक्षा दोन अडीच वर्षाची होत नाही तर चारु परत एकदा गरोदर राहिली.पहिलं सिझेरियन झाल्यामुळे डाँक्टरांनी तिला सहाव्या महिन्यापासूनच बेड रेस्ट सांगितला.वचन दिल्याप्रमाणे आपली बहिण आपल्याला बाळंतपणासाठी पुण्याला घेऊन जाईल अशी चारुची अपेक्षा होती.पण याही वेळी तिनं बहाणे केले.
"चारु माझे म्हातारे सासूसासरे माझ्याकडे आलेत आणि रोटेशननुसार सहा महिने ते इथेच रहाणार आहेत. त्यांचं करुनच माझा जीव मेटाकुटीला येतो. तुझ्याकडे मला लक्ष देता येणार नाही. तू म्हणत असशील तर मी येते तुझ्याकडे.तेवढीच सासूसासऱ्यांपासून माझी सुटका"
चारुने मंदारला विचारलं. ती आली की करणार काहीच नाही पण रेखावहिनींवरच तिची सरबराई करायची वेळ येईल हे मंदार जाणून होता. त्याने सपशेल नकार दिला. रागावलेली चारु दोन दिवस त्याच्याशी बोलली नाही. योग्य वेळी चारुची डिलीव्हरी होऊन प्रसादचा जन्म झाला. मागच्या वेळेप्रमाणेच याहीवेळी रात्री रेखावहिनीने तिची काळजी घेतली. प्रसाद पाच वर्षाचा झाला आणि प्रतिक्षा आठ वर्षाची झाल्यावर मात्र चारुने मंदारचं ऐकलं नाही. रवीदादा आणि रेखावहिनीपासून त्याला वेगळं करुनच तिने मोकळा श्वास घेतला. पण असं वेगळं होण्याची शिक्षा मंदार आणि मुलं भोगू लागली. वेळेवर डबे न मिळणं, जेवण न मिळणं, त्यामुळे उपास घडणं असे प्रकार सुरु झाले. त्या अपार्टमेंटमध्ये मुलं होती पण ती आपापल्या फ्लँटमध्ये दार बंद करुन बसायची. अख्ख्या अपार्टमेंटमध्ये कोणी कुणाशी बोलायचं नाही.त्यामुळे मुलांना जेलमध्ये आल्यासारखं वाटू लागलं.चारुचं समाजसेवेसाठी सातत्याने बाहेर रहाणं मुलांना आणि मंदारलाही त्रासदायक होऊ लागलं. मंदारची चिडचिड होऊ लागली. चारुसोबत त्याचे वारंवार खटके उडू लागले. मुलांनी चारुच्या स्वयंपाकाची तुलना रेखाकाकूबरोबर केली की चारु चिडायची. मुलांना फटके लगवायची नाहीतर शिक्षा करायची. तिची स्वतःचीही खुप धावपळ व्हायची. समाजसेवा आणि घरकाम यांचा ताळमेळ बसवणं तिला कठिण होऊन बसलं. शेवटी तिने स्वयंपाकासकट सगळ्या घरकामांसाठी बाई लावून घेतली. यामुळे तिला तर फुरसत मिळू लागली पण मंदार आणि मुलांची नाराजी वाढली. थोडक्यात चारु वगळता कुणालाही या अशा स्वातंत्र्यात आनंद वाटत नव्हता.
     स्वातंत्र्याचे सातआठ महिने निघून गेले आणि एक दिवस चारु आजारी पडली. ताप उतरेना म्हणून टेस्ट्स केल्यावर टायफॉईडचं निदान झालं. मंदारने चारुला दवाखान्यात अँडमीट केलं. भरीसभर म्हणून स्वयंपाक आणि घरकाम करणाऱ्या बाईने लग्नासाठी पंधरा दिवस दांडी मारली. मंदारचे फार हाल होऊ लागले.रात्री मुलांना शेजाऱ्यांकडे ठेवून हाँस्पिटलमध्ये झोपायला जाणं,सकाळी घरी येऊन मुलांना शाळेसाठी तयार करणं,त्यांचे डबे तयार करणं,मग स्वतः तयार होऊन परत हाँस्पिटलमध्ये जाणं,चारुच्या वेगवेगळ्या टेस्ट्स करणं यात मंदारचा दिवस कधी पार पडायचा त्यालाच कळत नव्हतं. चारुच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता.त्यातच तिला चिकन गुनिया झाल्याचं निदान झालं आणि तिच्या हालात अजूनच भर पडली. तिच्या महिला मंडळातील बायका फक्त तिची कोरडी चौकशी करुन जात होत्या पण एकीनेही तिला मदत करायची तयारी दाखवली नाही. एक दिवस संध्याकाळी मंदार चारुजवळ चिंताग्रस्त अवस्थेत बसला असतांना दरवाजावर थाप पडली.मंदारने दार उघडून पाहिलं तर बाहेर रवीदादा आणि रेखावहिनी उभे होते
" अरे दादा वहिनी तुम्ही? तुम्हाला कुणी कळवलं?"
" मंदार अरे चारु आजारी असल्याचं कळवायचंस ना?एक साधा फोन तर करायचास. वेगळा झालास म्हणजे आमचा काही संबंधच राहिलाच नाही का?"रवीने आत येता येता विचारलं.
"तसं काही नाही रे दादा पण...."
"काही बोलू नका भाऊजी. आज प्रतिक्षा आणि प्रसाद घरी आले नसते तर आम्हाला काही कळालं नसतं"
"काय मुलं तुमच्याकडे आलीहेत?"
"हो.आईवडिलांचे होणारे हाल त्यांना पहावले गेले नाहीत म्हणून ती आमच्याकडे आलीत आणि आता चारु घरी येईपर्यंत त्यांना आमच्याकडेच राहू देत"
"बापरे काय भयंकर अवस्था झालीय चारुची." चारुकडे पहात रवी म्हणाला "आणि या कोणत्या दवाखान्यात घेऊन आलास तू तिला? अरे आपल्या इतक्या डाँक्टरांच्या ओळखी आहेत ,चांगल्या डाँक्टरकडे तर जायचंस आणि आपल्या एवढ्या मोठ्या मेडिकल एजन्सीमध्ये सगळी औषधं उपलब्ध असतांना तू विकत औषधी आणलीस?" मंदारला काय बोलावं ते कळेना. रवीने फाईल बघितली.मग म्हणाला " आपण आताच चारुला दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करुया.मी डाँक्टरांशी बोलतो आणि अँब्युलन्स बोलावून घेतो".रेखा चारुजवळ बसली. तिचा हात हातात घेऊन म्हणाली.
"काही काळजी करु नकोस चारु. सगळं व्यवस्थित होईल आणि भाऊजी मी थांबत जाईन रात्री चारुजवळ. तुम्ही जाऊन आराम करा."
ते ऐकून चारुच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
पंधरा दिवसांनी बरी झाल्यावर चारुला रेखावहिनी आपल्या घरी घेऊन आली. संध्याकाळी मंदारने बाहेर खेळणाऱ्या मुलांना हाक मारली.
" चला मुलांनो. आपल्याला आता घरी जायचंय"
प्रतिक्षा आपला भाऊ आणि रवीच्या मुलांसह आत आली. मंदारसोबत रवी,चारु आणि रेखावहिनीही बसली होती." मी नाही येणार तिकडे. तुम्ही मला कितीही बोला,मारा पण मी तिकडे येणार नाही. मी रवीकाकाकडेच रहाणार आहे."
सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतांनाच छोटा प्रसाद आपल्या बहिणीला बिलगला आणि म्हणाला.
"मी पण नाही येणार"
मंदार त्यांच्या निश्चयापुढे आणि आवाजातल्या ठामपणापुढे निशब्द झाला.असा निश्चय आणि ठामपणा आपण का दाखवू शकलो नाही याची त्याला खंत वाटली.
" ठिक आहे मग मी सुध्दा तिकडे जाणार नाही" मंदार चारुकडे पहात म्हणाला
चारुच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिने रेखावहिनींचे पाय धरले.
"वहिनी मी चुकले मला माफ करा.मी खुप वाईट वागले तुमच्याशी" रेखावहिनीने तिला उचलून जवळ घेतलं.
" अग वेडे एकमेकांना सुखदुःखात साथ देण्यासाठीच तर ही बंधनं असतात. मला कल्पना आहे की एकत्र कुटुंबात प्रायव्हसी मिळत नाही. पण ज्या सुखाकरीता आपण ही बंधनं तोडून स्वतंत्र होऊ पहातो ती सुखं क्षणिक असतात. आपल्यापेक्षा ही लहान मुलं बघ किती शहाणी असतात. ती एकमेकांशी भांडतात,माऱ्यामाऱ्या करतात पण पुन्हा एक होतात. आपल्या घासातला घास एकमेकांना खाऊ घालतात. शेअरींगचं सुख त्यांना कळलेलं असतं. आपण मोठे स्वतंत्र होऊ पहातो पण त्या स्वातंत्र्यामुळे येणारी वेगळी बंधनं अजुनच त्रासदायक ठरतात. या सर्व प्रकारात तुझी नाही तुझ्या वयाची चुक आहे. लग्नं झाल्यानंतर मलासुद्धा आपला राजाराणीचा संसार असावा असं वाटायचं. पण नणदा-दिरांची लग्नं, सासुसासरे आणि माझ्यावरचे संस्कार यामुळे मला स्वतंत्र होता आलं नाही. नंतर तर ही बंधनंच मला आवडायला लागली.आता तर मी त्याशिवाय जगूच शकत नाही."
चारुने डोळे पुसले.दिराकडे पाहिलं आणि म्हणाली.
"भाऊजी आम्ही परत या घरात आलेलं चालेल?"
"चालेल? अग हे घर तुझंच आहे चारु. मंदार घेऊन ये सगळं सामान"
मुलांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. ते पाहून मंदारचे डोळे आसवांनी भरुन गेले

© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या " कथा माणुसकीच्या " या कथासंग्रहातील आहे. माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...