शुक्रवार, ३० जून, २०२३

416. मर्यादा...

 "मधुरा, पुन्हा एकदा नीट विचार कर अन मगच हा निर्णय घे. तू हे असं का वागतीयेस हेच कळत नाहीये मला..मी हवं तर तुझ्या मिस्टरांशी बोलू का? काही वेगळ्या ऍडजस्टमेंट करता येतात का ते बघा.. अगं तुझं खूप मोठं नुकसान होणार आहे या निर्णयाने कल्पना आहे ना? अजूनही संधी आहे, परब तयार आहेतच.. त्यांच्या मागे काहीही व्याप नाही गं अन फक्त दोंन वर्षं राहिलीयेत त्यांची.. प्लिज असा अविचारी निर्णय घेऊ नकोस.."
काकुळतीला येऊन प्राचार्या शुक्ला मॅडम बोलत होत्या. मधुरा केवळ निर्विकार बसली होती.
" फाईन..ऍज यू विश.."
काहीश्या चिडक्या स्वरात म्हणाल्या त्या. त्यांनी पेपरवर तिचं नाव घातलं अन सही केली अन तिची सही घ्यायला म्हणून तिच्यापुढे ते पेपर सरकवले. सही करतानाही ती तितकीच ठाम होती, मग विनंतीचा स्वरात म्हणाली ती,
"मॅडम, फक्त एक रिक्वेस्ट आहे, अजून तीन आठवडे तरी आहेत रुजू व्हायला...तुम्ही प्लिज आत्ताच माझं नाव डिस्क्लोज करू नका. परब सरांशी देखील बोललेय मी हे."
"काय अगं.."
एवढीच फक्त प्रतिक्रिया देऊ शकल्या त्या आणि माझे लेक्चर आहे म्हणत निघून गेली ती फार काही न बोलता.
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला गेली सतरा वर्ष मॅथेमॅटिक्स शिकवायची मधुरा. 'मधुरा' हे नाव अगदीच साजेसं होतं तिच्या व्यक्तिमत्वाला..किंचित गव्हाळ रंग, सुंदर पाणीदार डोळे, चाफेकळी नाक, नाजूक रेखीव ओठ अन त्याखाली असणारा ठसठशीत तीळ, बांधेसूद शरीर..जणू काही एखाद्या साच्यातून काढली असावी इतकी देखणी. तिला पाहताक्षणी कोणीही मोहित व्हावं इतकी देखणी. काळ्याभोर लांबसडक केसांची सैलसर वेणी घालायची ती..सुंदर अशा निरनिराळ्या प्रकारच्या साड्या नेसायची, तिचं एकूणच व्यक्तिमत्त्व आकर्षित करणारं होतं, संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसलं तरी आवाज अतिशय मधुर होता तिचा. बोलण्यात कमालीचा गोडवा होता, या सगळ्यात भर म्हणून स्वतःच्या विषयावर गाढे प्रभुत्व होते. आणि म्हणूनच मुलामुलींची अतिशय आवडती होती मधुरा.
शिक्षण पूर्ण होताच मेरिटवर लागली होती मधुरा या कॉलेजमध्ये, किती काय काय पाहिलं होतं तिने या सतरा वर्षांत, आपल्या विद्यार्थ्यांना घडतांना पाहिलं होतं, अनेक वाईट कठीण प्रसंग हाताळले होते, गौरवाचे अनेक क्षण डोळ्यात साठवून ठेवले होते, मुलींनी त्यांच्या अडचणी तिच्याशी शेयर केल्या होत्या, मुलांनी त्यांच्या क्रश विषयी तिच्याशी चर्चा केली होती. तिने प्रत्येकाला मोठ्या बहिणीच्या-आईच्या मायेनं सांभाळून घेतलं होतं. निरोप समारंभाच्या दिवशी तिला मिठी मारून रडली होती मुलं मुली. किती घट्ट मुळं रोवली गेली होती तीची सुद्धा या सगळ्यांमुळे. गेली सतरा वर्ष झरझरत डोळ्यांपुढून गेली तिच्या, आपल्याच तंद्रीत होती ती खरंतर पण विक्रम सरांच्या आवाजाने भानावर आली,
" गुड मॉर्निंग मधुरा.."
" गुड मॉर्निंग."
एवढंच फक्त बोलून ती आपल्या वाटेने निघून गेली, शक्य तितकं निर्विकार राहायचं होतं तिला, शुक्ला मॅडमशी बोलल्याप्रमाणे तिला इतक्यात कोणालाच काही कळू द्यायचे नव्हते. अगदी आशूला म्हणजेच अश्विनीला, तिच्या कलिगला सुद्धा. अगदी घट्ट मैत्री होती तिची अन आशुची, सात वर्षांपूर्वी आशु जॉइन झाली होती इथे.
" कशी रिऍक्ट करेल आशु तिला हे कळल्यावर, खूप खूप रागवेल आपल्यावर.. कदाचित त्या दिवशीपेक्षाही जास्त.."
त्या दिवशीचा विचार आला मधुराच्या मनात अन भयंकर अस्वस्थ झाली ती. युथ फेस्टिव्हलच्या सांगतेचा दिवस होता तो, बाहेर सगळी आवराआवर चालली होती. आशु अन मधुरा दोघीच स्टाफरूममध्ये होत्या. आशु म्हणाली,
" काय चाललंय मधू तुझं? "
" काय म्हणजे, आवरतीये..निघुया ना आपण पण घरी.."
" तुला नाही कळलं का मी नेमकं काय विचारतेय ते..जरा स्पष्टच बोलते आता..काय चाललंय तुझं अन विक्रम सरांचं? "
" आशु..काही काय.."
" बघ, मी कुठे काही नेमकं विचारलं तुला, अशी का रिऍक्ट झालीस..चोराच्या मनात चांदणं म्हणतात याला.."
" तुझ्या बोलण्याचा रोख कळला मला आशु, असा विचार तरी कसा करू शकतेस तू."
" डोळे मिटून दूध पितांना मांजराला कितीही वाटलं आपल्याला कोणी बघत नाहीये तरी सगळं जग बघत असतंच की त्याला, तसं झालंय तुझं मधुरा..वेळीच सावध हो..तुला खरंच सगळं कळत नाहीये की तू कळत नसल्याचं सोंग घेतलं आहेस मला नाही माहिती पण तुझी आणि विक्रम सरांची मैत्री वेगळ्या वाटेने जायला लागलीये एवढं नक्की."
" आशु प्लिज.." जरा चिडलीच मधुरा.
" मधू, काळजीपोटी बोलतेय मी तुझ्या, अनेक दिवसांपासून बोलावंसं वाटत होतं, एकदा वाटलं नसावं असं काही..पण ट्रिप पासून ते युथ फेस्टच्या काळात मी ऑबसर्व्ह करत आलीये तुम्हा दोघांना आणि मला जाणवलंय असं काहीतरी..म्हणून तुला सावध करावसं वाटलं. विक्रम सरांनी परवाला ऐकवलेली 'शामलबाधा' कविता कोणाला उद्देशून होती असं वाटतंय तुला? तुमचं वाढत जाणारं शेयरिंग बाकीच्यांच्याही लक्षात येतंय मधू, मुलामुलींची तू लाडकी आहेस, विक्रम सरही बऱ्यापैकी फेमस आहेत म्हणून कोणी काही उघड उघड बोलत नाहीत एवढंच...तुला खरंच हे सगळं कळत नाहीये का, जरा इन्ट्रोस्पेक्ट कर स्वतःला.."
कोणीतरी आवाज दिला अन त्या दोघींचं बोलणं मधेच खुंटलं, गडबडीत दोघीही एकमेकींशी न बोलताच निघाल्या. पुढे दोन दिवस कॉलेजला सुटी दिली होती, घरी येताना मधुरा सुन्न होती एकदम, राहून राहून फक्त आशुचे बोलणे आठवत होते तिला, त्या तंद्रीत ती कधी घरी पोचली तेही कळलं नाही. दारावरची बेल वाजवणार तेच तिच्या लक्षात आले की मंदार अन इरा आज सकाळीच गावी गेले आहेत, तिने जवळच्या चवीने लॅच उघडले नी घरात आली, अजूनही आशुचे शब्द घुमत होते कानात तिच्या, ती मट्टकन सोफ्यावर बसली. फ्रेश होऊन कपडे बदलण्याचे भानही तिला राहिले नाही. हतबलपणे दोन्ही हातांच्या ओंजळीत आपला चेहरा झाकत गोळे मिटून घेतले तिने, जरा इन्ट्रोस्पेक्ट कर स्वतःला हे माघाचे आशुचे शब्द आठवले तिला.. खरचंच इन्ट्रोस्पेक्ट करायला हवे का असा तिने विचार केला अन तिला आठवले मागचे सगळे दिवस, युथ फेस्ट पासून ते ट्रिप पर्यंतचे सगळे दिवस.
" परवाला समीर जेंव्हा गायला गिटार वर..दिल संभल जा जरा फिर महोबात करने चला है तू..तेंव्हा आपसूकच नजर गेली होती आपली विक्रम सरांकडे अन तेही बघतच होते आपल्याकडे.. किती ओशाळल्यासारखे झाले होते, ट्रॅडिशनल डे ला आपल्या साडीचा अन सरांच्या कुर्त्याचा कलर मॅच झाला होता अगदीच योगायोगाने, कितीदा तरी नजर जात होती आपली त्यांच्याकडे, या वर्षीच्या युथ फेस्टच्या तयारीत किती आणि काय काय डिस्कशन केलं होतं आपण, विरुद्ध गटातून अंताक्षरी खेळतांना कशी अजाणतेपणी मदत केली होती एकमेकांना, अन ट्रिपच्या वेळी तर..ते प्रवासात एकत्र बसून गप्पा मारणं, चालतांना झालेले पुसटशे स्पर्श, गप्पांच्या ओघात वेळेचं न राहिलेलं भान, समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीपर्यंत बसून त्यांच्या ऐकलेल्या कविता...कवितेवरून आठवलं, त्या शामलबाधा कवितेतील नायिकेचं वर्णन हुबेहूब आपल्याशी जुळतंय हे त्याच वेळी कळलं होतं आपल्याला खरंतर अन मनावर असंख्य मोरपीस फिरल्यासारखं वाटलं होतं."
ताडकन उठली मधू जागेवरून, तोंडावर पाण्याचे शिपके मारले तिने, कपडे बदलून फ्रेश झाली..साधारण पाच मिनिटं स्वतःला आरशात निरखत होती ती, मनात कोणतं द्वंद्व चाललं होतं तिच्या तिलाच ठाऊक..रात्रभर झोपलीही की नाही तिचं तिलाच ठाऊक..
" हॅलो.."
" आज भेटायला जमेल का.."
" हो जमेल की, कुठे भेटूया सांग.."
" माझ्या घरी, कोणीही नाहीये मी एकटीच आहे..वाट पाहते.."
साधारण पंधरा मिनिटांच्या मोठ्या पॉजनंतर मधुराच्या हातावर थोपटत आशूनेच बोलायला सुरुवात केली,
" मधू, बोलणार आहेस काही..काय विचार करते आहेस एवढा.."
तिचा बांधच फुटला, हमसून हमसून रडायला लागली ती, आशूनेही मोकळं होऊ दिलं तिला.
" खूप लहान वयात जवाबदारी पडली माझ्यावर, बाबा लवकर गेले, भावंडात मीच मोठी, लवकरच ही इथली नोकरी लागली.. लग्न झालं, इकडेही मीच मोठी. लहान दिराची, नंदेची जवाबदारी आली, त्यांचं शिक्षण झालं अन मग लग्न..दरम्यान इरा झाली, लग्नाला बारा वर्षं कधी अन कशी झाली कळलंच नाही गं, मंदारचा स्वभाव तू जाणतेस..अतिशय मितभाषी अन अव्यक्त असे आहेत ते, माझ्यावर त्यांचं प्रचंड प्रेम आहे पण मनातल्या भावना, प्रेम, माझी भासलेली कमी कधीही शब्दांत व्यक्त केली नाही त्यांनी, तुझ्यावर हा रंग छान दिसतो, आज तू अमुक ड्रेस घाल असं कधीही सांगितलं नाही मागच्या बारा वर्षात..आम्ही कधीही घंटोंघंटे बोलत बसत नाही आशु, सहजच कधीतरी फिरायला जावं, नवखेपणातील काही जुने क्षण सहजच आठवत बसावेत असं आमचं कधीही होत नाही.."
एक दिर्घ सुस्कारा सोडत ती पुन्हा बोलू लागली,
"याऊलट, याच्या अगदी उलट विक्रम सर आहेत आशु, आमची ओळखच झाली ती इंटर कॉलेज काव्य संमेलनात, आठवतं चार वर्षांपूर्वी काव्य संमेलन आपल्या कॉलेजला होतं, मी वाचलेल्या एका साध्याश्या कवितेच्या प्रत्येक ओळीची काय सुंदर मिमांसा केली होती त्यांनी, एका स्त्रीच्या भावना एका पुरुषाला इतक्या सखोल कळाव्यात? प्रचंड भारावले होते मी तेंव्हा..आणि मग अशीच भारवत गेले त्यांच्या प्रत्येकच गोष्टीने. काय योगायोग म्हणावा गं हा की ते नेमके माझ्याच डिपार्टमेंटचे एच.ओ.डी म्हणून यावेत. रोजचा सहवास, रोजचं डिस्कशन, रोजचे चर्चासत्र. अगदी साध्या अन छोट्या गोष्टींचं देखील ते एवढं कौतुक करतात माहित्ये, म्हणजे अगदी मनातून.. तोंडदेखलं नाही आणि विशेषतः प्रत्येकाचंच करतात फक्त माझंच नाही. सिनियर असूनसुद्धा हा टॉपिक तू माझ्यापेक्षा छान शिकवतेस असं सहज मान्य करतात ते, आमचे वादविवाद पण तेवढेच हेल्दी असतात..त्यांचा ऑराच तसा आहे गं, माणूस नकळतपणे कनेक्ट होतो त्यांच्याशी..त्यांच्याशी कुठल्याही विषयावर अगदी सहजपणे बोलता येऊ शकतं, त्यांची फिरण्याची आवड, जुनी गाणी जुने पिच्चर, नाटकं बघण्याची आवड, त्यांची खवय्येगिरी, रात्र रात्र जागून कादंबरी वाचून संपवून टाकणं सगळंच किती जुळतं माझ्या आवडी निवडींशी! "
भरभरून बोलत होती मधुरा, त्यांच्याविषयी बोलताना तिला विचारच करावा लागत नव्हता, जणू काही ती वर्षानुवर्षे त्यांना ओळखते. अश्विनी फक्त ऐकत होती ते सगळं.
" अशा व्यक्तीला अगदीच अरसिक बायको का भेटली असेल गं आशु, कधीतरी बोलतांना सांगत होते ते..सुटीच्या दिवशी ती उठण्याआधी तिच्या आवडीचा ब्रेकफास्ट करून ठेवतात ते, स्वतः जाऊन तिच्यासाठी साड्या, ड्रेस खरेदी करत असतात नेहमीच..अनेकदा न चुकता गजरा घेऊन जातात तिच्यासाठी, कितीदा तरी दोघंच नवरा बायको लॉंग ड्राईव्हला जातात, मुव्हीला जातात..सुख म्हणजे आणि काय वेगळं असतं सांग..पण ती फार वेगळी आहे, तिला कामाचं टेन्शन असतं, मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टला आहे ना, तिला नसतो वेळ अन असलाच की सुटी आरामात घालवावी वाटते म्हणे तिला. तिला स्वयंपाक करण्यात रस नाही, तिला साडी घालणं कटकटीचं वाटतं अन त्यांच्या कविता तिला कधीही झेपल्या नाही..फार इमोशनल झाले होते सर एकदा सांगतांना. माझी तरी कथा कुठे फार वेगळी आहे म्हणा.
आम्ही सहजच बोलत गेलो, आपला विषय, आपलं डिपार्टमेंट यापासून ते आपले जोडीदार इथपर्यंत हे बोलणं कसं रुंदावत गेलं नाहीच कळलं गं.. त्यांचं लिहिलेलं ते माझ्याशी शेयर करू लागले, मी दाद देऊ लागले.. गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेजेस होऊ लागले, मी माझ्या डब्यासोबतच त्यांच्या साठीही थोडीशी चटणी भाजी आणू लागले, मला आवडलं त्यांनी केलेलं कौतुक अन मी हरखले. मी मधुरा मॅडमची मधुरा कधी झाले हे कळलंच नाही आशु..त्यांची मला इतकी सवय कधी झाली खरंच कळलं नाही मला. पण..पण याला फक्त निखळ मैत्री म्हंटलं तर काय हरकत आहे सांग ना..सांग.."
" तू प्रश्न विचारते आहेस का स्वतःला जस्टिफाय करते आहेस मधुरा..सवय असणं अन ऍडिक्शन होणं यात फरक असतो..आणि मला विचारशील ना तर ही केवळ मैत्री नाहीच.."
" बरं.. तसं म्हणूया तुला वाटतंय म्हणून..पण माझ्या गरजा शारीरिक नाहीतच आशु, माझ्या मानसिक भावनिक गरजा अधिक आहेत."
" असतीलही, नक्कीच असतील..पण कोणत्या जोड्या परफेक्ट असतात मधू? तोच समतोल साधायचा असतो ना आपल्याला. अन कोणत्या फिलिंग्स मर्यादित असतात सांग बरं, मंदार वर्षातून अनेकदा ऑन साईट जातात.. तू कितीदा तरी एकटी असतेस..एखाद्या मोहाच्या क्षणाला बळी पडायला अन आयुष्यात वादळ यायला असा कितीसा वेळ लागणार आहे सांग..एखादी वर्स्ट सिच्युएशन इमॅजीन करून बघ बरं जरा.."
" मग काय करू मी..सांग काय करू..आठ आठ तास एकत्र काम करत असतांना मी त्यांना टाळू तरी कसं..?"
" मला नाही माहिती मधू, पण हे सगळं मला जाणवल्यानंतर तुला सावध करावसं वाटलं..तुला कुठल्याही टेन्शनमध्ये पाहायचं नाहीये मला.."
पुन्हा हमसून हमसून रडायला लागली मधुरा..आशुने मोकळं होऊ दिलं तिला..ती जरा शांत झाल्यावर तिचा निरोप घेऊन घरी गेली ती.
त्या दिवशीनंतर एक वेगळंच अवघडलेपण आलं मधुराच्या वागण्यात, तिने टाळण्याचा प्रयत्नही केला विक्रम सरांना पण ते खरचंच शक्य नव्हतं. दरम्यानच्या काळात मंदारचे प्रमोशन झाल्याने त्याला मुंबईच्या ऑफिसला जॉइन व्हावे लागणार होते, नेमकी तेंव्हाच वाशीच्या कॉलेजला इमर्जन्सी बेसिसवर व्हॅकन्सी निर्माण झाली होती. परब सरांचे फक्त दोनच वर्ष राहिले होते शेवटचे अन ते तिकडे जॉईन व्हायला तयारही झाले होते. मधुराला जेंव्हा ही गोष्ट कळली तेंव्हा तिने विचार केला की नशीब आपल्याला संधी देतंय, या गुंतागुंतीच्या बाहेर पडायचं असेल तर हीच ती वेळ अन तिने मग मंदारला पटवत शुक्ला मॅडमना परब सरांऐवजी स्वतःचे नाव कळवावे असे सांगितले होते शिवाय आपला निर्धार अजिबातही ढासळू नये म्हणून ही गोष्ट कोणालाही कळू न देण्याची विनंती त्या दोघांनाही केली होती. तरीसुद्धा ती जॉईन होण्याच्या साधारण दोन तीन दिवस अगोदर मॅडम नी स्वतः ही गोष्ट अश्विनीला सांगितली होती, उडालीच होती आशु हे कळताच."
वेडी आहेस का मधुरा तू, अगं काय केलंस हे..प्राचार्या पदाची संधी आहे ना तुला पाच सहा वर्षांनी, एकदा बोलायचंस तरी.."
"मग काय करणार होते आशु मी सांग, दुसरा पर्याय नव्हताच गं माझ्याजवळ.. उद्या खरंच माझ्या हातून एखादी चूक झाली असती तर..छे छे! विचारही करवत नाही..मंदार खूप चांगले आहेत अगं, त्यांना मी स्वतः जरी असं काही सांगितलं ना तरी ते विश्वास ठेवणार नाहीत..मला त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायचा नाहीये..मला बारा वर्षाच्या आमच्या नात्याशी प्रतारणा करायची नाहीये..गाव बदलेल, जागा बदलेल, होतील बदल थोडेफार अन नाहीच झाले तर मी स्वतःला बदलेल..आधी होतेच ना मी आनंदी, तशी पुन्हा होईल..तुझ्यामुळे वेळीच शहाणपण आलं आशु..खूप खूप थॅंक्यु.."
असं म्हणत तिने आशूला मिठी मारली होती.
माझ्यासाठी फॉर्मल निरोप समारंभ करू नये अशी तिने सगळ्यांना विनंती केली होती..आपल्या लाडक्या मॅडम जाणार याचे विद्यार्थ्यांना अतीव दुःख होते पण कळत नकळत नेमके कारण सगळ्यांना माहिती असल्याप्रमाणे सगळे गप्प होते, तिने सगळ्यांचा निरोप घेतला, विक्रम सरांचाही निरोप घ्यायला ती गेली. तेही तिच्याच इतके निर्विकार होते..चेहऱ्यावरच्या भावना लपवण्याचे वरदान जणू काही आज दोघांनाही लाभले होते. एका पवित्र नात्याची मर्यादा जपण्यासाठी दुसऱ्या एका अनामिक नात्यातील अमर्याद भावना हृदयात जपत सगळ्यांचा निरोप घेतला होता मधुराने, पुन्हा कधीही न परतण्यासाठी.
प्राजक्ता राजदेरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...