साठ पेक्षा जास्त वयाची नैराश्याने (डिप्रेशनने) ग्रासलेली एक व्यक्ती होती. त्यांची पत्नी त्यांना घेऊन एका मनोचिकित्सकाकडे (सायकॅट्रीस्ट) गेली.
पत्नी म्हणाली :- "हे खूपच निराशाग्रस्त आहेत. यांच्या नैराश्यामुळे घरातील वातावरण बिघडले आहे."
मनोचिकीत्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला बाहेर बसायला सांगितले. त्या व्यक्तीला बोलते केले.
"खूप त्रासात आहे. काळजीच्या ओझ्याने दबला गेलोय. नोकरीचा ताण, मुलांच्या शिक्षण आणि त्यांना नोकरी मिळेल की नाही याची काळजी. घरासाठी घेतलेले कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज.कशातच मन लागत नाही. लोक मला खूपच यशस्वी व्यक्ती समजतात. पण खरंतर माझ्याकडे काहीच नाही. मी खूपच निराश आहे..." वगैरे म्हणत संपूर्ण जीवनाचे पुस्तकच उलगडून सांगितले.
मग त्या विद्वान चिकित्सकाने काही विचार केला आणि विचारले, "दहावीला असताना कोणत्या शाळेत शिकत होतात ?" त्या व्यक्तीने शाळेचे नाव सांगितले.
चिकित्सक म्हणाले:-
"तुम्हाला त्या शाळेत जावे लागेल. तेथून तुमच्या दहावीच्या वर्गाची नोंदवही (रजिस्टर) घेऊन या, आपल्या मित्रांची नावे बघा आणि त्यांना शोधून त्यांच्या आजच्या स्थितीची माहिती मिळवायचा प्रयत्न करा. सर्व माहिती एका वहीत लिहून काढा व एका महिन्याने ती माहिती घेऊन मला येऊन भेटा."
ती व्यक्ती आपल्या जुन्या शाळेत गेली, खुप विनंत्या करुन नोंदवही (रजिस्टर) शोधली व त्याची प्रत बनवून आणली. त्यात एकशेवीस नावे होती. महिनाभर दिवस-रात्र प्रयत्न केले तरीही मोठ्या मुश्किलीने आपल्या पंचाहत्तर ते ऐंशी वर्गमित्रांच्या विषयीच माहिती जमा करु शकले.
त्यांना मोठे आश्चर्य वाटले....
त्यातील पंधरा मित्रांचा मृत्यू झालेला होता... सात मित्र/मैत्रीणी विधवा/विधुर आणि दहा घटस्फोटीत होते... बारा जण नशेच्या अधिन झाले होते, जे बोलण्याच्या लायकीचेही नव्हते. काहींचा तर ठावठिकाणाही माहित होत नव्हता. पाच तर इतके गरीब होते की विचारता सोय नाही. सहा इतके श्रीमंत निघाले की विश्वासच बसत नव्हता. काही कॅन्सरने पिडीत होते, काहींना अर्धांगवायू झाला होता, कुणाला साखरेचा, कुणाला दमा तर कुणी हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते. एक दोघांचा अपघात होऊन हात/पाय किंवा मणक्याचे हाड मोडून अंथरुणावर पडून होते. काहींची मुलं वेडी, व्यसनी, रिकामटेकडी, कामातून गेलेली निघाली. एक कारागृहात कैदेत होता. एक पन्नास वय झाल्यावर स्थिरस्थावर झाला होता म्हणून आता विवाहबद्ध होण्याच्या विचारात होता तर एक अजूनही स्थिरावू शकला नव्हता. दोन घटस्फोट होऊन तिसरे लग्न करायच्या बेतात होता. महिन्याभरात दहावी इयत्तेची नोंदवही (रजिस्टर) भाग्याची व्यथा स्वतः ऐकवत होती.
चिकित्सकाने विचारले :- "आता सांगा, तुम्हाला नैराश्य (डिप्रेशन) कसलं आलं आहे?"
या व्यक्ती च्या लक्षात आले की 'त्याला कुठला आजार नाही, त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे, तो भुकेने मरत नाही, मेंदू अगदी ठणठणीत आहे, कोर्ट पोलिस स्टेशनशी कधीही संबंध आला नाही, त्याची पत्नी-मुलं खूप चांगले आहेत, स्वस्थ आहेत, तोही स्वस्थ आहे, डाॅक्टर दवाखान्याची कधी गरज पडली नाही, मुलांची त्यांच्या करिअरच्या दृष्टीने प्रगतीही चांगली आहे' त्याला असे जाणवले की जगात खरंच खूप दुःख आहे आणि मी खूप सुखी आणि भाग्यवान आहे, तेव्हा नैराश्य येण्यापासून दूर रहाण्यासाठी-दुसऱ्याच्या ताटात ढुंकून पहाण्याची सवय सोडून आपल्या ताटातील भोजन प्रेमाने ग्रहण करावे. तुलनात्मक विचार करु नये,सर्वांची वेळ व नशिब वेगवेगळे असते आणि अजून एक गोष्ट. सांगितलेल्या - ऐकलेल्या निरुपयोगी अर्थहीन गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा