एका सकाळी ब्रश करताना उजव्या हाताची मरंगळी वेगळीच भासली. म्हणजे ब्रश पाचही बोटात धरलेला असूनही मरंगळीत ताकद नाही असं वाटलं... त्यापूर्वी डाव्या हाताची मरंगळीही तशीच जाणवली होती. फार विचार करत न बसता नवऱ्याला कॉफी दिली. मी घेतली. नाश्त्यासाठी कांदा चिरतानाही पुन्हा तेच. दोन्ही हातांच्या मरंगळ्याच मरगळल्यासारख्या झाल्या होत्या. इतर बोटं व्यवस्थित काम करत होती. थोडी काळजी वाटली म्हणून आनंदला सांगितलं. दोन्ही हाताची पाची बोटं त्याच्यासमोर उघडून धरली तेव्हा दोन्ही मरंगळ्या बाकीच्या बोटांच्या बरोबर नव्हत्या, थोड्या खाली होत्या. ‘मी काय सांगू, डॉक्टरकडे जाऊन ये..’बघू.. म्हणत मी माझ्या कामाला लागले. स्वयंपाक करतानाही अधुनमधून या मरंगळ्यांनी पुकारलेला असहकार डोळ्याआड करता येत नव्हता. मनातून जावयाचा धावा करत होते. शेखर आला तर बरं होईल.. तो यावर काहीतरी उपाय सुचवेल असं मनातून वाटत होतं, पण तो संध्याकाळी येणार होता. त्यामुळे सकाळी येण्याची शक्यता अगदीच कमी होती.. पण माझ्या हाकेला देवासारखा धावून आला.. आजेसासुबाईंची खबर घेतल्यावर मला ‘कशी आहेस?’ असं त्यानं विचारण्याचा अवकाश, मी त्याला मरंगळ्या कशा काम करत नाहीयेत हे दाखवलं. गंगा-यमुना पापणीच्या काठावर तयारच होत्या.. ‘काय ना गे.. आताच पाउस सुरू झालाय.. क्लायमेट चेंज झाल्यामुळे असं झालं असेल, तरी तुला शंका वाटत असेल तर चल डॉक्टरकडे जाऊन येऊया.’ गंगा यमुनेला कसं तरी परतवत मी हो म्हटलं. पायात चपला अडकवल्या आणि जवळच्या डॉ. महेश आमोणकरकडे गेलो. त्यांनी तपासलं आणि खूप साऱ्या टेस्ट करायला सांगितल्या. उद्या रिपोर्ट घेऊन या म्हणाले. फी देऊन आम्ही खाली आलो. काय करू काही कळत नव्हतं.
‘मम्मी, मला तरी या टेस्टची गरज वाटत नाही. जरा एक दोन दिवस थांब.’
‘मम्मी, मला तरी या टेस्टची गरज वाटत नाही. जरा एक दोन दिवस थांब.’
मी बरं म्हटलं आणि घरी आले. तो माशेलला गेला. जेवून दुपारी ऑफिसला गेले. मैत्रिणींना माझ्याबाबतीत घडलेली ही विचित्र गोष्ट सांगितली. तशाच परिस्थितीत कामही केलं. संध्याकाळी मृण्मयी पिल्लूला घेऊन यायची होती. त्याला नर्सरीचा युनिफॉर्म घ्यायचा होता. युनिफॉर्म घेऊन आम्ही घरी आलो. शेखर माशेलला गेला.. गाडीतून उतरून त्याला बाय बाय करताना माझा डावा हात नेहमीसारखा.. नेहमीइतका वर आला नाही, तसं मी त्याला सांगितलं पण तो घरी जायच्या गडबडीत होता. घरी आल्यावर मी ही गोष्ट मृण्मयीला सांगितली. हात वर करून बघितला पण फारसा वर जाईना. तिने लगेच शेखरला फोन केला. त्याने ‘जातले गो सारखे’ म्हणत फोन ठेवला. घरी आल्यावर हातपाय धुवून कपडे बदलून गाऊन घालताना दोन्ही हातांची हालचाल मंदावली आहे असं वाटलं. जेवायला बसले तर घास घेण्यासाठी पोळी मोडता येईना. मला भात दे कालवून म्हटलं लेकीला. तिने बाऊलमध्ये कालवून दिलेला भात खाताना चमचाही नीट तोंडापर्यंत पोहोचेना. तिनं हे पाहून पुन्हा शेखरला फोन केला. ‘अम्माचं’ मला काही ठीक दिसत नाही, काय ते बघ म्हणाली.
तीन वर्षांपूर्वीच्या जून महिन्यातला शुक्रवार होता हा. ७ जून २०१९. त्या आधी २०१८ च्या जूनमध्ये (शनिवार २३) आणि जुलैमध्ये (शनिवार २८) माझ्या मेंदूच्या आणि कवटीच्या पोकळीत असलेल्या रक्ताच्या दोन गाठी काढण्यासाठी माझी दोन मेजर ऑपरेशन्स झाली होती. अजून वर्षं ही झालं नव्हतं.. त्यामुळे ही नवीन समस्या उद्भवली असावी, असा विचार करून शेखरने रात्रीच डॉ. अमेय परबना फोन केला. सुदैवानं दुसऱ्याच दिवशी शनिवारी (८ जून) न्युरो ओपीडी असल्यानं त्यांनी मला घेऊन ये असं शेखरला सांगितलं. आता माझ्या समस्येचं निदान नक्की होईल, या विश्वासानं मी लवकरच झोपी गेले. सकाळी लेकीच्या मदतीनं कसं बसं आवरून ठरल्यावेळी जीएमसीत पोहोचलो. डॉ. अमेय परबनी सगळं नीट चेक केलं. मेंदूच्या ऑपरेशनची स्थिती बघण्यासाठी सीटीस्कॅनही केलं. त्या गाठींचा काही मागमूसही नव्हता. मेंदूत सगळं आलबेल होतं..
‘शरीरातली एखादी शीर दबली गेली असेल म्हणून असं होत असावं, असं सांगून डॉ. अमेयनी गोळ्या लिहून दिल्या. जीएमसीत चालताना चाल थोडी मंदावली आहे, असं जाणवलं. लंबूटांग शेखरच्या बरोबरीनं चालण्याचा नेहमीच प्रयत्न करणारी मी आज खूप मागे पडत होते... घरी आलो. आजी नातीनं स्वयंपाक घराचा ताबा घेतला होता. मृण्मयीनं औषधं आणताच एक डोस लगेच घेतला. दुपारी आवरून ऑफिसला जायला निघाले. एरवी दर शनिवारी आनंद मला स्कूटरने सोडायचा. पण स्कूटरवर बसू शकेन याचा मलाच विश्वास वाटत नव्हता म्हणून मी रिक्षाने निघाले.. मृण्मयीला माझी काळजीही वाटत होती आणि तीच मला धीर देत होती. ऑफिस गाठेपर्यंत शरीराची एकूणच क्षमता कमी झाल्याचं मला स्पष्ट जाणवत होतं, तरी एक दोन दिवस औषध घेतल्यावर बरं वाटेल, अशीच स्वत:ची समजूत काढली. रिक्षातून उतरणंही कठीण झालं होतं. पैसे द्यायला पर्सच उघडता येईना. त्यालाच शंभर रुपये काढून घे म्हटलं. तो ही चकित होऊन मलाच पाहात होता. चारच पायऱ्या चढायच्या होत्या पण मला भीती वाटत होती, कारण कठडा नव्हता.
कशीबशी वर येऊन जागेवर बसले. कंप्युटर सुरू करतानाही तारांबळ उडाली होती. दोनच लेख एडीट करायचे होते. पण मला ना माऊस हाताळता येईना ना कीबोर्ड. धनश्रीच्या लक्षात आल्यावर तिनं एक आणि हातांची कसरत करत मी कसाबसा दुसरा लेख एडीट केला. बाकीची पानं तयार होती ती पाहिली. राजन सरांनाच बाकीचं पाहा म्हटलं. मला गाडीनं घरी सोडायची जबाबदारी धनश्रीनं आपणहून घेतली. सचिन गाडी घेऊन आला होता. ऑफिसच्या पायऱ्या उतरताना.. चालताना चाल खूपच मंदावल्याचं जाणवलं. करूर वैश्य बँकेसमोर मोठी पायरी चढताना तर पाय फारच कमी वर उचलला जातोय हे जाणवलं आणि पाठीमागे पडता पडता थोडक्यात वाचले. धनश्री दारापर्यंत येऊन मला सोडून गेली. बेल वाजवायलाही हात वर जात नव्हता.
झटापट करून ड्रेस बदलला. पिल्लूशी खेळायलाही जमत नव्हतं.. भूक असूनही हात तोंडापर्यंत पोचत नसल्यानं जेवायची इच्छाच नव्हती. लेकीनं कालवून दिलेला भात कसातरी खाल्ला. आता माझी मलाच काळजी वाटत होती. गोळ्यांचा काहीच असर दिसत नव्हता. देवावर सगळं सोपवून तशीच झोपी गेले.
रविवार म्हणजे आरामाचा दिवस. लवकर जाग आली तरी लोळायचा दिवस.. पण मला लोळताच काय उठताही येईना. पाठच उचलेना. आनंद बाहेर पेपर वाचत बसला होता.. त्याला हाका मारून बोलवलं. दोघांनी धरून उठून बसवलं. मृण्मयीनेच दात घासले. पाणी हातात घेऊन चूळही भरता येत नव्हती. नाश्त्यासाठी बाहेरून इडली आणली. लेकीने लहान बाळाला भरवतात तशी भरवली. आतातर मोबाइलही हातात धरता येत नव्हता. एक दीड इडली खाल्ली आणि आनंदला म्हटलं, ‘काहीही करा आणि मला जीएमसीत घेऊन चला. अजून जर गोळा झाला शरीराचा तर खाली नेणंही मुश्किल होईल तुम्हाला. मृण्मयीने शेखरला फोन केला. काहीही कर आणि ये अम्माची अवस्था अगदीच वाईट झालीये.
तो अर्ध्या तासात गाडी घेऊन आला. आनंद नि शेखरने हाताला धरून खाली नेलं. गाडीत बसताना एक पाय कसातरी गाडीत ठेवला पण दुसरा पाय आणि अंगच उचलता येईना. पडलेच. अर्धी आत अर्धी बाहेर, अशी विचित्र पडले. रस्त्यावरचे एक दोघे आणि आनंदने कसंतरी आत ढकललं आणि गाडीचं दार लावलं.
जीएमसीत पोहोचलो. आनंदने व्हीलचेअरवरून आत ओपीडीत नेलं. मला एका तात्पुरत्या बेडवर झोपायला सांगण्यात आलं. पण एरवी आपण अलगद पाठ टेकतो, तसं न होता माझी पाठ धाडकन आपटलीच बेडला. मग इसीजी काढण्यात आला. ब्लडप्रेशर, शुगर तपासली. सगळे नॉर्मल होते.. एवढ्यावरून निदान काही होत नव्हते. मग एक्सरे काढायला सांगितला. व्हीलचेअरवरूनच तिथे गेलो. पण भिंतीला लावलेल्या एक्सरे मशीनसमोर उभेच राहाता येईना. कशी तरी कसरत करत उभी राहिले एखाद मिनिटासाठी.. पुन्हा ओपीडीत आलो. तो रिपोर्टही नॉर्मल. मला नक्की काय झालंय हा डॉक्टरांना पडलेला प्रश्न. शेवटचा मार्ग म्हणजे एमआरआय. पण रविवार असल्याने जीएमसीतील मशीन बंद होते. वरून ऑर्डर आल्याशिवाय कुणी मशीन सुरू करायला तयार नव्हते. शेखरने आमदार बाबुश मोन्सेरात यांची ओळख काढली आणि माझी अडचण त्यांच्या कानावर घातली. ते स्वत: जीएमसीत आले. त्यानंतर मशीन सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली. पण एमआरआय काढण्याआधी एक दोन तास ते मशीन सुरू करून ठेवावे लागते.. हे दीड दोन तास कसेबसे गेले.. पुन्हा व्हीलचेअरने दूर कुठेतरी एमआरआय मशीन असलेल्या ठिकाणी मला नेण्यात आले. त्यावेळी त्यांचा गाऊन घालणे अनिवार्य. ब्रह्मांड आठवले. त्यावेळी मुलगी सोबत नव्हती. माझ्यासाठी नवरा आणि जावई मिळून सगळी पळापळ करत होते. नातू लहान असल्याने मुलीला घरी थांबणे भाग होते. एकदाची एमआरआयच्या दिव्यातून पार पडले. तासाभराने तो रिपोर्ट आला. तो ही नॉर्मल. न्यूरोसर्जन आणि न्यूरोलॉजिस्ट यांच्यात दीर्घ चर्चा होऊन एकदाचे निदान झाले. गिलिअन बेअर सिंड्रोम. जी बी सिंड्रोम. लाखात एखाद्या व्यक्तीला हा आजार होतो. एकप्रकारचे व्हायरस इन्फेक्शन. हा व्हायरस व्यक्तीच्या मज्जासंस्थेवर (नर्व्हस सिस्टीम) हल्ला करतो. त्यामुळे शरीर लुळे पांगळे होते. अक्षरश: लोळा गोळा. असहाय्य. हा व्हायरस कुठून येतो, शरीरात कसा शिरतो, काही माहीत नाही. मज्जासंस्थेवर ॲटॅक होतो हे खरे.
एवढे सगळे होईपर्यंत संध्याकाळचे साडेपाच वाजले. आणि एकदाचे मला ॲडमिट करून सलाईन लावण्यात आले. रोगाचे निदान झाल्याने सुटकेचा नि:श्वास आम्ही सोडला, पण खरी लढाई पुढेच होती. दुसऱ्या दिवशी शॉक सदृश्य पद्धतीद्वारे माझ्या शरीराचे किती टक्के नुकसान झाले आहे, हे डॉक्टरांनी पाहिले. यात माझ्या शरीराचे ९८ टक्के नुकसान झाले होते. मी माझ्या मर्जीने हात पायच काय, तर बोटही हलवू शकत नव्हते. गळ्यापासून खाली सगळे शरीर लुळे पडले असले तरी सुदैव एवढेच की मी मान हलवू शकत होते. बोलू शकत होते. गिळू शकत होते.. सगळ्या आवेगांच्या संवेदना जागृत होत्या. त्यावर नियंत्रण होते. बारीकशी टाचणी पायाच्या अंगठ्याला टोचली तरी मला ते कळत होते. आता स्ट्रेचरवरून कसेबसे नवीन ठिकाणी एअरबेडवर मला निजवण्यात आले. एकाच पोझिशनमध्ये मी झोपणार असल्याने बेड सोअर्स होऊ नयेत म्हणून ही व्यवस्था. त्यानंतर मुख्य औषधोपचार सुरू झाले. सलाईन आणि त्यातून रोज एक इंजेक्शन. रक्त पातळ राहावे यासाठी पोटावर एक इंजेक्शन. पण एवढ्याने भागणार नव्हते. शरीरात ताकद येण्यासाठी पोटात निदान द्रवपदार्थ जाणे गरजेचे होते. त्यासाठी नाकातून थेट घशात नळी घालण्यात आली. त्यातून नारळपाणी, दूध, सूप, वस्त्रगाळ पेज असे सुरू झाले. कुशीवर वळायचे तरी मला मदत लागत होती. फार अगतिक अवस्था होती माझी आणि माझ्याबरोबर असणाऱ्यांची परीक्षा. दिवसाची वेळ आनंद, शेखर, बहीण सुचित्रा, नणंद वृंदाताई, आईसमान रेखाताई, स्वप्ना, सोनाली, अनघा या भाच्या; विणा, पूजा या मैत्रिणी यांनी वाटून घेतली होती. रात्री मात्र मृण्मयीलाच राहावे लागत होते. अशातच मग मासिकपाळी आली आणि त्रास अजूनच वाढला. कॅथेटर आणि त्यात पॅड, सतत एकाच पोझीशनमुळे निर्माण होणारी उष्णता यामुळे अगदी वैताग आला होता. डॉक्टरांच्या मागे लागून, सतत विनंत्या करून कॅथेटर काढायला लावला आणि डायपर घालणे सुरू केले. पण आई होऊन लेकीलाच डायपर बदलण्यापासून स्पंजिंगपर्यंत सगळे करावे लागत होते. शिकाऊ नर्सेस मुलींच्या मदतीने ती हे सगळं न कंटाळता करायची. रात्री माझ्यासोबतही मृण्मयीलाच हॉस्पिटलमध्ये राहावे लागत होते.
रोज सकाळी डॉक्टरांचा राउंड होत होता, डॉक्टर तेरेझा परैरा, डॉ. अमित परब, डॉक्टर हर्षल आदी डॉक्टर येऊन तपासून चौकशी करून जात होते.
तीन-चार दिवसांनी नाकातली नळी काढण्यात आली. मग तोंडावाटे अन्न खाण्याची परवानगी मिळाली. पण हातात अजून ताकद आली नव्हती. त्यामुळे बरोबर कोण असेल त्यांना मला भरवावे लागत होते. त्यावर्षी वटपौर्णिमा मी आनंदकडून घास भरवून घेऊन साजरी केली. हॉस्पिटलतर्फे रुग्णाच्या गरजेनुसार सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, दूध, चहा आदी गोष्टी वेळच्यावेळी दिल्या जात होत्या. फिजिओथेरपीशिवाय या आजारातून सुटका नव्हतीच. फिजिओथेरपिस्ट येऊन व्यायाम दाखवून जात होती. त्यानुसार पडल्याजागी जमेल तितका व्यायाम मी करत होते. अगदी सुरुवातीलाच स्मायलीचा बॉल आणून तो बोटांनी दाबून हाताच्या बोटांचा व्यायाम सुरू झाला होता. हळूहळू एक एक पाय हलवता येऊ लागला. वर उचलता येऊ लागला. एकासकाळी सुमारे दहा दिवसांनी मी पहिल्यांदा जमिनीला पाय लावला. पण ताकद नव्हतीच. जेमतेम उभी राहिले आणि लगेच बसले बेडवर. मग दोन दिवसांनी जीएमसीत खाली फिजिओथेरपी विभागात जाऊन धरून चालण्याचा व्यायाम सुरू झाला. नंतर दिवसातून दोन वेळा बेडजवळ असलेल्या कठड्याला धरून चालण्याचा व्यायाम सुरू केला. आता औषधोपचार संपले होते. सगळी मदार होती ती फिजिओथेरपीवर आणि माझ्या विलपॉवरवर. असा पडून राहण्याचा कंटाळा आला होता आणि इतरांना माझं करावं लागतंय याचा त्रास तर जास्तच होतच होता. डॉक्टर घरी घेऊन जा सांगत होते.. (त्यात एक दिवस युरीन इन्फेकशन होऊन ताप आला. आणि 3-4 दिवस घरी जाणं लांबलं... ) पण इमारतीच्या वीस पायऱ्या माझ्या मला चढता येणे आवश्यक होते. हळूहळू मी धरून धरून दहा बारा पावले चालू शकते याचा आत्मविश्वास आला आणि आम्ही डिस्चार्जचा दिवस ठरवला. ९ ते २९ जून असे वीस दिवस जीएमसीत राहून मी घरी आले.
मृण्मयी अडीच वर्षांच्या हर्षला सोडून गेले विस दिवस माझ्या सेवेत होती. तिचा बराचवेळ हॉस्पिटलमध्ये जात असल्याने माशेलला जाऊन त्याला भेटूही शकत नव्हती. घरी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी शेखर मृण्मयीला घरी नेतो म्हणाला.
‘‘मला अजून फक्त दहा दिवस दे. अजूनही धरून चालावं लागतंय.. माझं मी जमेल तसं स्वत:चं स्वत: करू लागले की ने..’’
त्याने ते मान्य केलं.. मी पुढच्या दहा दिवसांत चालण्याबरोबरच पायऱ्या चढण्या-उतरण्याचा सराव केला. सोमवारी ८ जुलैला संध्याकाळी मृण्मयी तिच्या घरी गेली आणि मंगळवारी, ९ जुलैला घरी आल्याच्या दहाव्या दिवशी मी ऑफिस जॉइन्ड केलं.
सगळ्यांच्या आशीर्वादानं, शुभेच्छांमुळे, आपल्या माणसांच्या सहकार्यानं आणि माझ्या विलपॉवरच्या बळावर एका जिवघेण्या आजारावर मी फार कमी वेळेत मात केली आणि माझं दैनंदिन आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू झालं.. आज मला या आजाराचा काही त्रास नाही.. भविष्यात काही त्रास होईल का, याचा विचार मी करत नाही.. कधी काय घडेल हे सांगता येत नाही, त्यामुळं हे क्षणभंगुर आयुष्य प्रेमानं.. हसत खेळत जगायचं असतं.. एवढा धडा या व्हायरसकडून मी नक्कीच शिकले..!
चौकट : १ माझ्या आजारपणाचं ऐकल्यावर वहिनी म्हणाली, वन्सं साधा तापही कधी येत नाही तुम्हाला आणि हे काय, कसलं आजारपण आलंय तुम्हाला? मी थट्टेनं म्हटलं, अगं आम्ही लाखात एक माणसं, म्हणून आमचा आजार ही असाच लाखात एक. पण खरं तर रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यानेच आजवर कधी ताप आला नव्हता आणि त्या बळावरच मी या आजारातून सहीसलामत बाहेर आले.. एवढं नक्कीच म्हणू शकते.
चौकट : २ लाखात एखाद्या व्यक्तीला होणारा आजार मला झाला तेव्हाच मला आणि माझ्या जवळच्या माणसांना, सहकाऱ्यांना कळला. अजूनही या आजाराविषयी खूप कमी जणांना माहिती आहे. याविषयी जागृती व्हावी, हाच हा लेख लिहिण्याचा उद्देश.. कुणाला झालाच तर आजारात हात पाय न गाळता धीरानं तोंड द्या आणि न घाबरता आपल्या जगातल्या नंबर वन सरकारी हॉस्पिटलमध्ये, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात भरती व्हा..
चौकट : ३ मानसिक आरोग्य दिनानिमित्त फेसबुक वर एका ग्रुपने लेख मागवले होते.. मी माझ्या आजारावर लिहिल्यावर अनेकजणांच्या कमेंट आल्या. पैकी दोन तीन जणांनाच या आजाराची पूर्वकल्पना होती. एका डॉक्टरांनी लिहिले होते, की या आजारातून बाहेर पडायला दोन-तीन वर्षं ही लागतात. मी खूपच लवकर यातून सुखरूप बाहेर पडले.. एकाने या आजारामुळे जवळचा तरुण मित्र गमावल्याचं लिहिलं.. खरं तर त्या कटू आठवणी उगाळायच्या नव्हत्या म्हणून मी इतके दिवस त्यावर लिहिलं नव्हतं.. पण या लेखामुळे गरज अधोरेखित झाली आणि मी लिहिती झाले.
© अपूर्वा ग्रामोपाध्ये, पणजी गोवा
8806532729
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा