शुक्रवार, २ जून, २०२३

381. एक रामभक्त...

        एका गांवात एक रामभक्त राहात होता . कोणीही काहीही विचारले तरी मला काय कळते . ते सारं रामजी जाणे. हे तूं केलेस? मी कुठं काय केले ते रामजींनी केले. कोणी काहीं दिले तर मंदिरात रामासमोर ठेवणार मग घरी नेणार. कालचक्राच्या प्रवासात मुलं मुलगी मोठी झाली. मुलीच लग्न ठरले , म्हणून गांवच्या सावकारांकडे जाताना रामरायांना सांगून गेला . घर गहाण ठेऊन लग्नाला पैसे कर्जाऊ आणले. लग्न यथासांग पद्धतीने पार पडले. मुलांनी कामधंदा बघितला नोकरी धरली . आलेले पैसे जमा करत सांठवले. हे सारे प्रभूंना सांगून चालले होते. शेवटी एकदाची रक्कम सांठली .ती घेऊन रामरायांसमोर ठेवली . त्यांना सांगून सावकाराला परत फेड पूर्ण रकमेची केली. सावकाराने तशी पावती बनवली व दुसरी पावती करून त्याला सही करायला सांगितले. तो म्हणाला मला लिहीता वाचता येत नाहीं. हे सगळे श्रीरामांना सांगून तुमच्याकडे आलो . जो व्यवहार झाला तो तुम्ही आणि रामराय जाणे. सावकाराने मान डोलावली आणि पावतीवर त्याने त्याचा अंगठा घेतला व पावती त्याच्या हातात सोपवली आणि निरोप घेतला. तो निघाला ते तडक मंदिरात आला देवासमोर पावती ठेवली . चरणावर माथा ठेवला . पावती घेऊन घरी आला कारभारणीला पण आनंद झाला . मुलांना ही आनंद वाटला. हा आनंद फार टिकला नाहीं. सावकाराचा माणूस येऊन सांगून गेला . सावकार पुढल्या आठवड्यात घराचा ताबा घ्यायला येणार आहे. सगळ्या घरावर अवकळा पसरली . मुलांनी वडीलांशी बोलून खात्री केली. दुसऱ्या दिवशी रामभक्त देवळात गेला. ऊरफुटेपर्यंत रामासमोर रडला. देवा अशी बेअब्रू होण्यापासून तूच वांचवू शकतोस. तुला सांगून पैसे तुझ्या चरणी ठेऊन, मगच त्या सावकाराला दिले. त्याने पण परत फेडीबद्दल धन्यवाद मानले आणि पावती दिली . रामराया ती पण तुझ्या चरणी ठेवली. मला लिहिता वाचता येत नाहीं ; हे तुला पण माहिती आहे . त्याने अंगठा घेतला आणि मी दिला . बाकीचे देवा तुम्हांलाच माहिती .
तो सावकार शहरातील कोर्टात गेला दावा दाखल केला. त्याला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या . पै न् पै वसूल झालेला होता आणि अक्कल हुशारीने घरपण घशात घालायला मिळणार होते. कोर्टात दावा दाखल झाला सावकारांने पुराव्यानिशी सर्व कागदपत्रे दाखल केली. रामभक्त न्यायालयात हजर झाला .
न्यायाधीशांनी त्याला विचारले , " तुझ्या बाजूने साक्षीदार कोणी आहे ."
" होय आहे ना ! "
"कोण आहे ? "
" श्री राम . पत्ता राघवदास मंदिर "
" या नांवाने समन्स काढू ते हजर होतील ? " न्यायाधीशांनी विचारले . . " हो ! " एवढेच उत्तरला .
गांवांत येऊन रामासमोर हात जोडून भावपूर्ण उभा राहिला. साश्रू डोळ्यांनी सर्व कथन करून, आता तुलाच माझी लाज म्हणून शांतपणे घरी गेला. न्यायालयाचा शिपाई ते समन्स घेऊन गांवात घर न घर फिरला. शेवटी राघवमंदिरात तो आला. पुजारी महाराज पुढे आले. त्यांचे नांव राघवदास होते. त्यांच्या हातात श्रीरामाचे समन्स दिले . तारखेला रामभक्त मंदिरात येऊन काकुळतीला येऊन बोलला. तो गेल्यावर पुजारी महाराज देवाला म्हणाले, " राजारामा आज समन्स तुमच्या नांवाचे आहे. देवा तुम्ही खरंच जा. तुमच्या शिवाय त्याचे कोणीही नाहीं." असं बोलून आपल्या सजल नेत्रांनी चरण भिजवले .
इकडे न्यायालयात केसची वेळ आली. रामभक्त आंत न्यायाधीशांसमोर हात जोडून उभा राहिला. न्यायाधीशांनी विचारले तुझे साक्षीदार कुठयंत. तो म्हणाला, "आलेले असतील पुकारा द्यावा ." श्रीराम राघवदास राघवमंदिर वासी हाजिर हो. असा तीन वेळा पुकारा झाला. तोच दरवाज्यातून एक वयस्कर व्यक्ती आत येत होती. हातात उंची पेक्षा जास्त उंचीची श्वेत दंडिका. पायात कुर्र कुर्र आवाज करणाऱ्या कलाकुसरीच्या मोजड्या. अंगात बाराबंदी व पिवळे गर्भरेशमी धोती. अतिशय दमदार पावलं टाकत रामभक्त आणि शिपाई यांच्या मधे उभे राहिले . शिपायाने हाताच्या इशाऱ्याने साक्षीदाराचा पिंजरा दाखवला. रामभक्त त्यांना बघून भांबावल्या अवस्थेत बघत राहिला. तिकडे सावकाराने कपाळावर धोतराचा सोगा फिरवला .
आपले नांव मी श्रीराम राघवदास, अवधपुरी. श्रीराम राघवदासांच्या समोर शपथेसाठी गीता धरण्यात आली. त्यांनी शपथ घेऊन सांगण्यास प्रारंभ केला. न्यायाधीश साहेब हा व्यवहार माझ्या साक्षीने झाला आहे. सावकाराने सर्व पैसे मिळाल्यावर त्याच्या खासगी वहीत पैसे मिळाल्याची तारीख वार नोंद केलेली आहे. त्याच वहीत ती पहिली पोच पावती आहे. ती वही यांच्या झोपण्याच्या खोलीतील अशा वर्णनाच्या कपाटात या खाण्यात आहे. सावकाराने आपल्या मुनीमाला दमदाटीने तोंड बंद ठेवण्याचा मोबदला कबूल केलेला आहे. हे सारे मागवून घ्यावे. सर्व सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ होईल. सावकाराला न्यायालयाने ताब्यात घेतले. आणि घरी शिपाई पाठवून मुनीम वही पावती न्यायालयात हजर करवले. श्रीराम राघवदास शांतपणे न्यायालयातून निघून गेले. रामभक्ताला तिथंच हुंदका फुटला. समन्स बजावणारा व्यक्ती पाहून भोचक्का झाला होता.
सर्वच उघडे पडल्यावर मुनीम महाशय व सावकार हतबल होऊन कबूल झाला. रामभक्ताला मूळ पावती न्यायालयामार्फत मिळाली. सावकाराला व मुनीमाला फसवणूकी बद्दल ताब्यात घेतले आणि न्यायालयाने सरकार तर्फे त्याच्यावर दावा दाखल करून घेतला .
पुढे शिपायाने सांगितले, " साहेब समन्स ज्या राघवदासाच्या हातात दिले. ती ही व्यक्ती नव्हे ." न्यायाधीश महाराज बुचकळ्यात पडले. इतकं बरोबर सांगणारी व्यक्ती ही त्यांच्या डोक्याला भुंगा लावून गेली. त्याच रविवारी ते त्या गांवच्या राघव मंदिरात गेले . त्यांना राघवदास भेटले . रामभक्त पण भेटले. पण श्रीराम राघवदास भेटले नाहीं. म्हणून न्यायाधीश साहेब मंदिरात मूर्ती समोर उभे राहिले. अंगातील बाराबंदी सगळं सांगून गेली. त्या केसचा निवाडा करून, राजीनामा देऊन रामसेवेला निघून गेले .
बाह्य़ देह आणि विश्व यांचा विसर पडतो. तो त्या दैवताशी एकरुप होऊन गेलेला असतो. तो साधक आपले कर्म अर्पण करतो म्हणजे कर्म फळ पण अर्पण करतो. प्रत्येक कर्म त्याच्या साक्षीने क्रियमाण करतो. म्हणून सर्वव्यापी भगवंताने साक्षीदाराची भूमिका निभावली .

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...